मराठीचा मुद्दा हा असा नेहमी बारगळत का जातो श्रीधर तिळवे नाईक
सध्या अधून मधून मराठी भाषेच्या अंगाने वाद उमटतच असतात . मी फार पूर्वीपासून या विषयावर भाष्य केलेले आहे आणि या अंगाने मी लिहिलेली एक कविता त्या काळात बरीच गाजली होती. त्यात मराठी भाषा इंद्रायणीत बुडणार असे सांगितले होते आणि नंतर खरोखरच तशी स्थिती आता आलेली आहे. त्या कवितेत मी माझ्या भाषेचा अखेरचा कवी असेही म्हटले होते हे मात्र सत्य झालं नाही आणि नंतर आमच्या पिढीत आणि आमच्या पिढीनंतर अनेक चांगले कवी आले . मात्र भाषा बोलण्याचा धोका मात्र तसाच राहिला .
मला नेहमीच प्रश्न पडतो की मराठीचा मुद्दा हा नेहमी का बारगळत असतो ? हे मी अनेकदा पाहिलेले आहे की काहीतरी वक्तव्य अशा लोकांच्याकडून मराठीच्या मुद्द्याबरोबर ज्यादा येते . त्यांचे भाषा प्रेम निर्विवाद असते त्याला दाद द्यावीशी वाटते पण ते हे व्यक्त करताना काहीतरी असं विचित्र ज्यादा बोलतात आणि त्याला अशा काही राजकारणाची जोड देतात की मराठी भाषेचं भाषाकारण राहतं बाजूला आणि हे लोक काहीतरी भलतंच करत आहेत असा फील येतो या सतत राजकीय फील येणाऱ्या वक्तव्यांच्यामुळे मराठीचे भाषाकारण मात्र नेहमीच बारगळत जात असतं. वास्तविक संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झाले तेव्हा सर्व नेत्यांनी आपले राजकारण पूर्णपणे बाजूला करून भाषेवर लक्ष केंद्रित केले होते त्यापासून जो धडा शिकायला पाहिजे होता ते आत्ताचे मराठी लोक आणि आत्ताचे मराठी नेते शिकत नाही आहेत असं माझे एकंदरीत निरीक्षण आहे .
मराठीचा एक व्यापक मोर्चा निघाला आणि अचानक आमच्या तशाच हितचिंतक असलेल्या व्यक्ती आल्या. मराठी शाळांच्या बाजूने ठाम उभ्या राहिल्या आणि मग अचानक त्यांनी जय भीम वगैरे सुरू केले माझा स्वतःचा त्या जय भीम ला आक्षेप नाही परंतु मराठी आणि जय भीम अचानक जोडल्यामुळे या सगळ्याला एक आंबेडकरी चळवळीचा वास विनाकारण प्राप्त झाला आणि भाजप विरोधी राजकारणाचा अजेंडा कारण नसताना त्या सगळ्या त्यांच्या वक्तव्याला चिपकवला गेला आणि मराठी भाषा राहिली बाजूला आणि भलत्याच घोषणा पुढे यायला लागल्या . वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषेच्या राज्यासाठी कोर्टात लढत दिली ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही जय भीम ज्या संदर्भात म्हणत आहात तो संदर्भ अनेक लोकांना माहीतच नाही . त्यामुळे आंबेडकरवादी असणे हे जादा महत्त्वाचे झाले आणि मराठी भाषिक असणे कमी महत्त्वाचे झाले . मुळातच एक गोष्ट अलीकडे अशी झालेली आहे की आंबेडकर वादाच्या मागे फार संख्येने लोक उभे राहत नाहीत आणि मग संख्या कमी झाली म्हणून कळत नकळत त्याबद्दलची टीका सुद्धा यायला लागली आणि त्यामुळे उलट आंदोलनाची धार गेली . ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे याला खरे तर खूप चांगले डायमेन्शन लाभले होते . मराठीच्या इतिहासातला तो एक सुवर्णक्षण होता परंतु कळत नकळत नंतर हे जे काही आले त्यामुळे मराठीचा मुद्दा थोडासा हलला. बरे हे त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे होते पण ते सांगितले बहुदा गेलेच नाही .
नंतर इथे एक राजकीय व्यक्तिमत्व अलीकडे आले. त्यांनी भागवतांच्या संदर्भात बोलायला काहीच हरकत नव्हती परंतु आपला फोकस त्यांनी फक्त भाषिक ठेवायला पाहिजे होता . परंतु अचानक भयामुळे आले वगैरे असा काहीतरी गर्दी संबंधित मुद्दा आला आणि हाच मुद्दा महत्त्वाचा बनत गेला आणि त्यांनी भाषेच्या संदर्भात मांडलेला जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता तो पुन्हा एकदा राजकारणाच्या तावडीत सापडला आणि आता तो पुन्हा एकदा बारगळत जाईल असे दिसते. वास्तविक राजकारणामध्ये बीएमसी च्या निवडणुकीत फटका पडल्यानंतर निदान सावध होणे गरजेचे होते . तुमचा भाजप आणि शिंदेसेना यांना असलेला राजकीय विरोध मी समजू शकतो परंतु मुळात सर्वांना ही गोष्ट कळली पाहिजे की जे लोक भाजपाचे सुद्धा समर्थक आहेत ते मराठी भाषेच्या समर्थनासाठी प्रयत्न करतच असतात. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे संपूर्ण श्रेय हे त्या आंदोलकांचेच आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की खारीचा वाटा का होईना परंतु यशवंतराव चव्हाण यांचा सुद्धा यामध्ये वाटा आहे की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा नेहरू यांच्या मेंदूत व्यवस्थित उतरवला . अनेक लोक भाजपच्या राजकारणात असतात आणि तरीही त्यांचा मराठी भाषेला संपूर्ण पाठिंबा आहे अशा वेळेला त्यांची मदत घेणार आहे की नाही की तुमचे पक्षीय राजकारण भाषेमध्ये आणणार आहे ? हा मुद्दा सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण असा नाही तर सत्ताधारी भाषा कुठली आणि विरोधक भाषा कुठली असा आहे आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी भाषा असली पाहिजे असे स्पष्ट विधान आहे गरज आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या ते महत्त्वाचे आहे आता अशी सत्तेवर असलेली भाषा सत्ताधारी असणारे राजकीय लोक स्वीकारत नसतील तर मग त्यांना दोन्ही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावे लागणार आहे. काही विरोधक त्यांच्या पक्षांतर्गत विरोध करणार आहेत आणि काही पक्षाच्या बाहेरचे असणार .आंदोलन चालवणाऱ्या लोकांना याचे भान नाही की काय अशी शंका मला आता येते आहे. मुळातच या भाषेच्या संदर्भातील नेतृत्व ज्यांच्या हातात गेले त्यांनी कारण नसताना भाजप विरोधी हिंदुत्व विरोधी मुद्दे अधिक अधोरेखित करून हे आंदोलन जणू काय पुरोगामी लोकांनी चालवायचे राजकीय आंदोलन आहे अशा थाटात सादरीकरण सुरू केले .पण मी गप्प बसलो कारण संस्कृतीकारणांमध्ये ज्या माणसाच्या हातामध्ये नेतृत्व असते त्याचे नेतृत्व शक्यतो डागाळले जाऊ नये आणि आपण त्या विरोधात बोलणे बरे नव्हे. म्हणूनच आम्ही गप्प होतो पण नंतर जो निकाल लागायचा तो आमच्या दृष्टीने अपेक्षित होता असाच लागला मुद्दा ज्यांनी पोचवायचा होता त्यांनी तो पद्धतशीरपणे पोहोचवला नाही
आता सुद्धा मला माहिती आहे की आताही आत्मपरीक्षण केले जाणार नाही कारण अहंकार इतका आहे की तो बोलताना कळतो . वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा पहिले विधान केले तेव्हाच स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात मी निषेधही केला होता आणि मराठीची बाजू तर मी सातत्याने मांडतच आहे . त्यामुळे मीच नाही अनेक लोक आपला मराठी भाषेला असलेला आपला पाठिंबा आणि मुद्दा भाजपमध्ये सुद्धा मांडत असतात हिंदुत्ववादामध्ये मांडत असतात तुम्हाला त्यांचे लिखाण वाचायचे नाही कारण एकदा एखादा माणूस हिंदुत्ववादी माणूस असला की त्याच्या नादाला लागायचे नाही असे तुम्ही ठरवलेले आहे. त्यामुळे कोणी भागवत यांचे भाषण जरी ऐकायला गेले तर तुम्ही जणू काय त्यांनी घोर अपराध केला अशा थाटात फोटो टाकता आता भाषण ऐकणे सुद्धा गुलामगिरी आहे का ? विरोधकांचे भाषण अटेंड करायचे नसते का ? आणि समजा हे लोक हिंदुत्ववादी आहेत तर हिंदुत्ववादी असण्याचा हक्क तुम्ही मान्य करता की नाही ? कारण जर का ते हिंदुत्ववादी असतील तर मग हिंदुत्ववादी नेत्याचे भाषण ऐकायला ते गेले त्यात चुकीचे काय आहे ? जणू काय सगळा पुरोगामीवादाचा वारसा तुम्हालाच मिळालेला आहे आणि तुम्ही पोटातूनच येताना पुरोगामी वाद शिकून आलात आणि बाकीचे अजूनही हिंदुत्ववादाच्या बेंबीत अडकलेले आहेत अशी तुमची समजूत आहे.
खरे तर मी स्वतः याबाबतीत असे काही लिहिणार नव्हतो परंतु झाले असे की आंदोलन जर का बारगळत गेले तर ते कोणालाच परवडणारे नाही . काही झाले तरी हिंदी भाषेची सक्ती आपण चालवून घेता कामा नये आणि हे मी हिंदी फिल्म करत असून सुद्धा नेहमी म्हणत असतो हिंदी भाषिकांच्या पुढे माझे मुद्दे पोहोचवत असतो ज्यांना कोणाला या संदर्भात काही शंका असतील त्यांनी माझी या काळातली स्टेटस काढून बघावीत . फेसबुक वरचे माझे लिखाण बघावे . ते चालतच राहिले पाहिजे परंतु मला आता असे वाटायला लागले आहे की हे काहीतरी सामूहिकरीत्या पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या मिलापाचे असे ठिकाण बनत चालले आहे वास्तविक हा भाषिक विरोध पक्षाच्या अंगाने नव्हे तर धोरणाच्या अंगाने व्हायला हवा.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी सर्वच लोक समाजवादी होते आता तसे नाहीये आता बरेच जण विभागलेले आहेत आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठा मोर्चा निघाला ते ठाकरे बंधू हिंदुत्ववादी आहेत म्हणजेच इथे हिंदुत्ववादी विरोधात हिंदुत्ववादी असा संघर्ष निर्माण झालेला आहे . आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरवादी आहेत समाजवादी आहेत . आणि हे सगळे मिळून एक अत्यंत गुंतागुंतीचा विरोध तयार झालेला आहे . अशा वेळेला पक्ष राजकारणाने भाषेचे भाषाकारण राजकारणात मिक्स होऊ न देणेच उत्तम आहे . तेव्हा बघा विचार करून. शक्य आहे की मी चुकत असेन मीच मूर्ख असेन परंतु माझ्या या मुद्द्याचा विचार करायला हरकत नाही.
अर्थात त्यावर एक ऑब्जेक्शन येणारच की नाव का घेत नाही याचे साधे सरळ कारण मला लक्ष भाषेभोवती केंद्रित करायचे आहे. नाव आले की पुन्हा पक्ष आले आणि मग पुन्हा राजकारण आले मला ते नकोय. मराठी भाषेचा मुद्दा हा भाषाकारण म्हणून पुढे सरकावा हेच तर सांगायचे आहे.
अर्थात यावर काहीजण असे म्हणतील की संन्याशाला या सगळ्या भानगडीत पडण्याचे कारण काय ? तर मी इतकेच म्हणेन महावीर आणि बुद्ध या महान विभूतीनी ज्यासाठी प्राकृत भाषांचा आग्रह धरला त्याच गोष्टीसाठी मी मराठीचा आग्रह धरतो आहे. भारतीय मोक्षता ही फक्त आता इंग्लिश मधूनच व्यक्त व्हावी असे मला वाटत नाही मोक्षता ही काही फक्त अभिजन वर्गासाठी नाही ती बहुजन वर्गासाठी सुद्धा आहे इतके हे साधे सरळ आहे आणि महाराष्ट्रातील बहुजनांची भाषा ही मराठी आहे त्यामुळे मोक्षता सुद्धा मराठीतून व्यक्त झाली पाहिजे आणि मी मराठीतून ती भरपूर व्यक्त केली आहे आणि मराठी भाषा त्यासाठी सशक्त आहे बाकी लोकप्रियता वगैरे भानगडी मी नेहमीच साईडलाईन केलेत. आता उद्या जर का मराठी भाषिक लोकच म्हणाले की तू आमच्या भाषेत लिहू नकोस तर मात्र मला त्यांचे ऐकावे लागेल कदाचित उद्या तेही म्हटले जाऊ शकते पण असे काही झाले तर मी अतिशय शांतपणाने भाषेतून बाहेर पडेन .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment