व्यवहार ,महात्मा फुले आणि हक्काचा प्रश्न श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय समाजाच्या इतिहासामध्ये आणि समाजशास्त्राच्या इतिहासामध्ये जे योगदान महात्मा फुले यांनी दिले आहे तशा प्रकारचे योगदान पुरोगामी वादामध्ये 19 व्या शतकात फार कोणी दिलेले नाही हे योगदान अतिशय थोर आहे हे करायचे असेल तर प्रथम जातीव्यवस्था काय पद्धतीने आपल्याकडे ऑपरेट होत होती ते पाहिले पाहिजे

१ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये व्यक्तिगत हक्क नाही जो हक्क आहे तो जातीला आहे म्हणजेच व्यक्तिगतला थोडा सुद्धा मुंगी इतका सुद्धा शिरकाव नाही आणि व्यक्तिगतला यायचंच असेल तर मोक्षाच्याच फक्त शक्यता उपलब्ध ठेवायच्या आणि या शक्यता अशा आहेत की ज्या लाखात एकाला मिळू शकतात म्हणजेच तुम्ही थेट संन्यास घ्या आणि समाजातून बाहेर पडा अशा प्रकारची ही योजना आहे साहजिकच बहुतांशी संन्यासी बाहेर पडले पण नंतर नंतर तर गोष्ट हितेपर्यंत गेली की संन्याशाला सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी नाकारलेच पण त्याचबरोबर संन्यास कोणी घ्यायचा आणि घ्यायचा नाही तपश्चर्या कोणी करायचे आणि कोणी करायचे नाही यासंदर्भातले सुद्धा नियम घालून दिले कारण काही संन्यासी असे झाले ज्यांनी बंड केले विशेषतः नाथ संप्रदायाचे बंड हे खूपच शिरकाव करणारे होते आघात करणारे होते म्हणून ते मोडीत काढण्यासाठी हा नाथसंप्रदाय पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेण्यात आला आणि व्यवस्थितपणे त्याचे जितके ब्राह्मणीकरण करता येणे शक्य आहे तितके ब्राह्मनीकरण ब्राह्मण धर्माने करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी गोरखनाथांना गोरक्षनाथ करण्याचा सुद्धा उद्योग केला . सर्व नवीन नाथांचे जन्म अत्यंत गुंतागुंतीचे केले आणि दत्तात्रय नाथांच्या सारखे नाथ ज्यांचा उपदेश अवधूत गीतेमध्ये व्यवस्थित आला होता तो वेदांती करून सादर करण्यात आला वास्तविक त्यांनी ब्रह्म हा शब्द वापरलेला नव्हता त्यांनी वापरलेला शब्द शिव आहे पण अत्यंत जाणीवपूर्वक त्या जागी ब्रम्ह ब्रह्म मांडले गेले आणि महाराष्ट्रामध्ये या नाथ संप्रदायाचे रूपांतरच पद्धतशीरपणे वैष्णव वारकरी संप्रदायांमध्ये करण्यात आले .

२ यावरून जाती व्यवस्थेमध्ये फक्त जातीला जाती हक्क म्हणजे रोटी बेटी व्यवहार कसा करायचा रोटी कशी कमवायची आणि बेटी कुठे द्यायची म्हणजेच जातीतला जातीतच कशी द्यायची याचा अधिकार होता तिथे व्यक्तीला सर्वात दोन मोठे अधिकार असतात तेच नाकारलेले होते एक म्हणजे मी कसे कमवून खायचे कसे कमवायचे माझी आवड निवड काय माझा कल काय याचा कसलाही ठरवण्याचा अधिकार या व्यवस्थेत नव्हता म्हणजेच व्यक्तीची व्यक्ती म्हणून असलेली सृजनशीलताच नाकारली गेली वर आणि एक असा व्यवहार आणला की ज्या व्यवहारामध्ये नको तितकी बंधने होती म्हणजे जातीतल्या जातीत रोटी व्यवहार बेटी व्यवहार याचबरोबर बंधन असे की हे व्यवहार जातीच्या बाहेर नाही जातीच्या अंतर्गतच हे व्यवहार झाले पाहिजे म्हणजे जात व्यवस्था मोडण्याचे एकमेव जे साधन असते ते म्हणजे आंतरजातीय विवाह ते होणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेतली गेली आणि एकदा जात सुरक्षित केली की आपोआपच वर्ण सुरक्षित होतात हे माहीत असल्याने आपोआपच वर्ण टिकवण्याची अत्यंत पद्धतशीरचना तयार झाली कारण या लोकांनी जात व्यवस्थित आधीच जन्मदत्त पद्धतीने प्लेस केली ठेवली म्हणजेच रोटी बेटी व्यवहारासाठी जात आणि वर्णव्यवस्था मोडू नये म्हणून प्रत्येक जातीला वर्ण व्यवस्थेमध्ये व्यवस्थित प्लेसमेंट उतरंड देणे अशा प्रकारचा अत्यंत नतदृष्ट उद्योग केला गेला

३ बरे हे सर्व करताना कर्म दत्तता नव्हतीच हे सर्व काही जन्मदत्तच म्हणजेच जन्मदत्त तुम्हाला व्यक्तिगत अधिकार नाही आणि तुम्हाला सामाजिक जात म्हणून सामाजिक उन्नयन करण्याचा अधिकारच नाही साहजिकच मग तुम्हाला जन्मदत्त पद्धतीने तुमच्या जातीची गुलामगिरी करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक ठेवला गेला नाही 

४ मग जात कुठे? म्हणजे तिची वर्ण व्यवस्थित प्लेसमेंट कुठे? तर ती सुद्धा जन्मदत्त पद्धतीने !तर सहा वर्ण पैकी एक म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यापैकी एका गटात स्तरीकरणांमध्ये बांधून ठेवले आणि जर का तुम्ही ब्राह्मण आणि क्षत्रिय असाल तर विशेष अधिकार वैश्य असाल तर मध्यम शूद्र असाल तर उत्पादन करण्याचा अधिकार पण उत्पादन कोणाला विकायचे याचा मात्र अधिकार नाकारला तिथे अंतिम शब्द उत्पादकांचा नव्हताच आणि जर का तुम्ही अतिसुद्र असाल तर अधिकार नाही तुम्ही फक्त दास व्हायचे आणि आदिवासी असाल तर प्रवेशच नाही . बघा आमच्यात येऊ नका तुम्ही तुमचे स्वतंत्र जंगलात जगा पण आमच्यात येऊ नका मात्र यदा कदाचित तुमच्या बायकांच्या वर आमचे मन आले तर त्या उपभोगण्याचा अधिकार आम्हाला आहे .

तर अशा पद्धतीने ही जी हक्काची रचना तयार करण्यात आली ती हक्काची रचना काय आहे हे महात्मा फुले यांना व्यवस्थित कळालेले होते आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टीला गुलामगिरी असे नाव दिले

 ही वर्ण जात रचना अशी आहे जिच्यामध्ये हक्क सर्वच्या सर्व पहिल्या दोन वर्णांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत आणि मग या दोन वर्णांना पैसा तर हवा आणि पैसा कोणाकडे मागायचा तर वैश्य लोकांच्याकडून मागायचा म्हणजे वैश्य हे एस पी! त्यांनी उत्पादक असलेल्या शूद्र लोकांना व्यवस्थित मॅनेज करायचे उत्पादन करून घ्यायचे आणि पैसा मात्र आपल्याकडे ठेवण्याऐवजी राजा जसा म्हणेल तसा त्याला पोचवायचा. हा पैसा त्यांनी या लोकांना टॅक्स म्हणून किंवा दक्षिणा म्हणून द्यायचा .

जेव्हा हे सर्व हक्काचे प्रकार आणि आकार महात्मा फुले यांच्या लक्षात आले तेव्हा मग ते जन्मदत्त हक्काच्याच विरोधात उभे राहिले आणि त्यांनी हक्काची लढाई लढली आणि माझ्या मते मानवी हक्काची जी लढाई महात्मा फुले लढत होते ते त्यांचे भारतीय समाजाला सर्वात मोठे योगदान आहे त्यांनी हक्काची संकल्पना पाश्चात्त्य देशाकडून आणली ती आणावी लागली म्हणूनच ते थॉमस पेन चे जबरदस्त समर्थक होते त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती मधून सुद्धा हक्क आणले आणि हे सगळे हक्क त्यांनी व्यवस्थित मांडले आणि हे सर्व हक्क इथल्या जनतेला मिळाली पाहिजेत अशी मागणी केली महात्मा फुले यांचे हे योगदान अभूतपूर्व आहे कारण अशा प्रकारची हक्काची मागणी इतरांनी इतक्या सातत्याने कधी केलेली नव्हती ज्या प्रकारच्या स्तरीकरणांमध्ये महात्मा फुले जातीला पहात होते ते स्तरीकरणच त्यांनी उध्वस्त केले आणि म्हणूनच ब्राह्मणांना त्याचा राग आहे ब्राह्मण काही उगाच महात्मा फुले यांच्या विरोधात गेले नाहीत कारण महात्मा फुले हे असे पहिले होते ज्यांनी ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेची व्यवस्थित आकलनाच्या दृष्टीने संपूर्ण अशी एक आकलनप्रणाली विकसित केली ते पूर्णपणे ओळखून होते की विष्णूची अवतार संकल्पना एक शोषण व्यवस्था म्हणून कशी काम करते ते पूर्णपणे ओळखून होते की गणपती कसा ब्राह्मणी पद्धतीने व्यवस्थितपणे सादर केला जात असतो ते पूर्णपणे ओळखून होते की काय पद्धतीची धार्मिकता ब्राह्मण धर्म म्हणून ऑपरेट होत असते आणि धर्माचा काय प्रकार म्हणून स्त्रियांचे सर्व हक्क डावलले जातात महात्मा फुले यांची हक्काच्या संदर्भातली जी लढाई आहे ती एक समग्र मांडणी आहे आणि ती भारतीय समाजाच्या संदर्भात येते आणि म्हणूनच ती भारताच्या इतिहासामध्ये एकोणिसाव्या शतकातली सर्वात थोर मांडणी आहे 

महात्मा फुले हक्काच्या संदर्भात नेमके काय म्हणत होते ते या संदर्भात विशेष लक्षात घ्यायला हवे 


श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय