महाराष्ट्राचा मोक्षांक म्हणजेच मोक्ष quotient हा भारतात सर्वाधिक कमी आहे का ? श्रीधर तिळवे नाईक
महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्षे ज्या पद्धतीची वासनाकांडे वारंवार घडत आहेत ते बघता एक प्रश्न नेहमीच निर्माण होतो की महाराष्ट्रामध्ये नेमके श्रद्धा, धर्म आणि मोक्षाच्या नावाने काय चाललेले असते आणि जे चाललेले असते त्याचा मोक्षाशी काडीचा तरी संबंध आहे का ?
माणसाचा संपूर्ण प्राचीन कालखंड हा अनुभव केंद्री होता साहजिकच या अनुभवाला व्यक्त किंवा निर्माण करणारी कला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि ती संस्कृतीच्या केंद्रस्थानी होती परंतु अनुभव आणि कला यातून जेव्हा मांत्रिकी श्रद्धा निर्माण झाली आणि त्याच मांत्रिकी श्रद्धेतून अनेक अनाचार निर्माण होऊ लागले तेव्हा मात्र अतिप्रत्यक्ष अनुभव हा प्रत्यक्षामध्ये काय आहे याचा वैज्ञानिक शोध सुरू झाला आणि यातून पहिला मोक्ष मिळवणारा मनुष्य म्हणजे भगवान शंकर होय .
यानंतर मांत्रिकी श्रद्धेचे केंद्र रिप्लेस केले गेले आणि त्या जागी मोक्ष आणला गेला . मांत्रिकी गेली आणि मोक्ष मिळवणारे तंत्र आले .
मोक्ष केंद्रस्थानी आल्यामुळे साहजिकच श्रद्धेमुळे जो ठेकेदार वर्ग निर्माण झाला होता ज्याला शैव लोकांच्या मध्ये भगत आणि नंतर वैदिक लोकांच्या मध्ये ब्राह्मण म्हटले जात होते त्या लोकांनी पुन्हा एकदा मांत्रिकी आणण्यासाठी नवे राजकारण सुरू केले. आणि सरते शेवटी या नव्या मंत्री मधून धर्म नावाची गोष्ट त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे निर्माण केली. पूर्वीच्या टोळी पद्धतीमध्ये मांत्रिक टोळीप्रमुख होता आता पुन्हा एकदा मांत्रिकीला शरण जाणारा प्रमुख या लोकांना आवश्यक वाटायला लागला. साहजिकच त्यासाठी मांत्रिकी केंद्री श्रद्धा केंद्र असलेली विचारसरणी निर्माण करणे गरजेचे बनले आणि त्यातूनच धर्माचा उदय झाला.
या मांत्रिक लोकांनी जगात सर्वत्र रिलिजन आणि धर्म निर्माण केले आणि संपूर्ण समाज आपल्या ताब्यात ठेवले त्यासाठी धर्म आणि रिलिजन नावाची राजकीय विचार प्रणाली निर्माण करत संपूर्ण राजकीय ज्ञानात्मक सामाजिक सत्ता आपल्या ताब्यात घेतली यासाठी त्यांनी श्रद्धेमधून एक महारचना निर्माण केली ती म्हणजे महासत्ता म्हणजे महा श्रद्धा म्हणजे रिलीजन होय भारतामध्ये धर्म होय.
या धर्माचा आधार श्रद्धा, पवित्र पुस्तक ,मांत्रिकी आणि कर्मकांड होता . मात्र रिलिजन पासून तो वेगळा होता कारण धर्माने मोक्ष स्वीकारला मात्र हा मोक्षाचा अधिकार ब्राह्मणांनी स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातून अनेक अनर्थ निर्माण झाले. कारण प्रत्यक्ष ब्राह्मणांच्या पैकी प्रत्यक्ष मोक्षाची साधना करणारे आणि ब्रह्मप्राप्ती करणारे अष्टावक्र , जे कृष्ण मूर्ती यांच्यासारखे लोक जवळ जवळ एक टक्का होते आणि उरलेले 99% हे फक्त मांत्रिक होते पण त्यामुळे सगळा खेळ हा शेवटी धर्माच्या नावाने श्रद्धा केंद्री होत गेला आणि त्यातूनच पुढे मग अंधश्रद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या .
अनुभवामुळे येणारे शहाणपण आणि ज्ञान यांच्यामध्ये कायमच मोक्षाने फारकत केली असली तरी त्यांनी कधीही विज्ञानाला नकार दिला नाही पण रेलिजन आणि धर्म मात्र कायमच विज्ञानाची वाट अडवून बसले. या सगळ्यांमध्ये मोक्ष कुठे होता सर्वत्र धर्म तर होता . त्यामुळे साहजिकच सदा सर्वकाळ एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये मोक्षाची खरोखर काही आस आहे का ? आणि जर का अशी काही आस असेल तर ही आस बाजूला करून मोक्षाच्या नावाने धर्माचे दुकान कोण मांडतात ?
आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे भारत ही संतांची भूमी आहे प्रत्यक्षामध्ये संतांचे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांनी नेमके काय केले होते हा प्रश्न कोणी विचारत नाही वास्तविक सर्व संत लोकांना भारताने किंवा मराठी लोकांनी प्रचंड त्रास दिलेला दिसतो आणि हा त्रास प्रामुख्याने ब्राह्मण लोकांनी दिलेला आहे आणि मग या ब्राह्मणांच्या मागे जाणाऱ्या बहुजन समाजाने दिलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर आणि निवृत्ती यांच्या आई वडिलांना पाण्यात बुडण्याची शिक्षा कोणी दिली? महाराष्ट्रातले ब्राह्मण हा प्रश्न विचारत नाहीत किंवा नामदेवांना महाराष्ट्र सोडणे का भाग पडले किंवा संत तुकारामांना गाथा बुडवायला लावली कुणी ? ज्या संतांची भूमी म्हणून या देशातले प्रदेशातले लोक महाराष्ट्राचा गौरव करतात त्या संतांना महाराष्ट्रातल्या जनतेने खरोखर कधी ते जिवंत असताना पाठिंबा दिला होता का ? वस्तुस्थिती अशी आहे की जिवंत असलेल्या संतांना कधीही महाराष्ट्राने आधार दिलेला नाही. उलट जितका त्रास देता येईल तितका त्रास दिलेला आहे तर मग तुम्ही कशाच्या आधारे सांगता की महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे? संतांना जर का सतत सत्य अहिंसा अपरिग्रह यांचा उपदेश करावा लागत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही प्रत्येक काळात प्रत्येक युगात खोटे बोलत होता म्हणून त्यांना सत्य बोला म्हणून सांगावे लागत होते तुम्ही हिंसा करत होता म्हणून त्यांना अहिंसेचा उद्देश द्यावा लागत होता आणि तुम्ही प्रचंड परिग्रह पाळत होता प्रचंड साधन संपत्तीच्या मागे होता म्हणून त्यांना अपरिग्रहाचा उपदेश करावा लागला भारत हा प्रचंड ऐहिक गोष्टींच्या मागे लागलेलादेश आहे मोक्षिक नव्हे आणि म्हणूनच त्याला वारंवार असा मोक्षिक उपदेश करणारे सिद्ध संत बुद्ध लागतात. ते जिवंतपणे उपदेश करत असतात तेव्हा लोक काही ऐकत नाहीत आणि मग मेल्यानंतर त्यांचा सन्मान करतात कारण आता ते प्रत्यक्ष दारात येऊन त्रास देणार नसतात. मेलेला संत शेवटी तुमच्या दारात येत नसतो साहजिकच मेलेला संत हा समाजाला परवडतो आणि भारतीय समाजाला तर तो अधिकच परवडतो. जिवंत संत सरळ सांगणार दारू पिऊ नकोस सिगरेट ओढू नकोस खोटे बोलू नकोस वाईट मार्गाने पैसा कमवू नकोस असे लोक तुम्हाला कसे चालतील ? या उलट मेलेला संत काही येत नाही पाठीमागे लागत नाही त्यामुळे त्याचे आचरण करावे लागत नाही नाही केले तरी चालते फक्त पूजा केली की चालते. प्रत्यक्षामध्ये अत्यंत खोटारडे असणाऱ्या राजकीय लोकांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचणार दांभिक असणाऱ्या पुढार्यांना पाठिंबा देणार त्यांच्या सभांना तुम्ही गर्दी करणार
मेलेल्या संतांना पाठिंबा द्यायला काय अक्कल लागते ? खरी अक्कल जिवंत असलेल्या संताला ओळखण्यात असते. वस्तुस्थिती अशी होती की संतांना कायम साईडलाईन करायचे आणि कुठले तरी बुवा डोक्यावर घेऊन नाचायचे असाच उद्योग त्या संतांच्या काळात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे. महाराष्ट्रातला जनतेचा कधीही पुरोगामी गोष्टीशी संबंध नव्हता नंतर आधुनिक गोष्टीशी संबंध नव्हता आणि नंतर आधुनिक उत्तर आधुनिक गोष्टीशी संबंध नव्हता आणि आता चौथ्या नवतेशी पण काय संबंध नाही . केवळ अपरिहार्य आहे म्हणून किंवा या नवतेने दिलेल्या उपयुक्त गोष्टी उपयुक्ततेमुळे मराठी लोकांनी स्वीकारलेल्या आहेत . अन्यथा इसवी सन १००० पासून महाराष्ट्र कधीच ब्राह्मणवादाच्या आहारी गेलेला आहे. हिंदुत्ववाद हा महाराष्ट्रातून का निर्माण झाला हा प्रश्न आता विचारायची वेळ आलेली आहे.
एकीकडे ब्राह्मणवाद आणि दुसरीकडे ब्राह्मणांनीच प्रामुख्याने चालवलेला आणि ज्युदाइक मुस्लिम धार्जिणा पुरोगामी वाद यामध्ये कायमच महाराष्ट्रातला विचारवंत फाटलेला दिसतो . विचार पुढे घेऊन जाणारा कोणीही आला की त्याला त्रास द्यायचा असा प्रकार महाराष्ट्रातली जनता करत नाही काय ? स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तरी आधुनिकतेकडे तर आधुनिकेकडे किंवा चौथ्या नवते कडे सरकतात काय ?
ओशो रजनीश यांच्यासारख्या बंडलबाज माणसाच्या पाठीमागे मुकेश यांच्यासारखे लोक राहत असतात कारण काय तर ते उत्कृष्ट कथा सांगतात आता उत्कृष्ट पुराण सांगणारा माणूस आणि उत्कृष्ट कथा सांगणारा माणूस यांची लायकी मोक्षाच्या क्षेत्रात एकच असते. प्रत्यक्ष त्या माणसाने ज्या प्रकारचा सेटअप उभा केला त्या सेटअप चा आदर्श आजकाल सर्वच लोक बाळगताना दिसतात अपरिग्रह या तत्त्वाची संपूर्ण वाट लावण्यामध्ये जेवढा वाटा ओशो रजनीश यांचा आहे तेवढा कोणाचा नाही . प्रचंड मोठे आश्रम उभे करायचे त्यासाठी लागणारी कायदेशीर परमिशन मिळाली नाही तर करप्शन करून ती घ्यायची अनेक लोकांना आपल्या मागे कामाला लावायचे अनेकांच्या स्थावर आणि चल संपत्ती आपल्या आश्रमांच्या नावाने करून घ्यायच्या असले अनेक नतदृष्ट उद्योग ओशो रजनीश यांच्यामुळे महाराष्ट्रात सुरू झाले आणि पुढे ते अमेरिकेत पोचले आणि नंतर जगभरात पोचले .
ओशो रजनीश हे याबाबतीत सर्वांचेच आद्य गुरु आहेत .ते अनेकांचा आदर्श आहेत साहजिकच आपण सुद्धा ओशोंच्या सारखे करिअर करू शकतो असे वाटणारे अनेक लोक आहेत. थोरात आणि थोरांतांच्या कमळा हा पॅटर्न ओशो रजनीश्यांनी प्रथम निर्माण केला .
ज्याला बोलता येते तो संत अशी नवीन व्याख्या यामुळे निर्माण झाली . साहजिकच मग कोण अधिक चांगला संत होण्याचा अभिनय करतो त्यावर यश निश्चिती होऊ लागली . परंपरेचा उत्तराधुनिक कमबॅक हा प्रथम ओशो रजनीश्यांच्यामुळे भारतभर पसरला मग देशी वाद आला. आज जर का आपले नेते पाहिले किंवा डोनाल्ड ट्रम्प सारखा नेता पाहिला तर तो ओशो रजनीश यांच्या सारखा वागताना दिसतो कारण धार्मिक नेतृत्वाचा हा पॅटर्न तिथूनच सुरू झालेला आहे . वेगवेगळे ड्रेस परिधान करणे पत्रकार परिषदेच्या नावाखाली सादरीकरण करणे जास्तीत जास्त ड्रामा तयार करणे हे सगळे उद्योग प्रथम ओशो रजनीश यांनी सुरू केले. आणि हळूहळू हा नेतृत्वाचा पॅटर्न सर्वत्र निर्माण होत गेला . ओशो रजनीश ही जगातल्या उत्तर आधुनिक नेतृत्वाची सुरुवात आहे हेच अनेकांच्या आज सुद्धा लक्षात येत नाही.
महाराष्ट्रात याबाबतीत सुद्धा त्यांची मिनी मॉडेल्स तयार झाली .
या काळात महाराष्ट्रातून निर्माण झालेला जो खरा संत होता तो होता निसर्ग दत्त महाराज! पण महाराष्ट्राला आज सुद्धा त्यांना समजून घ्यावे असे वाटत नाही. सामाजिक सुधारणा हा काही मोक्ष मिळवणाऱ्या लोकांचा उद्योग नव्हे हा मोक्ष मिळवताना आणि नंतर त्या अंगाने काम करताना आपोआपच लोककल्याणकारी कामे होत जातात . पण ती आपोआप निर्माण होतात मुद्दाम करायची किंवा सामाजिक बांधिलकी मानून करायची असा उद्योग चाललेला नसतो. समाज सुधारणा करणाऱ्या लोकांना संत समजण्याची एक नवीन स्टाईल महाराष्ट्रात डेव्हलप झाली . यातून मग मोक्षातला भोंगळपणा वाढला .
थोडक्यात काय महाराष्ट्राचा मोक्षिक कोशंट मोक्षांक हा कधीही अव्वल दर्जाचा नव्हता तो पूर्वीपासूनच बाळबोध आहे अगदी संतांच्या काळात सुद्धा तो बाळबोधच होता आणि आता सुद्धा तो बाळबोधच आहे. तो मेलेल्या बुद्धांना सिद्धांना आदर देतो जिवंत असलेल्यां सिद्धांना समाजातून बहिष्कृत करत राहतो आणि जिवंत असणाऱ्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांना मात्र डोक्यावर चढवतो त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे गर्वाने सांगत बसतो. त्याच्या चरणी आपले डोके काढून मेंदू काढून ठेवतो. वस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणूस हा आतून राजकारणी आहे त्यामुळे धर्म ही राजकीय विचार प्रणाली त्याला कायमच भावत असते . धार्मिक नेता हा राजकीय नेताच असतो. त्यामुळे या दोघांच्यात फरक करणे मुळातच बंद करावे. मोक्षिक नेता नावाची गोष्ट अस्तित्वात नसते कारण ज्याला मोक्ष मिळतो तो कधीही नेता बनायला जात नाही . तो शैव भाषेत सांगायचे तर अनुशासन किंवा शिस्त सांगतो आणि अनुशासक किंवा शास्ता बनतो . यमनियमांची पाठराखण करतो . पंचशीलता किंवा द्वादशशिलता सांगतो .
धार्मिक मनुष्य किंवा धार्मिक नेता हा सर्वात प्रथम तुमच्या खिशात हात घालतो तो तुम्हाला आसकत्यांच्यापासून म्हणजे तृष्णा भूक आणि निकड यांच्यापासून मुक्त व्हायला सांगत नाही तर त्यांची पूर्ती करायला सांगतो . किंबहुना त्यांचे व्यसन लावतो . आणि मग स्वतःचे बंगले उभे करतो गाड्या उभ्या करतो त्यांना ओळखणे खरे तर खूप सोपे असते . पण गमतीची गोष्ट अशी असते की लोकांना सुद्धा मुळात ह्याच गोष्टी हव्या असतात . त्यामुळे ज्याच्याकडे या गोष्टी असतात तोच माणूस जास्त आकर्षित करतो अगदी मीडिया सुद्धा ज्याचा जेवढा मोठा आश्रम ज्याचे जेवढे अनुयायी तेवढा तो मोठा अशीच लिखापट्टी सादर करत असतो . त्यामुळे मुळातच हा सगळा कामनांचा वासनांचा सगळ्यांनाच आवडणारा असा खेळ असतो आणि ज्यात प्रत्येक जण आपला सहभाग नोंदवत असतो.
प्रथम चढवायचा आणि मग पाडायचा ही तर मीडियाची आजकाल स्पेशलिटी होऊन बसलेली आहे . किंबहुना मीडियातल्या काही लोकांना कोणाच्याही सक्सेसची एलर्जी असते . त्यांना मोका मिळाला की मग ते बरोबर पाडापाडी करतात . अलीकडे तर सत्य काय आणि असत्य काय याची साधी चौकशी सुद्धा होऊ देत नाहीत स्वतःच मीडिया ट्रायल खटले चालवतात आधीच बातम्या देतात . बरे यांना जर आपण विचारले की जेव्हा हे सर्व घडत होते तेव्हा मीडिया काय करत होता तर त्याचे उत्तर यांच्याकडे नसते. यामुळे होते काय की अशा आणखीन काही बुवांना यामध्ये आपले करिअर दिसायला लागते . प्रश्न असा आहे की या लोकांना आपण एक दिवस पकडले जाऊ असे का वाटत नाही ? की पकडले गेलो तर पुढचे पुढे पाहू अशी क्रिमिनल मेंटॅलिटी या लोकांच्याकडे असते ?
याबाबतीतली सर्वात मोठी गोची अशी आहे की ज्याला मोक्ष मिळालेला असतो किंवा जो मोक्षाच्या मार्गावर असतो त्याला देखील या समाजामध्ये सन्मान मिळालेला नाहीये. राजकीय सत्तांनी येशू ख्रिस्त किंवा मन्सूर किंवा गुरुगोविंद सिंग किंवा गुरुनानक किंवा तुकाराम यांना त्रासच दिलेला दिसतो. म्हणजे मोक्ष मिळालेल्या माणसाला ही त्रास आणि मोक्षाच्या नावाने धंदा करणाऱ्या धार्मिक माणसाला सुरुवातीला चढवणे आणि नंतर पाडापाडी करणे असे दोन ध्रुव चाललेले असतात . यामध्ये समाज नेमका काय करत असतो ? की समाज हा सुद्धा केवळ या सर्वच लोकांचा स्वतःच्या मानसिक सुरक्षिततेसाठी किंवा स्वतःच्या तृष्णापूर्तीसाठी वापर करत असतो ? आपल्याकडे एक फार मोठी समजूत अशी आहे की समाज हा नायक असतो माझ्या मते समाज नायक असतो की खलनायक असतो याचीही चौकशी आता नीट झाली पाहिजे. शैव श्रुतीतले बहुतांशी सिद्ध हे समाजापासून दूर राहतात कारण त्यांच्या हे आधीच लक्षात आलेले असते की समाज हा खलनायक आहे स्वतःच्या इच्छा वासना कामना यांच्यात बुडलेला आहे. ते उगाच लोकांचे समाजाचे रोमँटिक चांगुलपणाचे स्वरूप सादर करत नाहीत किंबहुना भगवान शंकर यांनी कधीही माणसाच्या विचाराची सुरुवात माणूस म्हणून केलेली नाही ते नेहमीच माणूस प्रथम पशु आहे इथून सुरुवात करतात आणि जगाचा इतिहास भगवान शंकर बरोबर होते हेच सांगतो . समाज म्हणजे माणूस नावाच्या प्राण्याची झुंड . ज्याला सिद्ध बनायचे आहे त्याने या झुंडीपासून स्वतःला अलिप्त ठेवावे हेच उत्तम ! किंवा मग झुंडीत राहताना आपल्याला जमेल तसे कष्ट करावेत त्या कष्टातून आपला पैसा उभा करावा आपला सदाचार आपण जपावा हेच उत्तम. माणूस पाशवी आहे त्याला प्रथम मानवी बनवणे गरजेचे असते आणि मग दैवी बनण्याकडे वाटचाल सुरू होते अलीकडे अनेकांना आपण मानव झालोय असा उगाच फील येत असतो पण पाशवीपण ही अशी गोष्ट आहे जी आतून पाठलाग करत राहते साहजिकच मग हा पशु हा ऍनिमल तुमच्या समाजात डान्स करत राहतो आणि मग त्यातून अनेक पाशवी उद्योग घडत राहतात. तेव्हा सर्वात प्रथम होमोसेपीयंसना मानवी बनवा शाळा आणि कॉलेजेस त्यासाठीच असतात असायला हवीत . मोबाईल आणि कॅम्पुटर हातात आले म्हणजे आपण मानवी होतो असा एक फार मोठा गैरसमज अनेक पशुंचा झालेला आहे या गैरसमजातून आपण जेवढ्या लवकर बाहेर येऊ तितके बरे. लक्षात ठेवा तुमच्यातला पशु हा नेहमीच पाशवी लोकांच्या बरोबर ऍडजेस्टमेंट करण्यासाठी उत्सुक असतो टपलेला असतो . त्याला नियंत्रणात ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे. उगाच आपण त्याला नियंत्रणात ठेवले आहे हा भ्रम बाळगू नका. आपल्यातल्या पशुवर पहिल्यांदा नजर ठेवा मग इतरांच्या पशु वर नजर ठेवा. सध्या तरी आपली सर्वांची नजर दुसऱ्यांच्या पशु वर आहे परिणामी आपल्यातल्या पशूला कोणीच मारत नाही किंवा उन्नत करून त्याला मनुष्य बनवत नाही . सुधारणांची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment