अनुभव , कला, श्रद्धा , शहाणपण, धर्म आणि कलावंताची सामाजिक बांधिलकी १ श्रीधर तिळवे नाईक 


अनुभव हा मानवी जीवनाचा स्थायीपणा म्हणजे स्थावर आहे जो अजूनही टिकलेला दिसतो. माणसाला इंद्रियांच्याद्वारे प्रथम इंद्रियना होते मग संवेदना होते ही संवेदना माणसामधल्या वेगवेगळ्या अवयव आणि इतर सर्व गोष्टींच्या व्यवस्थांच्यापर्यंत पोहोचते त्यातील मज्जाव्यवस्था nervous system ही सर्वात महत्त्वाची आणि त्यातील मेंदू हा सर्वात महत्त्वाचा अवयव होय. या संवेदनेचे किंवा संवेदन पुंजाचे ग्रहण होते, त्याचे उमटण होते ही उमटणी एकदा पूर्ण झाल्यानंतर मग प्रक्रियेला म्हणजेच प्रोसेसला सुरुवात होते . अनेकदा सर्वात प्रथम या उमटन पासून ठसे तयार केले जातात आणि मग पुढे वाटचाल सुरू होते 


ही प्रोसेस ही प्रक्रिया १ शरीर २ बुद्धी ३ भाव ४ अहं ५ सृजनशीलता ६ अवकाश ७ काळ ८ स्थिती ९ अवस्था १० आणि शेवटी क्रिया कार्यान्वित करते म्हणजेच सर्व नय ऍक्टिव्हेट होतात एक निर्णय घेतला जातो आणि मग कृती होते किंबहुना जो निर्णय घेतो तोच निर्णयक असतो ज्याला आपण मी म्हणतो ( शैव भाषेत नंतर मीत हा शब्द याच अंगाने आलेला आहे त्याच्यानंतर मनमित आणि मितवा मध्ये रूपांतर झालेले आहे) ही या प्रोसेस मधून केली जाणारी कृती संपूर्ण शरीराची अभिव्यक्ती असते त्या शरीरात असलेल्या सर्व नयांची अभिव्यक्ती असते ती कधी क्रियात्मक असते तर कधी प्रतिक्रियात्मक असते. तर कधी कधी नि: ष्क्रियात्मक असते . 


यातील सर्वसाधारणपणे अलीकडे जी बुद्धी आहे ती जाणिवेच्या अंगाने बघितली जाते प्रत्यक्षामध्ये जाणीव शरीरालाही असते आणि भावनेलाही असते आणि बुद्धीलाही असते आणि अहंकारालाही असते आणि सर्जनशीलतेलाही असते ती सर्व नयांना असते . तिचा मुख्य उगम हा प्राणामध्ये असतो. प्राणाचा या अंगाने ऍक्टिव्हेट झालेला भाग म्हणजे चित्त होय. आपल्याकडे त्यामुळेच चित्त वेगळे काढले गेलेले आहे आणि चित्तामध्ये जाणीव नेणीव वगैरे सर्व येतात. हे सर्व एक नेटवर्क म्हणून काम करत असते . त्याचा वेग इतका विलक्षण असतो की आपल्याला असे वाटते की कुठल्यातरी एका अहंकाराने किंवा अहमने किंवा मी ने निर्णय घेतलेला आहे. प्रत्यक्षामध्ये अनेक मी आपल्या देहामध्ये तयार झालेले असतात आणि त्यातील कोणता ऍक्टिव्ह होईल हे कोणीही सांगू शकत नाही कारण हे सर्व काही आलेल्या इंद्रियनांच्यावर अवलंबून असते. इंद्रियना जेव्हा बुद्धी आणि भाव यांनी भयग्रस्त होते तेव्हा ती संरक्षणात्मक बनत जाते आणि संपूर्ण प्रतिक्रिया किंवा क्रिया ही कळत नकळत भयग्रस्त असते. कधी कधी बुद्धी पूर्वग्रहदूषित असते त्यामुळे सुद्धा भय निर्माण होते . त्यामुळेच अनेकदा आपण अनुभवाला अनुभव म्हणून पाहू शकत नाही आणि सगळा गोंधळ इथेच सुरू होतो . आणि यामुळेच कलेची आवश्यकता अधिक निर्माण होते कारण कला जेव्हा अनुभव देते तेव्हा त्या अनुभवामुळे आपल्याला संरक्षण करण्याची गरज नाही हे रसिकाला पूर्णपणे माहिती असते कारण त्याला हे माहीत असते की हे अनुभवाचे सर्जन प्रत्यक्ष सर्जन प्रत्यक्ष अनुभव नाही आहे. हा कलात्मक अनुभव आहे आणि त्यापासून आपल्याला धोका नाही. अर्थातच कलेपासून सुद्धा धोका वाटणारे काही लोक असतात कारण त्यांच्या दृष्टीने कलात्मक अनुभव आणि प्रत्यक्ष आयुष्यातला अनुभव या दोन वेगळ्या गोष्टी नसतात त्यामुळे साहजिकच हे लोक कलात्मक अनुभवांना प्रत्यक्ष अनुभव मानून त्याप्रमाणे प्रतिक्रिया द्यायला लागतात आणि खरा गोंधळ इथेच सुरू होतो. कलेची खरी ताकद हीच असते की कला अनुभव देते पण हा एका अर्थाने अव्यवहारिक अनुभव असतो म्हणजे तो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये व्यवहारिक अनुभवा इतकी ढवळाढवळ करत नाही जोपर्यंत अनुभवी ही व्यवहारिक ढवळाढवळ होऊ देत नाही .


माणूस सर्वात प्रथम अनुभव निर्माण करायला शिकला कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याकडे इंद्रियांच्या मार्फतच जग बघण्याची सोय होती. भाषेचा शोध लागलेला नसल्याने इंद्रिय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची बोललेली होती आणि म्हणूनच त्याचे सर्व जग हे इंद्रिय केंद्रीय जग होते . साहजिकच त्याला त्याने जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभव पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत पोहोचवायचा होता . त्या अनुभवातून आलेले शहाणपण त्याला पुढच्या पिढीला द्यायचे होते कलेचा जन्म हा असा एका पिढीचा अनुभव दुसऱ्या पिढीला देण्यासाठी आणि एका पिढीचे शहाणपण दुसऱ्या पिढीला देण्यासाठी झालेला आहे. या मागची असलेली प्रेरणा ही अत्यंत शारीरिक प्रेरणा आहे आणि तिला मी जेनेटिक प्रेरणा म्हणतो . जे जीन्स च्या बाबतीत आहे तेच कलेच्या बाबतीत आहे . एका अर्थाने कला ही अनुभव जीन आहे . त्यामुळेच कलेचे मुख्य काम अनुभवनिर्मिती आणि शहाणपण निर्मिती असते . कला बौद्धिक ज्ञान देत नाही पण शहाणपण देत असते अलीकडच्या काही लोकांना याचा विसर पडलेला आहे म्हणून हे सांगायला लागते.


मनुष्य प्रत्यक्ष अनुभव जसा घेतो तसाच तो कलेचाही अनुभव घेत असतो का? माझ्या मते याबाबतीत हळूहळू माणसाची तयारी होत जाते अनेकदा लहानपणी आपणाला कलेचा अनुभव आणि प्रत्यक्ष व्यवहारिक अनुभव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तितके कळत नसते मात्र हळूहळू आपल्याला संस्कृती शिकवते की कलेचे अनुभव हे अव्यवहारी अनुभव असतात ते प्रत्यक्षात खरे अनुभव नसतात . प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा कलेचा अनुभव हा प्रत्यक्ष व्यवहारी अनुभवाइतकाच परिणाम करायला लागतो . अशावेळी अनेकदा मग कलेच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतात आणि कलेवर सेंसर शिप लादावी की न लादावी असा मुद्दा निर्माण होतो . खरोखरच कला अनुभव हा प्रत्यक्ष अनुभवापेक्षा अधिक प्रभावी असतो का असा एक फार मोठा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये सातत्याने निर्माण होताना दिसतो. 


एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या मेंदूला कलेचा अनुभव वेगळा करता येत नाही. आपला मेंदू हा कलेचा अनुभव सुद्धा अनुभव म्हणूनच घेत असतो. आणि खरी गोची इथेच आहे. त्यामुळेच कलेच्या संदर्भामध्ये लहानपणापासून विशेष ट्रेनिंग देणे गरजेचे असते आणि प्रत्येक मुलावर हे बिंबवावे लागते की हे कलेचे अनुभवविश्व काल्पनिक अव्यवहारी अनुभवविश्व आहे.


मनुष्य जेव्हापासून मनुष्य म्हणून काम करत आहे तेव्हापासूनच त्याने भाषेच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती किंबहुना भाषेच्या सर्व संभाव्य शक्यता त्याच्या जीन्स मध्येच आहेत हे आता स्पष्ट होत आहे. माणूस हा एका अर्थाने चिन्ह निर्मितीसाठी आणि चिन्ह सृष्टीसाठी आधीपासूनच तयार होत होता असे आता दिसते आहे. कदाचित माणसाची हीच खरी खासियत आहे . म्हणजेच एका अर्थाने मानव हा चिन्ह मानव आहे. 


म्हणजेच माणसाच्या बाबतीत जर का कलेच्या पातळीवर विचार करायला गेलो तर आपणाला असे दिसते की मनुष्य हा होमो सेपियन अधिक चिन्ह प्राणी आहे . त्यातील जो होमो सेपियन आहे तो पशु अधिक मानव आहे . म्हणजेच एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की आपण जे काही आहोत ते पशु अधिक मानव अधिक चिन्ह मानव आहे. 


यातील पशूची जी जनुक सूत्रे आहेत जनुक सूत्रे आहेत त्यातील जवळजवळ 99% पशु म्हणजेच एपशी जुळतात . ०. ९९ % ही मानवाशी जुळतात. ०. ००१ हा चिन्ह मानव आहे पण हा चिन्ह मानवच आता संपूर्ण उरलेला देह हाताळत असताना दिसतो यातून काही विलक्षण प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. 


माणसाच्या अनेक पाशवी परंतु अत्यंत उपयुक्त अशा नैसर्गिक प्रेरणा आणि क्षमता कळत नकळत अलीकडे नाहीशा होत चाललेल्या असाव्यात असा संशय आहे. मुख्य म्हणजे यांच्यावर असलेले नियंत्रण निर्माणच होत नाही याचे कारण मुळात त्या सुप्त आणि गुप्त मध्ये निघून गेलेल्या आहेत किंवा निघून जात आहेत . अनेक माणसांना याची जाणीव नाही उदाहरणार्थ केवळ वासावरून माणसाला ओळखण्याची क्षमता जवळजवळ सर्वच माणसांच्या मधून निघून गेलेली आहे. याचा एक परिणाम असा होतो की लुप्त आणि गुप्त अवस्थेत गेलेल्या या सगळ्या क्षमता नियंत्रणांच्या संदर्भामध्ये काम करत नाहीत कारण त्या जाणिवेचा भाग म्हणून कार्यान्वित होत्या आता त्या तश्या राहिलेल्या नाहीत आणि मग त्यातूनच एक अनियंत्रित पशु डिजिटल च्या साह्याने ऑपरेट होतो आणि हे भीषण आहे. माणसाला हे परवडणारे नाही आणि मुख्य म्हणजे या संदर्भामध्ये मग कला नेमके काय काम करत आहे असा प्रश्न निर्माण होतो कारण या अंगाने कलेची जबाबदारी मग सर्वाधिक आणि सर्वच पातळीवर वाढत जाते कारण कला हे एकमेव माध्यम असे उरत आहे की जे नियंत्रणाच्या आवश्यकतेची जबाबदारी सांगत राहू शकते . अन्यथा चिन्हसृष्टीच्याद्वारे येणारे अनुभव हे मोकाट अनुभव आहेत . हे मोकाट अनुभव अनुभव म्हणूनच मेंदूवर आदळत आहेत आणि मेंदूला त्यामध्ये नैसर्गिक पातळीवर काही फरक करता येत नसल्याने आपणाला आता कला शिक्षणासंदर्भामध्ये फार लहानपणापासून संस्कार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कला अनुभव डिजिटल अनुभव हे पूर्णपणे वेगळे आहेत हे आता लहानपणापासूनच मेंदूला ट्रेनिंग देऊन शिकवावे लागेल हे आपण लक्षातच घेत नाही आहोत. अनेकांच्या अजूनही हे लक्षात येत नाही की अद्वैताचा जमाना गेलेला आहे . प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला द्वैत शिकवावे लागते शिकवावे लागेल.हे भेद करण्याचे शिक्षण जर का आपण दिले नाही तर पुढच्या काळामध्ये चिन्ह शिक्षणाच्या अभावी पुढच्या पिढ्या ह्या वारंवार आपल्या अनियंत्रित पशु मध्ये कोसळत राहणार आहेत .


अनुभव ही सर्व नय व्यापक गोष्ट असल्याने ती सर्वच नयांच्या मध्ये घुसत असते आणि नेमके हेच कला अनुभवाच्या बाबतीतही असते . साहजिकच कलावंतांची जबाबदारी अधिक वाढते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 


Continue 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय