सुनेत्रा पवार यांची एन्ट्री आणि भारतीय राजकारणाचा इतिहास श्रीधर तिळवे नाईक 

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्ष दोन पद्धतीने जाणार हे फार स्पष्ट होते पहिली दिशा ही विलीनीकरणाची होती आणि दुसरी दिशा वेगळीकरणाची होती अजूनही हे स्पष्ट नाही की नेमके काय होणार आहे परंतु सध्या तात्कालिक विजय हा वेगळीकरणाला मिळालेला आहे 

ज्यांनी १९८० चे राजकारण पाहिलेले आहे त्यांना हा गोंधळ स्पष्टपणे कळू शकतो कारण नेमका हाच गोंधळ जेव्हा संजय गांधी यांचा अचानक अपघाताने मृत्यू झाला त्यावेळी त्यावेळी झाला होता यानंतर जी राजीव गांधी यांची एन्ट्री झाली तो एक फार आमच्या पिढीसाठी ऐतिहासिक क्षण होता त्यावेळी नेमके काय झाले? हे पुढील भाषेत सहज दिसेल 

राजीव गांधी यांच्या entry ची गझल श्रीधर तिळवे नाईक 

तुझ्या माझ्या हातातून निसटलेले आहे 

हे राजकारण आता इतके भटकलेले आहे 


ज्याचा त्याचा अभिनय चालू आहे नीट 

ज्यांने लिहून दिलेले वाचले स्क्रिप्ट ते वाचलेले आहे 


शोधूनही सापडणार नाही कोण आहे खरा सूत्रधार 

आपण फक्त पहायचे ते डोके जे हललेले आहे 


प्रत्येक नेत्यांमध्ये आहे एक संस्थानिक लपलेला 

आणि लोकांनीही ते संस्थानिकपण जपलेले आहे 


माहित नाही त्यांना अशी कोणती सत्तेची घाई होती 

आत्तापर्यंत जे गॅलरीत होते ते रेस मध्ये उतरलेले आहे 


अगदी अनपेक्षित पणे कोणी रंगमंचावर आहे आला 

तो रेसमध्ये आला आहे आणि भांडण थांबलेले आहे 


नवीन पिढीचा नायक आहे कदाचित नवे युग येईल 

त्याच्या हातात संगणक दिसतोय 

पण बोट थांबलेले आहे 


तुम्ही त्याची आई पाहताय पण मी तिचा हा मुलगा पाहतोय 

ती आऊटडेटेड झालेली पण तारुण्य सळसळलेले आहे 


असेल ही ती कधीकाळी रणरागिनी दुर्गा तुमच्यासाठी 

माझ्यासाठी मात्र नवे ऑर्केस्ट्रेशन वाजलेले आहे 


माहित आहे माझ्यामुळे नवा विचार तुम्हाला खूपतो 

पण लक्षात ठेवा जागे होईल 

आत्ता जे झोपलेले आहे 


काय बोलायचे ते बोला तुम्ही शक्य आहे मूर्ख ठरेन 

नाही तरी तुम्ही शहाण्यांनाच आधी मूर्ख ठरवलेले आहे 


होऊ शकते की या कोल्हापुरात मी मारला जाऊ शकतो 

इतके या शहराचे आता हवामान खालावलेले आहे 


माझ्याजवळ माझे म्हणावी अशी फक्त आहे फॅमिली 

तुमच्याजवळ आहे टीम जिला मी आव्हान दिलेले आहे 


भल्या भल्या लोकांना या व्यवस्थेने व्यवस्थित केले 

माझ्या अव्यवस्थितपणानेच मला इथे वाचवलेले आहे 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


यावेळी जे काही घडले ते सर्व या कवितेत आलेले आहे आता मात्र नेमके उलटे घडलेले आहे म्हणजे अजित पवार यांचा मुलगा सत्तेवर येण्याऐवजी त्यांची पत्नी सत्तेवर आलेली आहे पण प्रश्न मात्र तेच आणि तसेच आहेत मुलगा सत्तेवर येण्याऐवजी आई सत्तेवर आलेली आहे आणि तरीही निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत फारसा फरक पडलेला नाही. एका अर्थाने महाराष्ट्राची इंदिरा गांधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे .

प्रश्न हाच आहे की सुनेत्रा पवार या इंदिरा गांधी होऊ शकतील का ? कारण जेव्हा नेहरू गेले तेव्हा नेहरूंच्या नंतर काय असा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळी ही दोन प्रकाराचे लोक होते ज्यांना नेतृत्व पूर्णपणे वेगळ्या हातात जावे असे वाटत होते आणि ज्यांना संस्थानिक पणाची सवय झाली होती त्यांना नेहरूंचीच मुलगी सत्तेवर यावी असे वाटत होते यामध्ये एक खेळी अशी होती की इंदिरा गांधी सत्तेवर आल्या की त्या आपल्या हातातील भावले म्हणून आपणाला हव्या तशा काम करतील भारतीय राजकारणात हा विचार नवीन नाही किंबहुना हा थेट महाभारत काळापासून सुरू होतो जिथे शकुनी दुर्योधनाला आपल्या तालावर नाचवत होता पुढे राजाराम महाराजांना सुद्धा सत्तेवर आणण्याचा जो घाट घातला गेला होता तो याच स्वरूपाचा होता . संभाजी महाराज हे पूर्णपणे स्वतंत्र वृत्तीचे असल्याने ते आपल्या तालावर नाचणार नाही हे लक्षात आलेल्या लोकांनी हा उद्योग केला होता पण तो काही फार यशस्वी झाला नाही आणि त्यामध्ये अण्णाजी फसले आणि नंतर हत्तीच्या पायाखाली गेले . आज सुद्धा फडणवीस यांना जेव्हा अण्णाजी म्हटले जाते तेव्हा ते अशा प्रकारचे राजकारण खेळतात असे अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात ते तसे नाही त्याची कल्पना मला आहे त्यांचा यासंदर्भातला रोल हा अतिशय मर्यादित आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हा पूर्णपणे राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचा प्रश्न आहे आणि प्रॉब्लेम तिथेच झाला . कारण पुन्हा पर्याय दोन होते एक शरद पवार यांच्या दिशेने जाणार होता तर दुसरा स्वतःची सत्ता तात्पुरती का होईना परंतु भाजप जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत शाबूत ठेवणारा होता मुळात ज्यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडली त्यांना सत्ता इतकी प्रिय आहे की ते शरद पवारांच्या कडे जाणे शक्यच नव्हते पवारांच्या बरोबर जायचं म्हणजे पवार स्वतः मोदींच्या बरोबर यायला हवेत भाजप बरोबर यायला हवेत आणि या दिशेने नक्की प्रयत्न झालेले असतील असे मला वाटते पण ठामपण न आढळल्याने किंवा ठाम उत्तर नाही मिळाल्याने शेवटी मग सध्याची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून आपण आता सुनेत्रा पवार यांना आणले पाहिजे असा विचार केला गेलेला आहे अजित पवारांचा जो सकाळच्या सरकारचा नाट्यप्रयोग पार पाडला त्यावेळी ठाम पण नसले म्हणजे काय होते याचा अनुभव या लोकांना असल्याने बहुदा पुन्हा एकदा अशीच दुविधा आढळल्यानंतर त्यांनी आपली सुविधा शोधलेली आहे शिवाय दुसरा प्रॉब्लेम हाही होता की जर का सुप्रिया मुळे या आल्या तर त्या अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे राजकारण करणारे असल्याने कदाचित आपल्याला हवे ते स्वातंत्र्य मिळणार नाही . थोडक्यात काय तात्कालीन सत्तेचा विचार हा जो यशवंत आणि शरद पवार मॉडेलचा प्रॉब्लेम आहे तोच इथे कार्यान्वित झाला यशवंतराव चव्हाण यांच्या मॉडेल मध्येच हा प्रॉब्लेम होता आणीबाणीच्या काळामध्ये बाहेर पडायचे असून सुद्धा आणीबाणीत यशवंतराव चव्हाण पूर्णपणे बाहेर पडले नाहीत चालढकल करत राहिले कारण सत्ता प्रत्येकाला हवी असते . किंबहुना मराठा लोकांच्या बद्दल दिल्लीमध्ये हेच बोलले जाते की मराठा प्रत्यक्ष सत्ता कधीच ताब्यात घेत नाहीत ते कायमच कोणी ना कोणीतरी बादशहा नेमत असतात किंबहुना हा मराठा मॉडेलचाच प्रॉब्लेम आहे ते दिल्ली ताब्यात घेतच नाहीत पण दिल्लीचे सगळे फायदे त्यांना हवे असतात . उत्तर भारतीय लोक आता याबाबतीत शहाणे झाल्याने ते असा फायदा मराठ्यांना घेऊ देत नाहीत पण मुंबई हे क्षेत्र मराठ्यांच्या ताब्यात असल्याने त्यांना झक मारत मराठ्यांशी तडजोड करावी लागते आणि ही तडजोड कायम करावी लागत असल्याने ती टाळता यावी म्हणूनच मुंबई वेगळी करण्याचा घाट अनेकदा घाटला जातो . 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरच्या काळात सुरुवातीला पहिला गट विजयी झाला आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले परंतु हा विजय फार काळ टिकला नाही आज सुद्धा लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत संशयाचे धुके आहे आणि त्याचा एक पदर हा इंदिरा गांधींना सत्तेवर आणण्याचा प्लॅन कम्युनिस्ट रशियन सरकारने केला होता काय या अंगाने येतो त्यांचा ताश्कंद मधला मृत्यू आजही संशयास्पद आहे याबद्दल शंका नाही . 

त्यामुळेच आज सुद्धा अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल वारंवार संशय व्यक्त केला जातो आणि हा होतच राहील . माझा अंदाज चुकला नाही तर या संदर्भातले अंतिम उत्तर कधीही मिळणे शक्य नाही आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूसारख्याच हा विषय कायम चघळला जाईल .

थोडक्यात काय राज्यप्रमुखाचा अंत आणि त्याच्यानंतर होणारी परिस्थिती हा एक सनातन राजकारणातला सनातन चक्रव्यूह असतो तोच आता आपल्यापुढे उभा राहिला आहे आणि प्रत्येक जण त्याचे विश्लेषण करत बसलेला आहे .

प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार हा या चक्रव्यूहातला अभिमन्यू आहे का ? आणि तो शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही बाजूंनी ठरवला गेलेला आहे का ? की फक्त ही ज्यांना सत्तेची घाई झालेली आहे अशा लोकांनी खेळलेली तात्पुरती खेळी आहे ? कदाचित नीट निर्णय न घेता आल्याने आता केलेली चालढकल आहे ? कारण जे घडले ते इतके अनपेक्षित आहे की कदाचित काहीच ठरवता येत नसावे . ही नेमकी तीच परिस्थिती आहे जी लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर निर्माण झाली होती आणि नंतर संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर निर्माण झाली होती अशा परिस्थितीच्या वेळी अनेकदा सगळे वातावरण थंड करण्यासाठी म्हणून परंपरेचा आधार घेतला जातो म्हणजेच परंपरा ज्याला मान्यता देईल असा उमेदवार निवडायचा म्हणजेच राजेशाही निवडायची म्हणजे संस्थानिकशाही निवडायची आणि त्या राजाचा त्या संस्थानिकाचा वारस सत्तेवर नेमायचा . अगदी इंदिरा गांधी यांची निवड सुद्धा याचमुळे झाली होती त्यापूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये सर्व संस्थानांच्या मध्ये इंग्रज हेच करत होते तेव्हा आपणाला या परंपरेची इतकी सवय झालेली आहे की भारतीय लोक चटकन या गोष्टीला मान्यता देतात याचा सर्वांनाच अंदाज आलेला आहे . भारतातली वर्णव्यवस्था मोडत नाही याचे एक मोठे कारण भारतातला राजा हा परंपरेने चालवला जातो आणि तेच अनेकांना सोयीचे असते म्हणजे फाटाफूट होत नाही . झाली तरी फारशी होत नाही आणि बऱ्यापैकी संघटन एकसंध राहते 

हे एका अर्थाने जुन्या भाषेत एनसीन किंवा आत्ताच्या भाषेत पॅरासिटामोल घेण्यासारखे आहे डोकेदुखी थांबवायची . आणि मग आता डोके शांत ठेवून होणाऱ्या घटना निरीक्षणाखाली आणत शेवटी मग एक निर्णय घ्यायचा . 

पण समजा उद्या जशा इंदिरा गांधी अत्यंत कार्यक्षम निघाल्या किंवा राजीव गांधी नंतर अतिशय योग्य असे नेते म्हणून उदयाला आले तसेच सुनेत्रा पवार यांचे झाले तर काय ? 

राजकारणी लोकांच्या बायका ह्या आपल्या नवऱ्याबरोबर राहून व्यवस्थित राजकारण शिकत असतात हा माझा अनुभव आहे . त्यामुळे त्यांना कोणी अनोळखी समजू नये . फक्त फायली हाताळता येतील का फायलींच्या गाठी सोडवता येतील का हाच फक्त त्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे कारण राजकारणी लोक सहसा आपल्या बायकोकडे आपल्या फायली घेऊन जात नाहीत . कारण मुळात फायली राजकीय कमी आणि प्रशासकीय जास्त असतात आणि प्रशासनाबाबत जितकी गुप्तता पाळता येईल तितकी ती पाळणे आवश्यक असते . आता जर का पवार मॅडम व्यवस्थित फायली हाताळायला शिकल्या तर त्यांच्यातून एक इंदिरा गांधी नव्याने उदयाला येणे अटळ आहे . प्रश्न असा आहे की फायली हाताळण्यात अजित पवार यांच्या नंतर सर्वाधिक एक्सपर्ट असलेले देवेंद्र फडणवीस त्यांना हे शिकवणार का ?

श्रीधर तिळवे नाईक


सुनेत्रा पवार यांची एन्ट्री आणि भारतीय राजकारणाचा इतिहास भाग दोन श्रीधर तिळवे नाईक 


सुनेत्रा पवार यांच्या एन्ट्री नंतर गिरीश कुबेर यांनी लेख लिहिला आणि नंतर बहुदा काही प्रमाणात माघार घेतली स्त्रीवादी सर्व लोकांनी मुळातच हा प्रश्न स्त्रीवादाचा केला आणि त्यामुळे गुंतागुंत अधिकच वाढली . एखाद्या व्यक्तीकडे ती स्त्री आहे म्हणून स्त्रीवादी नजरेने पाहणे हे योग्य आहे की तिच्याकडे सर्वात प्रथम मनुष्य म्हणून पाहिले पाहिजे असा एक मूलभूत प्रश्नच यामुळे निर्माण होतो . माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की तिच्याकडे सर्वात प्रथम आपण मनुष्य म्हणून होमोसोपियन म्हणून पाहिले पाहिजे . आणि मग होमोसोपियन म्हणून पुरुष सत्ताक राजवटी कडून तिच्या स्वभावात तिच्या वागण्यात तिच्या वर्तन शैलीत काही फरक पडला आहे का तिच्यावर काही पुरुषसत्ताक विशिष्ट दबाव निर्माण झालेले आहेत का असे प्रश्न निर्माण केले पाहिजेत आणि त्या अंगाने तपासणी केली पाहिजे परंतु अनेकदा होते उलटे म्हणजे एखादी स्त्री असेल तर सर्वात प्रथम तिचा विचार स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून करणाऱ्या अनेक स्त्रीवादी लेखिका आहेत . नेत्या आहेत. याची सुरुवात सुषमा अंधारे यांनी केली . पण ही करताना त्यांनी शेवटचा इशारा हाच दिला होता की जेव्हा बाई म्हणून प्रश्न येईल तेव्हा आम्ही तुमच्या मागे येऊ परंतु आम्ही तुमचे विरोधक राहू . त्यांना याबाबतीत म्हणायचे हेच होते की पुरुष सत्ता जेव्हा स्त्री म्हणून तुमचे अधिकार डावलेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत पण जेव्हा विचार प्रणाली चा येईल तेव्हा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला विरोध करताना आम्ही मागे हटणार नाही .


मूळ मुद्दा असा आहे की विचार प्रणालीच्या पातळीवर खरोखर विराट विरोध करता येणे शक्य आहे का? तर हे शक्य नाही याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मुळात उद्धव ठाकरे यांनीच युती केली होती आणि आता याच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप बरोबर युती केलेली आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची हिंदुत्ववादी या विचारसरणीची युती असे विचार प्रणालीच्या पातळीवर याचे स्वरूप आहे तर तुम्ही कसे काय विरोधात जाणार ? आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे हे होऊ शकत नाही . उद्या समजा अजित पवार पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करायला उतरले असते तर ही युती झाली नसती काय तर ती झालीच असती तेव्हा उगाच काहीतरी विचार प्रणालीच्या नावाखाली विरोध विरोध तर मूळ मुद्दा काय खरा नाहीये मूळ मुद्दा निर्माण झालाच तर तो भ्रष्टाचाराचा होणार आहे आणि त्या संदर्भाबाबत कोणी चर्चा करत नाही हा खरा परस्पर विरोध आहे .


साहजिकच आता प्रश्न असा येतो की एक होमो सेपियन म्हणून एखादा मनुष्य मग तो स्त्री असो किंवा पुरुष राजकारणात वावरतो तेव्हा त्या माणसाकडे त्या व्यक्तीकडे काय असते ? याचे पहिले उत्तर धर्म असते आणि दुसरे उत्तर विचारप्रणाली असते त्यातील विचार प्रणालीचा भाग आपण बघितलेलाच आहे


या प्रश्नाचे दुसरे दुसरे उत्तर अलीकडच्या काळामध्ये धर्म असतो असे आहे याचे कारण उत्तर परंपरा वादामध्ये आणि उत्तराधुनिक मध्ये धर्माचे पुन्हा एकदा आगमन झालेले आहे आणि याची सुरुवात आया तुला खोमेनी यांनी केली याबद्दल मी अनेकदा लिहिलेलेच आहे . 


साहजिकच सुनेत्रा पवार धर्माच्या बाबतीत काय भूमिका घेतात ते फार महत्त्वाचे असते . अजित पवार यांच्या निधनानंतर स्पष्ट आणि स्वच्छपणाने सर्व जे संस्कार झाले ते युरेशियन परंपरेचे झाले ही वस्तुस्थिती आणि ही जवळजवळ सर्वच लोकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. भारतातला कोणताही मोठा राजकीय नेता अलीकडच्या काळामध्ये अंत्यविधीसाठी ब्राह्मणेतर शैव पुरोहितांना बोलवत नाही याबाबतीत सर्वच हिंदू झालेले आहेत. प्रत्यक्षामध्ये अनेकदा सर्वजण फक्त संस्कृत वर भाळतात आणि अनेकांना हे माहीतच नसते की मंत्र पौराणिक की वैदिक हा एक फार मोठा प्रश्न असतो कारण जर का मंत्र पौराणिक म्हटले गेले तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही शूद्र आहात आणि मंत्र जर का वैदिक म्हटले गेले तर तुम्ही ब्राह्मण आहात किंवा ब्राह्मणांनी मान्य केलेले क्षत्रिय किंवा वैश्य आहात . तिथे नेमके काय झाले ते माहित नाही पण एवढी गोष्ट नक्की आहे की जे विधी झाले ते ब्राह्मण लोकांनी केले . आता हा प्रश्न नेमका कुठे घेऊन जातो तर हा प्रश्न हिंदू किंवा वैष्णव-धर्माकडे घेऊन जातो याचा अर्थ स्पष्ट आहे की सुनेत्रा पवार या हिंदू किंवा वैष्णव धर्मी आहेत त्यामुळेच त्या भाजपकडे गेल्या तर त्याबद्दल आश्चर्य मानायचे कारणच नाही महाराष्ट्रातले बहुतांशी मराठा नेते शिवाजी महाराजांचे नाव घेत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते शिवाजी महाराजांचा शैव धर्म पाळत नाहीत त्यांना पंडित आणि ब्राह्मण यांच्यात असलेला फरक कळत नाही . अनेक जण केवळ या अज्ञानामुळे हिंदू असतात त्यामुळे पवार कुटुंबीयांनी पंडितांना बोलावले की ब्राह्मणांना बोलावले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही . जर पंडित असेल तर किमान वैदिक मंत्र म्हणायलाच हवेत पण तो जर कर्मठ ब्राह्मण असेल तर मात्र तो कदाचित पौराणिक मंत्र म्हणूनच निघून जाईल . आता अशा तपशिलामध्ये कोणी सहसा जात नाही कारण हा एक धर्माचा प्रश्न आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होतो. आपणाला हे मान्यच आहे परंतु प्रॉब्लेम असा झाला की कळत नकळत तेरावे पाळायला हवे सत्तेची घाई करायला नको होती अशा प्रकारची मांडणी समोर आली . यात गिरीश कुबेर यांचीही मांडणी होती . प्रत्यक्षामध्ये ही सत्तेची घाई होती असे म्हणता येईल का? तर राजकीय पातळीवर आपण पाहायला गेलो तर ही एक आवश्यकता होती हे स्पष्टपणे दिसते राहता राहिली गोष्ट धार्मिक गोष्टींची तर त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात . उदाहरणार्थ आता मी हे अनेकदा सांगितले आहे की तेरावे ही सिस्टीम मुळची शैव सिस्टीम आहे वैदिक ब्राह्मणांनी त्यामध्ये काही आपले स्वतःचे मंत्र बसवलेले आहेत . त्यामुळे आपोआपच ही व्यवस्था हिंदू बनत जाते जिच्यामध्ये युरेशियन आणि शैव अशा दोन्ही श्रुती मधले मंत्र येतात . आणि विधी तर सरळ सरळ पूर्णपणे शैव पद्धतीचेच आहेत तो तसा का गेला गेला होता याची स्पष्ट कारणे एक शैव पंडित म्हणून मी इतरत्र दिलेली आहेत आणि मी स्वतः त्यावर एक तेरावे नावाचे पुस्तकच लिहिलेले आहे जे आता कदाचित बाजारात येईल.


हा विषय मग अचानक सार्वजनिक किंवा राजकीय का झाला? हा एक फार मोठा प्रश्न आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे की तुम्ही नीट पणाने हा विधी काय आहे ते आधी समजून घ्या आणि नंतर यामध्ये बदल करणे आवश्यक आहे का हेही पहा . माझ्या नवशैव-धर्मामध्ये हा विधी मी तेरा दिवसाचा ठेवलेला नाही माझ्या मते आता तसा तो ठेवण्याची गरज नाही याचे कारण असे आहे की पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावरून किंवा बैलगाडी मधून यावे लागे आणि त्यामुळे प्रवासाला अनेकदा तेरा दिवस लागायचे त्यामुळे सर्व नातेवाईक साधारणपणे तेराव्या दिवशी एकत्रपणे भेटायचे आणि म्हणून तेराव्या दिवशी हे तेरावे ठेवले होते दुसरे कारण अर्थातच तेरा दिवसात असणारे विधि आहेत प्राचीन काळामध्ये त्यासाठी लागणारी सामग्री गोळा करायला कधीकधी वेळ लागेल म्हणूनच प्रत्येक दिवशी एक विधी असा एक सोहळा होता त्या काळाला हे धरूनच होते परंतु अलीकडच्या काळात हे गरजेचे राहिलेले नाही तुम्ही सर्व विधी एका दिवसात सुद्धा सहज रित्या पार पाडू शकता मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की आपले प्राचीन काळातले लोक काही अगदी मूर्ख नव्हते त्यांचा म्हणून स्वतःचा काही शहाणपणा होता पण त्या शहाणपणा मागची कारणे आपण तपासायचे ऐवजी आपण काहीतरी आपला मूर्खपणा सादर करत बसतो . जेव्हा हा संस्कार शोधला गेला तेव्हा तो योग्यच होता त्याची असलेली मांडणी मग ती युरेशियन श्रुतीतील असो किंवा शैव श्रुतीतील असो योग्यच होती पण आता मात्र प्रवास करायला तास सुद्धा पुरत नाही सामान मॉल मधून मागवायला वेळ लागत नाही किंवा अनेकदा मरणाचे सामान सहजरीत्या मिळते पूर्वी जो खटाटोप करावा लागेल तो आता करावा लागत नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी एक विधी करत वेळ घालवणे याला आता काही अर्थ उरलेला नाही अर्थातच ज्यांना सनातन पद्धतीने सर्व करायचे आहे त्यांना ते करायचा पूर्ण अधिकार आपण शाबूतच ठेवला पाहिजे कारण प्रत्येक श्रद्धेचा आपण आदर ठेवला पाहिजे परंतु मी नेहमीच सांगतो की जे नवशैव लोक आहेत त्यांनी आता या संदर्भात काळाच्या अंगाने काळाला अनुरूप असे स्वतःच्या जीवनशैलीत फरक करावेत . ज्यांना हे बदल घडवायचे नाहीत त्यांना त्यांचा कर्मठ सनातन धर्म पाळण्याचा अधिकार व्यवस्थित शाबूत ठेवावा. कारण शेवटी श्रद्धेचे प्रश्न हे नेहमीच वैयक्तिक असतात . जेव्हा त्याचा परिणाम सार्वजनिक जीवनावर होत असतो तेव्हा मात्र अवश्य त्यामध्ये सरकारने दखल घ्यावी लागते . पूर्वी वाहनाची साधने जास्त नव्हती त्यामुळे त्या काळात ते सर्व योग्य असले तरी अलीकडच्या काळात जर का तुम्ही विमानाने आलात आणि जर का तुम्ही टॅक्सी किंवा रेल्वे वगैरे नाही आला तर जास्तीत जास्त तीन दिवसात तुम्ही पोहोचतात म्हणूनच आता तेरावे हे तीन दिवसाचे किंवा पाच दिवसाचे करावे असे मी म्हणतो . आणि जे काही विधी आहेत ते सर्व या पाच दिवसात किंवा तीन दिवसात पुरे करावे म्हणजे वेळ वाया जाणार नाही . एखादी गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा ती त्या काळाला धरून असते पण काळ नेहमी बदलत असतो आणि काळाप्रमाणे आपणाला वेळ सुद्धा बदलावी लागते .


एकदा हे लक्षात आल्यानंतर धार्मिक पातळीवर जर का हे सर्व मूळच्या शोकाच्या कळा संपल्या असतील तर सुनेत्रा पवार यांना सत्ता ग्रहण करण्याचा पूर्णपणे अधिकार पोहोचतो अगदी धार्मिक पातळीवर सुद्धा पोहोचतो दुर्देवाची गोष्ट अशी की कुबेरांच्या सारखा मॉडर्न असणारा माणूस आता अचानक पारंपारिक होत जातो . तो तसा का झाला आहे त्यांनीच आता एकदा सांगितलेले बरे ! मला नेहमी प्रश्न पडतो समजा पतीचा मृत्यू झाला तर हे सर्व होते आता उलट करून पहा पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर असे ऑब्जेक्शन येते का ? येईल का ? एकदा तुम्ही स्त्री पुरुष समानता स्वीकारली तर ती सर्व बाबतीतच स्वीकारली पाहिजे फक्त बाई माणसाच्या बाबतीतच हा प्रश्न कसा काय उभा करायचा हेही आपण आता विचारले पाहिजे . स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान न्याय असेच झाले पाहिजे .


दुसरा प्रश्न आमचे एक मित्र जय प्रभू यांनी विचारला होता तो म्हणजे अर्थमंत्रीपद काढून घेतले त्याचे काय 


या प्रश्नाला मी उत्तर दिले होते तेच इथे देतो 


" कारण त्या पदासाठी आता ताबडतोब अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे आणि माझा अंदाज चुकला नाही तर आता हे काम खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाच करावे लागेल अर्थसंकल्प सादर करणाऱ्या माणसाला अनेक आर्थिक प्रश्नांना विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये उत्तरे द्यावी लागतात मला नाही वाटत की ताबडतोब या गोष्टीची प्रॅक्टिस सुनेत्रा वहिनींना होईल . राजकारणातल्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या असतात बाकी जाऊ दे साध ग्रामपंचायत बजेट करायला गेलो तरी किती अडथळे येतात हे मला माहिती आहे गेली कित्येक वर्षे माझ्या गावाची ग्रामपंचायत आमच्याच घराण्याकडे होती हे तुला माहित असेलच . बाहेरून राजकारण बघणे आणि आतून राजकारण बघणे यात खूप फरक असतो .

श्रीधर तिळवे नाईक"


तेव्हा ताबडतोब त्यांच्या हातात अर्थमंत्रीपद द्यावे असे ज्यांना वाटते त्या लोकांची मला गंमत वाटते एकीकडे गुणवत्ता गुणवत्ता म्हणायचे आणि दुसरीकडे थेट घराणेशाही आहे म्हणून घराण्याप्रमाणे अर्थमंत्रीपद द्या अशी मागणी करायची यामधला विरोधाभास यांना कळत नाही का ? सुनेत्रा पवार या सार्वजनिक जीवनात व्यवस्थित वावरलेले व्यक्तिमत्व आहे याबद्दल कोणीही शंका घेऊ नये किंबहुना त्यांना राबडी देवी म्हणणे मूर्खपणाचे होते कारण सार्वजनिक जीवनात त्या व्यवस्थित वावरलेले आहेत आणि त्यांच्या घराण्यामध्ये राजकारणाचा वारसा आहे पर्यावरणाच्या प्रश्नावर इको आस्था असलेल्या त्या कदाचित एकमेव राजकीय नेत्या आहेत त्यामुळेच त्यांना राबडीदेवी समजणे हा तर मूर्खपणाच होता. मी पहिल्याच भागात लिहिले होते की त्या इंदिरा गांधी बनू शकतात . त्या मंत्रीपद सांभाळू शकतात याबद्दलही शंका नाही परंतु अर्थमंत्री पद हे फार अवघड आहे आणि गुंतागुंतीचे आहे कारण ताबडतोब आता बजेट सादर करणे गरजेचे आहे म्हणूनच त्यांना अर्थमंत्रीपद दिले गेलेले नाही .


दरवेळी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी कसलेही राजकारण करा हे बरोबरच नाही . सत्ता जिथे चुकते तिथे तिला आवश्यक दाखवून दिले पाहिजे मी स्वतः हे काँग्रेसच्या राजवटीत करत होतो आणि हिंदुत्ववादी राजवटीतही हे करत असतो . प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही समोरच्या सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडायला बघता तेव्हा तुम्ही विश्लेषण करत नसता तुम्ही विरोधी पक्षाचे काम करत असता माझी त्यालाही हरकत नाही माझं म्हणणं इतकंच असतं की विरोधी पक्षात प्रवेश करा उगाच तटस्थ असल्याचा आव आणू नका . 


बाकीचे सर्व मुद्दे बाकीचे इतरत्र लोकांनी मांडलेलेच आहेत म्हणजे मुख्य मुद्दा असा की पक्षात फूट पडण्याची शक्यता होती 


माझा याबाबतीतला स्वतःचा एक वेगळाच मुद्दा आहे माझे स्वतःचे म्हणणे असे आहे की समजा विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा असेल तर सुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक संपूर्ण त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलणारी नेतृत्व यंत्रणा नको का? ती असायलाच हवी म्हणजे विलीनीकरणासाठी सुद्धा या लोकांच्याकडून बोलणारा एक नेता असायला हवा जो या सर्वांना लीड करेल आता हे नेतृत्व करायला सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा अधिक योग्य कोण आहे त्या एकच नेत्या अशा आहेत की ज्यांच्या नावाबद्दल पक्षांमध्ये फूट पडणार नाही त्यामुळे जे झाले ते योग्य झालेले आहे . विलीनीकरणाच्या साठी सुद्धा सुनेत्रा पवार बोलणार असतील तर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे किंवा त्यांनी या संदर्भातली सूत्रे समजा एखाद्या चार नेत्यांच्या पैकी कोणाला दिली तर तोही निर्णय आपण स्वीकारला पाहिजे शेवटी दोन पार्ट्या झाल्या आता त्या दोन पार्ट्यांनी आपापसात बसून काय करायचे हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे थोडक्यात काय इथे सुद्धा एक नेतृत्व हवे आहे आणि सध्या तरी सुनेत्रा पवार त्याला योग्य आहेत म्हणून त्यांचे नेतृत्व नेतृत्व म्हणून हवे आहे .


तेव्हा जे झाले ते योग्य झाले असे म्हणा आणि पुढे कामाला लागा मुख्य म्हणजे अजितदादांचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हेच होते की ते फार उत्कृष्ट व्यवस्थापक होते . थांबणारे नेते तर ते बिलकुलच नव्हते . त्यांना खरी श्रद्धांजली हीच आहे की गती पकडा .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय