अशोक नायगावकर यांच्या कवितेविषयी श्रीधर तिळवे नाईक 

उपरोधिक आधुनिक कविता हा आधुनिक कवितेचा एक विशेष काव्य प्रकार आहे आपल्याकडे त्याची सुरुवात काही प्रमाणात मर्ढेकरांच्या कवितेमध्ये दिसत असली तरी प्रत्यक्षात अशा प्रकारची कविता सर्वात उत्तम रीतीने विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे . त्यांच्या काही विरूपिका भन्नाट आहेत. त्यांच्याप्रमाणे लिखाण करण्याचा प्रयत्न मंगेश पाडगावकर यांनी सलाम नावाच्या काव्यसंग्रहात केला असला तरी करंदीकरांची प्रतिभा त्यांच्याकडे कधीच नव्हती. अशोक नायगावकर हे कदाचित असे कवी आहेत ज्यांनी ही करंदीकरी आधुनिक उपरोधिक कविता स्वतःच्या काळाला अनुरूप करून लिहिली पण ते तिथेच थांबले नाहीत त्यांनी त्याला गद्यात्मक उपरोधक निवेदनाची अतिशय चांगली जोड दिली त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये हे मिश्रण फार भन्नाट वाटले. नायगावकरांची आत्ताची गोची अशी आहे की नायगावकर विषयाचे नवे प्रांत शोधत आहेत पण आशयाचे नवे प्रांत शोधत नाही आहेत किंवा त्याबाबत कमी पडत आहेत त्याचबरोबर नवी शैली शोधण्यामध्ये कमी पडत आहेत आणि कळत नकळत रिपीटेशन येत चाललेली आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रश्नांचा गोंधळ आता समोर उभा राहिलेला दिसतो . मी स्वतः हा फॉर्म अपवादात्मक वेळेला हाताळलेला आहे आणि तो लिहिणे किती कठीण आहे याची मला कल्पना आहे. परंतु याबाबतीतली नायगावकरांची जी सातत्यता आहे ती माझ्या माहितीप्रमाणे तरी नंतर कोणालाच साधलेली नाही कुठल्याही वांग्मय संस्कृतीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा प्रकारच्या कवितांची गरज असते आपल्याकडे काही लोक लोकांच्या पासून कविता तुटावीच अशा थाटामध्ये जगायचा प्रयत्न करत असतात. माझ्यामते हे टोक आहे हे टोक गाठले गेले की कविता ही फक्त पंडिती किंवा अभिजन वर्गाची होत जाते आणि तिच्यामध्ये तोच तोच पणा यायला लागतो तेव्हा नायगावकरांच्या कवितांचा पूर्वार्ध हा वांग्मयीन आरोग्य आणि सामाजिक आरोग्य विशेषत: राजकीय आरोग्य चांगला राखणारा उपक्रम म्हणून आपण पाहिला पाहिजे .त्या कविताच आहेत कविता अमुक पद्धतीनेच लिहिली पाहिजे हा दुराग्रह आहे आणि मला तो मान्य नाही नायगावकरांच्या कविता बाद करायच्या असतील तर मग करंदीकरांच्या सुद्धा विरूपीका मधल्या कविता बाद कराव्या लागतील. त्यापेक्षा उपरोधित आधुनिक काव्यप्रकार आपण काव्य प्रकार म्हणून स्वीकारावा हेच उत्तम आहे. नायगावकर आता थांबलेले दिसत असले तरी मुळातच हा फक्त त्यांचा प्रॉब्लेम नाही अनेकांची ही गोची सध्या झालेली दिसते. एक संपूर्ण पिढीच काव्याच्या विकासाबाबत थांबली आहे का असा प्रश्न आपण गंभीर चेहऱ्याने विचारायला हरकत नाही. हे सर्व मी माझ्या अल्पमतीने लिहिलेले आहे त्यामुळे काही चुकले असल्यास माफ करावे.

 श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय