कविता कशासाठी कविता दिनाच्या निमित्ताने श्रीधर तिळवे नाईक 

UNESCO ने 21 March हा World Poetry Day म्हणून पॅरिसमध्ये १९९९ यावर्षी भरलेल्या 30th General Conference मध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यामागचा उद्देश भाषा संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन होता . त्यामुळे आपण जेव्हा कविता दिन साजरा करत असतो तेव्हा हे दोन उद्देश त्यामागे असतात प्रश्न असा आहे की एक कवी म्हणून मला कवितेची गरज का वाटते ?


या संदर्भातले माझे पहिले उत्तर मी खूपदा दिलेले आहे ते म्हणजे माझ्या मोक्षाच्या साधनेचा ग्राफ नेमका कसा चालला आहे ते मला कवितेमुळे जास्त चांगल्या रीतीने कळत होते म्हणजेच मोक्षाचा साधक म्हणून स्वतःच्या आकलनाची एक प्रोसेस म्हणून कवितेकडे बघता येते . पण हा फक्त जे मोक्षाची साधना करत आहेत त्यांच्यासाठी योग्य उद्देश होऊ शकतो पण जे मोक्षाची साधना करत नाहीत त्यांचे काय ? तर माझ्या मते आयुष्य हे सुद्धा साधना असते आणि आपल्या आयुष्याच्या साधनेचा ग्राफ म्हणून आपण कवितेकडे बघू शकतो . ज्यांना सामाजिक बांधिलकी प्रमाण मानायची आहे त्यांना सामाजिक अनुभवांचा ग्राफ म्हणून कवितेकडे बघता येईल .


माझ्या आयुष्यातला एक काळ असाही होता की ज्या वेळेला मला वाटत होते की नवीन दृश्य युगात कविता नाहीशी होईल आणि कदाचित आपली पिढी ही कवितेच्या क्षेत्रातली शेवटची पिढी ठरेल मी एक अशी कविता ही लिहिली होती जी आता कवी नावाच्या काव्यसंग्रहामध्ये आहे. पण प्रत्यक्षामध्ये असे झाले नाही. याची कारणे नेमकी काय असावीत हा प्रश्न मला नेहमीच पडत असतो. मी दृश्य श्राव्य माध्यमात काम करतो मी चित्रे सुद्धा कधी कधी काढतो पण मला जाणवलेली एक गोष्ट अशी की जे कवितेमध्ये येते ते इतर कुठल्याही माध्यमातून येत नाही . विशेषत: आपल्या आत मध्ये जे काही चालले आहे ते ओतण्यासाठी कवितेइतके योग्य माध्यम मला तरी सापडलेले नाही. त्यामुळे ज्याला स्वअभिव्यक्ती किंवा आत्मअभिव्यक्ती किंवा मनअभिव्यक्ती किंवा आत्मा अभिव्यक्ती म्हणता येईल असे जे काही अस्तित्व केंद्री आतमध्ये घडत असते ते सादर करायचे आहे त्याला ते सादर करण्याचा एक सर्वोत्कृष्ट फॉर्म म्हणून कवितेला बघता येते. 


आजच्या चिन्ह सृष्टी मध्ये आजच्या माध्यमकाळामध्ये आपणाला दिसते ते असे की सर्व सार्वजनिक गोष्टी तुमची व्यक्तिगत आत्मगत असण्याची मालमत्ता बळकावत आहेत तुमचा सगळा खाजगीपणा दृश्यात्मक माध्यमात आणत तो पूर्णपणे नाहीसा करत सार्वजनिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक करत आहे किंवा त्यांना आपल्या हिशोबाने आकार देत आहे अशा वेळेला खरोखरच आपण त्या माध्यमाच्या ताकतीत किंवा चिन्हसृष्टीच्या ताकतीत विरघळून जाऊ नये असे वाटत असेल तर कविता हा स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता शाबूत ठेवण्याचा सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक मार्ग आहे असे म्हणता येते . आत्म संस्कृती नावाची एक संस्कृती असती जी व्यक्ती व्यक्ती म्हणून स्वतःच्या देहातील आत मध्ये विकसित करत असते . त्यामुळेच तिचे काही स्वतःचे विशेष असतात काही विशेष व्यक्तिगत अनुभव असतात आणि हे विशेष व्यक्त करण्यासाठी कविते इतके दुसरे सर्वोत्कृष्ट माध्यम नाही त्यामुळेच मला नेहमी कवितेकडे वळावेसे वाटते 


आता प्रश्न असा होतो की मला दुसऱ्यांच्या कविता का वाचणे आवश्यक आहे ? इथे पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो की आपण एकमेकाला समजून घेणार आहोत की नाही आणि आपण एकमेकाला समजून घेणार म्हणजे नेमके काय करणार तर या संदर्भामध्ये मला नेहमी असे वाटते की जर का आपण एकमेकांच्या कविता समजून घेतल्या तर आपण एकमेकाला अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो त्यामुळेच ज्यांना तथाकथित ग्रेट कविता लिहिता येत नाहीत अशा अनेक अपरिपक्व लोकांच्या कविता सुद्धा मी वाचत असतो कारण त्यांना समजून घेण्याचा तो एक उत्कृष्ट मार्ग आहे असे मला वाटते अर्थातच काही लोकांचे व्यक्तिमत्व इतके समृद्ध असते किंवा त्यांची आत्मसंस्कृती इतकी समृद्ध असते की ती समजून घेणे हे आपल्याला एक स्वतःलाच वृद्धिंगत करण्याचे माध्यम ठरू शकते आपण त्यामुळे संपन्न होऊ शकतो मला अनेक कवींनी असे संपन्न केलेले आहे मी बसवेश्वर वाचतो किंवा तुकाराम वास्तव किंवा कबीर वाचतो तेव्हा मी आपोआपच संपन्न होत असतो. ही आत्मसंपन्नता वाढवण्यासाठी ही आत्मसमृद्धी बळकट करण्यासाठी मला कविता ही सांस्कृतिक माध्यम म्हणून सुद्धा जिवंत राहिली पाहिजे असे वाटत असते. कवितेचे काम हे जसे आत्मशांतीच्या प्रकाशात चाललेले असते तसे ते आत्मयुद्धात आत्म युद्धातील अंधारात सुद्धा चाललेले असते त्यामुळे जिथे जिथे आपल्या आत्मसंस्कृतीमध्ये आत्मयुद्ध चाललेले असते तेव्हा तेव्हा साहजिकच आपण कवितेच्या मार्फत ते युद्ध समजून घेण्याचा अधिक प्रयत्न करत असतो. अनेकदा आपले स्वतःचे आत्म युद्ध आणि आपल्यासारख्याच अस्तित्वात असलेल्या अनेक लोकांच्या अस्तित्वाच्या आतले आत्म युद्ध हे एकमेकाला समजून घेण्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी पूरक ठरू शकते म्हणूनच दुसऱ्यांच्या कविता वाचाव्या लागतात.


ज्यांना कोणाला कविता वाचता येत नाही असे लोक आत्मदरिद्री असतात. अनेक लोक अत्यंत उथळ आणि टलाट रेला रे करणाऱ्या कविता वाचत असतात आणि त्यांनाच मिरवत असतात जर ही सुरुवात असेल तर ते चांगले असते परंतु जर वर्षानुवर्षे कोणी अशाच प्रकारच्या कवितांना कवटाळत असेल तर त्याचा अर्थ या माणसाची कलेच्या संदर्भातील आकलनाची रेंज मर्यादित राहिलेली आहे ती वयानुसार वाढलेलीच नाही असे समजून चालावे. याबाबतीतली गंमत अशी असते की अनेक लोक लँड फोन वापरत असतात आणि आयुष्यभर तोच कवटाळत असतात कारण लहानपणापासून त्यांनी फक्त लँड फोनच हाताळलेला असतो पण कवितेची गोष्ट आली आणि आपण त्यांना सांगितले की तुम्ही लँड फोनच्या काळातली कविता वाचत आहात तर त्यांना अपमान वाटतो वास्तविक यात अपमान वाटण्यासारखे काय आहे जसे तंत्र डेव्हलप होत असते तशी कविता सुद्धा डेव्हलप होत असते ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती एखाद्या तंत्राबाबत मागासलेली राहू शकते त्याचबरोबर कविता करण्याबाबत आणि वाचण्याबाबत मागासलेली राहू शकते फक्त अशा लोकांना त्यांना कोणी मागासलेले म्हटले की राग येत असतो पण हा राग येऊन फायदा काय? त्यापेक्षा नवीन पद्धतीच्या कविता कशा समजून घेता येईल ते तुम्ही पाहिले पाहिजे . जर नवीन मोबाईल कसा हाताळायचा हे तुम्ही शिकत असाल तर नवीन कविता कशी हाताळायची कशी समजून घ्यायची हेही तुम्ही त्याच पद्धतीने शिकायला हवे पण तुम्ही हे शिकायला नकार देता कारण तुम्ही अजूनही तुमच्या कॉलेजच्या काळातल्या कविता मध्ये अडकलेले असता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा सिनेमाची गोष्ट येते तेव्हा तुम्ही मोबाईलच्या जमान्यातला सिनेमा सहज बघत असता परंतु कविता आली की मात्र मोबाईलच्या जमान्यातली कविता तुम्हाला चालत नाही हा सगळा प्रकार फार विनोदी असतो आणि तुमच्या आकलनाच्या मर्यादा दर्शवणारा असतो मुळातच तुम्ही असे गृहीत धरलेले असते की आपल्याला कुठली तरी साधारण दर्जाची कविता कळते म्हणजे ते पुरेसे आहे परंतु प्रत्यक्षात असे नसते कविता जशी वाढते तशी तुमचीही वाढ होत असते . तेव्हा स्वतःला वाचक म्हणून आणि कवी म्हणून वाढवणे स्वतःचा वृक्ष बनवणे आणि शेवटी स्वतःचा वटवृक्ष बनवणे ही फार मोठी अचीवमेंट आहे हे लक्षात घ्या आणि ही अचिव्हमेंट तुम्हाला नक्की आपण वाढल्याचा फील देत राहते अन्यथा कित्येक लोक असे असतात जे कुंडीतल्या कुंडीत मरून जातात . तेव्हा अभ्यासक्रमाच्या बाहेर या आणि बाहेरच्या आयुष्याशी कविता कशी व्यवहार करत आहे ते पहा कविता दिनाच्या निमित्ताने इतके जरी तुम्ही केले आणि आत्मपरीक्षण केले आणि आत्मपरीक्षणाचे एक निमित्त म्हणून कवितेचे परीक्षण केले दुसऱ्यांच्या कवितेचे आणि स्वतःच्या कवितेचे परीक्षण केले आणि आपण काय पद्धतीच्या कविता वाचतो आणि काय पद्धतीच्या कविता प्रमोट करतो याचे जर का परीक्षण निरीक्षण केले तर कविता दिनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल अन्यथा कविता म्हणजे १९४० मध्येच स्वतःची आत्मसंस्कृती टांगून ठेवण्याची एक सवय बनेल आणि कविता दिन म्हणजे ही सांस्कृतिक सवय अधिकृतरित्या दृढमूल करण्याचा केवळ एक संस्कार बनेल. अर्थात यालाच जर का तुम्ही संस्कारी म्हणवून घेणार असाल तर मग तुमच्यासारखे खुळे तुम्हीच! लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आयुष्य प्रत्येक वेळेला नवे नवे चॅलेंज आणत असते त्याचप्रमाणे कला सुद्धा तुमच्या पुढे नेहमी नवीन चॅलेंज घेऊन येत असते अशावेळी ते नवीन चॅलेंज स्वीकारण्यातच खरे शौर्य असते पण हे शौर्य दाखवण्याची त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा तुम्ही करत असाल तर त्याचा अर्थ इतकाच की तुम्ही दगड झालेले आहात आणि माझ्या मना बन दगड 

बनलो दगड 

इतके यश मला रग्गड 

मानत आहात असा होतो. 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय