भूतकालीन असणे आणि कालातीत असणे श्रीधर तिळवे नाईक
मानवी व्यवहाराची जी गुंतागुंत आहे त्यामध्ये सर्वात मोठी गुंतगुंत काळाची असते त्यामुळे साहजिकच काळा विषयक अनेक मूलभूत प्रश्न कायमच निर्माण झालेले आहेत
मुळातच अलीकडे ज्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पहात असतो ते 80 मिली सेकंद जुने असते याचा अर्थ आपण भूतकाळच पाहत असतो साहजिकच आपले पाहणे भूतकालीन असते .
जर वर्तमान भूतकालीन असेल तर निदान मग भविष्यकाळ तरी भूतकाळाच्या कचाट्यातल्या नसेल असे होऊ शकते का ? तर नाही आपण आपल्या भूतकाळाच्या आधारेच भविष्यकाळ पाहत असतो . आपली तर्क देण्याची पद्धत सुद्धा भूतकाळामध्ये आपण शिकलेलो असतो . म्हणजेच आपला भविष्यकाळ हा आपल्या भूतकाळाचेच प्रोजेक्शन असते
आपण मग भूतकाळाकडे वळलो तर काय दिसते तर आपण जुन्या गोष्टींच्याकडे पाहतो तेव्हा अनेकदा आपण दहा मिली सेकंद पूर्वीची जी आपली दृष्टी असते जी भूतकालीन असते तिच्यानुसार पाहत असतो म्हणजे इतिहास सुद्धा पूर्णपणे ऐतिहासिक नसतो .
या सगळ्या काळाच्या गुंतागुंतीमुळे आपण अधिकाधिक भूत प्रधान असतो आणि म्हणूनच मग सातत्याने इतिहासाचा विचार करतो आणि करावा लागतो . आपण केवळ संपूर्ण ऐतिहासिक म्हणून जगत असतो आणि म्हणूनच जगणे अवघड होऊन बसते
मग यावर आपण जर का वाट काढायला गेलो तर काय दिसते? तर असे दिसते की तुम्ही काळावर मात करू शकत नाही मग होते काय तर मोक्ष मिळाला तर तुम्ही कालातीत होता म्हणजे काळच उरत नाही अशी ती अवस्था असते त्यामुळे आपण समाधीत असतो तेव्हा आपण किती काळ समाधीत असतो ते कळत नाही . बाहेर येतो तेव्हा अनेकदा असे वाटते की अरेच्चा दहा-बारा सेकंद झाले असतील प्रत्यक्षात घड्याळ बघितले की कळते की आपण तास दोन तास अपवादात्मक वेळेला 8-10 तास समाधीत होतो .
मुळात तिथे काळाचा मागमुस नसल्याने कालातीत होणे असते आणि तिथेही काहीच नसते त्यामुळे साहजिकच काळाचा प्रश्न मोक्षात उद्भवतच नाही याचा अर्थ स्पष्ट आहे आपला व्यवहार फक्त एक तर भूतकाळी नसतो भूतकालीन असतो किंवा कालातीत असतो या खेरीज असलेल्या सर्व अवस्था या आपल्या केवळ कल्पना असतात हे एकदा लक्षात आले की मग स्मृतीचे आणि इतिहासाचे महत्त्व का मेंदूला भेडसावत राहते ते सहज कळू शकेल . लोक सहजासहजी आपला भूतकाळ विसरायला तयार नसतात कारण आपली स्वतःची आयडेंटिटी स्वतःची ओळख अनेकदा दुसरे तिसरे काही नसून स्मृतीजन्य संरचना असते . त्याचा त्याग केला तर आपली ओळखच मिटून जाईल याचे भय प्रत्येक माणसाला असते आणि म्हणूनच कोणीही आपला भूतकाळ सहजासहजी सोडायला तयार नसतो आणि यदाकदाचित तो जर का त्रास देणार असेल तर जो कोणी तो सोडायचा प्रयत्न करतो तो निगेटिव्ह पद्धतीने त्याला धरूनच असतो . म्हणजे पळताना ज्या खांबापासून पळायचे त्या खांबाला धरूनच पळणे असते . जो खांबासकट भूतकाळ सोडतो तो काळातीत होतो मोक्षाला पोहोचतो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment