सावरकर स्मृतिदिनानिमित्त: शाक्त विचार , शस्त्र विचार आणि सावरकर श्रीधर तिळवे नाईक 

26 फेब्रुवारी हा सावरकरांचा मृत्युदिन! साहजिकच हा दिवस आला की सावरकर विचारांचे विचार मंथन सुरू होते आणि वाद ही सुरू होतात .

सावरकर यांना समजून घ्यायचे असेल तर दोन विचार समजून घ्यावे लागतात. पहिला शाक्त विचार जो शैव श्रुती मधून आलेला आहे तर दुसरा शस्त्र बल विचार जो कौटिल्य आणि श्रीकृष्ण यांच्या विचारातून विकसित होत असतो. हा युरेशियन श्रुतीतून आलेला विचार आहे हिंदू धर्म हा या दोन्ही श्रुतींचा मिलाप घडवण्याचा प्रयत्न असल्यामुळे तिथे हे दोन्ही विचार कार्यरत असतात मात्र अंतिम उद्दिष्ट हे युरेशियन श्रुतीचे वर्चस्व स्थापन करणे असल्याने साहजिकच कल साधारणपणे कौटिल्य आणि श्रीकृष्ण यांच्या बाजूने सरकत असतो .

शाक्त तंत्र हे मोक्ष मिळवण्याच्या पाच मुख्य तंत्रांच्यापैकी एक तंत्र आहे हे मुळात भगवान शंकर यांनी भगवती पार्वतीला दिले होते . शिव आणि शक्ती या तत्त्वांच्यापैकी शक्ती या तत्त्वाला प्राधान्य देणे हे या तंत्राचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इतर तंत्रांच्या मध्ये संसाराची जी प्रचंड उपेक्षा चालते ती या तंत्रामध्ये चालत नाही . साहजिकच त्यामधून नंतर काही अडाणी माणसांनी फार विचित्र गोष्टी डेव्हलप केल्या .

या मार्गाने शैव श्रुतीमध्ये पार्वती ही मोक्षाला पोचली आणि आजही पंच सिद्धांच्या पैकी एक म्हणून तिचा गौरव होत असतो आणि तिची आणि शक्तीची पूजा करणारे अनेक लोक आपणाला शैव श्रुतीमध्ये आढळतात .

या तंत्रामध्ये संसारामधील कामवासना स्वीकारली जाते त्याचप्रमाणे लढाया सुद्धा सहजरीत्या स्वीकारल्या जातात . क्रिया तंत्र ज्यामधून कुमार स्कंद म्हणजे खंडोबा मोक्षाला पोचले तिथेही युद्ध करणे संरक्षण करण्याची बाब मानली जाते त्यामुळेच पुढे स्कंद कार्तिकेय हा देवांचा सेनापती होता अशा प्रकारची दंतकथा उदयाला आली प्रत्यक्षामध्ये त्याने फक्त आपल्या आजोबांच्या हिमगणावर काही नवीन टोळ्यांचे आक्रमण झाले तेव्हा ते परतवून लावले होते . सर्वसाधारणपणे वीर समाजामध्ये साहजिकच कार्तिकीय जास्त महत्त्वाचा होत जातो खंडोबा जास्त महत्त्वाचा होतो आणि म्हणूनच आज सुद्धा अनेक मराठ्यांची कुलदेवता ही खंडोबा आहे . 

सावरकरांना मोक्षाचे आकर्षण होते आणि साहजिकच त्यांची साधना ही क्रिया तंत्राला आणि शाक्त तंत्राला साजेशी होती मात्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये ते स्वातंत्र्यालाच मोक्ष मानत होते . मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती असे त्यांनी स्वतःच म्हटलेले आहे . 

त्यांनी शक्ती ही स्वातंत्र्यदेवतेच्या संदर्भ मध्ये पाहिली . आणि तिलाच भगवती म्हटले . ते वेदांती सुद्धा होते आणि नास्तिक सुद्धा होते त्यामुळे साहजिकच युरेशियन पद्धतीचे कौटिल्य आणि श्रीकृष्ण यांचे विचार त्यांच्यावर प्रभाव गाजवत होते आणि हे लक्षात आल्याशिवाय सावरकर समजून घेणे फार कठीण जाते . त्यांच्या काळामध्ये कौटिल्याचा फार प्रभाव नसला तरी चाणक्याचा प्रभाव होता आणि चाणक्याची चर्चा होत होती १९०५ यावर्षी जेव्हा पुन्हा एकदा अर्थशास्त्र सापडले आणि १९०९ यावर्षी प्रकाशित झाले तेव्हा ब्राह्मण धर्म नेमका कोणत्या पद्धतीने राजनीतीचा विचार करत होता ते पुढे आले परंतु तोवर या संदर्भातला सर्व विचार हा श्रीकृष्ण नीती किंवा चाणक्य नीति म्हणूनच ओळखला जात होता . साधारणपणे 1965 यावर्षी या संदर्भामध्ये अंतिम निर्णय झाला आणि विष्णू गुप्त आणि कौटिल्य या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि हा ग्रंथ साधारणपणे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये लिहिला गेला हे अनेक पुरावे मिळून सिद्ध झाले . सर्वसाधारणपणे गुप्त काळामध्ये चाणक्य आणि कौटिल्य या दोन एकच व्यक्ती आहेत हा गैरसमज पसरत गेला आणि त्याचा प्रभाव सावरकर यांच्यावर सुद्धा होता . आता दिसते ते असे की साधारणपणे इसवी सन 1200 पर्यंत आपणाला असे दिसते की कौटिल्याचे अर्थशास्त्र प्रचलित असावे नंतर मात्र ते नाहीसे झाले . याचे कारण उघड आहे कारण बाराव्या शतकानंतर श्रीकृष्णाचा इतका प्रभाव वाढला की जे कौटील्याच्या विचाराचे सार होते ते सर्वसाधारणपणे महाभारतामध्ये टाकत त्याचे सर्व श्रेय हे भगवान श्रीकृष्ण यांना देण्यात येऊ लागले . म्हणजेच कौटिल्याची एका अर्थाने गरज संपली जे काही उरले सुरले विचार होते त्यातले काही रामायणामध्ये आले आणि एकंदरच राम आणि कृष्ण आणि त्यांचे राजकीय विचार हे भारतामध्ये प्रमुख होत गेले याला कारण अर्थातच रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य आहेत. 

सावरकरांच्या वर पडलेला सर्वात मोठा विपरीत प्रभाव जर कुठला असेल तर तो मनुस्मृतीचा आहे त्यांनी केलेले मनस्मृतीचे समर्थन त्यांच्या संपूर्ण वैचारिकतेला काळीमा फासते . आज सुद्धा त्यांच्या या विचाराचा प्रभाव संघावर आहे आणि अधून मधून मनुस्मृति विषयीचे प्रेम उफाळून येत असते . सावरकर यांचे असे प्रेम उफाळून यावे हे अजबच म्हटले पाहिजे . एका बाजूला वर्ण जात व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असे ते म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला भारतीय घटनेबाबत तिच्यात भारतीय काही नाही असे सांगताना मनू स्मृतीचा दाखला देत होते . खरे तर त्यांचा आंधळा काँग्रेस विरोध याला जबाबदार होता. अनेकदा ते विचारवंत कमी आणि काँग्रेस विरोधक जास्त होते. त्यांच्या या काँग्रेस विरोधाची व्याप्ती हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यानंतर वाढत गेली .

सावरकरांच्या वर जो प्रभाव आहे तो या युरेशियन दिशेने आहे आणि दुसरा प्रभाव अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आहेत . शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केल्याने एकंदरीत या काळामध्ये शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे एक मोठे आयकॉन बनले होते . त्याचा प्रभाव ही सावरकर यांच्यावर पडला . याला आणखी बळ पुरवले ते स्वामी रामदास यांनी ! रामदासांचे वैशिष्ट्य असे होते की ते सामर्थ्य आहे चळवळीचे असे म्हणत होते . शिवाजी महाराजांना ते श्रीमंतयोगी म्हणत होते . किंबहुना ते एकमेव असे कवी होते जे शिवाजी महाराजांचा सार्थपणे गौरव करत होते आणि म्हणूनच ते गुरु आहेत असा एक समज पसरत गेला . ब्राह्मणांनी तो गैरसमज जास्तीत जास्त दृढ केला परंतु प्रत्यक्षात नवीन जे पुरावे आले त्यावरून असे दिसते की ही वस्तुस्थिती नाही परंतु सावरकरांच्या काळामध्ये मात्र ही दंतकथा पूर्णपणे प्रस्थापित झाली होती साहजिकच रामदासांची संपूर्ण मांडणी आणि सर्व काही शक्तीने आणि सामर्थ्यानेच शक्य आहे असा ठाम समज असे ठाम आकलन सावरकर यांना झाले होते . ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी एक क्रांतीच घडवली त्याप्रमाणे आपणही क्रांती घडवली पाहिजे असे त्यांना वाटायला लागले होते. याबाबतीत शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांचे काही चुकीचे आकलन पण होते . शिवाजी महाराज हे सरळ सरळ समतावादी होते पण त्यांच्या काळातल्या वैदिक लोकांनी त्यांची प्रतिमा वैदिक करण्यामध्ये फार मोठा प्रचार राबवला आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसतो. त्यातच त्यांचे जे गुरु होते ते लोकमान्य टिळक सशस्त्र क्रांती जर होणार असेल तर तिचे समर्थन करायला तयार होते . किंबहुना या संदर्भात दिसते ते असे की कळत नकळत त्यांचा याही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यावर विश्वास असावा . पण जे टिळक यांना साधणे अवघड झाले होते ते सावरकर यांनी करण्याचे ठरवले ते म्हणजे प्रत्यक्ष सशस्त्र क्रांती करणे. 

सावरकर यांच्या दृष्टीने इंग्रज हे औरंगजेब होते आणि त्याच्यापुढे आपण शिवाजी महाराज बनल्याशिवाय पर्याय नाही असेच त्यांचे मत असावे. पुढे त्यांचा औरंगजेब बदलला आणि इंग्रजांच्या जागी मुस्लिम आले.

साहजिकच या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासामध्ये यामधून दोन विचार निर्माण झाले पहिला विचार हा सावरकरांचा होता आणि तो पूर्णपणे शस्त्रांच्यावर शक्तीवर सामर्थ्यावर सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारा होता. तर दुसरा विचार हा गांधी यांचा होता जो नि:शस्त्र अहिंसात्मक चळवळीवर विश्वास ठेवणारा होता प्रश्न असा होता की जनता नेमकी काय पर्याय निवडणार आहे . कारण शेवटी जनता हेच न्यायालय असते . यामुळे सावरकरांनी जॅक्सनच्या संदर्भामध्ये शस्त्र पुरवण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात त्यांना अटक झाली. त्यांनी अभिनव भारत नावाची क्रांतिकारक संघटना विस्तारित केली . सावरकरांच्या सारखेच सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारे कम्युनिस्ट सुद्धा हळूहळू उदयाला यायला लागले होते ते याच काळात मात्र सावरकरांचा डाव्या विचारावर विश्वास नव्हता . ते एका अर्थाने उजवे क्रांतिकारक होते आणि कम्युनिस्ट लोकांना ते कायमच प्रतिगामी क्रांतिकारक वाटत होते .त्या उलट गांधी आणि नेहरू दोघेही आपापल्या पद्धतीचा समाजवाद सांभाळून उभे होते आणि दोघेही अहिंसावादी होते . नशास्त्र प्रतीकाराने निशस्त्र प्रतिकारणे प्रतिकाराने स्वातंत्र्य मिळवता येईल यावर त्यांचा विश्वास होता ज्याच्याबद्दल हिंदुत्ववादी लोकांना कायमच संशय वाटतो आणि म्हणूनच हे लोक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या हिंसा स्वीकारणाऱ्या आजाद हिंद पोहोचला स्वातंत्र्याचे श्रेय द्यायला बघतात .

उजवा विचार हा एक विलक्षण गुंतागुंतीचा प्रकार असतो कारण तो अनेकदा जिला युरोपमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टी म्हटले जाते तिच्याकडून प्रचलित केला जातो साहजिकच हे लोक बहुजनवादी कमी आणि महाजनवादी जास्त असतात . सावरकर असे महाजनवादी होते . त्यामुळेच वर्ण व्यवस्थेबाबत त्यांनी जो विचार केला तो महाजनवादाला धरून होता . महाजनवादाला समता हवी असते परंतु त्या समतेचे स्वरूप उत्तम पृष्ठा सारखे असते . त्यांना समाजामध्ये मूलभूत बदल घडवायचे नसतात . म्हणजेच राजकीय बाबतीत क्रांतिकारक असणारे सावरकर सामाजिक बाबतीत मात्र प्रखर क्रांतीकारक नव्हते . विशेषता वर्ण जाती व्यवस्थेबाबत संपूर्ण समाजाशी भांडण घ्यायला ते तयार नव्हते. मात्र विज्ञानाचा पुरस्कार करताना मात्र ते गांधींच्या पेक्षा अधिक क्रांतिकारक होते . म्हणजेच आपण जर का असे ठरवले की ज्ञानात्मक पातळी बघितली तर गांधींच्या पेक्षा अधिक क्रांतिकारक आणि सामाजिक पातळी घेतली तर गांधींच्या पेक्षा कमी क्रांतिकारक असे ते स्पष्ट दिसतात . गाय हा उपयुक्त पशु आहे असे म्हणण्याचे धाडस त्यांच्याकडे होते . पण भारतातली सगळी मंदिरे मी सर्वांना सर्व हिंदूंना ओपन करतो असे आंदोलन उभे करण्याचे धाडस त्यांच्याकडे नव्हते. विठ्ठल मंदिराचा लढा जर का सामान्य गुरुजींच्या ऐवजी सावरकरांनी चालवला असता तर ते जास्त योग्य झाले असते पण यासाठी लागणारी मानसिकताच मुळात त्यांच्याकडे नव्हती .

सुरुवातीच्या कालखंडामध्ये तर ते धर्मनिरपेक्षच असावेत परंतु अंदमान जेल मधला त्यांचा मुस्लिम कैद्यांच्या बद्दलचा अनुभव त्यांना पूर्णपणे बदलवून टाकणारा ठरला आणि धर्मनिरपेक्षते ऐवजी त्यांनी हिंदुत्व स्वीकारले आणि त्याची मांडणी केली . लोकमान्य टिळक यांच्यामध्ये असणारा बीज रूपाचा हिंदुत्व विचार त्यांनी वृक्षांमध्ये रूपांतरित केला . पुढे या विचाराचे रूपांतर अश्वत्थ मध्ये करण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसक संघाला जाते . हा पिंपळ आता राजकीय पातळीवर प्रचंड सळसळत असल्याने साहजिकच सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी सातत्याने पुढे येते आहे मुळात याची सुरुवात स्वतः सावरकर वादी असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती . विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या हिंदुत्वापेक्षा लोकमान्य टिळकांचे हिंदुत्व वेगळे होते आणि लोकमान्य टिळकांच्या हिंदुत्वापेक्षा सावरकर यांचे हिंदुत्व वेगळे होते आणि त्याच वेळेला प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व सुद्धा टिळक यांच्यापेक्षा वेगळे होते ते प्रामुख्याने ब्राह्मणेतर चळवळीशी जोडले गेलेले होते चिपळूणकरांचे ब्राह्मणी हिंदुत्व टिळकांचे वैष्णव हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरे यांचे क्षात्र हिंदुत्व यांच्याबरोबरच सावरकर यांचे वेदांती हिंदुत्व अशी चार प्रकारची हिंदूत्वे एकोणिसाव्या शतकानंतर विसाव्या शतकात हळूहळू आपल्या प्रभावाने विकसित होत गेली आणि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हे सर्व हिंदुत्वाचे प्रकार अस्तित्वात आहेत पुढे आर्य समाजाचे वैदिक विचार सुद्धा वैदिक हिंदुत्व म्हणून पुढे येऊ लागले आणि त्यामध्ये स्वामी श्रद्धा नंद यांचा फार मोठा वाटा होता . म्हणजेच हिंदुत्वाचा एक असा चेहरा नव्हता तर पाच प्रकारची हिंदुत्वे सुरुवातीच्या काळापासूनच प्रचलित झाली होती आणि त्यांना स्वीकारून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा राहिला होता . त्यामध्ये गोळवलकरांच्या सारखे चिपळूणकर यांचे ब्राह्मणी हिंदुत्व स्वीकारणारे सुद्धा होते ज्यांनी संघ चालक म्हणून काम केले होते. 

संघामध्ये सावरकरी हिंदुत्वाला खरोखर काही किंमत आहे का असा एक फार मोठा प्रश्न कायमच निर्माण होत राहिला आहे. आपल्याकडे सावरकर यांच्या हिंदुत्वाची अतिशय व्यवस्थित मांडणी शेषराव मोरे यांनी केली आहे. पण आरएसएस शेषराव मोरे यांच्या दिशेने जाणार आहे का हा खरा प्रश्न आहे . अनेकदा होते असे की ब्राह्मणी हिंदुत्वाला साजेसे काही मटेरियल इतर प्रकारांमध्ये दिसले की ते व्यवस्थित स्वीकारले जाते पण ब्राह्मणी हिंदुत्वाला विरोध करणारे काही असले की त्याची उपेक्षा करायची असा साधारणपणे धोरणात्मक कल असतो आणि या धोरणानुसारच आज सुद्धा सावरकरांना भारतरत्न दिले जात नाही . वास्तविक स्वातंत्र्य युद्ध अशी एक व्यापक संकल्पना आपण स्वीकारली तर सावरकरांनी त्यामध्ये भाग घेतला होता हे मान्य करावे लागते पण नंतरच्या काळामध्ये ते ब्रिटिश धार्जिने झाले होते का असा खरा प्रश्न आहे . सर्वसाधारण विरोधक त्यांची मांडणी करताना त्यांच्या माफी नाम्याचा उल्लेख करतात पण माझे स्पष्ट मत असे आहे की ती एक स्ट्रॅटेजी असावी . पण याला ऑब्जेक्शन असे येते की जर हे धोरण होते राजकीय धूर्तपणा होता तर मग नंतर का सावरकरांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतला नाही ? सावरकर आणि भगतसिंग यांच्या मधला सर्वात मोठा फरक असा होता की सावरकर हे सरळ सरळ शिवाजीला प्रमाण मानणारे होते त्यामुळे साहजिकच आग्र्याहून सुटका करताना ज्या प्रकारची अत्यंत धूर्त धोरण योजना गनिमी कावा धोरण महाराजांनी स्वीकारले आणि राबवले तसेच काहीसे त्यांनी केले . त्यामुळे भगतसिंग यांच्याबरोबर त्यांची तुलना करणे योग्य नव्हे भगतसिंग सरळ सरळ कम्युनिस्ट विचार प्रणालीचे असल्याने हौतात्म्याकडे स्वतःहून चालत गेले सावरकरांचा असा असा मुळात विचारच नव्हता ते याबाबतीत शिवाजीवादी होते . प्रश्न असा आहे की मग नंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा गेलेले किल्ले परत घेतले तसेच सावरकर यांनी का केले नाही ? कुठेतरी तुरुंगवासामुळे जे त्रास आले त्यामुळे रग कमी झाली का ? मला स्वतःला ही शक्यता खूप वाटते कारण त्यांची प्रकृती म्हणावी तशी सशक्त उरली नव्हती .

दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण मुळात जनतेच्या न्यायालयांमध्येच त्यांचा मार्ग पूर्णपणे नाकारण्यात आला होता आणि जनता महात्मा गांधी यांच्या मागे गेली . साहजिकच कळत नकळत सावरकरांना असे वाटले असणार की सशस्त्र क्रांती पेक्षा महात्मा गांधी यांचा मार्ग जनतेने स्वीकारलेला आहे आणि बहुमत आपल्या बाजूने नसल्याने आपण शांत राहणे हेच योग्य आहे. ते या मार्गावर टीका करत राहिले परंतु याबाबतीत जनताच त्यांच्या मागे उभी राहिली नाही .

आज सुद्धा या संदर्भामध्ये महात्मा गांधी यांचे श्रेय नाकारायचे आणि असे कधी निशस्त्र पद्धतीने आंदोलन करून स्वातंत्र्य मिळते का असा प्रश्न विचारत त्या चळवळीला बदनाम करायचे असे उद्योग चाललेले असतात परंतु स्पष्ट सांगायचे तर या उद्योगांना जागा नाही कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालवली आणि तिचा प्रचंड वाटा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आहे काँग्रेसचे आंदोलन जनतेचा आवाज म्हणूनच उमटत होते तसा जर तो आवाज नसता तर काँग्रेसला भारतीय जनतेने पुन्हा निवडून दिले नसते त्यांनी मग कम्युनिस्ट किंवा हिंदुत्ववादी यांनाच निवडून दिले असते तेव्हा याबाबतीत लोकांनी दिलेला जनादेश हाच प्रमाण मानला पाहिजे . पण हिंदुत्ववादी हा जनादेश स्वीकारायला तयार नाहीत आणि त्यांना वाटते की आपण इतिहास बदलू शकतो कारण आपण तो अनेकदा बदललेला आहे विशेषत: ब्राह्मणी हिंदुत्वाने असा प्रकार वारंवार केलेला आहे आणि साहजिकच त्यामुळे आता सुद्धा त्यांना असा आत्मविश्वास वाटतो की स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सुद्धा आपण आपल्याला हवा त्या पद्धतीने बदलू शकतो मला स्वतःला हे शक्य वाटत नाही आणि मान्य ही नाही सत्याचे विद्रूपीकरण करून तुम्ही विजयी होत नाही तुम्ही फक्त स्वतःच्या पराभवाचे फाउंडेशन स्टोन टाकत राहता . कारण सत्य हे फक्त सत्यच असते आणि त्याची ताकद दिसत असते आणि दिसत नसली तर कालांतराने दिसायला लागते . याबाबतीत हिंदुत्ववादी एक हरणारी लढाई लढत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे .

सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचाराचा हिंदुत्ववादी लोकांना सर्वात मोठा उपयुक्त असलेला घटक आत्ता या क्षणी कोणता असेल तर तो म्हणजे त्यांचा इस्लाम द्वेष ! साहजिकच या अंगाने जर का आपण सावरकरांचा विचार केला तर आपणाला असे दिसते की ते इतर हिंदुत्ववादी लोकांच्या पेक्षा ते याबाबतीत फार वेगळे होतात . अगदी टिळक सुद्धा मुस्लिम लोकांशी सहकार्य करायला तयार होते किंबहुना मुसलमानांच्या बाजूने कलणारा लखनऊ करार त्यातूनच झाला . एका हिंदुत्ववादी माणसाने असा करार करावा हे खरोखरच आश्चर्य म्हणावे असे आहे पण हिंदुत्ववादी याची कसलीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत वास्तविक हा हिंदुत्ववादी नेतृत्वानेच केलेला करार आहे . मुस्लिम काळामध्ये त्यांच्या राजवटीत अनेकदा अशा प्रकारचे सहकार्य ब्राह्मण आणि मुसलमान यांच्यात झालेले आहे त्याचीच ही पुनरावृत्ती होती . इथे मात्र सावरकर कळत नकळत टिळकांच्या विरोधात जातात त्यांचा इस्लामचा विरोध हा अधिक प्रखर आहे आणि आत्ताच्या काळामध्ये त्याला अचानक भरभराटीचे दिवस आले तर आश्चर्याचे कारण नाही. प्रश्न असा आहे की त्यांचा हा जो इस्लामचा विरोध आहे त्याचे नेमके स्वरूप काय हे आपण तपासले पाहिजे आणि त्यांनी केलेली इस्लामची मीमांसा अधिक खोलात जाऊन तपासली पाहिजे . शेषराव मोरे यांनी काही प्रमाणामध्ये हे सर्व काही केलेले आहे पण त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष गेलेले नाही. प्रश्न असा आहे की हिंदुत्वाचा आधार फक्त मुस्लिम द्वेष असू शकतो का ? माझ्या मते नाही . इस्लामला प्रतिकार करणे वेगळे आणि मुस्लिम लोकांचा द्वेष करणे वेगळे . यासंदर्भात हिंदुत्ववादी सत्ताधीश काय करत आहेत एकदा नीट तपासले पाहिजे . साधा समान नागरी कायदा सुद्धा आणता आलेला नाही . त्यामुळे भविष्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या मार्गाने मुस्लिमांच्या बरोबर करार झाला तर आश्चर्य मानू नये किंबहुना सावरकर हे इथेच जास्त अडचणीचे ठरत आहेत . इस्लाम बाबत सावरकरांनी केलेली अनेक प्रेडिक्शन्स ही खरी झाल्यामुळे त्यांच्या विचाराला आता गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. पण वैयक्तिक द्वेष त्यांच्या लेखणीमध्ये अधून मधून येतो तो टाळावाच लागेल . शैव हिंदुत्व हे बहुजन निष्ठ असल्याने इस्लामचा प्रतिकार करत असले तरी ते मुस्लिमांच्यावर प्रेमच करते . कारण शेवटी आपण सर्व होमो सेपियन आहोत हे मान्य आहे. मुख्य म्हणजे भारतातले मुस्लिम जवळजवळ ९९% मुस्लिम हे मूळचे हिंदूच आहेत त्यामुळे घर वापसीचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात चालायला हवे होते पण ते सुद्धा चालवले गेले नाही . माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की भारतीय मुसलमानांचे भले घर वापसी मध्ये आहे . हा देश मुस्लिमांचा नाही वगैरे म्हणून जे लोक टिमकी वाजवतात त्यांना हे सांगितले पाहिजे की बाहेरून तुम्ही सुद्धा आलेले आहात . यासंदर्भात काय केले पाहिजे याची मांडणी मी अनेक इतर लेखांच्यात केलेली आहे. मात्र सावरकरांचा काही बाबतीत असलेल्या विचार हा प्रॅक्टिकल असल्याने तो स्वीकारावा लागतो उदाहरणार्थ शेजारी देशांच्या पासून भारताचे संरक्षण आवश्यक आहे शेजारचे देश गप्प बसतील यावर विश्वास ठेवू नये असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा ते बरोबर असतात. 

त्यांच्याशी असलेला माझा सर्वात मोठा मतभेद म्हणजे ते भारताला धर्मभूमी मानतात मी भारताला मोक्ष भूमी मानतो . धर्म येतात आणि जातात परंतु मोक्ष ही मात्र एक नेहमीच अनंतकाळ उपलब्ध असलेली शक्यता असणार आहे . तिच्या कदाचित अनेक वेगवेगळ्या व्याख्या होतील पण जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य आवश्यक वाटेल तेव्हा तेव्हा मोक्षाची चर्चा अटळ आहे .

सेक्युलर लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा मोक्षाबाबत झालाय याचे कारण त्यांना तो मान्य नाही . यदा कदाचित कोणी मोक्षाची साधना करत असेल तर ती वैयक्तिक साधना समजावी असे ते मानतात . त्यामुळेच मोक्षाला राजकीय स्वरूप देण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष स्वरूप द्यायला हवे असे काहीतरी त्यांचे चाललेले असते. मला त्याचाही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असा आहे की धर्म याबाबत काय करतो आणि खरा प्रॉब्लेम तिथूनच सुरू होतो कारण इस्लाममध्ये मोक्ष ही संकल्पना नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच आज सुद्धा असली सुफी लोक(नकली सुफी लोक हे मुळात सुफी नसतात ते फक्त इस्लामच्या प्रचारासाठी सुफी तत्त्वज्ञानाचा वापर करतात) जे काही मांडतात त्याला फारसे पाठबळ इस्लाम देत नाही . इस्लाम मधील मन्सूर , रुमी, कबीर ही जी काही परंपरा आहे ती मोक्षाशी सहज जोडता येते त्यामुळे ती तशी व्यापक करत न्हेणे हा यावर खरा उपाय आहे . सावरकरांनी हे केले नाही त्यांचा फोकस त्यापेक्षा धर्मावर जास्त राहिला औरंगजेबावर जास्त राहिला आणि एक परिणाम असा झाला की इस्लाम मधील मोक्ष परंपरेला त्यांनी फारसे स्थान आपल्या लिखाणात दिलेले नाही .

हल्ली काही लोक सावरकरांना डरपोक वगैरे सुद्धा म्हणायला लागलेत हे ताबडतोब बंद झाले पाहिजे. जेव्हा एखाद्या नेतृत्वाचे विचार जनतेकडून स्वीकारले जात नाहीत आणि त्याच्या प्रतिस्पर्धी असलेला विचार व विचारवंत विजयी होत असतो तेव्हा जी एक मानसिक कुचंबना असते ती त्यांच्या वाट्याला आलेली आहे हे सावरकर समजून घेताना लक्षात घेतले पाहिजे ते गांधींच्याकडून लिटरली पराभूत झाले पण त्याचबरोबर हेही खरे की 1985 नंतर त्यांच्याच विचाराने गांधीवाद पराभूत करायला सुरुवात केली. हा विजय काहीसा मृत्यूनंतर मिळालेला विजय आहे पण तरीही त्याचे मूल्य घटत नाही कारण अशा प्रकारचा विजय जेव्हा कार्ल मार्क्सला मिळतो तेव्हा तो आपण मान्य करतो परंतु सावरकरांना मात्र असा विजय मिळालेला आपल्याला मान्य करता येत नाही हा खरं तर विरोधाभास आहे . अनेकदा यामागे राजकीय सत्ताकांक्षा असते . सावरकरांचा मृत्यूनंतरचा विजय आज सुद्धा काँग्रेसला समाजवादाला कम्युनिस्टांना झेपलेला नाही . मुळात काँग्रेसला कधी वाटलेच नाही की सावरकर मेल्यानंतर अधिक जोमाने उभे राहतील याचे कारण इस्लाम नेमके काय करत आहे हेच काँग्रेसला कळले नाही. एका अर्थाने सावरकरांचा हा दूरदृष्टिपणा हा इस्लामशी निगडित आहे . आणि गांधी आणि नेहरू याबाबतीत पूर्णपणे फाफललेले आहेत . त्याचबरोबर परराष्ट्राबाबतचे धोरण हे सावरकरांच्या सारखे ठरत गेले इथेही सावरकर योग्य ठरलेले आहेत. त्यामुळे सावरकरांचा विचार करताना ते नेमके कुठे बरोबर होते ते कुठे चुकले याचा विचार करावा लागेल दुर्देवाची गोष्ट अशी आहे की हे सर्व राजकीय लोकांच्या तावडीत सापडल्याने अनेकदा सावरकरांचे मूल्यमापनच नीट होत नाही . काही अति शहाणे असे असतात की ते त्यांच्या उडीची सुद्धा चेष्टा करायला लागतात जे अत्यंत चुकीचे आहे. उडीचे स्वरूप काय होते यापेक्षा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी अशा प्रकारची उडी मारणे हेच निर्भयतेचे लक्षण आहे एवढे तरी निदान कबूल करा.

हीच गोष्ट सावरकरांच्या शिक्षेविषयी आहे त्यांच्या वाट्याला अधिक कठोर शिक्षा आली होती ही वस्तुस्थिती ! अर्थात हिंदुत्ववादी लोकांनी पण त्याच्या आधारे नेहरू आणि गांधी यांच्या तुरुंगवासाची चेष्टा उडवणे बरोबर नव्हे . मुळात सर्वांनाच एका विवेकाची गरज आहे आणि समतोलाची गरज आहे तो समतोल कोणी सध्या पाळत नाही आणि म्हणून सध्या आकलनामध्ये अनेक पूर्वग्रह फिरताना दिसतात. 

काही बाबतीत गोंधळ उडतो म्हणजे डार्विनच्या प्रभावातून आपले ब्राह्मण असणे काहीतरी मोठे आहे अशी संकल्पना बाळगणे हे त्या काळामध्ये अनेक ब्राह्मण लोकांच्या बाबतीत घडलेले दिसते. सावरकर याला अपवाद नसावेत हे दुर्दैव ! त्या संपूर्ण कालखंडामध्ये फक्त दोनच लोक आपल्या जाती विषयी कसलाही अभिमान बाळगत नसताना दिसतात . पहिले बाबासाहेब आंबेडकर त्यांना ते शक्यच नव्हते आणि दुसरे महात्मा गांधी ज्यांना अभिमान बाळगणे शक्य होते पण ज्यांनी बाळगला नाही उलट कोर्टामध्ये आपण शूद्र आहोत अशी घोषणा केली. महात्मा गांधी अनेक बाबतीत क्रांतिकारक आहेत त्यातील ही एक ! एका अर्थाने याबाबतीत ते सावरकर यांच्या पुढे गेले .

कुठलाही पुरुष हा त्या त्या काळामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांनी प्रभावित होतो आणि त्याची जडणघडण त्याचा काळ त्याला अनेक मर्यादा देतो. मुस्लिम कैद्यांच्या विषयीचे अनुभव जर का सावरकरांना आले नसते तर कदाचित सावरकर वेगळे झाले असते परंतु हा तुरुंगवास हा फार डिसाईडिंग फॅक्टर झाला . सावरकर याला अपवाद नव्हते त्यामुळे ते सुद्धा परिस्थितीचे अपत्य होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .

 त्यांनी मृत्यू स्वीकारताना सुद्धा असीम धाडस दाखवले याबद्दल शंका नसावी असा मृत्यु स्वीकारताना खूप मोठी मानसिक तयारी लागते त्यासाठी मुळात अंगात गट लागतात ते सावरकर यांच्यामध्ये कायमच होते . सावरकर विरोधकांनी त्यांना डरपोक म्हणून स्वतःच्या पराभवाची वाट तयार केली असे माझे स्पष्ट मत आहे . एकंदरीत सावरकर आणि इस्लाम याबाबत विरोधकांनी पण फार मोठा घोळ घातला असे दिसते आणि त्याची फार मोठी किंमत या देशांमध्ये पुरोगामी वाद पराभूत होण्यामध्ये झालेली आहे . कुठलाही देश परंपरा शरण झाला की तो प्रगती करत नाही . त्यामुळेच प्रगतीच्या बाजूने नेहमीच ऑथेंटिसिटी उभी करावी लागते . पूरोगामी लोकांनी इस्लामच्या आणि सावरकरांच्या बाबतीत विवेक न बाळगून ही ऑथेंटीसिटी गमावली . सावरकरांच्या निमित्ताने निदान पुरोगामी लोकांनी आता तरी नीट ऑथेंटिसिटी तयार करावी जोपर्यंत ती होती तोपर्यंत काँग्रेस विजयी होत होती . सावरकरांचे योगदान कायमच काँग्रेसने मान्य केले होते आणि हिंदुत्व हे पुस्तक लिहिण्यापूर्वीचे सावरकर आम्हाला मान्य आहेत असा एक शहाणपणाचा निष्कर्ष त्यांनी स्वीकारला होता जे योग्य होते पण नंतर काही अति शहाणे आले आणि गोंधळ झाला. हा गोंधळ निदान आता तरी निस्तारावा .

श्रीधर तिळवे नाईक


 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय