भारतीय शिक्षणाचा इतिहास , ख्रिश्चन धर्म आणि गॉर्डन हॉल समाज किंवा जात ही सामाजिक की शैक्षणिक ? श्रीधर तिळवे नाईक 

भारताचा इतिहास हा एक अत्यंत विलक्षण पद्धतीचा इतिहास आहे आणि भारतीय शिक्षणाचा इतिहास याला अपवाद नाही भारतीय शिक्षणाचा इतिहास सुद्धा भारतीय इतिहासाप्रमाणे किमान तीन पद्धतीने लिहिला जातो. आणि आता चौथ्या पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे. पहिली पद्धत शैव पद्धत आहे दुसरी पद्धत युरेशियन पद्धत आहे जी प्रामुख्याने ब्राह्मणी आहे तर तिसरी पद्धत ही ओरिएंटल आहे आणि आता चौथी पद्धत आणली पाहिजे जीच्या दिशेने मी स्वतः अधून मधून प्रयत्न करत असतो ती म्हणजे ऑक्सिडेंटल पद्धत ! ओरिएंटल पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे इतिहास लिहिणारे जे आऊटसाईडर इतिहासकार आहेत ते त्यांच्या अमेरिकन किंवा युरोपियन दृष्टिकोनातून किंवा मुस्लिम दृष्टिकोनातून किंवा जुडाईक दृष्टिकोनातून लिखाण करत असतात आज त्यांना आपण ओरिएंटल या एका नावाखाली आणू शकतो पण त्याचबरोबर हेही खरे की आपण जेव्हा युरोपचा किंवा अमेरिकेचा इतिहास लिहितो तेव्हा तो आपण आपल्या पद्धतीने पहात असतो याला मी ऑक्सिडेंटल इतिहास लेखनाची पद्धत म्हणतो ओक्सीडेंटल इतिहास हा नेहमीच ओरिएंटल इतिहासाची सुद्धा चिकित्सा करत असतो.


भारतात शैव पंडितांनी इतिहास लेखनाची परंपरा घालून दिली हे आता सर्वश्रुत आहे अन्यथा त्यापूर्वी अनेकदा इतिहास पौराणिक पद्धतीनेच लिहिला जात होता जी युरेशियन पद्धत आहे या संदर्भात कश्मीरी पंडितांचे काम हे सर्वाधिक वाखाणले जाते आणि भारताचा आद्य इतिहासकार म्हणून कल्हणचां उल्लेख होत असतो. हीच इतिहास लेखनाची पद्धत पुढे मुस्लिम इतिहासकाराने अधिक पुढे नेलेली दिसते.


यानंतर मग इतिहासाकडे पाहणारा दृष्टिकोन आपणाला महात्मा फुले यांच्याकडे दिसतो त्यांनी ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर या संघर्षामध्ये संपूर्ण भारताचा इतिहास पाहण्याचा पहिला प्रयत्न केला.


या पार्श्वभूमीवर आपण जर का ओरिएंटल इतिहासाकडे वळलो तर त्याची सुरुवात प्रामुख्याने मेगास्थिनस या ग्रीक पंडिताने केली असे आपण म्हणू शकतो. पुढे मग अनेक मुस्लिम इतिहासकारांनी यामध्ये प्रचंड भर टाकलेली दिसते यामध्ये सर्वात अवघडलेला इतिहास हा मुस्लिम कालखंडातील भारतात असलेल्या मुस्लिम इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास आहे. हा इतिहास एकीकडे मुस्लिम दृष्टिकोनातून लिहिला गेलाय आणि दुसरीकडे तो भारतातून लिहिला गेलेला आहे आणि या इतिहासकारांची नजर ही सरळ सरळ पूर्वग्रह दूषित आहे म्हणजे हिंदू म्हणजे भारतीय हे मूर्ख मूर्तिपूजक आहेत अशा स्टाईलने हा इतिहास लिहिला जातो. दारा शुकोहसारखे लोक याला अपवाद आहेत पण ते फार कमी आहेत.मात्र इतिहासाकडे पाहणारा भारतीय मुस्लिम वादी दृष्टिकोन म्हणून आपल्याला आता त्याचा विचार करावा लागतो या दृष्टिकोनाला ओरिएंटलच म्हणावे लागते कारण हे लोक इतिहास लिहिताना कळत नकळत आऊटसाईडर म्हणून लिहितात. यांच्या इतिहासामुळे काही विचित्र प्रश्न निर्माण होतात म्हणजे त्या काळामध्ये महंमद पैगंबर यांनी स्त्रियांना शिक्षण देणे मान्य केले होते त्यामुळे साहजिकच मुस्लिम स्त्रिया शिकत होत्या त्यामुळे जेव्हा आपण शिक्षणाचा शिक्षणाच्या इतिहासाचा प्रश्न विचारात घेतो तेव्हा ज्या मुस्लिम स्त्रिया आणि शैव स्त्रिया या काळात शिकत होत्या त्यांची संख्या जर मिळून आपण पाहिली तर ती तब्बल ८० ते ९०% आहे . त्यामुळे मोगलांच्या बायका , जिजामाता, अहिल्याबाई होळकर या शिकत होत्या. त्यामुळे भारतात शिक्षण नव्हते असा दावा जेव्हा कोणी करत असते तेव्हा त्या दाव्यामध्ये खरोखर काही सत्य असते का ? आपल्याकडे युरेशियन पद्धतीने इतिहास लिहिणारे लोक खूप पद्धतीचा शहाणपणा गाजवत असतात त्यातला एक शहाणपणा म्हणजे आम्ही संस्कृत शिकायची परमिशन कोणालाच दिलेली नव्हती म्हणून बहुजन समाजाला संस्कृत नव्हते येत नव्हते असे सांगणे. वास्तविक संस्कृत फक्त युरेशन लोक बोलत नव्हते भारतामध्ये शैव लोकांच्या मध्ये अनेक संस्कृत बोलणारे लोक होते. त्यातले अनेक पंडितच होते . त्यामुळे संभाजी महाराज सुद्धा संस्कृत सहज शिकू शकले. शैव धर्म हा कधीही युरेशियन श्रुतीचा भाग नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तो तसा नंतर ब्रिटिशांच्या काळात हुशारीने का बनवला गेला असा प्रश्न आपण विचारायला हवा .


तुम्ही म्हणाल हा प्रश्न आता का उपस्थित होतो आहे त्याचे कारण गॉर्डन हॉल यांचे द्विशताब्दी स्मृती वर्ष सुरू झालेले असून आज म्हणजे 25 मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक चर्चा सुरू होणे अटळ आहे पण या सर्व चर्चा भारतीय जनतेची दिशाभूल करण्याची फार मोठी शक्यता आहे. याचे कारण असे की मिशनरी लोक कायमच आपल्या पद्धतीने भारताचा इतिहास मांडत असतात. त्यामुळे गॉर्डन हॉल यांना भारतीय शिक्षणाचे आद्य प्रणेते बनवण्याचा प्रयत्न सुरू होणे अटळ आहे. आपल्याकडे ख्रिस्ती लोक तर असा प्रयत्न नेहमीच करत असतात कारण त्यांना आपण स्वीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचे समर्थन करायचे असते. 


वास्तविक इंग्रज येण्यापूर्वीसुद्धा भारतामध्ये एक विशिष्ट पद्धतीची शिक्षण व्यवस्था होती आणि भारतामध्ये किमान हजार वर शाळा होत्या. या शाळांच्या मध्ये सर्वाधिक शिकणारे लोक हे वैश्य होते आणि सर्वाधिक कमी शिकणारे लोक ब्राह्मण होते हे लक्षात घेण्याजोगे आहे.

त्यामुळे शाळा वगैरे गोष्टींचे श्रेय कोणालाच देऊ नये शाळा व्यवस्था या भारतामध्ये फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 


भारतामध्ये साधारणपणे दोन पद्धतीच्या शाळा होत्या १ मोक्ष शाळा या प्रामुख्याने शैव मंदिरामध्ये एकेकाळी चालवल्या जात होत्या . माझ्या स्वतःच्या मंदिरामध्ये अशा शाळा पोर्तुगीज काळामध्ये सुरू होत्या आणि माझे पणजोबा खापर पंजोबा या शाळेमध्ये व्यवस्थित शिकवत होते. पुढे मग मंदिर आणि शाळा दोन वेगळ्या गोष्टी झाल्या आणि हा युरोपियन प्रभाव होता. तेव्हा मोक्ष शाळा ही गोष्ट प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे त्यानंतर मग धर्मशाळा सुरू झाल्या या सुद्धा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत भारतीय मंदिरांच्या बद्दल काही विलक्षण विचित्र संकल्पना आपण करून बसलेलो आहोत. आपल्याकडे आज सुद्धा शाळेतल्या शिक्षकांना पंतोजी म्हटले जाते कारण पंत म्हणजे पंडित आणि हे पंडित मंदिरामध्ये शिकवत होते. गुरव लोकांना सुद्धा जे काही काम होते त्यामध्ये एक शिकवण्याचे काम होते. किंबहुना गुरव आणि पुजारी वेगळे काढले गेले त्याचे सर्वात मोठे कारण हेच होते की गुरव लोकांना शाळा शिकवणे , नाटक बसवणे यासारखी अनेक कामे होती. या गुरव लोकांच्या पैकीच काही लोकांना नंतर पुजारी म्हटले जाई कारण त्यांच्याकडे पूजा करण्याचे काम विशेष काम म्हणून दिले गेले होते. त्यामुळेच बहुजन समाजामध्ये पंडित, गुरव आणि पुजारी अशी धार्मिक त्रयी कार्यरत होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे तिघेही कुठल्याही समाजा मधून उदयाला येत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगदी अस्पृश्य मानल्या गेलेल्या पूर्वाश्रमीच्या महार समाजामध्ये सुद्धा पुजारी आढळतात गुरव आढळतात .


इसवी सन १००० नंतर पंडितांना धाड भरली आणि त्यांनी ब्राह्मण होणे सुरू केले आणि मग हे ब्राह्मण होणे इतके वाढले की मूळ ब्राह्मणांच्या पेक्षा सुद्धा हे बाटलेले ब्राह्मण अधिक कट्टर झाले. यामध्ये सर्व देशस्थ कराडे वराडी सारस्वत द्रविड ब्राह्मणांचा समावेश होतो. हे मूळचे पंडित आहेत . आणि हे प्रामुख्याने उत्तर पेशवाईत आणि इंग्रजांच्या काळामध्ये ब्राह्मण झालेले आहेत. फार थोडे यादवकाळात सुरू झाले होते अन्यथा महाराष्ट्र हा प्रामुख्याने पंडितांचा पंतांचा देश आहे. रामायण, महाभारत आणि वारकरी संप्रदायाने तो ब्राह्मणांचा बनवला. याचे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेले दिसतात. मुख्य म्हणजे जातीव्यवस्था वाढली आता याचा शिक्षण क्षेत्राशी काय संबंध असा प्रश्न तुम्ही विचारू शकता तर याचा अत्यंत खोल संबंध आहे 


मी हे अनेक वेळा मांडलेले आहे की शैव श्रुती ही समाज , गण आणि राज्य अशा तऱ्हेने राजकीय व्यवस्था अमलात आणते तिचा आधार प्रामुख्याने यमनियम आणि यांच्यावर आधारित अनुशासन असतात आणि या अनुशासन किंवा शिस्त , यमनियमातून शासन प्रशासन निर्माण होते शिवाजी महाराजांची राजवट हे या गोष्टीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पर्यंत हे सर्व टिकलेले आहे .


यानंतर उत्तर पेशवाईत हळूहळू समाज जात बनत गेला आणि इथेच शिक्षण फिरलेले आहे . शैव समाजामध्ये प्रामुख्याने समाज हाच शिक्षण द्यायचा म्हणजे कुंभार समाज न्हावी समाज वगैरे सर्व समाज स्वतःचे व्यवसायिक शिक्षण स्वतः देत होते म्हणजेच समाज ही केवळ समाज व्यवस्था नव्हती तर ती शिक्षण व्यवस्था सुद्धा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि त्या काळामध्ये व्यवसायिक शिक्षण फार महत्त्वाचे होते पण व्यवसाय सक्ती नव्हती त्यामुळे एखाद्याला जर स्वतःच्या घरातल्या व्यवसायातून बाहेर पडून दुसरा व्यवसाय करायचा असेल तर तो अनेकदा त्या व्यवसायिकाकडे जाऊन शिकायचा आत्ताच्या भाषेत अप्रेंटिसशिप करायचा . अनेकदा तर असा बाहेरून आलेला मनुष्य जावई करून घेतला जात होता. माझ्या स्वतःच्या पूर्वजांनी स्वतःची पंडिती विद्या बंद करून जेव्हा व्यापार शिकायचे ठरवले तेव्हा ते नाईक परिवाराकडे गेले आणि तिथूनच पुढे तिळवे नाईक यांचे संबंध आले. याचे कारण नव्या युगामध्ये व्यापार केंद्रस्थानी आला आहे असे ओळखणारे काही लोक 19 व्या शतकातच व्यापाराकडे सरकले त्यामध्ये प्रामुख्याने शैव पंडित किंवा ब्राह्मणच होते यामध्ये सर्वात अग्रेसर माहेश्वरी ब्राह्मण होते मेहता ब्राह्मण होते आणि ठाकूर ब्राह्मण होते कर्नाटकात गोव्यात शांभवी ब्राह्मण होते (हे स्वतःला नंतर सारस्वत ब्राह्मण म्हणून घेऊ लागले) त्यामुळेच रवींद्रनाथ टागोर यांच्या म्हणजे ठाकूर यांच्या घराण्याचा सुद्धा समावेश नंतर वैश्य लोकांच्यात झालेला दिसतो. वास्तविक वैश्य वगैरे भानगड शैव-धर्मामध्ये कधीच नव्हती व्यापार मात्र होता व्यापारी होते पणीवाणी होते आणि असा व्यापार स्वीकारण्यामध्ये काही अधःपतन आहे असे कोणी मानत नव्हते. उलट इंग्रजांच्या कडून आपण पोर्तुगीज लोकांच्याकडून आपण व्यापार शिकलो पाहिजे अशी एक नवी जाण या काळामध्ये काही शैव पंडितांच्या मध्ये आली होती आणि त्यातूनच मग माहेश्वरी पंडित मेहता पंडित ठाकूर पंडित शांभवी पंडित, द्रविड पंडित व्यापारामध्ये पडायला सुरुवात झाली. दुर्दैवाने नंतर अचानक मग आपण ओरिएंटल इतिहासाने नव्याने निर्माण केलेल्या फालतू वर्ण व्यवस्थेच्या नादाला लागलो. विशेषत: जनगणनेमुळे फार मोठा प्रॉब्लेम तयार झाला आणि अचानक व्यापार करणाऱ्या पंडित लोकांना काय म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामध्ये अनेकांना वैश्य दर्जा मिळून गेला . या सगळ्या कट कारस्थानामध्ये स्वतःला आर्य समजणारे ब्राह्मण सामील होते. या लोकांची मजल इथपर्यंत गेली होती की संपूर्ण लिंगायत धर्म या लोकांनी शूद्र वर्णांमध्ये टाकून दिला होता. शीख धर्मा बाबत सुद्धा हा प्रयत्न केला गेला होता. याचे कारण लिंगायत आणि शैव शीख आणि शैव यांच्यामध्ये काय संबंध आहे याची यांना नीट कल्पना आली होती. यातील लिंगायत लोकांना तर कोर्टात जाऊन शेवटी लढाई जिंकावी लागली. 


पण याचा एक दुष्परिणाम असा झाला की व्यापार करायचा असेल किंवा त्यासारख्या काही वैज्ञानिक आणि तंत्र वैज्ञानिक गोष्टी करायच्या असतील तर आपणाला इंग्रजीतूनच शिकायला हवे अशी भावना प्रबळ होत गेली. याबाबतीत आपणाला मेडिकल सायन्सचे उदाहरण उत्तम उदाहरण म्हणून घेता येते म्हणजे वर्णव्यवस्थेच्या भीषण भानगडीत वैद्यकीय नेहमीच शूद्रांचा धंदा होता. अगदी अश्विनी कुमार सुद्धा शूद्र आहेत असे सांगितले गेले आहे याचे कारण वैद्याला अनेकदा रोगराईला आणि रोगपूरक असलेल्या शरीराला स्पर्श करावा लागतो त्यामुळे त्याला अस्पृश्य मानण्यापर्यंत सुद्धा काही लोकांची मजल गेलेली होती पण इंग्रजांनी अचानक एक व्यवस्था ऍलोपथीच्या साह्याने डेव्हलप केली आणि यामध्ये पैसा आहे हे लक्षात येतात अनेक ब्राह्मणांनी मग या व्यवसायामध्ये उडी मारायला सुरुवात केली यातील सुरुवातीचे ब्राह्मण हे मूळचे शैव असल्याने त्यांना हे सोपे गेले परंतु काही कोकणस्थ वगैरे कट्टर पण होते त्यांना पण आता डॉक्टर व्हायचे होते साहजिकच या लोकांनी हा व्यवसाय हळूहळू अचानक ब्राह्मणांचा व्यवसाय करून टाकला जो प्रत्यक्षात ब्राह्मणांचा कधीच नव्हता. तो नेहमीच पंडितांचा होता . महाराष्ट्रामध्ये मूळचे पंडित असल्याने अनेक लोक वैद्यकीय व्यवसाय करत होते. पुढे अशाच प्रकारचा क्रांतिकारक बदल अभिनयाबाबत झाला . म्हणजे ज्यात पैसा आहे तो व्यवसाय ताबडतोब उच्च वर्णाचा करून घेण्याचा प्रयत्न आपल्याकडे सुरूच होता. पत्रकारिता त्यासाठी राबवली जात होती. 


हे सर्व सांगण्याचे कारण असे की भारतातली शिक्षण पद्धती ही काही केवळ ब्राह्मणांच्या आधारे चाललेली नव्हती ती पंडितांच्या आणि शैव गुरवांच्या साहाय्याने सुद्धा सुरू होती हे लक्षात घ्या. दुर्देवाची गोष्ट अशी की ओरिएंटल पद्धतीने इतिहास लिहिणाऱ्या अनेक लोकांना हा बेसिक मुद्दाच कळालेला नाही . त्यामुळेच भारतात पूर्वीपासून शाळा होत्या ही गोष्ट नाकारली गेली. नामदेव शिंपी असून सुद्धा लेखन विद्या जाणत होता ही गोष्ट नाकारली गेली आणि शूद्रांना खरे तर शैव लोकांना लिहिणे वाचणे येत नव्हते अशा प्रकारचा गैरसमज अत्यंत जाणीवपूर्वक पसरवला गेला. याबाबतीत शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा ते निरक्षर आहेत हा गैरसमज पसरवला गेला होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे याचे कारण हे शैव राज्यकर्ते होते . यांचा विसर पडावा म्हणून या लोकांचा इतिहास अक्षरशः नामशेष करण्यात आला होता इतका की यांच्या वारसदारांना सुद्धा सुद्धा यांची पुरेशी आठवण राहिलेली नव्हती. आणि ब्रिटिश काळामध्ये पुन्हा एकदा शिवाजीचा शोध लागला . अन्यथा स्वतःला शिवाजी महाराजांचे वारस बनवणारे लोक सुद्धा शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे याविषयी अज्ञानी होते आणि फुल्यांनी जेव्हा समाधी शोधली तेव्हा यांना समाधीचा शोध लागला तोपर्यंत यांना शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध सुद्धा घ्यावासा वाटला नव्हता हे लक्षात घेण्याजोगे आहे. आज सुद्धा महाराजांची शैव ही आयडेंटिटी लपवण्याचा सर्वार्थाने प्रयत्न चालू असतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला मराठा लोक बळी पडत आहेत त्यातूनच मग कोल्हापूरच्या अंबाबाईला महालक्ष्मी बनवण्याचा प्रयत्न सुरू असतो. आणि त्यामध्ये आपले मराठे लोक सुद्धा सामील असतात.


या सगळ्या पार्श्वभूमीवर गॉर्डन हॉल यांचे काम पाहिले पाहिजे. या माणसाने नेमके क्रांतिकारक काम केले म्हणजे काय केले हे आपण समजून घेतले पाहिजे. त्याने योगदान दिलेली सर्वात लक्षणीय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे "लेकराची पहिली पोथी "हे 1818 वर्षी छापण्यात आलेले पहिले अमेरिकन मिशन माले मधील पुस्तक हे साधारणपणे या पद्धतीचे पहिले अर्वाचीन पुस्तक मानता येते. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे मोडी लिपी मध्ये हे पुस्तक छापले गेले होते हे लक्षात घेण्याजोगे आहे म्हणजेच मोडी लिपीत फॉन्ट तयार करता येत होते केले गेले होते. मग अचानक देवनागरी लिपी कडे मराठी भाषा सरकली कशी आणि ती कुणी सरकवली ? जर का एका अमेरिकन मिशनरी माणसाला मोडी लिपीचे फॉन्ट तयार करता येतात तर भारतातल्या आणि मुख्य म्हणजे मराठी ब्राह्मणांना मोडी लिपी का स्वीकाराविशी वाटली नाही? की यानिमित्ताने मोडी लिपी छापखान्यामध्ये किती अवघड आहे याचा सातत्याने प्रचार करत देवनागरी लिपी आणण्याचे कटकारस्थान रचले गेले ? एकदा का मराठी संस्कृतीने देवनागरी लिपी स्वीकारली की मग आपोआपच संस्कृत स्वीकारली जाईल आणि एकदा का संस्कृतजन्य मराठी स्वीकारली की आपोआपच उत्तर भारतीय ओळख स्वीकारली जाईल असे हे इथल्या तथाकथित मराठी युरेशियन ब्राह्मणांचे किंवा स्वतःला युरेशियन समजणाऱ्या ब्राह्मणांचे गृहितक होते ? दक्षिण भारतातल्या इतर सर्व भाषा आपली लिपी शाबूत ठेवतात इतकेच कशाला गुजराती लोक सुद्धा आपली लिपी शाबूत ठेवतात आणि फक्त मराठीच ब्राह्मणांना आपली मोडी लिपी फॉन्ट अवघड असल्याने किंवा वाटल्याने शाबूत ठेवता येत नाही ही नेमकी काय भानगड आहे की हा उत्तर पेशवाईचा परिणाम आहे ? वस्तुस्थिती अशी आहे की उत्तर पेशवाई मध्ये मराठी संस्कृतीमध्ये ब्राह्मणीकरण हे सर्वाधिक जास्त झालेले होते व आहे आणि याला जबाबदार उत्तर पेशवाईची राजवट आहे. वर्णजात व्यवस्थेचा सगळा गाडा हा प्रथम मराठी ब्राह्मण लोकांनी आणला मनुस्मृती राजवट सर्वात प्रथम मराठी ब्राह्मण लोकांनी उत्तर पेशवाई मध्ये आणली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच मराठीच ब्राह्मणांना अधून मधून मनुस्मृती संविधान आणण्याचे स्वप्न इतर प्रांतातल्या ब्राह्मणांच्या पेक्षा जास्त पडत असते . आपण आर्य आहोत ही भावना मराठी ब्राह्मणांनी सर्वात प्रथम भारतातल्या ब्राह्मणांच्या मनामध्ये रुजवली (लोकमान्य टिळक हे यातले सर्वाधिक प्रचार करणारे विद्वान होते आणि ते राष्ट्रीय नेतेही होते)हे लक्षात घेण्याजोगे आहे. तेव्हा केवळ उत्तर प्रदेश आणि बिहार यांना दोष देण्यापेक्षा यांच्याबरोबर मराठी ब्राह्मण सुद्धा ब्राह्मणशाहीला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शेवटी नेतृत्व तुमच्या हातात होते . तुमच्या या नेतृत्वाला मुख्य शह महात्मा गांधी यांनी दिला आणि म्हणूनच महात्मा गांधी यांच्यावरचा सर्वाधिक राग हा मराठी ब्राह्मणांच्या मनामध्ये होता ही वस्तुस्थिती आहे. नथुराम गोडसे हा काही योगायोग म्हणून मराठी नव्हता त्यामागे मराठी ब्राह्मणांचे झालेले चलन वलन जे 19 व्या शतकापासून घडायला लागले होते जबाबदार होते . यामागे एका विशिष्ट पद्धतीची शिक्षण व्यवस्था शिक्षण प्रणाली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी आणणे हा या संस्कृतकरणाचा आणि ब्राह्मणीकरणाचा भाग होता सुरुवात होती.


अर्थात या सर्व मिशनरी लोकांचा मुख्य उद्देश ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हाच असल्याने त्यांनी हे छपाईचे काम सुरू केले होते साहजिकच अशा पाठ्यपुस्तकांच्यापेक्षा धार्मिक पुस्तके जास्त छापली गेली ही वस्तुस्थिती आहे. साहजिकच एक क्रम दिसतो शिक्षणाच्या निमित्ताने चंचू प्रवेश करायचा त्यासाठी पाठ्यपुस्तके आणायची त्यानिमित्ताने मग मागीलदाराने धार्मिक पुस्तके आणायची आणि मग ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी पुस्तके आणायची आणि तरीही शिक्षणामुळे परिणाम झाला नाही तर वैद्यकीय शिक्षण वापरत लोकांना आजारातून बरे करत ख्रिश्चन धर्माकडे वळवायचे म्हणजे येथे वैद्यकीय शिक्षण वापरून रोग बरे करायचे मात्र श्रेय विज्ञानाला न देता ख्रिश्चन धर्माला द्यायचे अशी ही पद्धत होती. एका अर्थाने मेडिकल सायन्स हा धार्मिक प्रचाराचा भाग बनला ही वस्तुस्थिती. आज सुद्धा मिरजेच्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये गेलात की याचा आंशिक प्रत्यय येतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिक्षण आणि हॉस्पिटल्स यांचा वापर धर्मप्रचारासाठीच केला जात होता मात्र त्याला उदात्ततेचा अतिशय मोठा मानवतावादी मुलांमा देण्यात येत होता. 


गार्डन हॉल हे या सर्व धर्मप्रक्रियेचे आणि धर्मप्रचाराचे एक भाग होते . त्यांनी काही पॉझिटिव्ह योगदान दिले त्याबद्दल आपण ऋणी असलेच पाहिजे किंबहुना मिशनरी लोकांच्या मुळे भारतात अर्वाचीन पद्धतीचा शिक्षण प्रसार झाला ही गोष्ट नाकारण्यात काहीच अर्थ नाही परंतु यामागे असलेल्या धर्मप्रचाराच्या यंत्रणा सुद्धा आपण नीट तपासल्या पाहिजेत. आपल्याकडे एक तर संपूर्ण स्वीकारायचे किंवा संपूर्ण नाकारायचे असले काहीतरी उद्योग चाललेले असतात अशा उद्योगांनी काहीच होत नाही त्यापेक्षा पॉझिटिव्ह काय होते आणि निगेटिव्ह काय होते हे पाहिले पाहिजे. भारतात मिशनरी येण्यापूर्वी जी काही शिक्षण व्यवस्था होती ती अर्वाचीन नव्हती ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे आणि अर्वाचीन शिक्षण आणल्याबद्दल आपण ब्रिटिश आणि ऑक्सीडेंटल लोकांचे आभारच मानले पाहिजे. पण त्याचबरोबर हेही खरे की हे सर्व पॅकेज डील म्हणून येत होते. तेव्हा हॉल यांना नक्की मानाचा मुजरा द्यावा पण हा मुजरा देताना आत्मभान राखावे. 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय