सत्य , व्यवहार आणि उत्तर व्यवहार १ श्रीधर तिळवे नाईक 

कुल म्हणजे समान जन्मदत्त गुणांनी युक्त असलेल्या समानपिंडाच्या आणि काम संबंधाने जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा गट होय . पूर्वीच्या काळी हे जन्मदत्त गुण आणि पिंड म्हणजे नेमके काय हे स्पष्ट नव्हते परंतु आता आपणाला जेनेटिक्समुळे ते स्पष्ट झाले आहे . इतकेच नव्हे तर आता जीन्समुळे आपणाला कोण कोणाचे आईबाप आहेत वगैरे अनेक गोष्टी सहजरीत्या कळतात पूर्वी यामागचे विज्ञान माहित नव्हते पण आता आपणाला हे सर्व काही माहिती आहे . त्यामुळे कुल किंवा कुल हे जितके वर्तमानकालीन संबंधांचे जोडणारे कामसूत्र आहे तितके कदाचित कुठलेच इतर सूत्र नाही आणि याचे कारण समान गुणसूत्रे हे आहे. 

प्रश्न असा आहे की आता आपण या काम गुणसूत्रांच्या आधारे जर का कुलव्यवस्था निर्माण केली तर ती आत्ताच्या काळामध्ये सक्षमपणे नांदवता येणार आहे का ? माझ्या मते आता या दिशेने प्रयत्न करायला हवा. प्राचीन काळी आपण या सर्व गोष्टीला आप्तावळा असा शब्द शोधला होता . अर्थातच आप्तावळा नंतर गोतावळा येतो ज्यात काम संबंध न आलेले अनेक मित्र येतात मैत्रिणी येतात आणि मग गणवळा येतो याला एक शब्द गणगवळण पण होता आणि त्यातूनच एका वळणाचे असलेले गावातले गणगलोक अशी व्याख्या ही होती . आपल्याच गणातले परंतु कामसूत्राने जोडले न जाणारे अनेक मित्र गोतावळ्यामध्ये येतात तर अनेक मित्र जे गोतावळ्यात नसून सुद्धा ज्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला असतो असे लोक म्हणजे गणवळा होत . 


प्राचीन काळी टोळी रूपात अस्तित्वात असलेले लोक भगवान शंकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे गण झाले आणि त्यातूनच हा गणवळा डेव्हलप झाला . 


प्रश्न असा आहे की मग एक वळण स्वीकारणारा हा आत्ताच्या भाषेत सांगायचे तर संविधान स्वीकारणारा हा जो महागट आहे त्याच्याशी संबंध कसे ठेवायचे ? 


या प्रश्नातच संपूर्णपणे व्यवहार नावाची गोष्ट येते आणि हा व्यवहार कसा पार पाडायचा याचे वळण येते . सर्वसाधारणपणे इथे प्रत्येक वळण अंगवळणी पडावे लागते आत्ताच्या भाषेत सांगायचे तर संविधान अंगात मुरावे लागते आणि मग संविधानाच्या अंतर्गत काय व्यवहार करायचा ते निश्चित करावे लागते . प्राचीन काळी प्रत्येक कुलाचे असे अंगवळण निश्चित झालेले होते अजूनही आमच्या कुटुंबात हे चालते आणि हे चालत नाही अशा पद्धतीने आपण आपला कुटुंबव्यवहार इतरांच्या पुढे सादर करतच असतो .

व्यवहार साधारणपणे पुढील गोष्टींनी युक्त असतो 

१ आहार त्यात समाजात जाऊन आहार मिळवणे कमावणे आणि घरात येऊन आहार करणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या !

२ आहार्य यात कपडे वगैरे आहाराखेरीज असलेल्या इतर सर्व गोष्टी येतात शैव नाट्यशास्त्रामध्ये त्यामुळेच आहार्य अभिनय हा एक वेगळा अभिनय मानला गेलेला आहे .

३ विचार यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व विचार येतात आणि त्यांची एक प्रणाली येते जी सर्वांना कॉमन असते यामध्ये प्रामुख्याने यम आणि नियम येतात आणि संयम कुठे कुठे साधायचा कसा साधायचा तेही येते म्हणजेच एका अर्थाने यम संयम नियम हे ठरवले जातात आणि त्याचबरोबर गणाने ठरवलेले विधी नियम सुद्धा पाळले जातात आणि समाजाने आणि सामाजिक संस्थांनी अनेकदा जिथे आपण काम करत असतो उदाहरणार्थ कंपनी कार्पोरेट हाऊस तिथे ठरवलेले अधिनियम पण पाळले जातात. विधी नियम आणि अधिनियम दोन्ही पाळावे लागतात पण ते साधारणपणे बाहेर पाळावे लागतात घरात मात्र आपणाला यम संयम आणि नियम अधिक पाळावे लागतात 

४ आचार यामध्ये आपल्या विचाराचे आचरण करावे लागते अनेकदा यामध्ये आचार्य असलेले लोक सल्लामसलतीसाठी बोलवले सुद्धा जातात कारण कधी कधी वैचारिक संघर्ष निर्माण होतो अशावेळी त्या त्या कुलाच्या आचार्यांनी हे प्रश्न येऊन मिटवावेत अशी अपेक्षा असते . आचारामध्ये आचरण करण्याच्या सर्व अटी ठरवाव्या लागतात त्यासाठी त्या कागदावर उतरवाव्या लागतात आणि त्यासाठी करार करावे लागतात आता लिखित संस्कृती व्यवस्थित विकसित झाल्याने आपण कुटुंबात सुद्धा आपले करार निर्माण करू शकतो काही वेळा वाद विवाद होतात आणि त्यासाठी कुटुंबाच्या किंवा कुलाच्या आचार्यांना बोलावले जाते मी स्वतः आचार्य म्हणून असे वाद विवाद मिटवलेले आहेत .

एकदा का हा व्यवहार म्हणजे काय प्रकार आहे हे कळले की आपण सामाजिक व्यवहार म्हणजे काय तेही ठरवू शकतो कुल व्यवहार आणि गण व्यवहार आणि गणामध्ये असलेला सामाजिक व्यवहार या सर्वांनी मिळून महा व्यवहार ठरतो . व्यवहारवादाची सुरुवात ही अशी प्राचीन शैव संस्कृतीतच रुजलेली आहे आणि म्हणूनच शैव श्रुतीमध्ये आणि शैव श्रुतीने निर्माण केलेल्या सर्व धर्मांच्या मध्ये व्यवहार वाद हा फार महत्त्वाचा असा वाद आहे प्रणाली आहे . मुख्य म्हणजे व्यवहारिक नियम हे सतत बदलू शकतात आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे ते बदलता येऊ शकतात ही गोष्ट शैव श्रुतीने स्वीकारलेली असल्याने ती विलक्षण लवचिक झालेली आहे आणि म्हणूनच जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपणाला दिले तेव्हा सर्व शैव लोकांनी तिचे जोरदार स्वागत केले कारण संविधानाची सर्वाधिक आवश्यकता ही पंडित, वीर, वाणी पणी बनिया , कारागीर , आदिवासी या पाच समुदायातल्या आणि त्यांच्या मध्ये नांदत असलेल्या सर्व समाजातल्या सर्व प्रकारच्या शैव लोकांनाच होती . हे संविधान समान नागरी कायद्याने युक्त झाले असते तर जास्त बरे झाले असते . अर्थात अजूनही आपण यासाठी आंदोलन करू शकतो .

एकदा का हा सर्व व्यवहार काय आहे हे तपशिलात लक्षात आले की मग आपणाला व्यवहारवादाची का गरज आहे हे नीट कळते . 

श्रीधर तिळवे नाईक


 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय