लोकनाथ यशवंत : चळवळीचा ग्राफ नोंदवणारा कवी श्रीधर तिळवे नाईक 


प्रत्येक कवीचे स्वतःचे अनुभव विश्व असते अनुभव विश्वाचे तीन प्रकार असतात 

१ शक्ती केंद्री:वास्तव वा माया केंद्री 

२ शिव केंद्री:आत्मकेंद्री वा अंत:करण केंद्री 

३ युग्म केंद्री शिवशक्ती केंद्री : ज्यामध्ये शिव आणि शक्ती अंत: करण आणि माया यांचे युग्म वावरत असते मी स्वतः या प्रकारातल्या कविता जास्त लिहितो .


काही काही लोक हे नेहमीच फक्त बाहेर वळलेले असतात आणि ते वास्तव किंवा माया यांच्याच अंगाने अनुभव घेत असतात साहजिकच अंत:करणाला त्या अनुभव विश्वामध्ये फार भाव आणि वाव असत नाही. त्यांच्या कवितेचा आणि अस्तित्वाचा वावर हा फक्त बाहेरच जास्त असतो . हे लोक स्वतःमध्ये फारसे वावरत नाहीत लोकनाथ यशवंत हा या पठडीतला कवी आहे साहजिकच तो एका अर्थाने लोकांचाच नाथ आहे  


भारतामध्ये मी नेहमीच सांगत आलो आहे की पुरोगामी चळवळ ही बसवेश्वरांच्यापासून सुरू होते आणि या चळवळीच्या सर्वात मोठा हिमालय म्हणावा असा विचारवंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर . भारतातल्या पुरोगामी चळवळीचे ते कलमिनेशन आहे . त्यांनी समग्र भारताचा विचार करण्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली विकसित केली जी ते ज्या दलित समूहातून आलेले होते त्याच्याशी निगडित होती. साहजिकच ग्रेस सारखा अपवाद वगळता या समुदायातून आलेल्या सर्वच कलावंतांचा पिंड हा आंबेडकरकेंद्री असतो हे लोक महात्मा फुले यांचा आदर केवळ यासाठी करतात कारण ते माझे गुरु आहेत असे खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे प्रत्यक्षामध्ये फुले समजून घेण्याची त्यांची प्रोसेस किती गहन आहे हा एक फार मोठा वादाचा प्रश्न अलीकडच्या काळात झालेला आहे . किंबहुना ओबीसी हा प्रवर्ग आपल्याकडे यावा म्हणून खेळली गेलेली ही राजकीय खेळी आहे का असा एक फार मोठा प्रश्न मनात निर्माण होतो कारण अनेक आंबेडकरवादी लोकांनी महात्मा फुले समग्र वांग्मय वाचलेले नसते हा माझा अनुभव आहे . खरंतर अनेकांनी संपूर्ण आंबेडकर सुद्धा वाचलेला नसतो . पण निदान आंबेडकरांच्या विचारांच्या विषयी या लोकांना बांधीलकी वाटत असते अर्थात त्यांच्या अज्ञानावर तुम्ही टीका करून चालत नाही कारण अहंकार फार मोठा असतो . एक वेळ ज्ञानाचा अहंकार समजू शकतो पण अज्ञानाचा अहंकार कसा काय समजून घ्यायचा असा एक फार मोठा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे किंबहुना आंबेडकर हे सुद्धा केवळ वापरण्याचे नाव आहे काय असेच हल्ली वाटू लागले आहे . अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा लोकनाथ यशवंत यांच्यासारखा एक ऑथेंटिक म्हणावा असा आंबेडकरवादी कवी लिहितो तेव्हा त्याला फार विशेष महत्त्व असते .


लोकनाथ यशवंत या कवीची शारीरिक प्रत्यक्ष ओळख मला मंगेश बनसोड ह्या आमच्या मित्राने करून दिली . आमच्या भेटी कायमच केवळ टच करणाऱ्या होत्या एक प्रकारचा कम्युनिकेशन गॅप सतत वावरायचा पुढे माझ्या लक्षात आले की लोकनाथचा एकंदर स्वभाव हा काहीसा मवाळ पद्धतीचा आहे तो अत्यंत हसत हसत उपरोधिक टीका करतो आणि बहुदा त्याच्या दृष्टीने मी एक मित्र म्हणून वावरणारा शत्रू आहे पण त्याला हे निश्चित करता येत नाहीये .याचे कारण उघड आहे मी ज्या पद्धतीने आंबेडकरवाद बघतो त्या पद्धतीने आंबेडकर बघण्याची खूप कमी लोकांची तयारी आहे त्यातच माझा स्टान्स प्रथम फुले नंतर आंबेडकर असा असल्याने आंबेडकरवादी लोकांना तो सहन होत नाही . त्यांच्यामध्ये प्रथम आंबेडकर मग फुले आले पाहिजेत मी याला तयार नाही याचे कारण माझी बांधिलकी ही प्रथम फुले यांच्याशी आहे कारण माझ्या मते फुले हे नवशैववादी आहेत आणि अर्थातच ही गोष्ट अनेक आंबेडकरवादी लोकांना पटत नाही . याचे कारण उघड आहे कारण एकदा का समस्त ओबीसी वर्ग शैव झाला की त्याचे नवबौद्ध धर्मांतर घडवणे कठीण जाणार आहे आणि समस्त नवबौद्ध विचारवंतांना काही करून संपूर्ण ओबीसी वर्ग आता नव बौद्ध म्हणून कन्वर्ट करायचं करायचा आहे. साहजिकच माझ्यासारखा माणूस त्यांना विरोधक वाटणे अटळ आहे . त्या उलट मला स्वतःला असे वाटते की समस्त दलित समुदायाने शैव धर्म स्वीकारावा म्हणजेच कळत नकळत हा एक असा सुप्त संघर्ष आहे ज्यामध्ये शैव की बौद्ध असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या मते हा प्रश्न अस्तित्वात नाही याचे कारण माझ्या मते गौतम बुद्ध हा शैव होता . अर्थातच हे साठोत्तरी नवबौद्ध विचारवंतांना मान्य नाही.


हीच गोष्ट सम्राट अशोक बाबतीत आहे माझ्या मते अशोकाच्या शिलालेखामध्ये येणारा ब्रम्हन हा वर्ग म्हणजेच बमन हा वर्ग पंडित होता ब्राह्मण नव्हता आणि अशोकाचे सारे शिलालेख पंडितांचा उल्लेख करतात ब्राह्मणांचा उल्लेख करत नाही याचे कारण पंडित वर्ण जातीभेद मानत नव्हते आणि म्हणूनच ते सम्राट अशोकाला स्वीकारावेसे वाटत होते . त्यामुळेच सम्राट अशोक याने बमण आणि शमण या दोघांनाही आधार दिलेला आहे . त्याच्या शिलालेखामध्ये तसाच उल्लेख आहे . या मागचे कारण उघड आहे ते म्हणजे अशोक प्रथम शैव आहे नंतर बौद्ध आहे किंबहुना त्याचा उल्लेख चंडाशोक किंवा कालाशोक असा होतो याचे कारण तो चंडी आणि काली यांचा भक्त होता . बौद्ध वाङ्मयामध्ये त्याचा तसा उल्लेख आहे. अलीकडे हा अशोक वेगळा आहे असे सांगितले जाते पण त्याला काही अर्थ नाही .कळत नकळत त्याचा स्वभाव सुरुवातीला अत्यंत हिंसक असावा माणसाचा स्वभाव हा अनेकदा तो पुजत असलेल्या दैवतांच्या मधून घडत असतो त्यानंतर मग त्याला मिळालेला धर्म त्याचा स्वभाव घडवत असतो अशोका शैव आणि त्यातही शाक्त आणि त्यातही काली आणि चेंडू यांचा भक्त असल्यानेच तो एवढा उग्र होत गेला त्याचा स्वभाव हा या देवतांच्या पूजनामधून आला होता माझे स्वतःचे मत असे की त्याने बाकीची शक्तीरुपेसुद्धा पाहायला हवी होती म्हणजे त्याला शांतादुर्गा ही कळली असती गौरी ही कळली असती अन्नपूर्णा कळली असती शांभवी कळली असती. अशोकाच्या दृष्टीने गौतम बुद्ध हा शैव आहे आणि म्हणूनच तो त्याचा स्वीकार आरामात करू शकतो . याचे कारण गौतम बुद्धाचा गण हा शाक्त होता आणि खुद्द अशोक सुद्धा शैव धर्मामधला शाक्त आहे याचे कारण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आहे तो आईकडे वाढला आणि वडिलांनी त्याची कायमच उपेक्षा केली . तो आईचा परमभक्त होता साहजिकच शाक्त होत गेला . माझी ही मांडणी अर्थातच आंबेडकरवादी विचारवंत लोकांना मान्य नाही असे आता दिसते अर्थात सामान्य बहुजन दलित लोकांना मात्र ती मान्य आहे आणि त्या लोकांनी हळूहळू का होईना परंतु बौद्ध धर्माबरोबरच शैव धर्माचे पालन सुरू केलेले आहे आणि मी नेहमीच त्याचे स्वागत केलेले आहे कारण ओबीसी आणि बीसी एकत्र येणे चळवळीच्या दृष्टीने आवश्यक आहे . अर्थात काही कट्टर नवबौद्ध आहेत त्यांना मात्र हे मान्य नाही किंबहुना त्यांना ओबीसी आणि बीसी यांची युती व्हावी असे वाटत नाही ऊट सूट ओबीसींच्यावर आणि शैव-धर्मावर टीका करत असतात . भाऊ कदम च्या घरामध्ये गणपती बसला तेव्हा हे स्पष्ट झाले होते . असो 


लोकनाथ अशी काही टीका करत नाही परंतु तो आमच्यासारख्या लोकांना वरवर मित्र मानत असला तरी तो आतून शत्रू मानतो आणि मला याची कल्पना आहे .


त्यामुळेच त्याच्या कवितांच्या वर लिहिताना फार काळजीपूर्वक लिहावे लागते . तो आमच्या आधीच्या पिढीत जन्मलेला आहे . म्हणजे सत्तरोत्तर पिढीच्या शेवटच्या भागातला तो कवी आहे . या पिढीला चळवळ मोठी वाटत होती ती परिवर्तन घडवणार क्रांती करण्यावर तिचा प्रचंड विश्वास होता याबाबतीत ती साठोत्तरी पिढीच्या जवळ होती . या पिढीचा त्यांच्यावर प्रचंड आणि खोल परिणाम होता . त्या उलट आमची पिढी लिहायला बसली तेव्हा तिच्यावर हा अजिबात प्रभाव उरलेला नव्हता . जो काही प्रभाव होता तो कलात्मक प्रभाव होता आशयात्मक नव्हता . अर्थात 90 टक्के लोक नेहमीच पारंपारिक असतात तसे ते आमच्याही पिढीत होते यांनी साठोत्तरीचा भरपूर गौरव केला . पण ज्यांना जाणीव होती त्यांना कळून चुकले होते की एक युग संपलेले आहे. आम्ही जेव्हा नवीन चौथ्या नवतेची मांडणी केली तेव्हा साहजिकच आमच्या आधी असलेल्या या सत्तरोत्तर पिढीने आम्हाला ठाम विरोध केला चौथ्या नवतेला सर्वात प्रथम विरोध करणारे लोक हे या पिढीतच होते यात अरुण म्हात्रे पासून लोकनाथ यशवंत यांच्यापर्यंत सर्व येतात 


त्यामुळेच लोकनाथ यशवंत मला लोकनाथ यशवंत प्रत्यक्ष उपस्थितीत साक्षात प्रथम भेटला तेव्हा तो काहीसा अनकम्फर्टेबल होता . माझ्यासाठी हे नवीन नव्हते कारण भुजंग पण असाच होता . 


ही ती पिढी होती जी "आता होऊन जाऊ द्या" किंवा उलगुलान म्हणत होती आणि लोकनाथाच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे नाव हेच होते आमच्या पिढीबाबतचा प्रॉब्लेम असा होता की आम्ही आता होऊन जाऊ द्या या स्थितीला फारसे पाहिलेच नाही आम्हाला कळत नकळत हा काळ ओसरलेला आहे असेच वाटत होते आणि त्यामुळेच त्याचा जो दुसरा काव्यसंग्रह आला त्या अवस्थेपासूनच आमची सुरुवात झाली होती म्हणजेच लोकनाथ यशवंत यांच्या भाषेत सांगायचे तर "आणि शेवटी काय झाले" इथून आमची सुरुवात होती . पण सुदैवाने नंतर राजीव गांधी आले आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन परिवर्तनाच्या दिशेने सरकायला सुरुवात केली त्याचे पडसाद सुरुवातीपासूनच माझ्या कवितेमध्ये उमटायला लागले आपण एका नव्या दिशेने चाललेलो आहोत याची मला पक्की खात्री होती . एक नवी व्यवस्था एक नवे नेटवर्क उभे राहत होते मात्र या नेटवर्कचा जो फायदा दलित समाजाला मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता आणि त्यामुळे साहजिकच हे जे काही आलेले आहे त्याला नवसम्राज्यवाद म्हणायला या लोकांनी सुरुवात केली ते या नवसाम्राज्यावादा विरोधात उभे राहिले हिंदुत्ववादा विरोधात उभे राहिले आणि यातूनच मग त्यांना पुन्हा एकदा एक नवीन व्यवस्था मिळाली जिच्या विरोधात त्यांना लढता येणे शक्य होते आणि त्यातूनच लोकनाथचा तिसरा काव्यसंग्रह आला तो म्हणजे "पुन्हा चाल करूया" म्हणजे असे की नवीन जी जागतिकीकरणाची नेटवर्क व्यवस्था आली त्याच्या विरोधात आता हे उभे ठाकले . त्यांच्या दृष्टीने हे सुद्धा नवे शोषकच होते . आणि ही जी नवीन नेटवर्क सिस्टीम आहे ती शोषण व्यवस्था होती खरे तर या सगळ्या प्रभावातून बाहेर यायला हवे होते परंतु हे बाहेर येणे फार अवघड होत गेले. साहजिकच चौथ्या नवते मधले बांधकाम बाजूला राहिले आणि साठोत्तरी ने तयार केलेल्या एका तयार दृष्टिकोनातूनच जो आधीच बांधला गेला होता आणि जो पारंपारिक होता या नव्या बांधकामाचा विरोधच प्रकट करणारी कविता येणे अटळ झाले . लोकनाथ चा तिसरा संग्रह हा या बांधकामा विरोधात उभा ठाकलेला संग्रह आहे.


मला हे मान्यच नव्हते याचे कारण असे की मी याबाबतीत सुरुवातीला ही गोष्ट नेमकी कशी घडते आहे ते पाहत होतो कवितेच्या भाषेत सांगायचे तर बांधकाम चालू झाले होते आणि ते बांधकामच आधी नीटनेट पाहणे आवश्यक होतं मी ते पाहत होतो माझ्या कवितांच्या तानात होतो आणि त्याला चौथी नवता असे नाव पण देत होतो आणि त्यातील अंतर विरोध आणि शोषण व्यवस्था सुद्धा समग्रपणे साकार करत होतो .या लोकांना हे सगळे समग्र पाहण्याची गरज वाटत नव्हती कारण यांनी साठोत्तरी मार्क्सवादी चष्मा लावला होता म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला विरोध करण्याची तयारी कसलाही विचार न करता सुरू झाली. मला हेही मान्य नव्हते कारण माझ्या मते कुठलीही नवी गोष्ट प्रथम नवता म्हणून व्यवस्थित उभी राहत असते आणि तिला नीट बघावे लागते आणि तिच्या विरोधात जर का तुम्हाला उभे राहायचे असेल तर तुम्हाला नवीन पद्धतीने सर्व व्यवस्था आणि नवीन पद्धतीने सर्व विरोध उभा करावा लागतो पण आधी नीट बघायचे नाही आणि मग ती उभी राहिल्यानंतर तिच्यावर तुटून पडायचे आणि तेही जुन्या दृष्टिकोनातून हे माझ्या मते परंपरा सांभाळण्याची लक्षणे आहेत त्यामुळे मी या लोकांना परंपरावादी म्हणायला लागलो त्यांना हे मान्य नव्हते . किंबहुना त्यांनी या काळामध्ये नेटवर्क कसे उभे राहिले ते समग्र आणि सम्यक पाहिले नाही मात्र जेव्हा हे संपूर्ण नेटवर्क त्यांच्या आयुष्याच्या पुढेच उभे टाकले तेव्हा मग यांना पुन्हा नव्याने जाग आली आणि मग याबाबतीतला उत्कृष्ट प्रतीकार अरुण काळे यांच्या कवितेत आला . भुजंग मेश्राम यांच्या कवितेत आला मात्र हे दोघेही काहीसे गुंतागुंतीच्या भाषेत बोलत होते याचे कारण यांनी नामदेव ढसाळ व्यवस्थित आत्मसात केला होता . दुसरी गोष्ट यांच्याकडे कवी म्हणून असणारी कल्पनाशक्ती होती साहजिकच यांच्या कविता या अधिक भरीव आणि कविता या वांग्मय प्रकारची वाङ्मय प्रकार म्हणून जास्त जवळची आणि कवितेची कविता म्हणून अधिक काळजी घेणारी अशी त्यांची कविता होती . पण या कवितेचा प्रॉब्लेम एक होता तो म्हणजे ही कविता सामान्य माणसाला समजत नव्हती आणि इथेच लोकनाथ यशवंत यांचे महत्त्व येते लोकनाथ यशवंत हा असे गुंतागुंतीचे लिहिण्याच्या फंदात पडला नाही त्यापेक्षा लोकांच्या भाषेमध्ये आपली कविता आली पाहिजे याविषयी तो आग्रही होता . मी स्वतः कवी म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये असा आग्रही होतो त्यामुळे मला हा आग्रह समजून घेणे अवघड गेले नाही पण त्याबरोबर हेही खरे होते की यामुळे आकलन सपाट होण्याची शक्यता निर्माण होते . पण लोकनाथाला याची परवा नव्हती त्याच्या मते कविता लोकांना कळायलाच हवी आपण कवितेला लोकांच्यात परिवर्तन घडवण्याचे माध्यम म्हणून वापरतो तर ती लोकांना कळावी अशीच असली पाहिजे . नामदेव ढसाळ यांची कविता कितीही लोक अभिमुख असली तरी ती लोक कविता नव्हती. त्यांच्या कविता लोकांना सगळ्याच्या सगळ्या कळत नव्हत्या मात्र काही ओळी लोकांना अपील होत होत्या आणि लोकांना ज्या अपील होत होत्या त्या सर्व ओळी अतिशय लोकभाषेत लिहिल्या गेल्या होत्या . साहजिकच लोकनाथ हा लोकभाषेचा कवी होता आणि आहे मी स्वतः सुरुवातीला अशा प्रकारच्या भाषेबाबत आग्रही होतो कारण जे जे मार्क्सवादी आणि डाव्या विचाराचे आहेत तिथे हा आग्रह नेहमी स्वीकारला जातो कविता जर का लोकांना मान्य होणार नसेल कळणारच नसेल तर ती कविता काय कामाची हा प्रश्न मीही विचारलेला आहे . पण तो माझ्या मते बाळबोधपणा होता . सुदैवाने हा बाळबोधपणाचा काळ एक वर्षापेक्षा अधिक टिकला नाही माझ्यामध्ये जी काय आत्मक्रांती झाली त्याच्यामुळे सर्व बदलले पण लोकनाथ बाबत असा काही प्रश्न नव्हता . त्यामुळेच त्याच्या कविता साध्या आणि सोप्या झाल्या . मात्र त्याचबरोबर त्याच्या कविता कधीकधी थेट आणि सत्त्यावर अचूक बोट ठेवणाऱ्या होत्या म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर या कवितेत


 "क्रुद्ध समूहातील एक संथ पावलांनी समोर आला

आणि

अल्प श्रमाने त्याने माझे दिशा दाखविणारे बोटच तेवढे तोडले."


या ओळी एका छोट्याशा तुकड्यात आंबेडकरवादी चळवळीचे झालेले किंवा केले गेलेले दिशाहीन पतन सारतत्व भाषेत सांगतात . लोकनाथ यशवंत यांची ही शैली आहे. हिला मी नेहमीच सुभाषितात्मक शैली म्हणतो मी स्वतःही तिचा वापर करत असतो . पण हा वापर अंशात्मक असायला हवा अर्थात लोकनाथ हे करत नाही तो संपूर्ण कविताच अशा पद्धतीने लिहायला जातो पण हे करताना अनेकदा मग सुरुवातीला वर्णनात्मक शैली घ्यावी लागते आणि ती अनेकदा मग गद्य व्हायला लागते मला हे थोडेसे माझ्या धाटणीत बसत नाही असे वाटते. पण तो हे करतो आणि मग अचानक ही सुभाषितात्मक शैली येते आणि संपूर्ण कविता कलाटणी घेतल्यासारखी इम्पॅक्ट प्रभाव टाकते.


आपण जर का त्याच्या या शैलीचा विचार केला तर कळत नकळत त्यावर उर्दूतल्या कवींचा प्रभाव आहे असे दिसेल . या मागचे कारण उघड आहे तो ज्या वातावरणात वाढवला गेला ते वातावरण हिंदी केंद्रीय होते उर्दू केंद्रीय होते साहजिकच त्याचा परिणाम झालाय दुसरी गोष्ट मुस्लिम लोकांना आंबेडकर वादाच्या मांडणीमध्ये भाऊ भाऊ असा आधार आहे असे वाटणारे जे विचारवंत कलावंत आहेत त्यामध्ये लोकनाथ यशवंत सुद्धा येतो. त्यामुळेच मिर्झा गालीब वर सुद्धा तो इतर कवींच्या प्रमाणेच कविता लिहितो किंबहुना आमच्या पिढीची आणि आमच्या आधीच्या पिढीची जी काही वैशिष्ट्य दिसतात त्यातील एक म्हणजे प्रत्येकाने मिर्झा गालिबवर एक कविता लिहिली पाहिजे अशी काहीतरी सक्तीच होती बहुदा. वास्तविक गालिब मोठा केला तो साठोत्तरी पिढीने खुद्द भालचंद्र नेमाडे यांच्या एका पुस्तकाच्या सुरुवातीला गालिब आहेच . दुसरी अशीच एक लाडकी थीम म्हणजे बैल माझ्या माहितीप्रमाणे वसंत सावंत यांच्या बैल या कवितेपासून ती सुरू झाली आणि दशकांच्या कवितेमध्ये असलेल्या एका कवीची ज्याचे नाव आता मला आठवत नाही बैल नावाची कविता आहे बहुतेक नारायण कुलकर्णी कवठेकर पण लोकनाथ यशवंत याचा बैल वेगळा येतो कारण इथे बैलच बोलतोय लोकनाथ यशवंत उपरोधाचं हत्यार अतिशय प्रभावीपणाने वापरतो. या कवितेत हेच घडते कारण बैल शेवटी शेतकरी नावाच्या मालकाला विचारतो की तरी तुम्ही मालक आत्महत्या का करता ? त्यातून कळत नकळत आपल्याला तो बैल आणि शेतकरी हे वेगवेगळे नाहीत दोघांची स्थिती एकसारखीच आहे हे जाणवते प्रतीत होते आणि ही कविता लिहिण्यामागचा उद्देश तोच आहे असे वाटते. 


आता प्रश्न एवढाच आहे की कवी हेच आता बैल झाले आहेत का आणि माझ्या मते जर का ते बैल झालेले असतील तर हा बैल माझ्या मते डिजिटल आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय