निर्वाणानंतरच्या कविता

 कोवळ्या वयात शक्तिपात 

आणि मध्ये काहीच नाही 


तगमग तगमग 

मगमग मगमग 


मला वाटले तू मला सोडून दिलेस 


बायकांच्यात डचमळलो 

फिलोसॉफीत घुटमळलो 

सोशॉलॉजीत ताटकळलो 

इतिहासात भटकळलो 

फ्यूचरोलॉजीत कुंडली मांडली 

कवितेमध्ये कुंडलिनी सांडली 


सर्व पसारा तुझ्यासाठी मांडला 

सर्वकाही तुझ्यात कांडला 

ताडत राहिलो स्वतःला ताडोबा अरण्यात 


ऐकत राहिलो एकट्याने एकट्याचे अरण्यरुद्रन 


आता कळतंय 

तुला फक्त माझ्याकडून ११४ तंत्रे मांडून घ्यायची होती 

शारीरिक साधनेत सांडून घ्यायची होती 

थोडीशी शब्दांमध्ये लवंडून घ्यायची होती


आणि आता हा तू दिलेला शेवटचा अंतिम पात 

सारे पॉज संपवणारा 


मी मूर्ख होतो 

तू शहाणा केलेस 


आता दे आज्ञा 

संसारात थांबू की शून्यात येऊ ?


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

अख्खा समुद्र माझ्यासाठी काम करतो 

शारीरिक तहान लागते तेव्हा 

ढग बनवतो 

पाठवतो 


मी ढग पिऊन तृप्त होतो 

मला नदीची गरज भासत नाही 

ना पावसाची 


ढग समुद्र असतो 

मीही 


तुम्हाला तांब्या दिसतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरीजमधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)


शांतता सुद्धा नाही 

मग आवाजाचा प्रश्न येतो कुठे 


देव बोलत नाही 

कारण तो भाषेत असत नाही 


त्याचा सरफेस कधीकधी भाषेत जमतो 

जसे दही 


मी थेट गाय पितोय


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

मोक्षानंतर जग जग राहत नाही 

लीला बनत 

आत्ताच्या भाषेत एंटरटेनमेंट 


अनेकदा बाहेरचे आवाज ऐकू येतात 

कोण काय बोलतो ते ऐकू येतं 


फक्त आत मध्ये आता त्यामुळे घंटा वाजते 

वार्निंग नाही 


तुझ्या बाबतीत जास्तच 

कारण तू जास्तच बोलतो 

आणि माझी जास्तच कर्मणूक होत राहते


मोक्षानंतर निंदकाचे घर शेजारी राहत नाही 

ते थेट मेंदूत येऊन बसते 


तुला माझ्याशी थेट बोलता येत नाही 

तुला माझी थेट निंदा करता येत नाही 

यानेच खरं तर मी करुणामय आहे 


बोलत रहा 

भाषा जिवंत राहिली पाहिजे 


कदाचित भाषेची सुरुवात शिवीपासून झाली असेल 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरीजमधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्य फायलीतून )

वय होतं वाया गेलं 

पाया गेला पाय उरले 


आजार थांबले 

उपाय उरले 


शरीराने आयुष्य पाहिले 

जो जगला तो यात्रेकरू होता 


मात्रा मोजत यात्रा केल्या 

बेबंध झाला तेव्हा जत्रा केल्या 


कळाले 

खूप काही जळाले 

आणि शेवटी गळाले 


सतत गळाला लागणारा मासा 

समुद्र झाला 


आता मस्त पहुडलाय  

कधीच मरून गेलेले आतमधले

स्वतःचे शव पाहून 

मृत्यूचकीत 


श्रीधर तिळवे नाईक 


(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

मासा झाड चढून गेला 

त्याच्या पोटात समुद्र आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय