ग्रेट लोकांची गोची आणि भारत श्रीधर तिळवे नाईक 


भारत हा एक असा देश आहे जो मेडी ओकर लोकांनी भरलेला आहे हे लोक केवळ मेडिओकर असते तर ठीक होते परंतु ते अल्पमतीबद्ध आहेत याचे एकमेव कारण ते मांत्रिकीने कायम भारावलेले असतात ही मांत्रिकी एका धर्माची मक्तेदारी नाही सर्व धर्मात ती आढळते शैव श्रुतीतले भगत ,युरेशियन श्रुतीतले वेदोक्त पुराणोक्त ब्राह्मण, ( इतर ९५% ब्राह्मण मांत्रिकीमधून बाहेर पडलेले आहेत मी जेव्हा ब्राह्मणांच्यावर टीका करतो तेव्हा ती मांत्रिक ब्राह्मणांच्यावर असते हे नेहमी लक्षात घ्या )ख्रिश्चन धर्मातले काही पादरी, मुस्लिम धर्मातले काही बाबा टाईप मौलवी यांनी बनवलेले असे सर्व धर्मीय मंत्रीकीय वास्तवच भारतात राज्य करत असते श्रद्धेचा अत्यंत विपरीत अर्थ लावून हे लोक अंधश्रद्धा लादत असतात . यातील काही लोकांची नरवळी देण्यापर्यंत मजल गेलेली आहे आणि त्यांना पोलिसांनी अटक पण केलेली आहे . 


पण यातून एक विचित्र प्रकार उदयाला येत जातो तो म्हणजे स्वतःचे अत्यंत कातडी बचाव अशी मेडीओकर वृत्ती आणि धोरण संपूर्ण समाजावर लादणे आणि यदाकदाचित एखादा ग्रेट मनुष्य स्वतःच्या प्रतिभेच्या जीवावर पुढे आला तर त्याचा जास्तीत जास्त कोंडमारा करणे असा एक उद्योग आपल्याकडे चाललेला असतो याला कुठलेही क्षेत्र अपवाद नाही . अनेकदा पायोनियर असणारे अनेक लोक यांच्यामुळे व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काम करताना दिसतात . यामध्ये टाटा अंबानींच्यापासून जगदीश चंद्र बोस सत्येंद्रनाथ बोस यांच्यापर्यंत शिवाजी महाराज टिळक गांधी आंबेडकर पेरियार यांच्यापासून रवींद्रनाथ टागोर अमर्त्य सेन यांच्यापर्यंत भगवान शंकर महावीर बुद्ध यांच्यापासून बसवेश्वर फुले यांच्यापर्यंत सर्वच लोकांना याचा फटका पडलेला आहे. सावरकरांच्या पासून भगतसिंग यांच्यापर्यंत अनेक क्रांतिकारकांना सुद्धा या मेडीओकर वृत्तीचा त्रास झालेला दिसतो. 


क्रीडा आणि क्रिकेटचे क्षेत्र याला अपवाद नाही . साहजिकच जेव्हा जसप्रीत बुमराह बद्दल जागतिक दर्जाचा नंबर एक खेळाडू म्हणून चर्चा सुरू झाली तेव्हाच हे माहीत होते की त्याची गोची आता वारंवार केली जाणार. त्याच्या आधी अशाच प्रकारची गोची अजित वाडेकर (कॅप्टन म्हणून खेळाडू म्हणून नव्हे), सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीत केली गेली होती. हे सर्व जगात नंबर एक खेळाडू म्हणून उदयाला आले होते. संपूर्ण जगाने त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते आणि यातल्या प्रत्येकाची गोची करण्यात आली होती. 


प्रश्न इतकाच होता की या विश्वचषक स्पर्धेत बुमराहची गोची कशी केली जाईल? 


सुरुवातीला त्याच्याकडून ओपनिंग करण्याचे काढून घेण्यात आले जेणेकरून त्याला मिळणाऱ्या विकेटांची संख्या कमी व्हावी. जेणेकरून विक्रमवीर म्हणून प्रस्थापित होऊ नये . काही काळ जसप्रीत बुमराह यामुळे नामोहरम झालेला स्पष्टपणे दिसत होता. पण नंतर त्याने पाचव्या आणि नंतरच्या ओव्हरस मध्ये पण चांगलीच गोलंदाजी करायला सुरुवात केली आणि सूर्यकुमार यादव आणि गंभीर यांची चांगलीच पंचाईत झाली.


मग याला शह म्हणून शेवटची ओव्हर त्याला द्यायची नाही असे कारस्थान सुरू झाले आणि शिवम दुबे सारखा अत्यंत दुय्यम दर्जाचा गोलंदाज शेवटच्या ओव्हरसाठी आणला गेला .


तिसरी गोष्ट Arshdeep हा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आणला गेला . आता याच्या बाबतीतला प्रॉब्लेम असा आहे की हा कधीच थोर खेळाडू नव्हता पण उत्तम खेळाडू होता . त्याच्या बाबतीतला सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच होता की हा खेळाडू स्वतःहून विकेट्स काढू शकत नाही . तो फलंदाजांनी केलेल्या चुकांच्यावर अवलंबून असतो आणि त्याला मारण्याच्या प्रयत्नातच अनेकदा खेळाडू बाद होतो. ग्रेट खेळाडू अशी वाट पाहत नाही तो विकेट काढायला आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो खुद्द जसप्रीत बुमराह ही गोष्ट वारंवार करत असतो. मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 20-20 मध्ये विकेट्स किती गेल्या हे महत्त्वाचे नसते तर किती रन तुम्ही वाचवल्या हे अधिक महत्त्वाचे असते कारण विजय विकेटांच्या संख्येवर अवलंबून नाही . परंतु मीडियामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक विकेट्स प्रोजेक्शन द्यायचे आणि बूमराहला विकेट मिळणार नाही याची काळजी घ्यायची असला नतदृष्ट उद्योग आपल्याकडच्या अति शहाण्या लोकांनी सुरू केला . त्या उलट Arshdeep किती विकेटा काढतो अशा चर्चा सुरू केल्या याचा एक परिणाम असा झाला की अर्शदीप मुळे विकेट पडतायेत परंतु रन्स मात्र भरपूर दिल्या जात आहेत असा विरोधाभास निर्माण झाला . पुढे मग वरुण चक्रवर्ती आला आणि सेम घडले . याचा प्रतिस्पर्धी संघाला कायमच फायदा होत गेला किंबहुना हे दोघे आहेत तोपर्यंत रणा बनवा आणि जसप्रीत बुमराह आला की डिफेन्स करा असे एक धोरण सर्व प्रतिस्पर्धी संघांनी तयार केले त्यामुळे दीपच्या नावाने विकेटा लागणे सुरू झाले परंतु विजयाच्या अंगाने त्याचा फायदा होईना . या सगळ्या प्रकारामध्ये जसप्रीत बुमराह याच्या मानसिक संतुलनाचे कंबरडे मोडणे हा एक उद्योग अत्यंत व्यवस्थितपणे आखला गेला आणि काही काळ त्याला यश पण आले परंतु इंग्लंडविरोधात खेळताना जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा स्वतःला सावरताना दिसला. सचिन तेंडुलकरची अशीच गोची करण्यात आली होती मात्र त्यावेळेला मॅच फिक्सिंग हा अत्यंत हैवानी उपाय योजला गेला होता . हा इतका प्रभावी होता की शेवटी नाईलाजाने सचिन तेंडुलकरला कॅप्टनशिप सोडावी लागली जे अभिप्रेत होते परंतु ज्याला ती द्यायची होती त्याच्याकडे ती दिली गेली नाही आणि सचिनने व्यवस्थित गेम करून ती कॅप्टनशिप सौरभ गांगुली कडे दिली. यामुळे मॅच फिक्सिंग पासून सुटका तर झालीच पण क्रिकेटही पुन्हा एकदा थोडेफार सभ्य झाले. अर्थातच मोहम्मद अझरुद्दीन हा फार मोठा सभ्य माणूस आहे असे काँग्रेसने उमेदवारी देऊन सिद्ध केले .(काँग्रेसच्या विरोधात ज्या काही गोष्टी केल्या त्यामध्ये ही एक गोष्ट होती आणि काँग्रेसला याची आजही जाणीव नाही) कारण न्यायालयामध्ये कसलेही पुरावे आढळले नाहीत. म्हणजे नेमके काय झाले हे आजतागायत कुणालाही माहित नाही.


सुदैवाची गोष्ट अशी की जसप्रीत बुमराहबाबत असे काही करता येणे शक्य नव्हते कारण आता व्यवस्था बदललेली आहे. पण मैदानावरच्या रणनीतीमध्ये बूमराह प्रोजेक्ट होणार नाही याची काळजी सूर्यकुमार यादव सतत घेत असतो . किंबहुना हार्दिक पांड्याकडून सूर्यकुमार यादव कडे नेतृत्व गेले त्याचे सर्वात मोठे कारण हे दोघेही म्हणजे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी चमकायला लागले होते .(या दोघांना अंबानींचा पाठिंबा आहे म्हणून हे निदान तरले तरी) यातील हार्दिक पांड्याच्या बाबतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये निमित्तच मिळाले अन्यथा त्याचा विनोद कांबळी करण्याची पुरी तयारी झालीही होती पण सुदैवाने हार्दिक पांड्याला एक अतिशय उत्तम पार्टनर मिळाली आणि सायकॉलॉजिकली तो सेट झाला याचे फळ ताबडतोब त्याला मिळालेलेही दिसते माणूस मानसिक पातळीवर आरामात असला की मग तो उत्तम खेळतो. हार्दिक पांड्या उत्तम खेळायला लागला. त्याला प्रथम बुमराह च्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु तो यशस्वी झाला नाही. सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टनशिपला या दोघांच्याकडूनच खतरा आहे. त्यामुळे गंभीरला तो सोईस्कर आहे . सर्व श्रेय कोचला मिळावे असे गौतम गंभीरला वाटणे ही एक नैसर्गिक भावना आहे पण ही भावना खेळापेक्षा मोठी झाली की गोंधळ व्हायला लागतो तो होता कामा नये. दुर्दैवाची गोष्ट अशी की जसप्रीत बुमराहबाबत हे अनेकदा झालेले आहे. 


सर्वसाधारणपणे सगळेच ग्रेट खेळाडू हे अशा प्रकारच्या मीडिओकर वृत्तीला पुरून उरतात तसा बुमराह सुद्धा आता उरलेला दिसतो . खरे तर असे काही होईल असे सांगणारी एक पोस्ट पूर्वी मी टाकली होती. 


प्रश्न असा आहे की जगात कुठलाही आपला माणूस जागतिक पातळीवर श्रेष्ठ व्हायला लागला तर भारतीय लोक त्याला असे का ठोकतात ? राजकीय क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी जोपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व निर्माण करत नव्हते तोपर्यंत अशा प्रकारचा उद्योग सुरू नव्हता परंतु अचानक ते अशा पद्धतीने यशस्वी होण्याची चिन्हे दिसायला लागली आणि अनेकांच्या पोटात ढवळायला लागलं . त्यांचे राजकारण योग्य की अयोग्य हा एक वेगळा मुद्दा आहे त्यावर चर्चा होईलच परंतु त्यांच्या प्रसिद्धीचा प्रॉब्लेम अनेकांना होताना दिसतो हे सुद्धा आपल्या मेडिओकर वृत्तीला साजेसे आहे. काही अतिरेकी वर्णव्यवस्थेचे समर्थक मोदींच्या विरोधात असण्याचे सर्वात मोठे कारण ते ओबीसी आहेत हेच आहे वास्तविक मोदी यांनी कायमच सर्ववर्ण समभाव दाखवलेला दिसतो पण काही अतिशहाण्यांना ते दिसत नाही. जसप्रीत बुमराह हा ओबीसींच्या मधून आलेला सर्वोत्तम खेळाडू आहे म्हणून हे सर्व होते आहे का? हाही प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे . वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी या क्षेत्रातल्या लोकांनी क्रिकेटच्या क्षेत्रात येऊ नये अशी मानसिकता असणारे लोक क्रिकेटमध्ये फार पूर्वीपासून आहेत . त्यांच्यावर उघडपणे फारसे बोलले जात नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही वृत्ती अस्तित्वात आहे यातूनच यशस्वी जयस्वालला संपवण्यात आले. पुन्हा मराठी लोकांच्याच विरोधात सर्वच अमराठी एकत्र आलेत की काय असा प्रश्न पडावा. अन्यथा ऋतुराज गायकवाड ची एवढी गोची करण्यात आलीच नसती .(त्याला फक्त दक्षिण भारतातूनच संधी मिळते आहे हा योगायोग नाही) याबद्दल बोलताच कामा नये अशी एक काही जणांची वृत्ती आहे पण म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो तसे थोर खेळाडू काही काळ कोंडले गेल्याचे दुःख नाही पण वर्णव्यवस्था सोकावते म्हणून लिहावे लागते.


भारतीय लोकांच्यामध्ये वर्णव्यवस्थेने निर्माण केलेले सर्वात मोठे दुर्गुण मत्सर आणि स्वतःच्या अस्तित्वाचा द्वेष हे आहेत. वर्ण व्यवस्थेतून मुक्त होण्यासाठी प्रथम या दुर्गुणातून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे जे जे थोर आहे त्या थोरवीला मान्यता आणि प्रतिष्ठा देणे मानाचा सॅल्यूट देणे गरजेचे आहे. कोण कुठून आला याच्याशी कसलेही देणे घेणे नसावे फक्त त्याची गुणवत्ता काय हे तपासावे . गुणवत्ता ही नेहमीच व्यक्तिगत असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली ना कुठली तरी गुणवत्ता असतेच असते ती ओळखावी लागते. आपल्याकडे व्यक्तिगत असलेली ही गुणवत्ता अनेकदा वर्णव्यवस्थेमुळे वर्ण गत असते किंवा जातिगत असते असा एक फार मोठा गैरसमज अत्यंत जाणीवपूर्वक ब्राह्मणी व्यवस्थेने जोपासलेला आहे. हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे आणि प्रत्येकाच्या व्यक्तिगत प्रतिभेला योग्य तो आदर मिळणे आणि वाव मिळणे गरजेचे आहे हे ओळखले पाहिजे जर का हा देश आणि हे जग उत्तम व्हावे अशी इच्छा असेल तर प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली तरी गुणवत्ता असतेच तिला फुलवावे लागेल आणि ती फुलताच तिला मान आणि प्रतिष्ठा द्यायला हवी हे बेसिक जोपर्यंत आपल्या हाडामासात खेळत नाही तोपर्यंत आपण असेच राहणार आणि स्वतःच्या भूमीतून उदयाला आलेल्या सर्व सर्वोत्तमांना आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना कायमच कोंडमाऱ्यात दाखल करत राहणार. प्रतिभा ही कुठल्याच भूमीशी निगडित नसते जगातल्या कुठल्याही भूमीतून ब्रह्मांडातल्या कुठल्याही व्याप्तीतून प्रतिभा उगवू शकते त्या प्रतिभेला आपण ओळखले पाहिजे आणि तिला उमलवण्यासाठी योग्य तो अवकाश आणि काळ दिला पाहिजे. याबाबतीत भेदाभेद होता कामा नये . (काही ब्राह्मण द्वेष्ट्या लोकांनी सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या ब्राह्मणांचाही असाच द्वेष करायला सुरुवात केलेली आहे त्यालाही माझा विरोध आहे.) आज अमेरिका आणि भारत यांच्यातला फरक हा संधींचा फरक आहे हे ओळखले पाहिजे. मत्सरामुळे संधी आकसत जाते . तेव्हा मत्सर करणे आपण जेवढ्या लवकर थांबवू आणि आसपास असणाऱ्या सर्वोत्तम आणि उत्तम लोकांना त्या त्या क्षेत्रात जितक्या लवकर आपण उमलवू आणि फुलू देऊ तेवढे बरे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय