शेती आणि व्यवहार
स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे २ शेतवस्तूचे व शेतकऱ्याचे स्टेटस श्रीधर तिळवे नाईक
जगात स्टेटस ठरवण्याच्या ज्या काही अटी आहेत त्यात एखादा मनुष्य जगण्यासाठी काय करतो आणि समाज जगवण्यासाठी काय करतो ह्या आहेत ह्यातही काय करतो ह्याचे टाईप असतात त्यातही स्तर असतात
शेतकरी पीक निर्माण करतो आणि त्यामुळेच समाज जगतो हे सर्वश्रुत आहे प्रश्न आहे शेतकरी पीक निर्माण करतो म्हणजे काय ?
निसर्गयुगात शेती ही फक्त स्वतःसाठी वा टोळीसाठी केली जाई आणि सारा भर पेरणीवर होता टिकली तर टिकली नाहीतर नाही टिकली भारतात ह्या काळात फक्त शैव धम्म होता शैवांच्या मते शंकर हाच पहिला शेतकरी आणि त्रिशूळ हा पहिला नांगर ! रडत बसलेल्या भक्ताला नीट शेती करता यावी म्हणून सुरवातीला शंकराने काठी दिली पण तिने काम भागेना म्हणून स्वतःचा त्रिशूळ नांगर म्हणून दिला आश्चर्याची गोष्ट अशी कि मूळ कथेत कोकणात व देशावर हा त्रिशूळ लाकडी होता कारण पार्वतीला तसा दृष्टांत झाला होता त्याउलट विदर्भ मराठवाड्याकडे कथा सारखी असली तरी नांगर धातूचा आहे पीक हे पार्वतीचे देणे आहे कारण ती सुजला सुफळा आहे तिच्या नऊ शक्तीतून ते निर्माण होते ह्यातील सात शक्ती सात मातृदेवता सात आसरा आहेत ज्यांची शेतकरी समाज पूजा करतो आसरा म्हणजे अप्सरा न्हवेत तर आश्रय देणाऱ्या आधार देणाऱ्या आसरा देणे म्हणजे आश्रय व आधार देणे साहजिकच शेतवस्तू प्रथम दैवी होत्या त्यांच्या आधारे स्त्रीराज्ये चालू होती हे मुद्दामच सांगतोय कारण जे शेतकऱ्याचा अपमान करतात ते शंकराचाही अपमान करतात हे हर हर महादेव म्हणणाऱ्यांनी लक्ष्यात घ्यावे
पुढे श्रध्दायुगात पेरणीबरोबर लावणीचा उदय झाला आता थोडे शिस्तीने काम सुरु झाले शेतवस्तू आणि श्रद्धा एकत्रच वावरले ह्या काळात वस्तुविनिमयाने व्यवहार चालत होता ह्या काळात शेतवस्तू ह्या हस्तवस्तू म्हणून वावरत होत्या म्हणजेच माणसाचा हात वस्तूत उतरायला लागला
पुढे धर्मयुगात लावणीचे रूपांतर लागवडीत झाले कल्टिव्हेशन परवली बनले शेतवस्तू ह्या शेतमाल झाल्या मल नाहीसा करून निर्मळ करून शेतवस्तू बाजारात आणल्या जाऊ लागल्या शेतीसाठी इतर टोळ्यांना जिंकून त्या टोळ्यांच्या सदस्यांना गुलाम वा दास बनवणे सुरु झाले त्यासाठी युद्धे लढली जाऊ लागली ज्याच्याकडे जेव्हढे गुलाम तेव्हढा तो श्रीमंत अशी धारणा रूढ झाली गुलांमांचा छळ सुरु झाला वाढला अनेक गुलाम ह्या वस्तू कलेक्टिव्हली तयार करू लागले घाणे तयार झाले गुलामगिरी व सर्फडम ह्यांच्या आधारे जमीनदारी व्यवस्था तयार झाली आणि जमीन ही मुख्य प्रॉपर्टी झाली माणूस हाही माल झाला त्याची खरेदी विक्री सुरु झाली धर्म दिवसा राबवून घ्यायचा आणि रात्री प्रवचनात दिलासा द्यायचा त्यामुळे गुलामांना आपल्या गुलामगिरीची जाणीवच व्हायची नाही एका अर्थाने धर्म अफूसारखा काम करायचा
मोक्षयुगाने धर्मयुगाला आव्हान दिले धर्माच्या आधारे दास निर्माण करण्याला विरोध केला पण मोक्षयुगात भक्ती शिरली तिने पुन्हा धार्मिक अफू जिवंत केली पुढेपुढे तर मोक्ष व समाज ह्यांची फारकत करून संन्यासव्यवस्था बळकट करण्यात आली जेणेकरून संन्याशाने सामाजिक अन्यायाविरुद्ध बोलू नये संन्याश्यांचे स्वतंत्र संघ निर्माण केले गेले जेणेकरून त्यांनी राज्यकर्त्यांच्यावर नैतिक दबाव निर्माण करू नये ह्या काळात नांगर नव्याने तयार झाले आणि लागवडीचे नवे तंत्र तयार झाले सुधारले पुढे इस्लामने उत्तरधर्मवादाची सुरवात करून धार्मिक गुलामगिरी पुन्हा रिस्टोर केली आणि ज्याच्याकडे जेव्हढे गुलाम तेव्हढा तो श्रीमंत अशी धारणा पुन्हा रूढ झाली गुलांमांचा छळ वाढला सरंजामशाही तयार झाली ह्या काळात शेतवस्तू ही माल न राहता उत्पादन बनली प्रॉडक्ट बनली आणि शेतकरी प्रोड्युसर बनला
ह्या चारी युगात शेतकऱ्याचा आब टिकून होता कारण शेतवस्तू निर्माण करणे हे सर्वाधिक आदराचे काम होते मात्र शेतमजूर कायमच गुलामांच्या व्यवस्थेत राहिला भविष्यातील भांडवलदार आणि कामगार ह्यांच्यासारखेच हे संबंध होते शेतकरी आणि शेतमजूर स्वामी आणि दास मालक आणि गुलाम उच्च आणि शूद्र ब्राम्हणक्षत्रिय आणि शूद्र !
विज्ञानयुगाने साकारलेल्या प्रबोधनात शेतकऱ्याचा हा आब फाटायला सुरवात झाली त्याने शेतकऱ्याचा कणा काढून घ्यायला सुरवात केली शेतीविज्ञानाने जीवविज्ञानाने वनस्पतिविज्ञानाने मुळातच वनस्पतींचे पावित्र्य काढून घेतले व त्यांना शास्त्रीय ज्ञानाच्या कक्षेत आणले निसर्गाला मशीन समजणारे हे युग होते साहजिकच निसर्ग हाच दुय्यम नागरिक बनला आणि त्याबरोबर शेतकरीही ! ह्यामागे देकार्तचे जमिनीला मन नसते रादर मनुष्याखेरीज इतर कुणालाच मन नसते हे तत्व होते आतापर्यंत शेतकरी जमिनीला मन असते असं मानायचा देकार्तने जमीन निर्जीव आहे असे सांगितले व पुढे मार्क्सने निसर्गाला जमिनीला मशीन म्हणायला सुरवात केली पारंपरिक ख्रिश्चन धर्मात सबस्टन्स व ऍक्सिडन्ट असे दोन भाग होते म्हणजे माणसाचे केस हा सबस्टन्स पण त्या केसाचा बदलणारा रंग हा अक्सिडन्ट ! बेकनने विचार व मनुष्य केंद्रस्थानी आणला देकार्तने विचार करण्याची क्षमता ही माणसाच्या मनात असते असे सांगून माणसाला निसर्गापासून वेगळे काढले त्यामुळे माईंड आणि बुद्धी हे माणसाचे वैभव ठरले हे वैभव जमीन व वनस्पती ह्यांच्याकडे नसल्याने निसर्ग माणसाचा विस्तारित अवयव झाला
रोमॅण्टिसिझमने बुद्धिप्रामाण्य नाकारून शेती व शेतकऱ्याला वैभव देण्याचा प्रयत्न केला खरा पण शेतीमागे जी जमीनदारी व्यवस्था होती ती अडथळा बनून वावरू लागली शेतवस्तू ही ह्या काळातच एक क्रयवस्तू म्हणून उदयाला यायला सुरवात झाली आणि इथूनच शेतकऱ्याचे स्टेट्स ढासळायला सुरवात झाली कारण तो जो शेतवस्तू पुरवत होता ती आता केवळ कच्चा माल होती अन्न नावाच्या पक्क्या मालाचे आणि हे अन्न आता हॉटेलात विकले जाणार होते विज्ञानयुगात प्रबोधनात उदयाला आलेली सर्वात मोठी इंडस्ट्री ही हॉटेल फूड इंडस्ट्री होती मांसाहार हाही तिचा एक भाग होता दूध मार्केटमध्ये उतरले गेले डेअऱ्या उभारल्या गेल्या मोक्ष काळातील खाणावळींचे व अतिथी देवो भवचे वैभव लयाला जाऊ लागले खाणारा पाहुणा न राहता गिऱ्हाईक कस्टमर बनू लागला
प्रतिसृष्टीय औद्योगिक युगात शेतकऱ्याचा आब पुरताच गेला तो केवळ कच्चा माल पुरवणारा कच्चा खेळाडू बनला ज्याचा पक्क्या मालाशी सम्बन्ध तुटत गेला शेतवस्तू अगदी दूधही महानंदा अमूल्य गोकुळ असं कम्पन्यांच्यामार्फत उचललं जाऊ लागलं आणि त्यांचा शिक्का पडून विकलं जाऊ लागलं शेती कंत्राटी पद्धतीने केली जाऊ लागली बैल गेले ट्रॅकटर आला आणि गिऱ्हाईक (कस्टमर) ग्राहक म्हणजे कन्झ्युमर बनले दुकानदार व गिऱ्हाईक ह्यांच्यात जो वैयक्तिक जिव्हाळा होता तो जाऊन हा जिव्हाळा कमर्शियल झाला व्यापारी नगदी पीकं घेतली जाऊ लागली शेतकरी ग्राहकांना दिसेनासा झाला त्यांना मॅकडोनाल्ड , ताज , कामत , आशीर्वाद , बेडेकर , कुबल , एमडीएच हल्दीराम अशी चेन दिसू लागली ताटातलं अन्न कुठल्या शेतकऱ्याकडून आलंय ह्यापेक्षा कुठल्या ब्रॅंडकडून आलंय हे महत्वाचं ठरू लागलं हीच अवस्था खाणमालकांची व खाणकामगारांची होती कार्सनां लागणारे धातू कुठल्या खाणीतून आलेत ह्यापेक्षा ते कुठल्या कम्पनीकडून आलेत व कार कुठल्या ब्रॅण्डची आहे हे महत्वाचे झाले आज कच्चा माल पुरवणारे सर्वच अदृश्य स्थितीत गेलेत आणि त्यामुळेच हे लोक लोकशाहीला दिसत नाहीत नेत्यांना दिसत नाहीत अगदी शेती करणाऱ्या किंवा शेतकरीपुत्र असलेल्या नेत्यांनाही दिसत नाहीत शेतं ही अनेक शहरी लोकांच्या दृष्टीने आता फार्म हाउसेस झाली आहेत फार्म हाऊसेसमध्ये जाऊन निसर्ग हाही एखाद्या वस्तुप्रमाणे भोगायचा ही वृत्ती बोकाळली आहे ह्यांना शेतावर जाऊन पार्ट्या करायच्या असतात शेतकऱ्यांविषयी आस्था शून्य असते
शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या स्टेटसचं क्रमशः होत गेलेलं अधःपतन आणि मग लग्नासारख्या सभारंभात उत्सवी आभासी काल्पनिक स्टेटस कमवून स्वतःचं खाली गेलेलं स्टेटस पुन्हा रिस्टोर करण्याची मूर्ख आकांक्षा ह्यांच्यामुळे शेतकऱ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत शेतमजूर परवडत नाहीत म्हणून स्वतःची लोकसंख्या वाढवणे हाही असाच एक मूर्ख उपाय त्यामुळे अंतिमतः शेतकरी नाही तर शेतमजूर निर्माण होतो ह्याचीही जाणीव नाही वस्तुस्थिती अशी आहे कि आज शेतकरी अस्तित्वातच नाहीत. अस्तित्वात आहेत ते फार्म ओव्हनर्स किंवा शेतमजूर ! ह्यातील काही शेतमजुरांची जमीन त्यांची स्वतःची आहे एव्हढंच ! बाकी प्राप्ती शेतमजुराएव्हढीच ! त्यामुळे अंतिमतः शेतकरी मागतो काय तर पूर्वीचे वैभवी स्टेटस त्या स्टेटसमुळे प्राप्त होणारी इज्जत आणि किमान आवश्यक असे शेतमजुरीचे वेतन ज्याला शेतवस्तूचे भाव असे गोंडस नाव दिले गेले आहे प्रत्यक्षात मालकी आहे पण मालकी हक्काचे फिलिंग नाही ही शेतकऱ्याची मानसिक स्थिती आहे ही परात्मता ( मी ह्याला ऍग्रिकल्चरल एलिनेशन म्हणतो )टोकाची वाढत गेली आणि हतबलता हताश होत अंतःकरणात दम तोडायला लागली कि शेतकरी आत्महत्या करतो
श्रीधर तिळवे नाईक
स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे ३ शेतकऱ्याचा अविश्वास आणि मोदी श्रीधर तिळवे नाईक
शेतकऱ्याची परात्मता ही केवळ आत्मिक नाही तर राजकीयही आहे त्याला कुठलेच सरकार शासन व प्रशासन आपले वाटत नाहीये कारण ह्या तिन्ही गोष्टींनी त्याने टाकलेल्या विश्वासाचे लचके तोडलेले आहेत आताची १० टक्के सुरक्षितता ही भविष्यातील अस्तित्वात नसलेल्या १०० टक्के सुरक्षिततेपेक्षा त्याला अधिक महत्वाची वाटते त्याला वाटते कि हे शहरी बाशिंदे कायमच वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी धरणासारख्या प्रकल्पासाठी माझी जमीन हिसकावतात आणि जमीन एकदा का हाती लागली कि वाऱ्यावर सोडून देतात अशावेळी सरकारने प्रथम स्वतःविषयी विश्वासार्हता निर्माण करायला हवी होती पण मोदींनी हे केलेलं नाही उलट आंदोलनजीवी खलिस्तानी सारखे स्टॅम्प मारून संशयच वाढवला आहे मुळात सरकारचा हेतू खरोखरच चांगला आहे ह्याच्या खाणाखुणा निर्माण झालेल्या नाहीत मोदींच्याविषयी एक सार्वत्रिक संशय निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झालेत मोदींना ह्या बदललेल्या वातावरणाची जाणीव नाही मी मागच्या दोन्ही लोकसभात मोदी निवडून येतील असे सांगितले होते पण तिसऱ्या लोकसभेबाबत असे वातावरण नाही जर असाच माहोल राहिला तर मोदी पुढची निवडणूक हरतील असा माझा अंदाज आहे शिवाय पक्षांतर्गत बंडाळी माजण्याचीही शक्यता आहे विशेषतः नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाभिलाषी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली हे घडण्याची शक्यता आहे
मोदींनी १८ महिन्यासाठी स्थगिती देण्याची व चर्चेची तयारी दर्शवली होती तेव्हा व नंतर सर्वोच्च न्यायालयाने पॅनेल निर्माण करून स्थगिती आणली होती त्यावेळी अशा दोन्ही वेळी हे आंदोलन तात्पुरता विश्राम घेऊन स्थगित करता आले असते (मी बंद म्हणत नाहीये हे लक्ष्यात घ्यावे ) पण हे घडले नाही त्याचे कारण मी वर उल्लेख केलेला सरकारविषयीचा अविश्वास ! आपली बहुजनांची सरकारला दुरुस्त करण्याची व ताळ्यावर आणण्याची ताकद कुठेतरी अंडरएस्टिमेट केली गेली भारतात दत्ता सामंतांचे आंदोलन व हे आंदोलन ह्यांची जी तुलना झाली त्याचे कारण शेतकरी नेत्यांचा ह्यावेळचा आडमुठेपणा ! सर्वोच्च पॅनेलवर अर्धे आमचे अर्धे तुमचे अशी मागणी करता आली असती आणि सरकार मानेपर्यंत रेटता आली असती पण हे घडले नाही कुठल्याही आंदोलनात समाजवादी, साम्यवादी आणि नवबौद्धवादी रोमँटिक क्रांतिकारक फिलिंग निर्माण करत असतात त्यांना जनतेचा निवडणुकीत पाठिंबा नसला तरी ! ह्या आंदोलनातही हे फिलिंग ह्या लोकांनी आणले आहे पण त्या फिलिंगचा आदर ठेऊन त्याच्यावर रियॅलिटी चेक ठेवण्याची जबाबदारी शेतकरी नेत्यांच्यावर विशेषतः फुलेआंबेडकरवादी बहुजनवादी नेत्यांच्यावर आहे माझा अंदाज चुकला नाही तर मोदी पुन्हा वाटाघाटीची संधी निर्माण करतील कारण त्यांचाही मतदार ह्या आंदोलनात त्यांच्याविरुद्ध गेला आहे हे कळण्याइतपत त्यांच्याकडे इन्साइट आहेच आणि ही त्यांच्याकडे नसेल तर मोदी पुढची निवडणूक हरल्यात जमा आहे .
भाजपमधील अनेक मध्यमवर्गीयांनी शेतकऱ्याला उद्योगपती ठरवून त्याच्या उत्पादनाचे उत्तरदायित्व त्याने घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे इतर उत्पादक असे करत असतील तर शेतकऱ्याने असे करायला काय हरकत आहे असा प्रश्न आहे इथे शेतकऱ्याचे स्टेट्स उत्पादकाचे आहे असे गृहीत धरले आहे ज्यात तथ्य आहे पण उत्पादक आपले उत्पादन व्यापाऱ्याकडे देई कार्पोरेट हाऊसकडे नाही ह्याचा विसर पडला आहे मोदींना शेतकरी उत्पादक म्हणून नको आहे उत्पादकशाही मग ती भांडवलवादी असो वा समाजवादी भांडवलदारांचे वा समाजवादातील भांडवल अधिकाऱ्याचे व्यापाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी काही तरी संबंध असत कार्पोरेटशाहीत कार्पोरेटला वैयक्तिक चेहरा नाही अनेकदा तर कायदेशीर जबाबदाऱ्या नाहीत मोदींना बिग हाऊस इकॉनॉमी उभी करायची आहे आणि बिग हाऊस इकॉनॉमी ही दहा ते वीस कार्पोरेट हाऊसेसपूरती मर्यादित असते मोदींच्याकडे किती कार्पोरेट हाउसेस आहेत ? आणि ते त्यांना कसे वागवणार आहेत ?अलीकडेच रामदेव बाबांनी जरा विरोधी आवाज उठवला तर मोदींनी त्यांचे नाव घेणे बंद केले हिटलरचा जसा समाजवाद होता स्टॅलिनचा जसा साम्यवाद होता तसा मोदींचा हा कार्पोरेटवाद नसेल हे कशावरून ? आर्यन ब्राह्मण्य आर्थिक सत्तानियंत्रणाच्या मागे आहे एकदा अन्नच स्वतःच्या नियंत्रणात आणले कि जनतेला हवा तसा डान्स करायला लावता येतो हे आपण इंग्रजांच्या राजवटीत अनेकदा पाहिले आहे जे अन्न भारतीयांनी पिकवले होते आणि ज्याच्यावर प्रथम भारतीयांचा हक्क होता ते अन्न ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात भारतीयांना उपाशी ठेऊन इंग्लंडवासीयांना दिले आहे अन्नाचा हक्क हा कधीही परक्यांच्या ताब्यात द्यायचा नसतो कार्पोरेट हाऊस इकॉनॉमीमध्ये हा अन्नाचा हक्क ब्रिटिशांच्याप्रमाणे मोजक्या हातात एकवटला जातो आणि उद्या समजा चायनाने पद्धतशीर राजकारण खेळून शेयर्सच्यामार्फत ह्या कम्पन्या बळकावल्या आणि भारतीय अन्नच आपल्या ताब्यात घेतले आणि युद्ध पुकारले तर --? चायना हे करू शकतो मोदींना हे दिसत नाहीये मी शेतीबाबत कट्टर देशी आहे तर औद्योगिक बाबतीत मार्गी त्याचे कारण अशा शक्यता ! शेतवस्तू ह्या कायमच जीवनावश्यक ह्या कॅटेगरीत आल्या पाहिजेत आणि आवश्यक असेल तर शेतकऱ्याला वाटेल त्या सबसिड्या द्यायला हव्यात सबसिडीमुक्त शेती हे अजून तीस वर्षे तरी दिवास्वप्न आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment