समाजवाद से सावधान ओशो रजनीश आणि आमची पिढी श्रीधर तिळवे नाईक 


आमच्या पिढीवर ज्या काही थोर विचारवंतांनी प्रभाव टाकला त्यामध्ये कदाचित ओशो रजनीश्यांचा नंबर अग्रक्रमावर येईल . आज मोदी यांना जे मोकळे रान मिळालेले आहे ते रान ओशो रजनीश यांनी मोकळे करून दिलेले आहे . त्यांच्या मोक्षपणाबद्दल मी काही बोलणार नाही कारण बरेच मतभेद आहेत परंतु भारतामधील १९६० नंतरचा सर्वश्रेष्ठ विचारवंत असे नक्की त्यांच्याबाबत म्हणता येते . मला भेटलेल्या प्रत्येक माणसाला मी नेहमीच सांगतो की आयुष्यात एकदा तरी ओशो रजनीश पुर्णपणे वाचा . भारतीय परंपरा हा साठोत्तरी पिढीचा ध्यास आहे परंतु हा ध्यास नेमकेपणाने उलगडून फक्त रजनीश्यांनीच दाखवला बाकीच्यांनी फक्त टीमक्या वाजवल्या आणि देशीवादाच्या नावाखाली बोंब केली पण यामध्ये फक्त ओशो रजनीशच असे होते की ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय परंपरा नेमकी काय आहे आणि भारताची नेमकी मानसिकता काय आहे हे व्यवस्थितपणे सांगितले . त्यांच्या काळाच्या त्यांना काय मर्यादा होते याची चर्चा आता काही प्रमाणात पुढे करणार आहे.


भारतामध्ये उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाची सुरुवात ही रामकृष्ण परमहंस यांच्यापासून होते आणि त्याचे परम उच्च शिखर म्हणून ओशो रजनीश यांना पहावे लागते मी याला उत्तर अध्यात्मिकतावाद असे म्हटले होते आणि तसा लेख लिहिला होता . (सचिन केतकर ने एकदा हा शब्द आणि ही संकल्पना तुझी चांगली देणगी आहे असे म्हटले होते) 


अर्थातच हे एक श्रमण स्कूल आहे आणि त्याची सुरुवात कपिल याने केली होती आणि विस्तार भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांनी केला होता पण आधुनिक काळामध्ये याची सुरुवात जे कृष्णमूर्ती यांनी केली होती(मी त्यांना आधुनिक बुद्ध त्यामुळेच म्हणतो) आणि साहजिकच त्याचा सर्वाधिक प्रभाव हा ओशो रजनीश यांच्यावर पडलेला आहे साहजिकच जेव्हा ओशो रजनीश यांनी सांसारिक म्हणजे राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक मीमांसा करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे अनेक खोलवर पडसाद आपल्या भारतीय समाजामध्ये त्या काळामध्ये उमटत राहिले त्यांना प्रचंड विरोध होत राहिला परंतु ते खरोखरच एक असा व्यापक discourse उभा करत होते जो त्या काळामध्ये कोणीही उभा करत नव्हते याबाबतीत ते महा थोर होते याबद्दल शंका नाही .


त्यांच्या मांडणी मधला एक मोठा घटक हा नेहमीच ज्या वेळेला समाजवाद प्रचंड बोकाळलेला होता त्या काळात त्याच्यावर टीका करणे हा होता . त्यांची ही सगळी टीका समाजवाद से सावधान या त्यांच्या ग्रंथामध्ये आपणाला वाचायला मिळते . 


ओशो नेमकी काय मांडणी करतात तर मुळातच त्यांचे बेसिक गृहीतक अत्यंत स्पष्ट आहे ते म्हणजे समाजवाद ही पद्धत वितरणाची पद्धत आहे उत्पादनाची न्हवे आणि त्यामुळेच समाजवाद आलाच पाहिजे समाजवाद येईलच पण जेव्हा भांडवलशाही पूर्णपणे विकसित होईल तेव्हा ! एकदा का भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली की एक वेळ अशी येईल की संपूर्ण समाज हा मशीन वर चालेल आणि अशी वेळ येईल की जेव्हा लोक कृपया आम्हाला कष्टाची कामे द्या अशी मागणी करतील . यातील जो शेवटचा अस्पेक्ट आहे तो सरळ सरळ मार्क्सवादापासूनच प्रभावित आहे कारण कार्ल मार्क्ससुद्धा अशाच प्रकारची अवस्था येईल अशी कल्पना करत होता.


अर्थातच ही भूमिका ही नंतर बदलली जेव्हा त्यांना अमेरिकेने हाकलून काढले त्यांना अचानक लक्षात आले की आपण समजतो तशी भांडवली व्यवस्था न्याय देणारी नाही . साहजिकच वैयक्तिक खुन्नस तत्त्वज्ञानात निघाली आणि त्यांनी समाजवादाच्या बाजूने एक जाहीरनामा जाहीर केला आणि तो रशियाला रशियाच्या अध्यक्षांना (म्हणजे मिखाइल गार्बोचेव यांना)धरून होता . कुठेतरी कळत नकळत ते फसले हे मात्र खरे . आपल्याकडे अनेक विचारवंतांचा हा प्रॉब्लेम होतो ते अनेकदा वैयक्तिक होत जातात ओशो रजनीश आर्थिक विचारांच्या बाबतीत कळत नकळत वैयक्तिक होत गेले आणि त्यांचे अमेरिकेविषयीचे आकलन जसे चुकले होते तसेच रशियाविषयीचे आकलन सुद्धा चुकले . सुरुवातीला अमेरिकेविषयीची तिच्यातल्या भांडवलशाही विषयीची त्यांची मते फार रोमँटिक होती. त्या व्यवस्थेतील भोके कदाचित त्यांना माहिती असावीत पण प्रत्यक्षात ही भोके भोके नव्हती तर भगदाडे होती . ती त्यांना नीट कळली नाही कारण त्यांची सर्व मते त्यांच्याकडे आलेल्या अनुयायांच्या वर अवलंबून होती. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये ते गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण समजतो तसा हा देश नाही तिथेही त्यांनी पुण्यात ज्याप्रमाणे स्वतःचे स्वतंत्र संस्थान निर्माण केले तसे संस्थान निर्माण करण्याची धडपड केली पण अमेरिका सरकार म्हणजे भारतीय सरकार नव्हे (नंतरच्या शेवटच्या काळात ते भारताला सर्वोत्तम देश म्हणायला लागले होते माझे तर सुरुवातीपासूनच हे मत आहे कारण आपल्या देशाची ताकद मला नीट माहित आहे त्यामुळे परदेशात सेटल होण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही आपल्याला आपल्या देशाची ताकद अनेकदा नीट कळत नाही मी अनेक त्रास सहन करून सुद्धा म्हणेन की मोक्षासाठी भारता इतका उत्तम देश नाही असो ) त्यामुळे जेव्हा त्यांनी मोकळी विचार प्रणाली मांडायला सुरुवात केली तेव्हा अमेरिकेने तडाखा दिला या तडाख्यामुळे सुद्धा त्यांच्यात झालेला तथाकथित समाजवादी बदल हा पुन्हा एकदा असाच रोमँटिक होता त्यांनी प्रत्यक्ष रशिया पाहिलाच नव्हता त्याचा एकच परिणाम झाला तो म्हणजे रशियामध्ये काय चाललंय याची कल्पना त्यांना आलीच नाही आणि ते समाजवादाकडे गेले हे फार विनोदी होते कारण जेव्हा साम्यवाद रशियामध्ये कोसळत होता तेव्हा ओशो रजनीश आश्चर्यकारकरीत्या समाजवादी बनत होते . ही खरे तर त्यांची वैचारिक शोकांतिका होती आणि त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणारीही होती .


मुळात त्यांनी जे प्रमेय गृहीत धरले होते ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते म्हणजे असे की समाजवाद म्हणजे फक्त वितरणाची प्रणाली हे खरे नव्हते कारण समाजवाद म्हणजे सामूहिक उत्पादनाची प्रणाली सुद्धा होती . ती एक सर्वांगीण आर्थिक प्रणाली आहे तुम्ही तिच्यावर टीका करू शकता परंतु तिचा विपर्यास करून ती फक्त वितरण केंद्रप्रणाली आहे असे म्हणणे हा सरळ सरळ स्वतःला दिलेला धोका होता . पण हा धोका त्यांनी खाल्ला याचे सर्वात मोठे कारण अमेरिकेमधून प्रत्यक्षात ही मांडणी आली होती . भारतात ती त्यांनी आध्यात्मिक परिभाषेमध्ये रंगवली . खरा प्रश्न फक्त वितरण नव्हता तर तो सामूहिक उत्पादन केल्याने खरोखरच उत्पादन वाढते का हा होता . साम्यवादा मधला सर्वात मोठा घोळ हाच होता की सामूहिक उत्पादन प्रणाली कशी काय निर्माण करायची याचे कारण असे होते की सामूहिक उत्पादन आपोआप विना नियंत्रण होणे ही साम्यवादाची एक आदर्श स्थिती होती ती प्रत्यक्षामध्ये कधी येणे शक्य आहे का हाच खरा प्रश्न होता. प्रत्यक्षामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे या सामूहिक उत्पादन प्रणालीवर नियंत्रण होते आणि हे नियंत्रणच साम्यवादाचा खरा शत्रू आहे . कारण हे नियंत्रण जर का नीट करणारी पार्टी असेल तर साम्यवाद यशस्वी होतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जगामध्ये विविध देशातल्या अनेक पद्धतीच्या जवळजवळ सर्व कम्युनिस्ट पक्षांनी सामूहिक उत्पादन प्रणाली व्यवस्थितरित्या निर्माण केली नाही आणि साम्यवादाच्या नावाखाली साम्यवादी नोकरशाही अस्तित्वात आली . रशिया मधली व्यवस्था कोसळण्याचे सर्वात मोठे कारण हेच होते त्या उलट चीनने मात्र आपली प्रणालीच बदलून टाकली आणि कार्पोरेट प्रणाली पूर्णपणे आत्मसात करत आणि भविष्य वाद म्हणजेच फ्युचरॉलॉजी खास आमंत्रण देऊन बोलवत स्वतःची संपूर्ण प्रणालीच पोस्ट कार्पोरेट प्रणाली म्हणून उभी केली आणि ते यशस्वी झाले म्हणजेच एका अर्थाने साम्यवादामध्ये राहून जी सृजनता चायनीज कम्युनिस्ट पक्षाने दाखवली तशा प्रकारची सृजनशीलता इतरांना दाखवता आली नाही आणि आज चायना हळूहळू पुढे सरकताना दिसला दिसतोय पण एक गोष्ट नक्की आहे की उद्या जर का समजा कम्युनिस्ट पक्ष हे नियंत्रण नेटनीट चालवण्यामध्ये यशस्वी ठरला तर ही यशस्वी होईल पण जर काही नियंत्रण नीट नेट चालले नाही तर ही व्यवस्था कोसळणे अटळ आहे आणि चायना चा रशिया बनणे सुद्धा अटळ आहे . सध्या चीनमध्ये नेमका हाच नीट"नेट"केपणा विरचित होतो आहे आणि त्याचे काय करायचे हे चीनच्या नेतृत्वाला सध्या कळत नाहीये .


कुठलाही साम्यवाद यशस्वी व्हायचा असेल तर वितरण व्यवस्थित व्हावे लागते हे मात्र खरे पण मुळात ही गोष्ट फक्त साम्यवादी पक्षाला लागू आहे का? तर नाही अगदी कार्पोरेट वादी पक्ष असला किंवा उत्तर कॉर्पोरेटवादी पक्ष असला तरी जर का संपत्तीचे आणि आवश्यक गोष्टींचे वितरण नीट झाले नाही तर त्या पक्षाने कुठलीही आर्थिक संरचना आणली तरी ती कोसळणे अपरिहार्य आहे मोदी यांचे यश जर कशात असेल तर ते अतिशय व्यवस्थितपणे आवश्यक असलेल्या गोष्टींचे विशेषत : अन्नाचे वितरण अधिक चांगल्या रीतीने करण्यात आहे किंवा किमान तशी अफवा आहे . साहजिकच भारतातला गरीब त्यांच्यामागे उभा आहे . माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा वितरणाचे एक हत्यार म्हणून विकसित झाले आणि भाजपने ते अधिक चांगल्या रीतीने केले म्हणूनच जरी काँग्रेसने ही योजना शोधली असली तरी प्रत्यक्षात भाजपने ती अधिक चांगल्या रीतीने राबवली आणि लोकांचा अधिक पाठिंबा मिळवण्यात भाजपाइ लोक यशस्वी झाले . प्रश्न असा आहे की अशा प्रकारच्या वितरणाच्या व्यवस्था या किती काळ फंक्शनल राहतील ? त्यांना लागणारा फायनान्स कसा काय मॅनेज होणार आहे कारण अनेकदा अशा प्रकारचा उद्योग हा तुम्हाला तुमच्या अर्थव्यवस्थेला दिवाळखोरीच्या दिशेने नेतो .


याबाबतीतले व्हेनेझुएला या देशाचे उदाहरण घेण्यासारखे आहे तिथे तेल निर्यातीमुळे आलेला प्रचंड पैसा असाच वेगवेगळ्या लाडक्या योजना राबवत वितरित केला गेला आणि संपत्तीचे वितरण अतिशय सोप्या पद्धतीने केले गेले त्याचा सुरुवातीच्या कालखंडामध्ये फायदा झाला खरा परंतु जेव्हा तेलावर चाललेल्या या अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था खुद्द अमेरिकेच्या आसपास तेल सापडल्याने निर्माण झाली तेव्हा निर्यातीचे सगळे जे आलेखन होते ते कोसळले आणि निर्यातच कोसळली याचा परिणाम असा झाला की हा देश आज पूर्णपणे रसातळाला गेलेला दिसतो. म्हणजे रजनीश यांनी जे सैद्धांतिक वितरण मॉडेल उभे करायला पाहिले ते वितरणमॉडेल सुद्धा कोसळू शकते . याचे कारण असे असते की कुठलीही आर्थिक व्यवस्था ही फक्त त्या त्या प्रदेशापुरती राहत नाही देशी राहत नाही अनेकदा बाहेरून काही ना काहीतरी येत राहते आणि हे येत राहते म्हणूनच मार्गी पण शाबूत ठेवावे लागते . जागतिकीकरणावर एक डोळा ठेवावा लागतो तो ठेवला नाही की तुमचा व्हेनेझुएला होतो .


म्हणजे एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की रशिया हे टोक आहे आणि दुसरे टोक अमेरिका आहे आणि यांचा मध्य काढावा लागतो आज अमेरिकेची जी गोची झालेली आहे तिला कारण तिथली कार्पोरेट व्यवस्था आहे या कार्पोरेट व्यवस्थेने देशाचा विचार अजिबात केला नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या क्षमता या चायना मध्ये निर्यात गेल्या आणि चायनाला श्रीमंत करत नेले पण याचा आपल्या देशाला काय तोटा होईल याची फिकीर केली नाही आणि आज ट्रम्प यांना नाईलाजाने देशीवाद किंवा उत्तराधुनिकता स्वीकारावी लागत आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये मार्गीपणा इतका मोठा होत गेला की आपण दुसऱ्या देशासाठी आपली उत्पादन व्यवस्था राबवत राहिलो तर आपण जिथून आलोय तिथे फापलत जाऊ शकतो हे इथल्या अनेक कंपन्यांच्या लक्षात आले नाही आणि ट्रम्प यांना नाईलाजाने आपल्या देशात उत्पादन करा अशा प्रकारची एक प्रकारची हुकूमशाही वाटावी कम्युनिस्ट वाटावी अशी काहीतरी अरेरावी करावी लागली . लोकांना फक्त त्यांची आरेरावी दिसते पण तिथल्या कंपन्यांनी चायना मध्ये जाऊन खाल्लेले शेण दिसत नाही . मार्गी वाद टोकाला गेला की काय होते त्याचे अमेरिका हे दुसरे उत्तम उदाहरण हे दुसरे टोक ! तर व्हेनेझुएला मध्ये फक्त स्वतःकडेच लक्ष केले गेले आणि जागतिक पातळीवर आपण लक्ष दिले नाही तर काय होते त्याचा नमुना दिला .


मी हे सातत्याने मांडत आलेलो आहे की चौथी नवता म्हणजे फक्त मार्गी नव्हे किंवा फक्त देशी नव्हे तर मार्गी देशी पोटी आणि जमाती यांचा समतोल होय . हा समतोल साधला नाही की अर्थव्यवस्थासुद्धा फापलत जातात .


ओशो रजनीश हे त्या काळामध्ये समाजवादाच्या विरोधात बंड करणारे विचारवंत होते आणि हे बंड आवश्यक होते पण या बंडासाठी जी एक समग्र आकलनाची चौकट त्यांनी पाहायला हवी होती ती पाहिली नाही आणि त्यामुळेच रशियात समाजवाद कोसळत चाललाय हेही त्यांना कळाले नाही . अर्थातच जेव्हा ते कळाले तेव्हा त्यांनी ताबडतोब स्वतःत बदल केला फक्त मोक्ष केंद्री बनले आपल्याला सर्व कळते हा अहंकार संपला परंतु या बदलाला संपूर्ण आत्मसात करण्याआधीच त्यांचे निधन झाले पण निधना आधीच त्यांच्या डोळ्या देखतच रशियामध्ये साम्यवाद पूर्णच कोसळला. यानंतर त्यांनी काय भूमिका घेतली असती हे आता आपण सांगू शकत नाही कारण त्यांचे निधन त्याच वेळेला झालेले आहे.


या मधला सर्वात मोठा विरोधाभास असा होता की त्यांच्या निधनानंतरच समाजवादसे सावधान होऊन नरसिंहराव यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये धोरण बदलायला सुरुवात केली. 


थोडक्यात काय कोणी कितीही आध्यात्मिक असो त्याला काळाच्या आणि अवकाशाच्या मर्यादा असतात आपल्याकडे ही गोष्ट का लक्षात घेतली जात नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे सविकल्प किंवा निर्विकल्प समाधी मधला मनुष्य काहीतरी सनातन सत्य सांगत असतो आणि हे प्रत्येक क्षेत्रातले सनातन सत्य असते असा एक गैरसमज आपल्याकडे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मोक्षा बाबतीत सत्य त्याला सापडू शकते तो मोक्षाला उपलब्ध होऊ शकतो त्याला मोक्ष मिळू शकतो परंतु संसार कसा चालेल कसा चालतो याविषयीचे त्याचे संपूर्ण आकलन हे नेहमीच त्या काळाशी आणि अवकाशाशी निगडित असते. याबाबतीत कारण नसताना त्याला देव मानण्याची गरज नाही याबाबतीत त्याचा विचार विचारवंत म्हणूनच झाला पाहिजे आपल्याकडे हे मोक्ष मिळालेले किंवा प्रोसेस मध्ये असलेले लोकसुद्धा हे सांगत नाहीत कारण यातल्या बहुतेक लोकांना आश्रम काढून प्रचंड पैसे प्रचंड सत्ताच कमवायची असते मोक्षाशी प्रत्यक्षात फार काही देणे घेणे नसते त्यामुळे फार घोळ होतात आणि त्यांचे सांसारिक विचार हे सुद्धा जणू काय सनातन विचार आहेत अशा तऱ्हेने त्यांचा प्रचार होतो. प्रत्यक्षामध्ये ही विचार करण्याची सनातन संसारिक पद्धत पूर्णपणे खोटी आहे त्यामुळे कोणी कितीही मोक्ष मिळवलेला असो कृपया सामाजिक राजकीय वगैरे संसारिक बाबी या नेहमीच त्या त्या काळाशी आणि त्या त्या अवकाशाची निगडित असतात आणि तो मुक्त पुरुष सुद्धा अवकाश आणि काळ यांच्याशी बद्ध असल्याने समाज व्यवस्थेशी बद्ध असल्याने याबाबतीत मर्यादित होतो हे कृपया प्रत्येकाने लक्षात घ्यावे ओशो रजनीश हे स विकल्प समाधीला उपलब्ध झाले होते परंतु मोक्षाला उपलब्ध झाले नव्हते हे माझे आकलन आहे परंतु समजा ते तसे झाले असतील असे काहींना वाटत असेल तर त्यांचे सामाजिक राजकीय वगैरे संसाराच्या दृष्टीने जे आकलन आहे ते त्यांच्या पिढीशी निगडित होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांच्या या मर्यादा लक्षात घेऊनच त्यांच्या सर्व संसाराविषयीच्या विचारांची चिकित्सा केली पाहिजे .


फक्त मोक्ष सनातन असतो आणि संसार ही कायमच तुम्हाला चकवा देणारी दलदल असते एवढे लक्षात आले तरी खूप झाले .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय