युनिट , एकता ,मोहन भागवत आणि हिंदुत्वाचा कणा श्रीधर तिळवे नाईक
मोहन भागवतांनी अलीकडे पुन्हा एकदा भाषेच्या अंगाने काही विधाने केली आणि ताबडतोब त्या अंगाने प्रतिक्रिया यायला लागल्या. या सगळ्याच्या मध्यभागी एकच गोष्ट आहे ती म्हणजे युनिट ही संकल्पना !
हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर थोडे इतिहासात जावे लागते .
राष्ट्रवाद नेहमी एकतेचे युनिट कोणते या प्रश्नाच्या अंगाने जात असतो.
मी हे खूपदा सांगितले आहे की शैव श्रुतीमध्ये भगवान शंकर यांनी काम अर्थ आणि मोक्ष हे तीन अक्ष सांगितलेले आहेत. आणि या तिन्ही पक्षांची व्याप्तीच्या पातळीवर तीन युनिटस आहेत त्यातील तिसरा अक्ष म्हणजे तिसरा डोळा मोक्ष होय आणि ती उघडण्याची ताकद फक्त शिव या तत्त्वात असते किंबहुना शिवाकडे जाण्यासाठी जो डोळा उघडला जातो तो तिसरा डोळा होईल. आणि आपण सर्वजण या तिसऱ्या डोळ्यातून आलेलो आहोत आणि त्यामुळेच जेव्हा व्याप्तीचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा शिवाबाबत हा प्रश्न अनंत होत जातो आणि शक्ती अनंत असते. शिव शून्य असते आणि शक्ती अनंत असते आणि या दोन्ही व्याप्ती अनेकदा आकलनाच्या बाहेर जातात म्हणजेच शून्य आणि अनंत ही दोन युनिट्स मोक्ष या पक्षाच्या संदर्भामध्ये ॲक्टिव्ह होतात असतात.
मात्र मोक्ष मिळाल्यानंतर तुम्ही या दोन्ही युनिट्सना उपलब्ध होता खरे तर त्यांना व्याप्ती सुद्धा म्हणू नये त्यांना काय म्हणावे हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण त्याला शब्दच नाही मी तात्पुरते व्याप्ती आणि युनिट हे दोन शब्द वापरत आहे .
प्रत्यक्षात या जगामध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमचा पहिला संबंध हा कुटुंब आणि घराणे या युनिटशी असतो काम या अक्ष्याशी येतो याचे कारण तुम्ही शेवटी आई-वडिलांच्या स्त्री-पुरुष कामसंबंधातून जन्मता आणि यामुळेच तुमचे बरेचसे नातेवाईक हे एका अर्थाने काम संबंध असतात यावर मी खूप वर्षांपूर्वी सौष्ठवच्या एका अंकात लिहिले होते हा अंक इंटरनेटवर उपलब्ध आहे . त्यावेळी त्यावर फार तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या कारण आपल्याकडे या गोष्टींच्यावर बोलणे सुद्धा अनेकांना प्रॉब्लेमॅटिक वाटते. ( सौष्ठवला त्यामुळे बाहेर पडावे लागले होते) पण वस्तुस्थिती अशीच आहे की आपल्या सर्व कौटुंबिक संबंधांच्या मुळाशी काम हाच असतो आणि ही गोष्ट भगवान शंकर यांनी सहजरित्या स्वीकारली होती त्यांचे स्वतःचेही कुटुंब होते ज्यात पार्वती गणपती आणि कुमार स्कंद येतात. भारतामध्ये त्यामुळेच सर्वात महत्त्वाचे युनिट हेच आहे कारण बहुतेक भारतीय हे भगवान शंकर यांचे याबाबतीत अनुकरण करत असतात . आजही अनेकांना आपल्या दोन अपत्यांच्या पैकी एक गणपती सारखे ज्ञानी आणि दुसरे कुमार स्कंदसारखे अत्यंत निष्णात कर्म प्रवीण योद्धा व्हावे असे वाटत असते .
दुसरे युनिट मात्र अर्थ या अक्षसंदर्भामध्ये अस्तित्वात येते माणसाचे जग म्हणजे तो ज्या व्याप्तीत जगतो ती व्याप्ती होय. सध्या तरी आपली व्याप्ती पृथ्वी हीच आहे ती कधी ना कधीतरी वाढत जाणे अटळ आहे परंतु ती वाढलेली नाही.
आणि खरा सगळा प्रॉब्लेम या युनिटमध्येच सुरू होतो या जगाबाबत होतो कारण काम संबंधांची व्याप्ती आपल्या कुटुंबाने आणि आपल्या घराण्याने घेतलेल्या ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि त्यावर बांधलेली घरे किंवा ऑफिसेस किंवा तत्सम गोष्टी असे आपण सहज म्हणू शकतो परंतु जेव्हा आपण अर्थ या अक्षाकडे येतो तेव्हा मात्र गोष्टी बदलत जातात. (अक्ष हा शब्द मी एका अर्थाने असे समजा की axis म्हणून वापरत आहे अर्थात त्यापेक्षा तो अधिक व्यापक आहे परंतु सध्या असे समजा. ) तर ज्याप्रमाणे काम संबंधाच्या अंगाने काम निश्चिती करून आपण आरामात काम व्याप्ती निश्चित करू शकतो कारण इथे आपल्या प्रॉपर्टीचा प्रश्न येतो आणि ही प्रॉपरटी प्रॉपरली डिफाइन करावी लागते . साहजिकच सामाजिक आणि गणित पातळीवर ती निश्चित होत जाते अर्थात तिथेही जमिनीची आणि घराचे वाद-विवाद असतातच . पण ते शेवटी अर्थ एकतेच्या अंतर्गत येतात . त्यामुळे कायदा नावाची गोष्ट शेवटी तयार करता येते परंतु आपल्या कायद्यांच्या बाहेर असलेल्या इतर लोकांच्या अर्थ या संदर्भातील युनिटचे काय? आपल्यावर आक्रमण होऊ शकते आणि आपल्याला संरक्षण करावे लागते त्यामुळे अशा प्रकारची युनिट बनवावे लागते आणि खरा प्रश्न इथेच आहे. मोहन भागवत यांचे जे विधान आहे ते सर्वसाधारणपणे या युनिट शी अर्थ या अक्ष्याशी संबंधित आहे . गेली हजारो वर्षे याबाबतीत वाद सुरू आहे सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे युनिट टोळी होते . टोळीने जंगलाची व्यापलेली व्याप्ती या युनिटच्या अंगाने स्थिर होती परंतु नंतर टोळ्या एकत्र येऊन गण तयार होऊ लागले आणि गणांच्या मधून गणराज्य अस्तित्वात आले. भगवान शंकर यांनी त्यांच्या काळात असलेल्या सर्व टोळ्यांना ज्या साधारणपणे पशुपालनच करत होत्या अपवादात्मक व्यापार करत होत्या त्यांना गणामध्ये रूपांतरित केले आणि हे सर्व गण त्यांच्याभोवती अत्यंत निष्ठावान म्हणून गोळा झालेल्या दिसतात . त्यांनी मोक्ष आणला आणि या मोक्षातील शिस्त सर्व गणांना स्वीकारायला लावली आणि त्यांना अनुशासन दिले . त्या अंगाने भारतातले अनेक गण व्यवस्थित तयार केले आणि संपूर्ण संस्कृतीला एक व्यवस्था जिला आज आपण गणव्यवस्था म्हणतो देण्यात आली .
या गणाचे रूपांतर पुढे जेव्हा गण एकत्र यायला लागले एकमेकावर आक्रमण करायला लागले आणि त्यातून महागण तयार व्हायला लागले तेव्हा गणाच्या व्याप्तीचे रूपांतर राज्य या व्याप्तीत झाले आणि शिस्तीच्या (थोडे श्रमान संस्कृती त्या शिस्तीचा धम्म झाला म्हणून धम्माच्या) महा श्रद्धेच्या, धर्माच्या कालखंडामध्ये राज्य ही संस्था पूर्णपणे प्रस्थापित करण्यात आली. राज्य चालवण्यासाठी चार गोष्टी होत्या. एक तर श्रद्धा होती किंवा धम्म होता किंवा धर्म होता किंवा मग या दरम्यान असलेली एक महाश्रद्धा ज्यांना आपण रिलिजन म्हणतो आणि जी मोक्षावर विश्वास ठेवत नाही ती होती.
सुरुवातीच्या काळामध्ये पाश्चात्त्य देशांमध्ये जी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली तिचा आधार श्रद्धाच होता परंतु ही श्रद्धा महा श्रद्धा बनली कारण अनेक श्रद्धा एकत्र करत आणि अनेक श्रद्धा नष्ट करत ही महा श्रद्धा आकाराला आली आणि पाश्चात देशांमध्ये महाश्रद्धेच्या आधारे रिलीजनच्या आधारे रिलीजियस स्टेट निर्माण झाले. जवळजवळ संपूर्ण मध्ययुगाचा कालखंड या महाश्रद्धेय राज्याच्या आधारे गेला . भारतात मात्र गोष्टी खूप वेगळ्या घडल्या भारतात श्रद्धे कडून आपण धर्माकडे गेलो नाही आपण प्रथम मोक्षाकडे गेलो आणि याला कारण भगवान शंकर यांचे भारतामध्ये झालेले आगमन. भगवान शंकर यांनी मोक्ष दिला तंत्र दिले शिस्त म्हणजेच शासन दिले आणि साहजिकच आपली गणराज्याची वाटचाल ही शिस्तकेंद्री अनुशासन केंद्री मोक्षिक बनली . अर्थात या शिस्तीला नकार देणारे लोक होते परंतु ते फारसे टिकले नाहीत किंबहुना ज्यांनी ज्यांनी नकार दिला ते ते पराभूत होत गेले .
त्यामुळे जेव्हा इसवीसन पूर्व पंधराशे च्या आसपास युरेशियन लोक जेव्हा घोडे घेऊन आले (माणसाने घोडे नेमके कधी पाळायला सुरुवात केली याबद्दल मतभेद आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे युरेशियन लोकांच्या आगमनाचा कालखंड या घोड्यांशी जोडला गेलेला आहे . त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोडे आढळत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे युरेशियन लोक नंतर आलेले आहेत . ते येताना घोडे घेऊन आले हेही स्पष्ट दिसते. रामायण आणि महाभारतामध्ये घोडे आलेले आहेत मात्र प्रामुख्याने ते रथात बसलेले दिसतात आणि त्यावरूनच महारथी अतिरती वगैरे प्रकार पण दिसतात. घोड्यावर बसण्याची विद्या या काळात अवगत नसावी नंतरच्या रामायण महाभारतामध्ये ती टाकण्यात आली पण मुख्य योद्धे तरीही रथामध्ये बसूनच युद्ध करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की घोड्यावर बसण्याची जी विद्या आहे ती सुरू होण्याच्या आधीच युरेशियन लोक भारतात आले होते . पायदळ आणि रथ दळ याच्या आधारेच हा सामना झालेला आहे आणि घोड्यावर बसून पहिल्यांदा जो आला तो बहुदा पर्शियन आक्रमक असावा किंवा मग अलेक्झांडर असावा अलेक्झांडर ची सर्वात मोठी गोची ही भारतामध्ये त्याच्यापुढे ठाकलेल्या हत्ती दळामुळे झालेली आहे . कारण घोडे हत्तींना पाहून बिथरतात . अलेक्झांडरला जी माघार घ्यावी लागली त्याचे एक मोठे कारण मगध साम्राज्यामध्ये आणि त्यांच्या सैन्यामध्ये असलेले हत्तींचे प्रचंड मोठे प्रमाण.
याचा अर्थ स्पष्ट आहे घोडे आल्यानंतरच रामायण आणि महाभारत या महाकाव्यांच्या रचना झालेल्या आहेत आणि हे घोडे बाहेरून आणले गेले भारतात घोडे होते याला अजून तरी ठोस पुरावे मिळालेले नाहीत. उलट भारतामध्ये गाढव हेच सर्वाधिक प्रचलित होते आणि दुसरा प्राणी अर्थातच हत्ती होता. हत्ती आणि गाढव यांच्या साह्याने आणि मुख्य म्हणजे नद्या भरपूर असल्याने नावांच्या साहाय्याने अनेक प्रकारची वाहतूक पार पाडली जात होती त्यामुळे विनाकारण जो कालखंड ताणवत मागे नेण्याचे प्रकार चाललेले आहेत ते सर्व प्रकार अनिष्ट आहेत . ते भविष्यात पुराव्यांच्या आधारावर टिकणार नाहीत शेवटी किती काळ तुम्ही खोट्या इतिहासाचा प्रचार करत राहणार ? त्यापेक्षा तुमची मांडणी अशीच हवी की ओके आम्ही कधी आलो ते महत्त्वाचे नाही आत्ता आम्ही इथले झालेलो आहोत आणि आमच्या किमान १०० पिढ्या इथल्याच होत्या . याबाबतीत काही अतिरेकी शैव लोकांनी त्यांना बाहेरचे वगैरे जे म्हणतात ते थांबवावे कारण जे बाहेरून आले ते कधीच गेले नाहीसे झाले मृत्यू पावले आता जे जिवंत आहेत त्यांच्या किमान १०० पिढ्या या भारतात जगल्या आहेत तेव्हा उगाच तुम्ही बाहेर जावा तुमच्या युरेशियामध्ये जावा वगैरे वगैरे भाषा वापरू नका कारण या भाषेमुळेच मग रिएक्शन म्हणून सिंधू संस्कृती ही कशी वैदिक संस्कृती होती वगैरे प्रतिक्रिया येतात तेव्हा मूलनिवासी वाद किती ताणवायचा याचा विचार आपण पण करायला पाहिजे . युरेशियन आणि इथले सर्व स्थानिक शैव यांनी मिळूनच आता भारतीय संस्कृती पुढे न्यायची आहे हे दोन्ही बाजूने नीट स्वीकारले जाणे आवश्यक आहे नाहीतर आपापसात लढूनच मरू )
या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की युरेशियन लोकांना सुद्धा हा मोक्ष नंतर त्यांच्या श्रद्धेत समाविष्ट करावा लागला . आणि त्यातूनच पुढे वैदिक धर्म निर्माण झाला वैदिकते बाबत दोन कालखंड दिसतात पहिला कालखंड वैदिक श्रद्धेचा आहे जो ऋग्वेदामध्ये आहे ज्यामध्ये मोक्ष नाही आणि दुसरा कालखंड वैदिक धर्माचा आहे ज्यामध्ये मोक्षाचा स्वीकार केला गेला आहे . या वैदिक धर्माचा आधार प्रामुख्याने सांख्य धर्म ,ब्रह्म धर्म हे दोन धर्म आहेत किंवा दोन दर्शने आहेत . यांचा समावेश तुम्हाला महाभारतामध्ये केलेला दिसेल आणि म्हणूनच वैष्णव लोक नेहमी स्वतःची स्मृती म्हणून महाभारताचा उल्लेख करतात आणि गीता हा मुख्य वैष्णव ग्रंथ मानतात . गीतेमध्ये ब्रह्मदर्शन आणि सांख्य दर्शन यांचा अतिशय व्यवस्थित मिलाफ केलेला आहे . गीतेचे मूळ नाव गीतोपनिषद असेच होते आणि आहे. याला अलीकडे गीता धर्म असे सुद्धा म्हटले जाते याचे कारण गीता धर्मामध्ये कृष्ण केंद्रस्थानी येतो विष्णू नाही.
त्याचबरोबर भारतामध्ये तोपर्यंत मोक्षामधून उदयाला आलेला धर्म जो इराण पर्यंत पोहोचला होता तो सुद्धा त्यांना स्वीकारावा लागला महाश्रद्धा आणि धर्म रिलिजन आणि धर्म यांच्यामध्ये एकच फरक असतो तो म्हणजे रीलिजन मध्ये मोक्षाचा स्वीकार केलेला असत नाही किंबहुना रीलिजन ला मोक्ष माहीत नाही त्याउलट धम्म आणि त्यावरून निर्माण झालेला धर्म मात्र मोक्ष सुद्धा स्वीकारतो इतकेच नव्हे तर मोक्षाला तो अंतिम मानतो इथेच भारतीय परंपरा आणि युरोपियन परंपरा वेगळ्या होत जातात . युरोपमध्ये मोक्षाची शक्यता कदाचित निर्माण झाली असती परंतु तिथे जे युरेशियन रोमन लोक गेले त्यांनी ती नष्ट करून टाकली आणि पुढे कॅथोलिक रिलिजन निर्माण केला ज्यामध्ये मोक्षाला वाव नव्हता.
मोक्षासाठी यमनियम फार महत्त्वाचे असतात आणि ते प्रत्येक साधकाला पाळावे लागतात साहजिकच हे यमनियम संपूर्ण जगभर नंतर पसरत गेलेले दिसतात.
साहजिकच भारतीय राष्ट्रवादाचा विचार सुरू झाला तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार अटळ बनला. या काळामध्ये युरेशियन लोकांच्या डोक्यात ब्रिटिश लोकांनी एक आर्य आक्रमण नावाचे पिल्लू सोडून दिले आणि ते इतके मोठे झाले की हे युरोइंडियन लोक स्वतःला बाहेरून आलेले समजायला लागले आणि श्रेष्ठ ही मानायला लागले म्हणजे इंग्रज बाहेरून आले आणि त्यांनी राज्य केले त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा बाहेरून आलो आणि इथल्या अडाणी लोकांच्यावर राज्य केले इतकेच नव्हे तर इथले सर्व लोक आम्ही येण्याआधी रानटी होते वगैरे वगैरे गोष्टी (इंग्रज सुद्धा भारतीय लोकांना रानटी समजत होते )सर्वात प्रथम ब्राह्मण लोकांनी इंग्रजांच्या नादाला लागून सुरू केल्या . आज म्हणूनच ब्राह्मणांच्या बद्दल इतका रोष आहे . जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा तुम्ही एक सोयीस्कर भूमिका घेतली आणि ब्रिटिश गेल्यानंतर आता मात्र तुम्ही आम्ही इथलेच आहोत वगैरे वगैरे सांगायला लागतात तेव्हा तुमच्यावर विश्वास राहत नाही . जरा विश्वास तुम्हाला खरोखर प्राप्त करायचा असेल तर सर्वात प्रथम हे स्वीकारा की आम्ही घोडे घेऊन आलो. मुख्य म्हणजे मुळात युरेशियन लोकांनी आक्रमण केलेच नव्हते ते इथे आश्रयाला आले होते. आणि इथल्या शैव राजवटींनी त्यांना आश्रय दिला इतकेच नव्हे तर त्यांच्या यज्ञ संस्थेला सुद्धा जागा दिल्या . हे संख्येनेच मुळात इतके लहान होते की यांनी आक्रमण केले वगैरे भाकड कथा आता थांबवल्या तर बरे होईल. भारतावर आक्रमण करत प्रचंड मोठ्या संख्येने आलेले लोक हे पर्शियन आणि ग्रीक आणि नंतर हूण आणि शक हे होते . त्यांनी कधी कधी आपल्यावर विजय मिळवला ही वस्तुस्थिती अर्थात आपण अनेकदा त्यांना हाकलून लावले ही ही वस्तुस्थिती . मात्र जे आले त्यातील बहुतांशी लोकांनी शैव धर्म स्वीकारला
आणि मग शेव धर्म स्वीकारल्यानंतर काही लोकांनी अपवादात्मक वेळेला बौद्ध धर्म स्वीकारला उदाहरणार्थ कनिष्क काही इथल्याच लोकांनी पण बौद्ध धर्म स्वीकारला उदाहरणार्थ अशोक पण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर माहित नाही का पण या राजवटी लगेच कोसळलेल्या दिसतात . काहींनी उदारपणाने बौद्ध धर्म हा शैव धर्माचा भाग आहे असे समजून त्याला आपल्या दरबारात आश्रय दिला . उदाहरणार्थ हर्षवर्धन हा शैव होता शैव धर्म पाळणारा होता परंतु त्याने आपल्या दरबारामध्ये शैव पंडित ब्रम्हणांच्या इतक्याच प्रमाणात बौद्ध पंडितांना ही आश्रय दिला. अगदी वाकाटक यांनी सुद्धा हेच केलेले दिसते. याचे कारण आत्ता जी दरी दिसते ती त्या काळात नव्हती. शैव लोकांच्या दृष्टीने गौतम हा एक सिद्ध असल्याने त्याचा स्वीकार ते सहज करत होते परंतु दुर्दैवाने अलीकडे नव बौद्ध लोकांनी गोष्ट जरा जास्त ताणायला सुरुवात केली आणि उलटा क्रम म्हणजेच बौद्ध धर्मातून शैव धर्म निर्माण झाला वगैरे वगैरे मांडणी सुरू केली आणि मग ओबीसी आणि नव बौद्ध यांच्यात दरी पडली. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हल्ली नव बौद्ध भक्ती हा बौद्ध धम्माचा भागच नाही ही बेसिक गोष्ट विसरलेले दिसतात. ही एक ज्ञान केंद्र मांडणी आहे आणि तिथे मोक्षाचे साधन ज्ञानतंत्र आहे . शैव लोक याकडे आणखी एक ज्ञान तंत्र म्हणून बघत होते आणि आताही बघत आहेत. उलट हा जो उद्योग चालला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडणीच्या पूर्णपणे विरोधात आहे . आंबेडकर संपूर्ण समाज ज्ञानाच्या दिशेने वळवायला बघत होते जे पुरोगामी वादाला साजेसे आहे कारण पुरोगामी वादाच्या केंद्रस्थानीच ज्ञान आहे. तुम्ही जर का भक्ती क्लेम करत बसला तर एक दिवस असा येईल की आत्ताचा नव यान धम्मसुद्धा भक्ती तंत्राने चालायला लागेल . आणि मग हे सगळे पाप तुमच्या नावाने फुटेल एवढे लक्षात ठेवा .
प्रश्न असा आहे की ही सगळी गुंतागुंत मोहन भागवत यांना कळते का की ते एका विशिष्ट ब्राह्मणी पठडीतूनच इतिहास पाहात आहेत राष्ट्रवाद पाहत आहेत ?
मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही धर्मराज्य उभे करणार आहात की मोक्ष राज्य उभे करणार आहात? जर तुम्ही धर्माच्या अंगाने गेलात तर कशावरून तुम्ही ब्राह्मण धर्माच्या स्मृती पुन्हा घेऊन येणार नाही ? आज पुरोगामी लोकांना जी भीती वाटत आहे ती हीच आहे याचे कारण असे की तुम्ही नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून उत्तरपेशवाई मध्ये धर्मराज्य घेऊन आलात आणि त्याचे स्वरूप किती वर्ण जातनिष्ठ होते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत . औरंगजेब आणि पेशवाई चा उत्तर कालखंड जिला मी उत्तर पेशवाई म्हणतो या दोघांच्याही धार्मिक राजवटीमध्ये फार फरक नाही . फक्त एक धर्मांतराला आतुर आहे आणि दुसरा धर्मांतर करून दुसऱ्या लोकांना आपल्या धर्मात घ्यायलाच तयार नाही . आज सुद्धा कळत नकळत तुम्हाला मुस्लिम लोकांना धर्मांतर करून सामील करून घ्यायचेच नाहीये अन्यथा घरवापसी आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तुम्ही चालवले असते तुमच्या तुलनेमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये घर वापसीच्या नावाने इस्लाम वापसी झाली सगळेच्या सगळे हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कालखंडातच पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये मुस्लिम झाले ते थांबवण्यासाठी तुम्ही काय केले तुम्ही का धर्म सैनिक तिथल्या हिंदू लोकांच्या मदतीसाठी पाठवले नाहीत ? आणि आत्ता सुद्धा बांगलादेशमध्ये तुम्ही हे का करत नाही ? स्थिती अशी आहे की तुमची ब्राह्मणी मानसिकता आज सुद्धा जात नाही म्हणजे आम्ही फक्त लढा म्हणतो आणि तुम्ही लढा आम्ही काय धर्मासाठी धारातीर्थी पडायला तयार नाही. ज्या पद्धतीने ख्रिश्चन लोकांनी मिशनरी मोहीम चालवल्या तशा मोहीम तुम्ही पाकिस्तान बांगलादेशमध्ये आणि भारतामध्ये का चालवत नाही ? त्यांच्याप्रमाणे का शाळा आणि हॉस्पिटल्स प्रचंड मोठ्या प्रमाणात उघडत नाही आहात? का तुम्हाला अजूनही संस्कृत संपूर्ण भारताला देता आली नाही ? एवढी मोठी संघटना 2014 पासून आता तुमचेच लोक सत्तेवर आहेत परंतु तुम्हाला साधी संस्कृत सुद्धा सगळ्या भारताला शिकवता आली नाही मग तुमच्याकडे असलेली ताकद काय कामाची ? मुळातच दिसते ते असे की तुम्हाला संस्कृत अजून सुद्धा ब्राह्मण नसलेल्यांना द्यायची नाही आणि त्यामुळेच हा हिंदी भाषेचा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो कारण संस्कृत द्यायची नसेल तर कुठली तरी दुसरी भाषा द्यायचीच आहे आणि इंग्लिश तुम्हाला नको आहे म्हणून मग तुम्ही आता हिंदी आणता आहात. आता हे सुद्धा ब्राह्मण मानसिकतेचे लक्षण नाही का? एकीकडे तुम्ही इस्त्राईलचे उदाहरण देता आणि दुसरीकडे ते उदाहरण फॉलो करत नाही त्या लोकांनी हिब्रू ही भाषा आणली की नाही मग तुम्ही का संस्कृत आणली नाही ?उलट जेव्हा भारतीय घटना तयार होत होती तेव्हा बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे संस्कृत भाषेच्या फेवर मध्ये होते पण तुम्हीच तिला देवभाषा आहे असे म्हणत ब्राह्मणेतर लोकांना द्यायला नाकार दिला ? हे सर्वप्रथम तुमच्या तिथे ब्राह्मण वर्णांमध्ये उगम पावते का? तुम्ही आज सुद्धा गुरुजींना परमपूज्य म्हणता? ते सरळ सरळ वर्ण जात व्यवस्थेचा पुरस्कार करतात तुम्ही का नाही म्हणत की गुरुजी चुकले ? तुम्ही का म्हणत नाही की नथुराम गोडसे ही चूक होती ?
जर का तुम्हाला तुमचा राष्ट्रवाद संशयास्पद होऊ द्यायचा नसेल तर प्रथम तुमची मांडणी अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ असली पाहिजे. दंतकथांच्या साह्याने तुम्ही फार काळ राज्य करू शकणार नाही . सतत खोटे बोलणे हे आता मीडियाच्या काळामध्ये शक्य नाही .
तेव्हा तुमच्या राष्ट्रवादाचा आधार जर का हिंदुत्व असेल तर त्या हिंदुत्वाचा कणा मोक्ष आहे धर्म नाही. आणि जर का मोक्ष नसेल तर तो मोक्ष असला पाहिजे . धर्म नाही. भारतात जी काही विविधतेतील एकता दिसते ती एकता मोक्षिक एकता आहे . मोक्षाकडे जाण्याची अनेक तंत्रे असू शकतात म्हणूनच 114 तंत्रे भगवान शंकर यांनी दिली . जी विविधता आहे ती ह्या 114 तंत्रांची आहे. यामध्ये जर का महावीर तंत्र आणि बुद्ध तंत्र स्वतंत्र मानून आपण ऍड करणार असू तर ते केले पाहिजे .
आता राहला प्रश्न धर्माचा ! तर मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे की धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे आणि भारतामध्ये तिचा आधार शिस्त किंवा धम्म असला पाहिजे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शैवधर्माकडून शिस्त घेतली खरी पण अजूनही हे अनुशासन वर्ण जात व्यवस्थेला जखडलेले आहे ते प्रथम वर्ण जात व्यवस्थेपासून मोकळे झाले पाहिजे. अगदी जेनेटिकोड ही व्यवस्था लावली तरी मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा जवळजवळ 90% मुस्लिम हे जेनेटिकली संपूर्णपणे हिंदूच होते हे स्पष्ट झालेले आहे. तर उरलेले दहा टक्के सुद्धा मिक्स आहेत . या लोकांना तुम्हाला अनुशासनामध्ये आणावेच लागेल . त्यांचा द्वेष करून हे होऊ शकत नाही . प्रेम आणि शिस्त या दोन गुरुकिल्ल्या आहेत . शिवाजी महाराजांनी त्या अत्यंत प्रभावीपणाने वापरल्या होत्या . पहिल्या बाजीरावा पर्यंत हे उत्तम चालले होते . नंतर मग गोंधळ करायला सुरुवात झाली आता पुन्हा एकदा असाच गोंधळ करायचा आहे का हे स्वतःला संघाने विचारावे . जर हे करायचे नसेल तर जे ब्राह्मणी हिंदुत्व वारंवार नको तितके डोकावते आहे त्यांचा बंदोबस्त करा . मनूस्मृतीचे नाव सुद्धा घेऊ नका . संपूर्ण ब्राह्मण वांग्मय आणि स्मृती वाङ्मय भारतीय इतिहासातून नाहीसे झालेले बरे त्यांच्याशिवाय भारताचे काहीही अडणार नाही याबाबतीत युरोपियन लोकांनी धर्माबाबत शेण खाल्ले म्हणून आपण पण खाल्ले पाहिजे असे नाही. तिकडे जे वैज्ञानिक वातावरण आहे ते आपल्याकडे नाही त्यामुळे आपल्याकडे या गोष्टी पवित्र वगैरे मानत संपूर्णपणे लोकांच्या डोक्यात घालता येतात. किमान 1000 वर्षे ब्राह्मण ,अरण्य आणि स्मृती वांग्मय सरळ सरळ दफन करून टाका नंतर 1000 वर्षानंतर त्यांचे काय करायचे ते ठरवू . कुठल्याही समाजामध्ये इतिहासाबाबत एक परिपक्वता यावी लागते भारतात अजून तरी आलेली नाही अगदी मुस्लिम समाजात सुद्धा ती नाही . त्यामुळे याबाबतीत आपल्यात आणि इस्लाम समाजामध्ये फार फरक नाही.
तेव्हा हे सर्व जे झालेले आहे ते का झाले आहे ते तपासणे आवश्यक आहे
आता राहिली गोष्ट राष्ट्र भाषेची ! माझ्या मते संस्कृत हीच भाषा पुन्हा एकदा राष्ट्रभाषा म्हणून आणली पाहिजे आणि ती सर्वांना शिकणे सक्तीचे केले पाहिजे आणि ती सक्ती पाचवीपासून किंवा सहावीपासून केली पाहिजे . याबाबतीत इस्त्राईल हाच आदर्श मानला पाहिजे . हिंदीची दादागिरी संपूर्ण भारत स्वीकारणे शक्य नाही उगाच त्या दादागिरीच्या नादात दक्षिण भारत हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येईल एवढे लक्षात ठेवा आणि बहुधा महाराष्ट्र हा दक्षिण भारतातच पुन्हा एकदा परतेल. ही लढाई सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये आता लढली जात आहे . भाषेच्या प्रश्नावरून तेव्हा उगाच भांडण लावण्याच्या फंदात पडू नका . हिंदी हे भांडणाला आमंत्रण आहे तुम्हाला हे लक्षात येत नाही.
भारताला संवाद साधण्यासाठी म्हणून एक राष्ट्रभाषा हवी पण ही राष्ट्रभाषा संस्कृतच असू शकते कारण दक्षिणेकडे सुद्धा संस्कृतला विरोध नाही जो विरोध आहे तो हिंदी भाषेला आहे. संस्कृत भाषा सर्वांनी मिळून तयार केलेली भाषा आहे. त्यामुळे तिला मिळालेला प्रतिसाद हा सर्वोत्तमच असणार . तेव्हा हिंदी भाषा लादण्याच्या फंदात पडू नका त्यापेक्षा संस्कृत कसे सर्वजण शिकतील हे पहा . संस्कृत आणि प्राकृत हा आपला सनातन फॉर्म्युला आहे तो उत्तम आहे तोच अंमलात आणलेला बरा खरे तर नेहरूंनी हे करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही त्यांचा मूर्खपणा पण म्हणून तो आपण म्हणजे हिंदवी लोकांनी कॅरी फॉरवर्ड करण्याची गरज नाही.
आणि शेवटची गोष्ट पुन्हा सांगतो गोष्ट : हिंदुत्वाचा मुख्य कणा हा मोक्ष म्हणजे कैवल्य म्हणजे निर्वाण आहे धर्म नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment