उत्तर आधुनिक साम्राज्यवाद , ब्राह्मणी हिंदुत्व ,मोदींचा अस्त आणि ट्रम्प हे तिसरे का ? श्रीधर तिळवे नाईक 

काही महिन्यापूर्वी मी जेव्हा मोदींच्या अस्ताविषयी एक लेख लिहिला होता तेव्हा अनेकांना तो अवेळी आणि अस्थायी वाटला होता आणि अलीकडे ज्या घटना घडत आहेत त्यावरून बहुदा मी का हा लेख लिहिला होता समजून यायला हरकत नाही. अर्थातच यामागे इतिहासाचे आकलन आहे . 

सर्वसाधारणपणे ब्राह्मणी हिंदुत्व एक खेळ नेहमी खेळते तो म्हणजे ते सर्वात प्रथम जर कोणी आपल्यापैकी येत असेल तर त्यालाच मुख्य नेता बनवून राजवट ताब्यात घेतली जाते मौर्य राजवट अशीच सेनापतीला पुढे करून ताब्यात घेतली गेलेली आहे.

जेव्हा हे शक्य नसते तेव्हा मग कुठला ना कुठला तरी एक नेता असे आणते जो बहुजनातून आलेला असतो त्याला मग ती प्रस्थापित करते आणि मग हळूहळू त्याचे क्षत्रियकरण घडवून त्याला राम आणि कृष्ण यांच्या तत्त्वज्ञानात बसायला लावून सावकाश आपली राजवट आणते. कधी कधी असे नेतृत्व आणणे त्यांच्या हातात नसते तेव्हा मग अर्थातच धोरण बदलते . मग असे एखादे नेतृत्व निर्माण होते का याची ते वाट बघते आणि मग त्याला क्षत्रियाचा दर्जा देत आत्मसात करते आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या बाबतीत वैदिक राज्याभिषेक करून हेच साधलेले आहे. आणि एकदा का हा क्षत्रिय गंड पसरत गेला की मग तो अनेक वीर पुरुषांना ग्रासायला लागतो आणि क्षत्रियत्वाचा काल्पनिक अहंकार बाळगायला लागतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या वारसदारांना बहुजन वारशा पासून बहुजन समाजापासून तोडतो . बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत अलीकडे हे व्यवस्थित घडवलेले आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की उद्धव ठाकरे यांना हे कळले नाही . एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वाटच बघितली जात होती तसेच काहीसे ठाकरे यांच्या बाबतीत झालेले आहे. एकदा का मुख्य नेता गेला की मग वारसदारांच्यात वारसा हक्काच्या लढाया सुरू होतात हे व्यवस्थित माहित असलेले लोक हा लढा कुठे सुरू होतो ते बघतात वेळप्रसंगी स्वतः काड्या टाकतात . आणि अंतिम शेवट यातच होतो की वारसदार आपापसात भांडायला लागतात आणि मग कोणीतरी एक असा येतो जो नामधारी वारस बनत जातो आपल्याकडे शिंदे असे नामधारी वारस म्हणून आणले गेले अर्थात यानंतर मग हे लोक व्यवस्थित ती सत्ता ताब्यात घेतात शिंदे सेना ही अशी ताब्यात घेतली जाणार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि तो शिंदे यांच्यापुढे नक्की आहे. आपल्याकडे ही गोष्ट पूर्वी सुद्धा शिवशाही बाबत झालेली होती . उत्तर पेशवाई मध्ये अमलात आणली गेलेली आहे आणि त्यापूर्वी सेवन म्हणजेच नंतर ज्यांना यादव केले गेले त्यांच्या बाबतीत झालेले आहे पण हे लोक नेहमीच एक गोष्ट विसरतात ते म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांनी हे उद्योग केलेले आहेत तेव्हा तेव्हा तेथे राज्य कोसळलेले आहे आणि कोणीतरी तिसरा जो अनेकदा बाहेरचा असतो त्याचा फायदा उठवत स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मोकळा झालेला आहे. यादवांच्या काळात हे मुस्लिम लोकांनी केले आणि पेशवाईच्या काळामध्ये याचा फायदा इंग्रजांनी घेतला प्रश्न असा आहे की आता डोनाल्ड ट्रम्प या मालिकेतील तिसरे आहेत का ?

तुम्हाला आवडो अगर ना आवडो ज्याप्रमाणे तुमचे अस्तित्व असते त्याचप्रमाणे बाहेर तुमच्या अस्तित्वाबाहेर अनेक लोक असतात राजकीय बाबतीत सुद्धा बाहेरच्या राजवटी या अस्तित्वात असतात दुर्दैवाची गोष्ट अशी की नेहरू सारख्या लोकांना हे कळत नाही ते काहीतरी रोमँटिक होऊन जातात . त्यात पुन्हा मोक्षवादी लोक हे विश्वचि माझे घर म्हणत असतात पण प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांमध्ये ही गोष्ट अस्तित्वात नसते . त्यामुळे बुद्ध आदर्श मानायला ठीक असतो, पसायदान आदर्श मानायला ठीक असते पण चायना बुद्धिस्ट असला तरी पसायदान वगैरे गोष्टी ऐकत नसतो . तो आक्रमण करतोच . आज ना उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश गप्प बसणारच नाहीत ते कुठल्या ना कुठल्या तरी बलाढ्य शत्रूशी युती करून आपल्यावर हल्ला चढवणारच . शक्यता अशी आहे की हे प्रथम दोघे एकत्र युती करतील . त्यामुळे नेहमीच बाहेर काय चालले आहे त्याच्यावर अतिशय व्यवस्थित नजर ठेवावी लागते . विश्वात्मक ठीक असते परंतु अनेकदा बाहेरचा जंगली बनूनच येतो . कधीकधी आतलाच दुसरा होतो नथुराम गोडसे हे उत्तम उदाहरण आहे.

त्यामुळेच जेव्हा शैव धर्म निर्माण झाला तेव्हा त्याने व्यवस्थित राजनीती खेळली पाहिजे हे पक्के स्वीकारले . ज्या प्रकारचा विश्वात्मक आदर्शवाद आपणाला जैन आणि बौद्ध धर्मात दिसतो त्या प्रकारचा विश्वात्मक आदर्शवाद शैव राजनीती मध्ये नाही . त्यामुळेच अनेक शैव राज्यकर्ते स्वीकारणे अलीकडच्या काळात अनेकांना अशक्य बनले . वास्तविक मोक्षामध्ये विश्वात्मक व्हावेच लागते पण याचा अर्थ असा नसतो की जनावरांना ओळखू नये . विशेषता विषारी साप ओळखावेच लागतात. आतले आणि बाहेरचे ही !

साहजिकच या शैव राजनीती विरोधात ब्राह्मणी हिंदुत्वाने कधी कल्पनेने तर कधी प्रत्यक्षतेने अशा प्रकारची कारवाई केलेली आहे. 

दुर्दैवाची गोष्ट अशी की सर्व राज्यकर्त्यांना कधीही राजकारण अशाप्रकारे चालते हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांना हे कधीही कळलेले नाही की काय चालले आहे वास्तविक त्यांनी सेक्युलर लोकांच्या बरोबर जायलाच नको पाहिजे होते . त्यांनी हे एक असे तात्विक कारण पुरवले की ज्यामुळे त्यांचा पराभव करणे खूपच सोपे झाले . काँग्रेसचा हिंदुत्ववादाचा काय संबंध काँग्रेस कधी हिंदुत्ववाद स्वीकारणार आहे का? मग उगाचच हिंदुत्ववादाने सेक्युलर लोकांशी का तडजोड करावी ? यामध्ये शक्य आहे की कदाचित भाजपने वचन मोडले परंतु वचन मोडण्याची प्रोसेस काय आहे हे लक्षात घेऊन वेगळी आखणी झाली पाहिजे होती. ती आखणी करण्यामध्ये उद्धव ठाकरे कमी पडले .

२०१४ यावर्षी अशीच काही खेळी खेळली गेली का असा एक फार मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे .आता बहुजन समाजातील एकमेव नेतृत्व जे सर्वोच्च स्थानी आहे त्याला पुढे आणले गेले तिथे पुढे आले असा हा पहिला प्रश्न आहे आणि हे करताना नेहमीप्रमाणे शैव धर्माचा आधार घेतला गेला अत्यंत जाणीवपूर्वक हर हर महादेव म्हणणारे नेतृत्व आणले गेले का हा दुसरा प्रश्न आहे . मोदी यांचे नेतृत्व आणल्यामुळेच सगळा ओबीसी प्रवर्ग आणि वैश्य भाग हा मोदी यांच्या मागे गेला . प्रश्न इतकाच होता की ही केवळ चाल आहे की खरोखरच मनापासून हे केले गेलेले आहे ? येत्या दोन वर्षात ही गोष्ट स्पष्ट होईल की हे नेमके काय होते आणि आहे. 

शैव नेतृत्वाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की त्यांचा नेता कधी त्यांचा राहत नाही. तो कायमच तथाकथित उच्च वर्णीय बनत जातो आणि मग ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्याची अवस्था बनत जाते . हे लोक अत्यंत जाणीवपूर्वक पाठीमागून वैष्णव वाद आणतात आणि शेवटी त्यांना जे करायचे आहे त्यांना जे घडवायचे आहे ते घडवतात . याची सुरुवात म्हणून एक रणभूमी तयार केली जाते . आत्ता ही जी रणभूमी तयार केलेली आहे ती प्रामुख्याने यूजीसी एक्ट ही आहे . यामागचा उद्देशच हा आहे की सर्व ओपन लोक एकत्र यावेत आणि ते ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावेत. म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य लोकांनी आता ब्राह्मणांच्या अंकित व्हावे आणि मग ब्राह्मण हा संपूर्ण लढा पुढे नेत जातील . साहजिकच आता मोदींच्या पुढे दोनच प्रश्न आहेत पर्याय आहेत एक तर त्यांना हा ऍक्ट कॅन्सल करावा लागेल हा कायदा कॅन्सल करावा लागेल किंवा ओबीसी,बीसी आणि आदिवासी यांची स्वबळावर युती घडवून आणावी लागेल आणि ओपन वाल्यांच्या समोर उघडपणाने स्टान्स घ्यावा लागेल . मोदी यांची आता या गोष्टीला तयारी आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

ब्राह्मणी हिंदुत्ववादाबद्दल जशी एक खात्री असते की हे काय करणार तशीच खात्री युरो अमेरिकन लोकांच्या बद्दल असते कित्येक शतके हे लोक आपल्या साम्राज्यवादाच्या वेगवेगळ्या आकारांना सादर करत जास्तीत जास्त देश आपल्या कह्यात ठेवायला बघत असतात . पुरोगामी पद्धतीचे साम्राज्य युरोपियन लोकांनी मोठ्या प्रमाणात आणले त्यांचा साम्राज्यवाद भारतभर पसरला होताच यानंतर जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर या साम्राज्याचा अस्त झाला तेव्हा मग आधुनिक साम्राज्य निर्माण करण्याची धडपड झाली आणि त्यातूनच एक शीतयुद्ध नावाची गोष्ट झाली . आता उत्तर आधुनिकतेने जे काही तत्त्वज्ञान आणलेले आहे त्याच्या साह्याने एक नवे साम्राज्य आणि साम्राज्यवाद आणण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी सुरू केलेला आहे असे दिसते आहे . हे उघड आहे फक्त या वेळेला युरोअमेरिकन युती झालेली नाहीये पण ती कधीही होऊ शकते मुळात अमेरिकेने निमित्ताने युरोपच आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केलेली असल्याने हा गोंधळ झालेला आहे. मुलाने आपला बाप ताब्यात घ्यावा तसे काहीसे डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.

मुळातच उत्तर आधुनिक साम्राज्यवादाची सुरुवात इस्लाम पासून झाली धर्मअधिष्ठित साम्राज्य निर्माण करणे हा इस्लामचा अजेंडा आहे आणि याची सुरुवात pan इस्लामिक चळवळीपासून सुरू झाली होती पुढे मग अत्यंत पद्धतशीरपणे पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण करण्यात आले . मग खोमिनी आले . अमेरिकेला मुळातच धार्मिक साम्राज्यवाद आणि धार्मिक राष्ट्रवाद हा हवा होता याचे कारण अशा प्रकारचा धार्मिक वाद हा नेहमीच उजव्या धोरणांना पाठिंबा देतो तुमच्या लोकशाह्या कोसळल्या तरी चालतील पण माझे साम्राज्य टिकले पाहिजे असा हा अमेरिकेचा अहंकार असतो . त्यामुळेच इस्लामी राष्ट्रवादाच्या आधारे उभी होणारी राष्ट्रे जोपर्यंत अमेरिकेच्या हिशेबाने चालतात तोपर्यंत टिकवली जातात आणि जेव्हा ती स्वतंत्र होतात तेव्हा त्यानं कोसळवले जाते . 

प्रश्न असा आहे की भारतातला हिंदू धार्मिक राष्ट्रवाद हा असा अमेरिकेने स्पॉन्सर केलेला राष्ट्रवाद होता काय ? अलीकडे वारंवार याबाबतीत प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण अमेरिकेबरोबर झालेला व्यापारी करार हा कोणत्याच अर्थाने समतोल नाही . भारताने सपशेल शरणागती पत्करली असे मानणारे अर्थशास्त्रज्ञ वाढत चाललेले आहेत . मुख्य म्हणजे शेती बाबतचे आयात धोरण लोकांना आणि शेतकऱ्यांना पटलेले नाही .. मुळातच याबाबतीत खरोखर मोदी यांनी शरणागती पत्करली आहे की नाही हे पूर्ण स्पष्ट दिसत नाहीये. मात्र या मुद्द्याचा आता नक्की सखोल विचार झाला पाहिजे . प्रश्न असा आहे की ब्राह्मणी हिंदुत्व आणि ट्रम्प यांची याबाबतीत युती झाली आहे का आणि जर का नेहमीप्रमाणे स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी ब्राह्मणी हिंदुत्वाने ही खेळी खेळली असेल तर ती उत्कृष्ट खेळी आहे याबाबतीत शंका नाही . अर्थातच नेहमीप्रमाणे बहुजन समाजातून उदयाला आलेल्या लोकांना क्षत्रिय होण्याचा इतका शौक चढलेला आहे की हे लोक आता या ब्राह्मणधर्मी हिंदुत्वाला स्पष्टपणे मिळालेले दिसतात . इतिहासामध्ये सातत्याने माती खाण्याची एक प्रोसेस असते . प्रश्न असा आहे की ती रिपीट होत चालली आहे का ?

जेव्हा जेव्हा एखादे शैव नेतृत्व उभे राहते तेव्हा तेव्हा ते शेवटी वैष्णव दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जातो गुप्ता साम्राज्यापासून हे घडलेले आहे. जेव्हा हे घडत नाही तेव्हा मग मौर्य साम्राज्य ताब्यात सुद्धा घेण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे आणि हा प्रयत्न एका ब्राह्मण सेनापतीने केला आणि शृंग घराण्याची स्थापना झाली म्हणजेच शक्य असेल तेव्हा डायरेक्ट आणि शक्य नसेल तेव्हा इनडायरेक्ट अशा दोन्ही पद्धती अवलंबल्या जातात . आता जर का मोदी सुद्धा याचे शिकार झाले असतील तर मात्र त्यांच्यापुढे एक फार मोठे आव्हान आहे याबद्दल शंका नाही आणि मुख्य म्हणजे ते या चॅलेंज वर कसे मात करणार हा ही प्रश्न आहे. मोदी यांच्यामुळे सर्वाधिक कोड्यात पडलेला समूह हा ओबीसी प्रवर्ग आहे कारण ओबीसी च्या बाजूने मोदींची धोरणे नाहीत आणि तरीही ओबीसी नेत्याला पाठिंबा द्यावा लागणार आहे. हे खरे तर फार विचित्र आहे. एकेकाळी नानासाहेब पेशव्यांना पाठिंबा नाकारून तत्कालीन ओबीसींनी फार मोठे प्रश्नचिन्ह उभे केले होते . पण अंतिमतः त्याचा फायदा इंग्रजांना मिळाला. इथे सुद्धा अंतिम फायदा अमेरिकेला मिळणार हे उघड आहे . एका अर्थाने आपण आता इतिहासाच्या नेमक्या त्याच टप्प्यावर आलेलो आहे जिथे वारंवार ओबीसींची गोची झालेली आहे . खरे तर राहुल गांधी यांना याचा फायदा उठवता आला पाहिजे होता त्यांच्यासाठी ही सोन्याची संधी आहे पण ते सेक्युलरवादाच्या नादाला लागून ही संधी गमावतील असेच सध्याचे चित्र आहे. 

एकंदरच आत्ताची जी अवस्था आहे ती मोदींना शेवटाकडे नेत चाललेली आहे पण त्यांचे हे असे शेवट परवडणारे नाहीत. त्यामुळेच आता पंडित, वीर, ओबीसी, बीसी आणि आदिवासी लोकांना एकत्र येऊन नीट विचार करावा लागेल . काही करताना पुरोगामी लोक सोबत आले तर उत्तम नाही आले तर त्यांच्याविना अशा तऱ्हेने काही गोष्टी कराव्या लागतील .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय