प्रदेशांतर ,देशाटन , देशांतर ,राष्ट्रांतर आणि स्थलांतर श्रीधर तिळवे नाईक 

माणूस हा निसर्ग अवस्थेत नेमका काय होता हे अजूनही कळलेले नाही .काहींच्या मते तो स्वतःचा प्रदेश सांभाळत स्थिर होता तर काहींच्या मते तो भटका होता. यातूनच दोन प्रवृत्ती जन्मलेल्या दिसतात त्या म्हणजे देशी आणि मार्गी ! जे आपल्या प्रदेशात राहतात ते देशी असतात आणि जे सतत भटकत असतात ते मार्गी असतात. त्यामुळेच मी कधीही देशी आणि मार्गी या गोष्टीला विरोध केला नाही. माझा विरोध कायमच देशीवादाला आणि मार्गीवादाला होता . वस्तुस्थिती अशी आहे की यदाकदाचित समजा माकडांच्या सारखा एक प्रदेश स्थिर करत मनुष्य टोळी करून राहत असेल तर सुद्धा कधी कधी दुष्काळ पडल्यामुळे त्याला प्रदेश सोडावा लागलेला आहे. या नैसर्गिक कारणांच्यामुळे जेव्हा प्रदेश सोडावा लागतो तेव्हा त्याला प्रदेशांतर म्हणतात आणि प्रदेशांतर हे अत्यंत नैसर्गिक असते . 

माझ्या मते आपले प्रदेशांतर याबाबतीतले साम्य हे अधिक प्रमाणामध्ये हत्तीशी आहे . हत्ती कधी कधी आपला प्रदेश सोडून जातात कारण पाण्याची टंचाई असते. अन्नाची टंचाई असते . आणि अपवादात्मक वेळेला हवामानात असा काही बदल होतो की स्थिर जागा सोडावी लागते. त्यामुळे मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मार्गी, देशी, पोटी आणि जमाती हे चार मानवी समाजाचे आयाम आहेत ते बदलता येणार नाहीत. यातील कुठल्यातरी एका आयामावर भर देणे म्हणजे आंशिक आकलन करणे होय. आंशिक आकलन संपूर्ण आकलनामध्ये नेहमीच बाधा असते . असो.

प्रत्येक देशी माणसाला अनेकदा निसर्गदत्त अडचणीमुळे आणि संकटांच्या मुळे प्रदेशांतर करावे लागते आणि या प्रदेशांतराचे काय करायचे हा कायमच मोठा प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे कारण पूर्वी हा प्रश्न जमीन मोबुलक असल्याने आणि लोकसंख्या कमी असल्याने फारसा सतावत नव्हता . उलट सुरुवातीच्या शेतीच्या कालखंडामध्ये काम करायला मजूर आवश्यक असल्याने स्थलांतरित लोकांना मजूर म्हणून सामावून घेणे खूप सोपे होते पण जेव्हापासून औद्योगिक कालखंड सुरू झालेला आहे तेव्हापासून शेतीला मजूर लागणे कमी होत गेलेले दिसते आणि म्हणूनच स्थलांतराच्या प्रश्नाबाबत जो उदारपणा होता तो उदारपणा हळूहळू घटत चाललेला दिसतो.

मनुष्य जेव्हा नैसर्गिक अवस्थेत होता तेव्हाच हळूहळू त्याच्यामध्ये एकमेकांना अनुभव सांगण्याचा त्यातून भाषेचा आणि पुढे त्यातून कलेचा आणि मग कलेमधून दृढ होत गेलेल्या रूढीपणाचा व शहाणपणाचा आणि या रूढीपण व शहाणपणातून श्रद्धेचा उदय होत गेला. या कालखंडामध्ये सुद्धा माणूस प्रदेशांतर करत होता . आणि अशाच एका प्रदेशांतरामधून युरेशियन लोक भारतात आलेले होते . साहजिकच ते येताना सोबत स्वतःची श्रद्धा घेऊन आले जिला मी वैदिक श्रद्धा म्हणतो . जी प्रामुख्याने ऋग्वेदामध्ये व्यक्त झालेली आहे .

भारतामधील शैव श्रुतीमध्ये मात्र प्रदेशांतराचा कालखंड हळूहळू संपत गेला आणि गणव्यवस्था उदयाला आली या गणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी मोक्ष होता आणि मोक्षाला देशाटन मान्य होते . किंबहुना ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी यात्रा केलीच पाहिजे आणि जत्रा ही सांभाळली पाहिजे अशा प्रकारचा शहाणपणाच एका अर्थाने स्थिर होत गेला . त्यातूनच देशाटन वाढत गेले .

पुढे शैव-धर्मामध्ये काही असे लोक निर्माण झाले ज्यांच्यामुळे आदिसिद्ध हे देव म्हणून प्रस्थापित होऊ लागले. त्यामुळे शंकर हे बडा देव झाले आणि पुढे महादेव झाले इथूनच शैव-धर्माचा उदय झाला आणि शैव श्रुती मोक्षापासून दूर जात धर्माच्या दिशेने प्रवास करायला लागली. मात्र तरीही वैदिक लोकांचे प्रदेशांतर होण्याच्या कालखंडापर्यंत शैव श्रुती व्यवस्थित शाबूत होती. मोक्षच केंद्रस्थानी होता .

या मोक्षाला सामावून घेण्याचा प्रयत्न नंतर आलेल्या सर्वच युरेशियन आक्रमकानी केला त्यामुळेच आपणाला ऋग्वेदामध्ये अनेक शैव स्थानिक संकल्पना दिसतात कारण आत्ताचा जो ऋग्वेद आहे तो प्रामुख्याने व्यासांनी रचलेला आहे आणि त्यांच्यावर वैदिक श्रुती आणि शैव श्रुती अशा दोन्ही श्रुतींचा परिणाम झालेला आहे. काही जणांनी शैव मोक्षाचा स्वीकार केला आणि ते सर्व आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. हा एक ओपन कालखंड होता . आणि या कालखंडामध्ये प्रामुख्याने शैव धर्म सामावून घेत युरेशियन लोकांच्या मध्ये दोन धर्म उदयाला आले पहिला धर्म हा सांख्य धर्म होता ज्याचा अविष्कार आपणाला सांख्य दर्शनामध्ये दिसतो तर दुसरा धर्म हा ब्रह्म धर्म होता जो उपनिषदांच्या मध्ये प्रामुख्याने आला. ज्या मधून पुढे वेदांत दर्शन उदयाला आले .हे दोन्ही धर्म वर्ण व्यवस्थेच्या विरोधात होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पुढे मग ब्राह्मणांनी काही उपनिषदांच्या मध्ये वर्णव्यवस्थेची घाल घुसळ केली . पण हे सर्व उत्तरकालीन उपनिषदांच्या मध्ये घडलेले आहे किंवा उपनिषदांच्या उत्तर कालखंडामध्ये घाल घुसळ केलेली आहे अन्यथा जी मूळ उपनिषदे होती त्यांच्यामध्ये कुठेही जन्मदत्त वर्णव्यवस्था नव्हती.यामुळेच आपणाला वैदिक कालखंड हा वर्ण जातनिष्ठ दिसत नाही तिथे ओपन जागा दिसतात आणि अनेकदा वर्ण हा जन्मदत्त नसून कर्म दत्त आहे असे दिसते नंतर या वेदांना सुद्धा जन्मदत्त करण्याचा प्रयत्न ब्राह्मण लोकांनी केला आणि त्यामध्ये घाल घुसळ केली .

भारतामध्ये ब्राह्मण नेमके कसे आले कुठून आले हा एक कायमच वादाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने जे उत्तर होते ते मी इतरत्र दिलेले आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे या देशांमध्ये प्रथम ज्याला आज आपण युरेशियन जन्मदत्त वर्णव्यवस्था पाळणारा धर्म म्हणतो तो ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण धर्म म्हणून स्थापन केला . आणि भारताच्या पतनाला यामुळे सुरुवात झाली. अर्थातच हा ब्राह्मण धर्माचा कालखंड फार काळ स्थिरावला नाही. त्याला आव्हान देणारे तीन धर्म निर्माण झाले 

१ लोकायत धर्म 

२ जैन धर्म 

३ बौद्ध धर्म 

याशिवाय आधीपासूनच आदिशैव धर्म, लोक शैव धर्म आणि पाशुपत धर्म हे तीन शैव धर्म अस्तित्वात होतेच. 

गौतम बुद्धाच्या अखेरच्या कालखंडामध्येच पहिले फार मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आणि ते आत्ताच्या इराणने केले होते ज्याला पर्शियन आक्रमण म्हणतात . यानंतर मग टोळ्या मागून टोळ्या येत राहिल्या आणि कधी जिंकल्या कधी हारल्या. मात्र आलेल्या सर्वच लोकांनी शैव धर्म स्वीकारला उदाहरणार्थ कनिष्काच्या पूर्वजाने शैव-धर्माचा स्वीकार केलेला होता . अनेक मंगोलियन लोक भारतामध्ये आक्रमक म्हणून आले आणि त्यातील काहीजण मराठा आणि राजपूत म्हणून शैव म्हणून स्थिरावले .या काळामध्ये राज्यांतर , प्रदेशांतर आणि देशाटन रूढ होत गेले . लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये यात्रा करत होते . मुळातच लोकसंख्या फारशी नसल्याने आपल्या राज्यामध्ये कोण राहते आणि कोण राहत नाही याविषयी फार काळजी करण्याची आवश्यकता त्या काळातल्या राज्यकर्त्यांना वाटत नव्हती . अपवाद फक्त दुसरा राज्यातले सैनिक किंवा गुप्तहेर हा होता . त्यांना मात्र आपल्या राज्यात प्रवेश मिळता कामा नये याविषयी सर्वजण सावधान होते. हा एक असा धार्मिक कालखंड होता ज्यामध्ये सर्वात जास्त प्रभावी धर्म हा शैव होता ज्याचा उल्लेख सातत्याने लोकधर्म म्हणून होतो याचे कारण तो लोकांचा धर्म होता . याशिवाय बौद्ध आणि जैन हे सुद्धा या काळामध्ये प्रभावी होते मात्र हळूहळू या दोन्ही धर्मांनी वर्णजात यांचा स्वीकार केला आणि मग त्यांच्या पतनाला सुरुवात झाली. 

गुप्तांच्या पाडावानंतर हळूहळू ब्राह्मण लोकांनी पुन्हा एकदा वैष्णव धर्म आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याला ब्राह्मणी स्वरूप द्यायला सुरुवात केली याचा परिणाम असा झाला की वैष्णव धर्म हा ब्राह्मण धर्माचेच आणखी एक रूप बनत गेला.

या सगळ्या कालखंडांच्या मध्ये जो वाद उदयाला आला तो वाद होता व्यापार वाद आणि त्याची सुरुवात प्रामुख्याने भारत आणि चीन या दोन देशात झाली होती. हाच व्यापार वाद हळूहळू अरब लोकांनी आत्मसात करायला सुरुवात केली मात्र हा व्यापार वाद आत्मसात करताना त्यांच्याकडे जो पारंपारिक श्रद्धांचा गोतावळा होता तो आता कोणीतरी संघटित करून त्याला एक रूप देणे गरजेचे होते. हे एक रूप देण्याचे काम महंमद पैगंबर यांनी केले . ते त्यांनी योग्य रीतीने केले की नाही केले त्याचा नेमका काय परिणाम झाला त्यामध्ये अरब संस्कृतीच्या मागासलेपणाचा किती वाटा होता वगैरे वगैरे आता सर्व गोष्टी वादाच्या झालेल्या असल्या तरी आपण त्या कालखंडात जर गेलो तर महंमद पैगंबर काय करत होते हे आपणाला अधिक चांगल्या रीतीने कळू शकते. एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे शेवटी हा एका व्यापाऱ्याने स्थापन केलेला धर्म आहे आणि त्याचे सर्व पडसाद त्या धर्मामध्ये उमटलेले स्पष्टपणे दिसतात. या धर्माचे मुळात जे प्रेरणास्थान होते ते ज्यू धर्म होते आणि पैगंबरांच्या काळामध्ये हा धर्म कळत नकळत व्यापारी लोकांचा धर्म बनलेला होता आणि त्याने अनेक व्यापारी तत्वे स्वतःमध्ये सामावून घेतलेली होती याचे कारण आपण देवाबरोबरचा करार पाळलेला नसल्यामुळे आपल्याला शिक्षा मिळालेली आहे आणि आपला जो शिक्षा मिळण्याचा कालखंड आहे तो आपण निमूट सहन केला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. अरब लोकांची गोष्ट वेगळी होती. त्यांना स्वतःची भूमी होती त्यामुळे साहजिकच ज्यू लोकांच्या पुढे व्यापार करण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नव्हता तसा प्रकार अरब लोकांच्या बाबतीत नव्हता त्यांच्याकडे शेती करणे हा सुद्धा पर्याय काही प्रमाणात का होईना पण होता परिणाम असा झाला की स्वतःची भूमी नसल्याने ज्यू हा तिसरा व्यापारी धर्म बनत गेला.

भारतामध्ये यापूर्वी अशा प्रकारचा प्रसंग फक्त जैन आणि चीनमध्ये बौद्ध लोकांच्यावर आला होता अत्यंत टोकाची अहिंसा स्वीकारणे आणि त्यामुळे शेती करणे हे सुद्धा हिंसाचार झाल्याने जैन व काही प्रमाणात बौद्ध लोकांनी शेतीचा त्याग केला आणि व्यापार स्वीकारला. मुळात हा जैन धर्म सुद्धा व्यापारी गण असलेल्या भगवान महावीर यांनीच स्थापन केला होता . हा एका अर्थाने पहिला व्यापारी धर्म होता ज्यू त्यानंतरचा दुसरा व्यापारी धर्म झाला तिसरा धर्म बौद्ध होता आणि यानंतर इस्लाम चौथा व्यापारी धर्म झाला . मात्र व्यापार करताना जैन आणि पुढे ज्यू सतत अहिंसे कडे सरकत गेले मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत मात्र गोष्ट नेमकी उलटी झाली ते हिंसेकडे सरकत गेले याचे कारण कळत नकळत त्यांनी ख्रिश्चन धर्मापुढे ज्यू लोकांचे काय झाले ते पाहिले होते. या काळामध्ये ख्रिश्चन लोकांनी ज्यू लोकांना कायमच सातत्याने हकालपट्टी आणि देशांतर स्वीकारायला लावलेले आहे. महंमद पैगंबर यांना आपल्या अरब कौमचे असे काही व्हावे असे वाटत नव्हते साहजिकच त्यांनी हिंसेचे उत्तर हिंसा हेच सुचवले . इतकेच नव्हे तर आपल्या धर्माचा प्रसार सर्वत्र व्हावा म्हणून त्या अंगाने सर्व मांडणी केली. आज ही आक्रमक मांडणीच इस्लामच्या आंधळ्या परंपरावादाची कारण बनलेली आहे. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रत्यक्ष अरब लोकांनी खरोखर किती आक्रमणे केली आणि इस्लामच्या नावाने बाकीच्या लोकांनी किती आक्रमणे केली हे नीट पाहिले पाहिजे. 

इस्लामने जेव्हा युरोप वर धडक दिली तेव्हा साहजिकच युरोपचे डोळे उघडायला सुरुवात झाली आणि मुळात जो व्यापार वाद आत्तापर्यंत फक्त जैन , बौद्ध ,ज्यू आणि इस्लाम संस्कृतीपर्यंत मर्यादित होता तो हळूहळू ख्रिश्चन धर्मामध्ये झिरपायला लागला आणि ख्रिश्चन लोकांना असे वाटायला लागले की आपण सुद्धा एक नवा व्यापारी ख्रिश्चन धर्म निर्माण केला पाहिजे आणि या गरजेतूनच आत्ताचा प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म निर्माण झालेला आहे. हा प्रोटेस्टंट धर्म व्यापाराला कसा पूरक होता भांडवलशाहीला कसा पूरक होता याबद्दलची अनेक विश्लेषणे वेबर या समाजशास्त्रज्ञाने सादर केलेली आहेत. या व्यापारी तत्त्वावर आधारित प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा व्यापारामधला खरा प्रतिस्पर्धी हा जू-धर्म होता आणि म्हणूनच मग ज्यू द्वेष कळत नकळत आला.

म्हणजेच अचानकपणे आपणाला जगात असे दिसते की एकाच वेळेला जगामध्ये नऊ व्यापारी धर्म हळूहळू प्रस्थापित होत गेले आणि हा सर्व व्यापारवादाचा परिणाम होता .

१ आदि शैव हा सिंधू संस्कृतीमध्ये व्यापारी बनत गेला आणि या संस्कृतीच्या उत्तर भागामध्ये याने धर्माची स्थापना केली 

२ जैन 

३ बौद्ध 

४ ज्यू 

५ इस्लाम 

६ लिंगायत हा नंतर कर्नाटकामध्ये व्यापार महत्त्वाचा असल्याने साहजिकच निर्माण होत गेला त्याला आश्रय मिळत गेला.

७ प्रोटेस्टंट 

८ शीख हा प्रामुख्याने मुस्लिम व्यापारी लोकांच्या दादागिरीला कंटाळून आणि राज्यकर्त्यांना कंटाळून निर्माण झाला कारण या लोकांच्यावर खूपच अन्याय अत्याचार झाले .

९ नव भारतीय पर्शियन (हा इंग्रजांच्या काळामध्ये प्रामुख्याने जास्त वाढला मात्र तो आधीच उपस्थित होता कारण त्यांच्या पुढेही व्यापार करण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नव्हता) 

या सगळ्याला विरोध करण्यासाठी म्हणूनच ब्राह्मणांनी समुद्र पर्यटन बंदी आणण्याचा उद्योग केला . आणि ज्या काळात संपूर्ण जग व्यापारवादाच्या दिशेने जात होते त्या काळामध्ये फक्त युरेशियन इंडियन प्रामुख्याने वैष्णव धर्म हाच असा धर्म होता किंवा हेच धर्म असे होते जे व्यापाराच्या विरोधात गेले . हा मूर्ख नालायकपणा होता. एका अर्थाने तुकारामाचे व्यापाराकडून शेतीकडे सरकणे हे याचे प्रतीक आहे एका अर्थाने संपूर्ण भारताची ब्राह्मणांच्यामुळे झालेली ही सांस्कृतिक आत्महत्या होती. खरे तर नवा व्यापारी वैष्णव धर्म निर्माण करण्याची ही एक अतिशय उत्तम सुवर्णसंधी होती परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की वैष्णव धर्मातल्या सनातन लोकांच्या पिंडामुळे ही संधी गमावली गेली. आणि याचा सर्वात जास्त फायदा इंग्रजांना झाला. धर्माने भारावलेले इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्यासाठी अनेक नवे दरवाजे खुले झाले. 

साहजिकच महात्मा गांधी यांनी नवा वैष्णव धर्म निर्माण करताना तो व्यापारवादाला पूरक होईल या दिशेने काही तत्वे सांगितली ती अत्यंत गरजेची होती एका अर्थाने महात्मा गांधी यांनी व्यापारी वैष्णव धर्म सांगितला 

आपण जर का नीट पाहिले तर हे नवे दरवाजे नेमके कसे खुलत होते ? 

तर आपणाला याचे बीज प्रथम प्रदेशांतरात (पर्शियन आणि ज्यू लोक) मग स्थलांतरात दिसते . अपवाद फक्त मुस्लिम आक्रमकांचा आहे ते थेट आक्रमक म्हणून आले. सर्व आक्रमकांच्याकडे आपण नीट पाहिले तर आपणाला एक गोष्ट आश्चर्यकारकरीत्या दिसते ती म्हणजे यातल्या अनेकांनी व्यापारामध्ये गुंतवणूक केलेली आहे किंबहुना अनेकदा तर असे दिसते की या लोकांच्या राण्या, बेगम आणि रखेल्या अशा प्रकारची गुंतवणूक करतात.

मात्र हे मुसलमान सुद्धा प्रथम दक्षिणेच्या किनाऱ्यावर व्यापारी म्हणूनच उतरलेले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याबाबतीत युरोपियन लोक तर सरळ सरळ व्यापारी म्हणूनच या देशांमध्ये उतरले होते. प्रथम त्यांचे देशाटन सुरू होते आणि हे व्यापारासाठी होते. 

या सगळ्या गोष्टींच्या मुळेच मग स्थलांतरित गोष्ट अचानक मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्वेशन आली आहे याचे कारण जवळजवळ सर्वच स्थलांतरित लोकांनी आपल्या स्थलांतराचे आक्रमणात केलेले रूपांतर आहे . याची सुरुवात प्रथम आपणाला वैदिक लोकांच्या पासूनच दिसते प्रथम आश्रय घेतला आणि मग तो प्रदेश बळकावला. त्यानंतर ही गोष्ट ब्राह्मणांच्या बाबतीत घडलेली दिसते . प्रथम भारतात आश्रय घेतला आणि मग अख्खा शैव-धर्म बळकवण्याचा उद्योग सुरू केला. 

म्हणजेच प्रदेशांतर म्हणून झालेले स्थलांतर हे हळूहळू प्रदेश बळकवण्यापर्यंत पोहोचते हे आता हळूहळू स्पष्ट झालेले आहे आणि यामध्ये अलीकडे सर्वात मोठा रोल हा मुस्लिमांचा आहे . मुस्लिम लोक अतिशय पद्धतशीरपणे आपली लोकसंख्या वाढवत जिथे आश्रय मिळालेला आहेत तो प्रदेश बाळकावतात मग नंतर आपले राज्य आणण्याचा प्रयत्न करतात हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आज स्थलांतरांच्या विरोधात एवढी बोंब सुरू झालेली आहे. 

प्रश्न असा आहे की मग ही बोंब ठोकतात कोण ? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले म्हणून रडणारे ब्राह्मण एक गोष्ट स्पष्ट विसरतात ती म्हणजे ते स्वतः सुद्धा इंग्रजांच्या प्रमाणेच या देशात आले होते. त्यांनी सुद्धा त्यांचा ब्राह्मण धर्म लादण्याचा प्रयत्न केला. पुढे मुस्लिम लोकांनी हेच केले. वैष्णव लोकांनी याला प्रतिकार करणे राहिले दूर उलट वैश्य कलियुगात नष्ट झाले अशी बोंब ठोकली प्रश्न असा आहे की ही बोंब ठोकली गेली की त्यांच्याकडून ठोकवली गेली ? ती मुस्लिम राजवटीने स्पॉन्सर केली होती का ? ब्राह्मण धर्म हा इस्लाम धर्माला पूरक म्हणून काम करत होता का ? शैवधर्म पाळत असताना कट्टर असणारे राजपूत वैष्णवधर्म स्वीकारल्यानंतर मात्र आपोआपच मुस्लिम लोकांची सेवा का करायला लागतात ? त्यांना अशी सेवा करायला लावणारा वैष्णव धर्म नेमका कोणी स्पॉन्सर केला होता ? आम्ही सुद्धा तुमच्याप्रमाणे बाहेरून आलेलो आहे त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांच्यावर आपण राज्य करू अशी काही मेंटॅलिटी मानसिकता डेव्हलप झाली होती का ? मराठे लोकांच्या पैकी काही लोकांच्या मध्ये अशाच प्रकारची मानसिकता आता 21व्या शतकात डेव्हलप झाली आहे का? त्यामुळेच हे लोक जय श्रीराम म्हणायला लागलेले आहेत का किंवा त्यांना म्हणायला भाग पाडले गेले आहे काय ? मुख्य म्हणजे हा सर्व उत्तर भारतातून स्पॉन्सर झालेल्या संस्कृतीचा मराठी लोकांच्यावर झालेला साईड इफेक्ट आहे का आणि हा साईड इफेक्ट उत्तर भारतीय लोकांच्या स्थलांतरामुळे घडलेला आहे का ? भारतामधला सर्वात मोठा गोंधळ जर कुठला असेल तर तो म्हणजे भारतातल्या लोकांना स्वार्थ साधणे आणि शहाणे असणे या मधला फरक कळत नाही . ब्राह्मण लोक स्वार्थी आहेत संधी साधू आहेत हुशार आहेत परंतु शहाणे नाहीत हे त्यांना कोणीतरी आता ठणकावून सांगणे गरजेचे आहे कारण मराठी ब्राह्मणांनी या देशात मराठी लोकांचे अनेकदा अतोनात नुकसानच केलेले दिसते. मागीलदाराने वर्णव्यवस्था प्रस्थापित करण्यात मराठी ब्राह्मण सर्वात आघाडीवर असतात हा इसवी सन १००० नंतरचा इतिहास आहे . शैव राजवट असणाऱ्या लोकांना शेवटच्या केवळ पन्नास वर्षात यादव करून संपूर्ण कालखंड यादव म्हणून प्रोजेक्ट करणारे लोक ब्राह्मणच होते. वारकरी चळवळीला तुकारामानंतर उत्तर पेशवाईत इंग्रज आल्यानंतर इंग्रजी कालखंडात अतिशय व्यापक स्वरूप देणारे ब्राह्मणच होते कारण वारकरी चळवळीमध्ये वर्णव्यवस्थेचे हितसंबंध राखले जात होते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या कालखंडामधील शैव पंडित (पंत)लोक सुद्धा ब्राह्मण लोकांना सामील झालेले दिसतात आणि हळूहळू नंतर ब्राह्मण म्हणवून घेऊ लागलेले दिसतात . 

आज या सगळ्या मुळाशी गेलो तर काय दिसते तर स्थलांतर नावाची गोष्ट दिसते .जर का तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये ब्राह्मण उत्तर भारतातून दक्षिण भारतात स्थलांतरित म्हणून आले नसते तर कदाचित हे घडलेच नसते. या इथे आलेल्या ब्राह्मण लोकांनीच हळूहळू आत मध्ये शिरून महाराष्ट्रातील शैव व्यवस्थेला वाळवी सारखे पोखरायला सुरुवात केली . पण त्यामुळे त्यांचा काय फायदा झाला? त्यांचा फक्त तात्कालीक स्वार्थ साधला गेला परंतु अंतिमतः त्यांचे प्रचंड नुकसान झाले .ब्राह्मणांच्यातला शहाणपणाचा अभाव याला जबाबदार आहे. वास्तविक इंग्रजांच्या कालखंडामध्ये सर्व ब्राह्मणांनी आपल्या ब्राह्मण वर्णाचा त्याग करायला हवा होता आणि स्वतःची नोंदणी पंडित म्हणून करायला हवी होती. तेच खरे पुरोगामी पणाचे लक्षण होते . पण ब्राह्मणांना आपण उच्चवर्णही आहोत असा आजही माज हवा आहे. त्यांना हे स्थान सोडायचे नाही . आता प्रॉब्लेम असा आहे की ब्राह्मणेतर पूर्वीच्या मनस्थितीत नाहीत. तुम्ही जर का हे स्थान सोडले नाही तर आम्ही तुम्हाला ते सोडायला लावू अशा मानसिक स्थितीत ब्राह्मणेतर हळूहळू यायला लागलेले आहेत. हळूहळू ब्राह्मणांना वाळीत टाका अशी चळवळ कोणी सुरू केली तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा ब्राह्मण राज्यकर्ता हवा असा म्हणणारा एक वर्ग आहे तर दुसरा वर्ग केवळ ब्राह्मण आहेत म्हणून फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. वास्तविक त्यांच्याकडून अतिशय चांगल्या काही गोष्टी होत आहेत पण काही जणांना त्या पचताना दिसत नाहीत. वास्तविक याबाबतीत विवेक दाखवायला हवा आणि मुख्य म्हणजे त्यांना ब्राह्मण म्हणून न पाहता पंडित म्हणून पहावे आणि ते काय करत आहेत त्याचे परखड परीक्षण करावे . सर्वात प्रथम म्हणजे ब्राह्मणेतर लोकांनी ब्राह्मण लोकांचा उल्लेख ब्राह्मण म्हणून न करता पंडित म्हणून करावा. ब्राह्मण शब्दही हळूहळू डिक्शनरीतून काढून टाकावा व भाषेतून काढून टाकावा समोरच्या माणसाचा माज स्वतःहूनच जात नसेल तर शेवटी इतरांनाच कृती करावी लागते तेव्हा ब्राह्मणेतराने ही कृती करायला हरकत नाही .

दुसरी एक गोष्ट म्हणजे स्थलांतरांच्याकडे रोमँटिक दृष्टिकोनातून पाहणे बंद करावे. इतिहासामध्ये स्थलांतर झाले आणि त्याचे अनेक फायदे झाले ही वस्तुस्थिती आहे परंतु आत्ताच्या काळामध्ये मात्र स्थलांतराबाबत विवेक बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना याबाबतीत फक्त सावरकरच असे होते जे दृष्टे होते त्यामुळेच त्यांनी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर ही संकल्पना मांडली पण त्यांना एक गोष्ट कळली नाही ती म्हणजे प्रथम याची सुरुवात स्थलांतराने होते . म्हणजेच स्थलांतर म्हणजेच धर्मांतर आणि धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे काहीतरी घडताना इतिहासामध्ये अलीकडच्या काळामध्ये दिसते . त्यामुळे याबाबतीतला रोमँटिक दृष्टिकोन सर्वात प्रथम थांबवला पाहिजे. याबाबतीत मुस्लिमांचे स्थलांतर पूर्णपणे थांबवणे असा अजेंडा भाजपने हातात घेतलेला आहे आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्याचबरोबर भारतात असलेल्या मुस्लिमांना ते केवळ मुस्लिम आहेत म्हणून त्रास देऊ नये. त्यापेक्षा त्यांच्यातला धार्मिक कट्टरपणा कसा नष्ट होईल ते पाहिले पाहिजे. शेवटी ते भारतीय आहेत ते बाहेरून आलेले किती असतील याबद्दल मला शंका आहे. धर्मांतरित मुसलमानांची संख्या जास्त असावी तेव्हा आपल्याच लोकांना उगाच शिव्या घालत बसू नये . त्यापेक्षा समजून घेऊन काय करता येईल ते बघितले पाहिजे . सर्वच लोकांनी मागची सर्व स्थलांतरे देशांतरे वगैरे विसरले पाहिजे . आत्ता आपण इथे एकत्र या भूमीत जगतो आहोत एवढीच गोष्ट प्रमाण मानावी . 

राष्ट्र अजून तरी आवश्यक आहे असेच दिसते खरंतर ती गोष्ट नष्ट व्हावी असे सर्वच मोक्षवाद्यांच्याप्रमाणे मलाही वाटते . पण आज तरी प्रॅक्टिकल पातळीवर ते शक्य वाटत नाही म्हणून मी राष्ट्र स्वीकारतो . मोक्ष केंद्रस्थानी असणारे राष्ट्र आवश्यक आहे आणि फक्त भारत इंडिया हे एकमेव भूमी सातत्य असे आहे तिथे हे घडू शकते म्हणून माझा इंडिया भारत या राष्ट्राला पूर्ण पाठिंबा आहे .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय