इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका परंपरा वाद विरुद्ध पुरोगामी वाद विरुद्ध उत्तराधुनिक वाद श्रीधर तिळवे नाईक
गेले काही लेख या युद्धाच्या अंगाने लिहिले आहेत. सर्वसाधारणपणे या युद्धातला तात्विक वाद नेमका काय आहे हे आता कोणाला समजेनासे झाले आहे त्यामुळे एका अर्थाने ही एक टिपिकल उत्तराधुनिक chaotic घटना बनलेली आहे जिथे एका बाजूला विचार प्रणालींचा अस्त सेलिब्रेट होतो आहे की काय असा प्रश्न पडतो आहे आणि दुसऱ्या बाजूला परंपरेचा धर्मकेंद्री उत्तर आधुनिक उदय हे सर्व घडवत आहे का असा प्रश्न उदयाला येतो आहे.
मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पर्शियाचा मूळ स्वभाव काय आहे ? याचे कारण असे की पर्शियाच्या देशीवादी धर्माचे मूळ झोराष्ट्रीयन धर्मात आहे हे आता स्पष्ट झालेले आहे पण हा झोराष्ट्रीयन धर्म तरी देशी आहे का ? स्पष्ट सांगायचे तर भारतातल्या वैदिक आणि पर्शिया मधला झोराष्ट्रीयन धर्म यांचे मूळ कुठल्यातरी एका धर्मात आहे जो स्टेप मध्ये तयार झाला होता त्याच्या मग दोन शाखा झाल्या त्यातील एक शाखा इराणमध्ये गेली आणि दुसरी भारतामध्ये आली त्यामुळे झोराष्ट्रीयन धर्म हा मुळात इराणचा देशी धर्म नाही जसा तो आहे म्हणून सांगितले जात आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही. त्यानंतर आलेला इस्लाम हा तर या देशाचा अजिबातच मूळचा धर्म नाही मात्र या दोन धर्मांच्या मध्ये एक फरक आहे. झोराष्ट्रीयन धर्मामध्ये निदान इराण मधले सर्व देशी परंपरांचे प्रवाह सामावून घेण्यात आले होते. इस्लाम बाबत हे पुरेशा प्रमाणात घडलेले नाही . इराण मधल्या लोकांनी झोराष्ट्रीयन धर्म हा स्वखुशीने स्वीकारला होता पण इस्लाम बाबत असे म्हणता येईल का याबद्दल प्रचंड शंकाय . म्हणजेच दोन्ही धर्म हे एका अर्थाने देशी नाहीत पण इस्लाम हा इराणला जास्त हानिकारक ठरला असे इतिहास सांगतो . अर्थात इराणी लोकांचा मूळचा आक्रमक स्वभाव मात्र गेलेला दिसत नाही . भारतावर आणि युरोप वर पूर्वी सुद्धा पर्शियन आक्रमण झालेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे इराण आत्ताच असा आहे असे समजण्याची भूलचूक करण्याची गरज नाही . भारतावरची मुस्लिम आक्रमणे झाली त्यामध्ये पर्सन संस्कृतीचा वाटा होता की नाही हा फार मोठा प्रश्न आहे पण एक गोष्ट भारतातील सर्वांनाच लक्षात आली पाहिजे ती म्हणजे भारतातले आक्रमक पर्शियन म्हणजेच फारसी भाषा बोलत होते . इराणचे आपल्याबरोबरचे संबंध हे कायमच आक्रमक आणि संरक्षक असेच होते . तेव्हा या संबंधांच्या बाबतीत उगाच जे काही रोमँटिक सुरू आहे ते आपण थांबवावे.
आता एकदा ही गोष्ट कळाली की मग प्रश्न असा निर्माण होतो की इराण मध्ये मग इस्लामच्या राजवटीविरोधात नेमके काय चालले होते वस्तुस्थिती अशी आहे की इराण मध्ये पुरोगामी वाद हळूहळू वाढत चालला होता आणि तिथली इस्लामिक राजवट हा पुरोगामी वाद दाबून टाकत होती. वास्तविक आता या लढ्यामध्ये पुरोगामी लोकांनी इराण मधल्या या पुरोगामी वादाला पाठिंबा द्यायला हवा होता पण तो पाठिंबा देणे बाजूला झाले आणि कळत नकळत अमेरिकन उत्तराधुनिक वादा विरोधात लढणारी राजवट म्हणून सर्व पुरोगामी लोकांनी तिला पाहायला सुरुवात केली. अफगाणिस्तान मधल्या तालिबानला पाठिंबा देणारे पुरोगामी आणि इस्लामिक राजवटीला पाठिंबा देणारे पुरोगामी हे सारखेच मूर्ख आहेत .
आता या मधला विरोधाभास असा होता की ही जी काही इराण मधली पारंपारिक राजवट होती किंवा आहे तिला काही झाले तरी इस्त्राएलला पॅलेस्टाईन मधून हाकलून काढायचे आहे त्यामुळे इस्रायल आणि इराण मधला हा प्रश्न संपलेला नाही किंवा इराण आपल्या इस्त्रायल मधल्या टेररिझमला मदत करणाऱ्या ऍक्टिव्हिटी तिथे थांबवणार नाही. इस्रायलला हे व्यवस्थित माहिती आहे . प्रॉब्लेम असा आहे की इस्त्राईल पॅलेस्टाईन मध्ये जे करते आहे ते नेमके काय आहे तर ते उत्तराधुनिक परंपरा वाद आहे . मी हे खूपदा सांगितलेले आहे की उत्तर आधुनिकतेचे आगमन साजरे होण्यामध्ये पाकिस्तान निर्मिती आणि इस्त्राईल निर्मिती यांचा फार मोठा वाटा आहे . आधुनिकतेला हा शह होता . त्यामुळेच अनेक उत्तराधुनिक विचारवंत हे धर्माने ज्यू आहेत .
म्हणजेच आपण जर का इराण मधला अंतर्गत संघर्ष पाहिला तर तो परंपरा वाद विरुद्ध पुरोगामी वाद असा आहे. तर इस्रायल मधला गाझा संघर्ष पाहिला तर तो पॅलेस्टाईन गिळंकृत करू पाहणारा इस्त्राईलचा उत्तराधुनिक साम्राज्यवाद विरुद्ध इराणने पाठिंबा दिलेला परंपरा वाद आहे. जोपर्यंत इस्राईल आणि इराण यांचा हा आपापसात वाद चालला होता आणि आपापसातच युद्ध चालले होते तोपर्यंत जगाला प्रॉब्लेम नव्हता .
जगाला प्रॉब्लेम कुठे सुरू झाला ? तर जगाला प्रॉब्लेम अमेरिकेच्या उत्तर आधुनिक साम्राज्यवादामुळे सुरू झाला . याची सुरुवात मुळात वेनेझूएला मधल्या राजवटीला पाडून तिथल्या तेल विहिरी आपल्या ताब्यात घेणे या घटनेपासून चालू झाल्या. अचानक ट्रंप यांना वाटू लागले की तिथे जे घडवले ते आपण इराण मध्ये घडवू शकतो आणि म्हणूनच मग इराण मधल्या इस्त्राईल विरुद्ध चाललेल्या या संघर्षामध्ये त्यांनी इस्त्राईलच्या बाजूने उडी मारली कारण त्यांना इराण मधल्या तेल विहिरींचा कंट्रोल तिथली राजवट बदलून बनवता येणे सहज शक्य वाटत होते पण त्यांच्या दुर्दैवाने इराण काही वेनेझुएला नाही . अर्थात अमेरिकेचे हे धोरण काही अचानक आलेले नाही . एकेकाळी कम्युनिस्ट राजवटींच्या विरोधात अमेरिकेतला कार्पोरेट वाद अशा प्रकारची युद्ध लढायचा . आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची पोस्ट कॉर्पोरेटवादी युद्धे लढायला प्रारंभ अमेरिकेने केलेला आहे . अमेरिका ग्रीनलँड वर अटॅक करणार नाही याची कसलीही खात्री नाही आणि त्यामुळेच अचानक युरोप सुद्धा अमेरिकेच्या बाबतीत सावधान झाला . या सगळ्या प्रकारामध्ये ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान हिटलरच्या बाजूने उतरले तसे चीन काही करेल का असा प्रश्न आहे . भारतासाठी सर्वात मोठी तापदायक गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे जर चिनने तैवान आणि भूतांन वर आक्रमण केले तर काय ? खुद्द रशिया सुद्धा या प्रश्नामुळे चिंताग्रस्त आहे कारण जर चायना ने आक्रमण केले तर चीन नेमक्या कुठल्या पार्टीचा समजायचा ? त्याला अमेरिका विरोधी समजायचे की अमेरिकेच्या बाजूने समजायचे ? हीच गोष्ट इकडे पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या बाबतीत झालेले झालेली आहे या युद्धामध्ये पाकिस्तानला काही करून अमेरिकेचा पाठिंबा हवा आहे त्यामुळे अमेरिकेला हवा असलेला रोल पार पाडायला पाकिस्तान तयार आहे मग हा रोल इराणच्या बाजूने असो किंवा इराणच्या विरुद्ध असो . पाकिस्तानकडे स्वतःचा कणा नाही हे इराणला माहिती आहे . त्यामुळे इराण भारताला सुद्धा सांभाळताना दिसत आहे. दुसरी गोष्ट इराण इतकेच अफगाणिस्तान सुद्धा अनप्रेडिक्टेबल आहे उद्या जर का इराणने पाकिस्तानला मदत केली आणि अफगाणिस्तान इराणच्या विरोधात उभा ठाकला तर काय करायचे ? त्यांना आता आणखी एक नवा शत्रू निर्माण करायचा नाही त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या युद्धा बाबतीत ते कदाचित शांततेची भूमिका घेतील आणि अलिप्त राहतील. पाकिस्तान दोन आघाड्यांच्या वर लढू शकत नाही त्यामुळे भारतावर आक्रमण करण्याची त्यांची काही योजना असेल असं वाटत नाही निदान आता तरी नाही एक तर त्यांना अफगाणिस्तानशी लढावे लागेल किंवा भारताशी आणि सध्या स्थिती अशी आहे की अफगाणिस्तान अजून दोन वर्षे तरी लडेल . म्हणजे भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता खूपच कमी आहे. चीनला जर का तैवान भूतान वगैरे हवे असतील तर भारताला पाकिस्तान विरुद्ध बिझी करता येणे आवश्यक वाटणे नैसर्गिक आहे त्यामुळे पाकिस्तान जर का भारता विरोधात लढणार असेल तरच तो उपयोगी आहे अन्यथा नाही. चीनला संपूर्ण आशिया खंडावर आणि पुढे जगावर स्वतःचे वर्चस्व हवे आहे. आणि यासंदर्भात त्याचा आशिया खंडातला मुख्य प्रतिस्पर्धी भारतच आहे . जर का तैवानवर हल्ला करून किंवा इतर प्रदेशांच्या वर हल्ला करून ते प्रदेश जोडता आले आणि भारत काहीच करू शकला नाही तर चीन आपणच नंबर वन आहे हे सहज सिद्ध करू शकतो. अमेरिकेची गोची इथे आहे कारण चीन आशिया पुरता थांबेल याची कसलीही गॅरंटी नाही साहजिकच मग चीन विरोधात अमेरिकेला भारताला पाठिंबा द्यावा लागेल त्यामुळेच अमेरिका आणि भारत यांच्या मधले संबंध तळ्यात मळ्यात चाललेले असतात . पाकिस्तान चीन विरोधात लढणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यासाठी त्यांना भारत हवा . या सर्व गोष्टींच्या मध्ये रशिया पूर्णपणे अलिप्त आहे त्याला फक्त अमेरिकेला शह द्यायचा आहे आता इराणला जो रशियाचा पाठिंबा आहे तो केवळ अमेरिकेला शह द्यायचा आहे म्हणून आहे . पण त्यामुळे होते काय रशिया अचानक परंपरावादी होत जातो . ही तीच चूक आहे जी अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तालिबानला पाठिंबा देऊन केली होती . नंतर हा पाठिंबा अमेरिकेला प्रचंड भोवला . आज इराण तात्पुरती सोय म्हणून रशियाची मदत घेत असला तरी उद्या जर का रशियाचा नास्तिकपणा मुस्लिम लोकांच्या विरोधात उभा राहिला तर इराण एकशे एक टक्के रशिया विरोधात उभा ठाकेल . त्यावेळी रशिया काय करणार आहे ? ज्याप्रमाणे अफगाणिस्तान मधून शेवटी अमेरिकेला मदत घ्यावी लागली त्याचप्रमाणे आज ना उद्या रशियाला इराणमधून आपला हात काढून घ्यावा लागेल . इराण आणि रशिया दोघेही एकमेकाची तात्पुरती सोय बघत आहेत .
जगाच्या इतिहासामध्ये हितसंबंधांचा इतका गुंतागुंतीचा नेटवर्क प्रकार कधीही उदयाला आला नव्हता तो इथे आला आहे आणि म्हणूनच सर्वांची भंबेरी उडालेली आहे. प्रॉब्लेम असा आहे की यामधून तिसरे महायुद्ध छेडले जाऊ शकते का ? याचे प्रामाणिक उत्तर माहित नाही सांगता येत नाही हेच आहे .
यामध्ये सगळ्यात मोठी गोची भारताचीच होणार आहे . म्हणजे इस्त्राईल अमेरिका आणि काही प्रमाणामध्ये युरोप एका बाजूला तर इराण रशिया चीन दुसऱ्या बाजूला अशी विभागणी होऊ शकते. जर का चीन उत्तर आधुनिक साम्राज्यवादी झाला आणि त्याने आक्रमण केले तर भारताला चीन विरोधात झक मारत उतरावे लागेल आणि असे झाले तर भारत इस्राएल अमेरिका यांच्या गटांमध्ये जाणार हे उघड आहे. यामध्ये आणखी एका गटाची गोची आहे ती म्हणजे सध्या अमेरिकेच्या बाजूने असलेली मुस्लिम राष्ट्रीय नेशन्स. जर त्यांचा धर्म जागा झाला धर्म प्रेम फानेटिक झाले तर हे देश इराणच्या बाजूने उतरतील . रशिया जर का युकरेन जिंकत पुढे सरकत गेला तर मग युरोपीय देशांना सुद्धा अमेरिकेच्या बाजूने युक्रेंनच्या बाजूने उतरण्याखेरीज पर्याय उरणार नाही.
थोडक्यात काय हितसंबंधांचे नेटवर्क जसे जसे काम करत जाईल तसे तसे हे युद्ध आपला रंग बदलत राहणार आहे . आत्तापर्यंतची झालेली युद्धे निदान आयडियालॉजी बाबतीत स्पष्ट होती . नाझीवादाविरुद्धचा लढा स्पष्ट दिसत होता . आता असे म्हणता येत नाही. कारण मुळातच इराणला इस्त्राईल मध्ये किंवा पॅलेस्टाईन मध्ये उतरायचा अधिकार नव्हता पण तो उतरला . गाजा पट्टीमध्ये इस्त्रायलला इतका हिंसाचार करायला नको पाहिजे होता पण केला गेला आहे. रशियाला मुळातच धर्मवादाच्या बाजूने उतरायला नको पाहिजे होते पण रशिया उतरला आहे आणि चीनने इराणला सुप्त आणि गुप्त मदत जायला नको होती पण चीन मदत करतच आहे .
थोडक्यात काय उत्तर आधुनिक स्थिती अनियंत्रित आणि गोंधळाची कोलाहलाची असते तसे आता झालेले आहे . कधीकधी होते असे की जग जसे असते तसे तुम्ही बनत नसता तर अनेकदा तुम्ही जसे असता तसे जग बनत जाते . आज मनुष्यच कोलाहल ग्रस्त झालेला आहे साहजिकच युद्धाची स्थिती ही कोलाहलग्रस्तच आहे . मनुष्याला जर का खरी ऑर्डर हवी असेल तर त्याला मोक्ष मिळवावा लागतो आणि तो मिळवण्याची कोणाचीच तयारी नाही . मग निदान काही वैचारिक ऑर्डर मिळाली तर मनुष्य थोडा नीट चालतो परंतु उत्तर आधुनिकतेमध्ये ऑर्डर मिळतच नाही व्यवस्था तयारच होत नाही शिस्त उपलब्ध होत नाही अनुशासन भ्रष्टाचार मुक्त चालतच नाही त्याचा परिणाम व्हायचा तो झालेला आहे . कोणाचाच पायपोस कोणामध्ये नाही . यामध्ये सर्वात जास्त भरडला जाणारा मनुष्य हा सर्वसामान्य मनुष्य असणार आहे पण त्याची चर्चा सर्वाधिक कमी होते .
दुसऱ्या महायुद्धाची सर्वात मोठी किंमत ही सामान्य माणसाने मोजली होती एवढे सामान्य माणसाने लक्षात ठेवावे . नेते आपापल्या घरी निघून जातात . सैनिकांची प्रेते दारात येतात सन्मानित होतात आणि मग विसरली ही जातात . नंतर उरते ते त्या त्या घरातल्या लोकांचे माणसे गमावल्याचे दुःख ! हे दुःख सामान्य माणसाचे असते आणि राजकारणी लोक फक्त इतिहासाच्या पानावर जाऊन बसतात .
जगाने आता हे सर्व पुन्हा एकदा रिपीट करायचे आहे का याचा विचार नीट करावा.
श्रीधर तिळवे नाईक
.
Comments
Post a Comment