नेट: थीम्स
सलाम
कोणीही कुणावर केस घालू शकतो
कोणीही कुणाला तुरुंगात लटकवू शकतो
कोणीही आयविटनेस उभे करून कुणालाही फाशी देऊ शकतो
कोणीही गॉसीप्समध्ये खटला चालवून सत्यात आरोप सिद्ध करू शकतो
शेवटी आपण सर्व क्रिमिनल लोकांची झुंड आहोत
जिच्यात प्रत्येकजण स्वतःला सज्जन आणि निरागस समजतो
आपणाला एकमेकांवर आरोप करण्याची कला अवगत आहे
आणि मिळणारी प्रसिद्धी वाटून खाण्याच्या कलेवर आपण सर्व फिदा आहोत
प्रत्येकाजवळ इझम आहे
जमजम आहे
जमवाजमव आहे
एकमेकाला फाशी देणारा समाज
म्हणून आपली नोंद इतिहासात होते आहे
आणि आपण ह्यातच खुश आहोत कि
आपली नोंद इतिहासात होते आहे
वर्तमानात ऐतिहासिक पुरुष व महिला होणाऱ्या तुम्हा सर्वांना
माझा सलाम
इतिहासाबाहेर ताठ उभा राहून !
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )
१
द ऍनिमल इज रिटर्नड
पशु परतलाय
जिथून तू सुरवात केली होतीस पशुपतीनाथ म्हणून
अल्फा लायन बनण्यासाठी सिंह भांडतायत
म्हाताऱ्याला हुसकावतायत
आणि लायनेस तमाशा पाहतायत
जो विजयी तो त्यांच्यासाठी अल्फा
जो गेला तो गतकाळाच्या डाटा
चिम्पाझी नीट संभोगत नाहीत
ते फिमेल चिम्पाझीवर थेट जबरदस्ती करतायत
आणि विज्ञान सांगतंय कि
माणसाचं चिंपांझींशी साम्य आहे
कदाचित तू हे स्पष्ट ओळखणारा पहिला वैज्ञानिक होतास
म्हणूनच तू पशु आणि पाश अधोरेखित केलेस
आणि म्हणालास
प्रथम मानवी बना मग दैवी
कारण उत्क्रांती तुम्हाला कायमस्वरूपी पशु बनवण्यासाठी
घडलेली नाहीये
स्वतःतून माणूस आणि देव निर्माण करण्यासाठी घडलीये
२
रद्दीत जमा होतायत भांडवलदार अन साम्यवादी
पुरोगामी आणि प्रतिगामी
कार्पोरेट्स अन रेट्स
एक रॉटन टोमॅटो पृथ्वीएव्हढा झालाय
त्याचं नेटवर्क जगभर
सॉससारखं वाटलं जातंय
मी क्लिशेत सापडत नाहीये कुठल्या
मी जिवंत नस झालोय जी ठसठसतीये
ठसवतीये
कि मोक्षाची शक्यता अजून दुर्मिळ झालेली नाहीये
शरीरभर फक्त गोळा करण्याची आसक्ती स्पॉन्सर
अन तिला ओळखणारा माझा सेन्सर
सारे सेन्सॉर धुडकावत
मी वाढत राहिलोय वाढतोय
मॉल बांधून काळजात
उडतायत प्राण्यातल्या प्राण्यात
मी प्राणात
प्रणाली बनत
अनात्मिक
३
एक मरणाचं शतक चालवलं माझ्या अस्तित्वासमोर
सब्जेक्ट इज डेड पासून आयडियालॉजी इज डेड पर्यंत
जे मरत न्हवते त्यांना आत्महत्या करायला लावली विसाव्या शतकानं
मी जीवनात थांबलो
अंधार ओढून शटर डाऊन करणाऱ्यांना मी टॅक्सी दाखवली
मीटर डाऊन न करणारी
ब्रॉन्झ झालेल्या सायंकाळी
मी गोल्डन केल्या नव्या सूर्योदयात
लोक म्हणाले सुपर हिरो आऊटडेटेड झालेत
मी म्हणालो मी नव्या फिल्म्सचा नायक आहे
पॉझिटिव्हिटीच्या हवामानात मी पाऊस पाडले
रस्त्यांच्यावर कॅमेरे लागले तेव्हा मी सावल्या धाडल्या
ज्यांना झाडं उभी करता येत नाही त्यांनी कॅमेरे उभे करावेत ?
४
उथळतेचा सरफेस गोमुत्राने सारवणाऱ्यांना मी संगणक शिकवला
आणि खोलात न्हेले प्रोग्रामिंगच्या
म्हणालो "नवे युग येते तेव्हा धर्म जिवंत होतो
तुम्ही मोक्ष जिवंत करा
अन्यथा पुन्हा एकदा गायी कार्स रिप्लेस करतील
आणि बैलगाड्यांना लागणारे बैल मिळणार नाहीत
अन तुम्ही बैलांजागी जुंपले जाल
पशुपालन माणसांनाही पशु म्हणून ट्रीट करतं
अन माणसाचा जन्म स्वतःतल्या पशूला उत्क्रांत करायला झाला आहे "
५
पशुपतिनाथा
बाटलमध्ये गेलं कि पाणी श्रीमंत होतं
माश्यांना पकडणारी जाळी नेटवर्क झाली कि महागडी होतात
कास्टिंग काऊचवर व्हायला लागलं कि अभिनय न्यूडिटी बनतो
कपडे काढून पशु सेलिब्रेट करायला निघालेले लोक
उन्हाळ्यांचा खून करून सूर्य गाजवणारे लोक
वेगाच्या वेडाने एकमेकांवर आदळणारे लोक
धर्म रिव्हर्समध्ये टाकून मागे न्हेणारे लोक
मर्डर माणसाला अल्फा मेल बनवतो म्हणून मर्डर करणारे लोक
ज्ञानाच्या अंत :स्फोटात श्रद्धा ठेवून जाणारे लोक
कवींच्या टेबलवर कविता स्पॉन्सर करणारे लोक
घटना लक्ष्यात न ठेवता फक्त पॅटर्न रिपीट करणारे लोक
मॅप बघून अटेन्शन आखून यात्रा करणारे लोक
देव बघून कुठला नवस बोलायचा ठरवणारे लोक
आयुष्याच्या मैदानात न उतरता थर्ड अंपायर बनून व्यक्तींना जज करणारे लोक
करायचे नाही पण करावे लागते म्हणून गोष्टी करणारे लोक
मी कायमच फाट्यावर मारत
आतला क्युट दिवा एक्झिक्युट करत
मला माहीतीये मी ऍनिमल ओलांडलाय
मला माहितीये मी डिव्हाईनच्या दारात आहे
फक्त ती जम्प दे
जी थेट शून्यात पडेल
काळीज आणि मेंदू परफेक्ट बनवून
खेच माझा देह दिव्यांगांत
पशुपतिनाथा
कर पशूचा अस्त
पतीचा शेवट
नाथाचा अंत
उडव
मिसाल नसलेले हे मिसाईल
शून्याचा दाखला मागतोय हा आखिल देह
दाखल करून घे
कितीकाळ मला केवळ दखल म्हणून ठेवणार आहेस ?
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )
दंतकथांचं उत्तर दंतकथांनी द्यायचं असतं
मला हे कळायला वेळ लागला
मोक्षाने मी थोडा ओला झालो होतो
म्हणून मला जळायला वेळ लागला
गुंडांची संख्या कधी कमी झालीच नाही
कमी कधी जास्त वेळ छळायला लागला
हे हरामखोर आहेत हरामखोरच राहणार
ह्यांचे सरफेस कळायला वेळ लागला
वृत्तीच अशी आहे निर्ढावलेली
सत्तेशिवाय ह्यांचा जीव मळमळायला लागला
माहीत नाही नेमका कशाचा माज आहे
बस खळखळायला वेळ लागला
आयुष्य काढले ह्यांनी वापरवापरीत
मला पण कळायला वेळ लागला
आता आलीयेच वेळ तर ठाकतो लढायला
हत्यार हाताळायला वेळ लागला
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )
माझ्यासोबत लोकलमध्ये बसणारी माणसे
विमानात बसायला शिकताहेत
ते आजकाल टेरेसवर जास्त राहतात
घरात कमी
संभोगाची फारच गरज असेल तर बेडरूममध्ये
त्यांची तक्रार असते कि
विमानात बेडरूमची सोय नाही विमानाला टेरेस नाही
एकेकाळी रस्त्यावरून चालणारे
आता ग्लोबल मॅप बघताहेत
इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म बघताहेत
ही प्रगती कि फुगा ?
गर्दी त्यांना ओळखत नाही ही त्यांना ओळख वाटते
संध्याकाळी सूर्याला फ्लश करणारे त्यांचे हात
सकाळी सूर्य काढायला मदत करतात
त्यांच्या आत्मविश्वासाचा फ्लॅश रेंगाळतो सगळ्या पायरवात
त्यांनी बायको म्हणून नवरे म्हणून डॉल्स ठेवलेत कि डोळस
कि डोळस असलेल्या डॉल्स ?
ते केवळ पोहताना नागडे असतात
कारण त्यांची फॅशन त्यावेळी कुणी बघत नसते
मात्र कुणी बघत असले कि ते पोहतानाही ट्रेंडी कपडे घालतात
किंवा मग संपूर्ण सेशनच बोल्ड असते
माश्या मारायला त्यांना वेळ नसतो
म्हणून ते मधमाश्यांना घरमाश्यांना घरात येऊ देत नाहीत
मात्र नैसर्गिक मध त्यांची चैन असते
त्यांच्या मानेवर फाशीचे व्रण असतात पण ते मेलेले नसतात
त्यांनी तो व्रण रॅप करून घेतलेले असतात रॅप ऐकत ऐकत
मुखवट्यांचे मुकुट डोक्यावर
प्रेमाच्या विनाशाच्या अंगठ्या बोटात
डिजिटल खिडक्या नाचवत स्पर्श
दारूला पुरेल एव्हढा काळजात बर्फ
आयुष्य शट ऑफ करणारे खटके
आवश्यकतेनुसार प्रसिद्धीची उंची कमीजास्त करणारे बुटके
निघतांना बरंच काही त्यांनी माझं चोरलेलं असतं
पण ते माझं नाव घेत नाही
मला संशय आहे
त्यांनी माझा अख्खा देश चोरून त्यांच्या अकाउंटमध्ये टाकलाय
विमानातून जाणारे
विमानात जाताना
मला मेसेजमध्ये बाय करतात
आणि दिसेनाशे होतात
मला खात्री असते ते परततील
नव्याने माझं नवीन सामान चोरण्यासाठी
पण मला ते पुन्हा ओळखता येतील का ?
मला खात्री नसते
त्यांच्याजवळ प्रत्येक विमानप्रवासासाठी
एक नवा चेहरा असतो
जो ट्रेस होईपर्यंत
त्यांचा चेहरा बदललेला असतो
मी फक्त त्यांनी सादर केलेल्या माझ्या सामानाच्या चोऱ्यांच्यावरून
त्यांना पुन्हा ओळखतो
आणि ते हसून सांगतात
तुझं सामान आता आमच्या नावावर आहे
जा काय करायचं ते कर
आम्ही सगळं विकत घेतलेलं आहे
मी काय करणार असतो
रस्त्यावरून चालणारा मनुष्य
हवेत उडणाऱ्या विमानाचं
काय करू शकतो ?
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )
Comments
Post a Comment