काळजी आणि काळजीचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक 

१ शारीरिक काळजी :जे आपल्या आई-वडिलांना झाले ते आपल्यालाही होणार आहे त्यामुळे घेण्यात येणारी काळजी तसेच स्वतःच्या शरीराची काळजी यामध्ये येते.

२ बौद्धिक काळजी :ही स्वार्थावर आधारित असते म्हणजे ज्या व्यक्तीची काळजी घ्यायची आहे तिच्यात कुठला ना कुठला स्वार्थ गुंतलेला असतो तुझे जिवंत राहणे हे माझ्या स्वार्थाशी निगडित आहे तुझ्या जिवंत असण्यानेच माझा स्वार्थ पुरा होऊ शकतो म्हणून अनेकदा अशी काळजी घेतली जाते ही काळजी सर्वाधिक प्रमाणात आहे कारण मुळातच अर्थ या शब्दाचा या जीवनात जीवनार्थाचा अर्थ स्वार्थ झालेला आहे . कधी कधी हा स्वार्थ इतका स्पष्टपणे दिसतो की त्याचे ओंगळवाणे स्वरूप पाहून काळजी घेणाऱ्या माणसाबद्दलच द्वेष निर्माण होऊ शकतो.

३ भाविक काळजी : यामध्ये भाव गुंतलेले असतात भावना गुंतलेल्या असतात त्यामुळे प्रेमापोटी किंवा आदरापोटी ही काळजी घेतली जाते 

४ क्रिया काळजी : ही अनेकदा कर्तव्य म्हणून आपल्या समाजामध्ये वावरत असते म्हणजे आई-वडिलांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणारे लोक केवळ कर्तव्य म्हणून काळजी घेत असतात. कधी कधी आपण काळजी घेतली नाही तर आपली ही कोणी काळजी घेणार नाही म्हणजेच क्रियेला प्रतिक्रिया येईल किंवा तिचे काही ना काही कर्मफळ मिळेल म्हणून काळजी घेतली जाते ही काळजी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही वेळा आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली तर आपली मुले आपली काळजी घेतील त्यांच्यावर संस्कार होईल म्हणून घेतली जाते . 


५ सृजनात्मक काळजी: ही काळजी प्रामुख्याने आपण ज्या गोष्टींचे सृजन केलेले असते त्या गोष्टींची केली जाणारी काळजी असते यामध्ये प्रामुख्याने आईची ममता येते आई ही मुलांच्याकडे आपले स्वतःचे सृजन म्हणूनच पाहत असते.आई आपल्या मुलांची काळजी घेते आणि ही सर्वाधिक नैसर्गिक अशी काळजी आहे कधीकधी बाबांच्या मध्ये सुद्धा ही काळजी असते. अनेकदा आपल्या सर्व सृजन केलेल्या गोष्टींची काळजी घेतली जाते उदाहरणार्थ आपण लिहिलेली कादंबरी कविता वगैरे टिकून राहाव्यात म्हणून आपण त्यांची काळजी घेत असतो.


६ अवकाशात्मक काळजी: प्रामुख्याने संपूर्ण अवकाशाशी आपले भवितव्य जोडले गेलेले आहे म्हणून ही काळजी घेतली जाते उदाहरणार्थ आपली राष्ट्र जर का आपण आपल्या राष्ट्राची काळजी घेतली नाही तर राष्ट्राबरोबर आपणही नष्ट होऊ या जाणिवेने ही काळजी घेतली जाते विशेषता साथीच्या रोगामध्ये ही अवकाशात्मक काळजी प्रचंड वाढत जाते अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाची जी काळजी निर्माण झालेली आहे ती काळजी अवकाशात्मक आहे . माणसाला नेहमीच स्वतःच्या व्याप्तीची काळजी असते अवकाशात त्याने स्वतःसाठी प्राप्त केलेल्या गोष्टींची काळजी असते. स्वतःच्या घराची काळजी त्यातल्या भिंतींची छताची काळजी ही अवकाशात्मकच काळजी असते.


७ काळात्मक काळजी: काळजीचा खरा संबंध हा काळाशी असतो किंबहुना काळजी या शब्दांमध्येच काळ आहे त्याचे कारण आपण सर्वजण कळीकाळापासून म्हणजेच मृत्यूपासून वाचत असतो वाचवत असतो टिकून राहण्यासाठी घेण्यात येणारी सर्व प्रकारची काळजी आपण घेत असतो. 


८ अवस्थात्मक काळजी : ही काळजी प्रामुख्याने नात्यातून निर्माण होते आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिवलगांची काळजी येते ज्यांच्याशी आपले अद्वैत असते किंवा विशिष्ट अद्वैत असते अशा सर्व लोकांशी असलेल्या संबंधांची काळजी आपण घेत असतो काही लोक इतके पुढे जातात की ते सर्वच प्रकारच्या संबंधांची काळजी घेतात म्हणजे द्वैतात्मक संबंध असले किंवा पूर्ण द्वैतात्मक संबंध असले तरी ते त्या संबंधांची काळजी घेत राहतात .


९ स्थितीची काळजी आपल्यातला प्रत्येक जण केवळ संबंधात असत नाही तर तो स्वतःत पण असतो स्वतःच्या स्थितीमध्ये असतो ही स्थिती जोपर्यंत मुक्त स्थिती होत नाही तोपर्यंत तो आपोआपच काळजी घेत राहतो सर्वसाधारणपणे तो जर का उन्नत स्थितीत असेल तर तो ती उन्नत स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करतो. 

गुप्त लुप्त सुप्त प्रकट जागृत उन्नत आणि मुक्त अशा कुठल्या ना कुठल्या तरी एका स्थितीत आपण असतो आणि त्या स्थितीची आपण काळजी घेत असतो. अनेकदा आपली सामाजिक स्थिती सुद्धा फार महत्त्वाची होऊन जाते आणि ती टिकावी म्हणून आपण काळजी घेतो . अलीकडे स्टेटस इतके महत्त्वाचे झाले आहे की सर्व काही खेळ स्थितीचा झालेला आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या स्थितीत आहात यावरून समाजातील तुमचे स्टेटस ठरते आणि त्या स्टेटस नुसार तुमचे मूल्यमापन होते त्यामुळे साहजिकच जो तो आपले स्टेटस टिकवण्यासाठी हल्ली धडपडत असतो . अवस्था आणि स्टेटस यांच्यामध्ये फरक हाच आहे की अवस्था ही नेहमी संबंधांच्यात असते तर स्थिति ही स्वतःची असते स्टेटस हे स्वतःचे असते 

१० प्राणात्मक काळजी :ही कदाचित सर्वात नैसर्गिक वाटावी अशी काळजी असते माणूस आपल्या प्राणाची काळजी घेतोच घेतो. या प्राणातून निर्माण होणाऱ्या अंत:करणाची ज्यामध्ये मनही येते तो काळजी घेतो अहंकार, मन यासारख्या अनेक गोष्टींची आपल्या अभिमानाची अस्मितेची काळजी तो घेत असतो ज्याला आजकाल मानसशास्त्रीय काळजी म्हणतात ती या प्राणात्मक काळजीचा एक भाग आहे इथूनच मोक्षाचीही सुरुवात होते कारण अंतिमत : स्वतःची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या मोक्षाची काळजी घेणे .


माणसाजवळ काळ आहे त्याला काळाची जाणीव आहे आणि म्हणूनच त्याला काळजीची ही जाणीव आहे आपली घेण्यात आलेली काळजी तो अनेकदा लक्षात ठेवतो आणि स्वतःची काळजी तर तो करतच असतो हळूहळू ही काळजी जेव्हा चिंतेत रूपांतरित होते घोरात रूपांतरीत होते तेव्हा ती हळूहळू विकृतीकडे सरकायला लागते म्हणूनच घोराकडून अघोराकडे येणे गरजेचे बनते किंबहुना आपण सर्वच तसा प्रयत्न करत असतो. अघोर होणे म्हणजेच मोक्ष मिळवणे होय. चिंता ही नेहमीच घोराची केवळ एक भाग आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे. भय आणि चिंता यांचे अतिशय डेडली कॉम्बिनेशन घोरामध्ये असते. अघोर साधना म्हणजे भय आणि चिंतेवर मात करणारी साधना होय आणि आपण सर्वच ही साधना करत असतो. आपल्यातील चिंतेवर आणि भयावर मात करायचा प्रयत्न करत असतो. अघोर बनण्याचा प्रयत्न करत असतो .अघोर तंत्र म्हणजे स्वतःची ,लोकांची, पर्यावरणाची काळजी घेणे होय. त्यासाठी चिंतामुक्त आणि भयमुक्त होणे होय. अलीकडे काही मूर्ख लोकांनी याचा भलताच अर्थ लावलेला आहे . मुख्य म्हणजे साधना म्हणजे काय आणि ती कशासाठी करायची असते हे न कळल्याने हा गोंधळ झालेला आहे. अघोर लोक जेव्हा स्मशानात साधना करत असतात तेव्हा ते प्रत्यक्षात मृत्यूवर ,मृत्यूच्या चिंतेवर, मृत्यूच्या लागलेल्या घोरावर मात करायला ठामपणे स्मशानात बसतात . मृत्यूच्या डोळ्याशी डोळे भिडवतात . तुम्ही सतत आयुष्यात कधीतरी पंधरा-वीस चीता जळताना पहा किंबहुना आपल्याकडे कोणाचेही मरण चुकवू नये असा जो शैव नियम आहे तो यासाठीच आहे की तुम्ही मृत्यू पहावा आणि तुम्हाला याचा एहसास व्हावा जाणीव व्हावी की एक दिवस तुम्ही सुद्धा या स्मशानात असेच येणार आहात . म्हणूनच मरण आणि तोरण टाळायचे नाही असा नियम शैवधर्मधारकांच्यात केला गेला आहे. कारण माणसाला सर्वाधिक मोठी काळजी सर्वात मोठा घोर हा मृत्यूचाच असतो एकदा का तो त्या मृत्यूच्या भयापासून मुक्त झाला की मग आयुष्य अतिशय आनंदाने जगू शकतो. कोणाशीही लढू शकतो . आयुष्याचा अंतिम उद्देश हा आनंदाने जगणे हाच आहे. तेव्हा आनंदी व्हा आनंदी राहा आणि आनंद वाटत राहा.


तेव्हा थोडक्यात काय काळजी घ्या स्वतःची ,स्वतःच्या कुटुंबीयांची, स्वतःच्या जिवलगांची ,स्वतःच्या समाजाची आणि स्वतःच्या पर्यावरणाची सुद्धा! आणि आनंदी व्हा.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय