अलौकिक ,लौकिक ,सांकेतिक, मोकळीक ,स्वतंत्र आणि मुक्त श्रीधर तिळवे नाईक
चिन्हसृष्टीची अभिव्यक्ती कशी व्हावी हा एक फार मोठा वादाचा प्रश्न कायमच राहिलेला आहे .चिन्हसृष्टीचा मुख्य उद्देशच मुळात जे अलौकिक आहे ते चिन्हांच्या मध्ये (यात भाषा सुद्धा येते) आणणे आणि त्याला शरीरात्मक , अनुभवात्मक आणि ज्ञानात्मक स्वरूप देणे कारण अलौकिक याचा अर्थ असा आहे की जे लोकांच्या मध्ये आलेले नाही . अर्थातच जे मोक्षिक आहे ते लोकांच्या मध्ये येऊ शकत नाही त्यामुळे त्याचा विचार मी इथे करत नाही कारण शब्द तिथे संपतात ज्ञान सुद्धा संपते आणि अनुभव सुद्धा संपतो पण त्याच्या अलीकडे जी स्थिती आहे ती अलौकिक आहे म्हणजे ती आहे परंतु तिला लौकिकता प्राप्त झालेली नाही . लौकिक या शब्दाचा अर्थच जे लोकांच्यात आहे आणि आलेले आहे ते!
पण खरा प्रश्न इथेच येतो की जर एखादी गोष्ट लौकिक करताना जर लोकांचाच अडथळा असेल तर काय करायचे आणि साहजिकच मग जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा सर्व गोष्टी सांकेतिक चिन्हांच्या मध्ये व्यक्त करण्याचे उद्योग चिन्हसृष्टीमध्ये सुरू होतात याला पर्याय असत नाही . चिन्ह हे स्वतः सांकेतिक असते परंतु आता ते केवळ ठरलेल्या संकेतानुसार चालणारे सांकेतिक रहात नाही तर अनेकदा नवीन संकेत निर्माण करावे लागतात त्यांचे कॉडिफिकेशन करावे लागते आणि नंतर ज्याच्याकडे ते जातात त्याला ते डी कोडीफाय करावे लागतात . काही संकेत प्रस्थापित असतात कारण ते चालत आलेले असतात. विशेषता उत्सव आणि सणांच्या मध्ये असे खूप चालते त्यामुळेच कवी लोक असतात ते अनेकदा स्वतःचे नवीन संकेत निर्माण करतात त्यातूनच नवीन प्रतिमा सृष्टी तयार होते. व्यवहारामध्ये याचा विचार करताना अर्थात कवितेच्या अंगाने आपण न जाता जर का लोकांना माहीत असलेल्या लौकिक चित्रपट गीतांच्या अंगाने गेलो तर कदाचित अधिक मुद्दा स्पष्ट होईल .उदाहरणार्थ याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपण बॉलीवूड मधला रोमान्स घेऊ इथे आपणाला अनेकदा असे दिसते की सांकेतिक म्हणजे काय तर दोन फुले एकमेकाला टक्करणे अनेकदा हा संकेत संभोगाला किंवा चुंबनाला व्यक्त करत होता आता हे सांकेतिक व्यक्त होणे ही त्या काळाची गरज होती कारण थेट बोलणे अवघड होत होते आता ही गोष्ट वेगळी की ब्रिटिश काळामध्ये मात्र चुंबन थेट होत होते आणि नंतर स्वतंत्र झाल्यानंतर मात्र चुंबनावर मोकळीक व्यक्त करण्याची बंदी आली आता हे असे कसे झाले म्हणजे जे प्रत्यक्ष होते ते पुन्हा एकदा सांकेतिक कसे काय झाले ?
हा प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे परंतु याचं कारण असं होतं की ब्रिटिश लोक चुंबनाबाबत मोकळे होते आणि भारतामध्ये सुद्धा शैव लोक चुंबनाबाबत मोकळे होते आणि याच वर्गातून सर्वसाधारणपणे नट त्या काळात उदयाला येत होते आणि जो प्रस्थापित वर्ग होता तो मात्र त्या काळामध्ये चित्रपट पाहत नव्हता किंबहुना चित्रपट पाहणे हे वाहियात वाया गेलेल्या लोकांचे काम आहे असेच या प्रस्थापित वर्गाचे मत होते त्याला या काळामध्ये बालगंधर्व आवडत होते यावरूनच काय ते स्पष्ट व्हावे
परंतु अचानक १९३०- ३५ नंतर हे थोडे थोडे बदलत गेले आणि अनेक ब्राह्मण लोक चित्रपटसृष्टीमध्ये आले आणि साहजिकच मग वैदिक युरेशियन चौकट आपोआप तयार झाली आणि या चौकटीमध्ये चुंबन घेणे बसत नसल्याने साहजिकच ते सांकेतिक पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक बनले दुसरी गोष्ट अशी होती की हळूहळू यानंतर चित्रपट पाहणे हा जो युरेशियन लोकांना गुन्हा वाटत होता किंबहुना हा एक टवाळ लोकांचा उद्योग आहे अशी त्यांची समजूत होती ती आता ओसरायला लागली होती आणि अनेक ब्राह्मणांना तर त्यामध्ये मिळणारा पैसा आकर्षित करू लागला होता साहजिकच सभ्य समजणारे ब्राह्मण लोक सुद्धा या व्यवसायात येऊ लागले त्यामुळे धारणा हळूहळू बदलली आणि युरेशियन जे प्रशासनात आले होते ते आता थेटर मध्ये सुद्धा थेट आले चोरून चोरून येण्याची आता गरज उरली नाही यांना सुद्धा हा चुंबन घेण्याचा प्रकार मानवणे शक्यच नव्हते आणि याचा परिणाम म्हणून साहजिकच मग स्वातंत्र्यानंतर चुंबनदृष्ट्यांच्या वर सेन्सरशिप या लोकांनी आणली आणि हे सर्व काही व्यक्त करण्याचे टिपिकल मध्यमवर्गीय संकेत व्यक्त होऊ लागले .
पण प्रश्न असा होता की हे सर्व किती काळ टिकणार होते कारण हळूहळू का होईना पण १९७० नंतर पुन्हा एकदा शैव बहुजन लोकांचा कमबॅक झाला विशेषत: शोले या चित्रपटापासून हा जास्तच झाला कारण यामध्ये भगवान शंकर होते आणि त्यांच्या पुढे धर्मेंद्र बिनधास्तपणे गोष्ट बोलत होता आणि हेमामालिनी सुद्धा आपल्या लग्नाबद्दल थेट बोलत होती आणि हे थेट बोलणे बहुजन परंपरेला शोभेल असे चक्क शंकराला उद्देशून होते . असेच थेट बोलणे नंतर दिवार मध्ये अमिताभ बच्चन चे होते हळूहळू एक पीठातला (ज्याला पिटातला असे हिणवले गेले )प्रेक्षक ज्याला म्हटले जाते असा बहुजन शैव प्रेक्षक तयार झाला आणि साहजिकच अधिक मोकळीक त्याच काळामध्ये येणे थोडे अधिक सोपे झाले यामध्ये एक वाटा सर्व परंपरेमधून आलेल्या कपूर खानदानाचा होतं मुळात त्यांच्या प्रोडक्शनचा चिन्ह समूह हाच एक शिवलिंग सादर करत होता आणि या शिवलिंगाला पृथ्वीराज कपूर अर्पण करत आहेत असा हा प्रकार होता साहजिकच पहिल्या चित्रपटापासून हे लोक वेगळे होते आणि नंतर बरसात मध्ये नर्गिस बिकनी घालून आली. म्हणजेच एक परिणाम म्हणजे राज कपूरचे अधिक मोकळे पिक्चर चित्रपट आधीच आले होते आणि आता ते अधिक मोकळी होणार होते . त्या काळात ह्या बिकनी दृश्यावर खूप टीका झाली होती कारण बिकनी सहन करणे युरेशियन परंपरेला शक्यच नव्हते परंतु राज कपूरचा प्रॉब्लेम तेव्हा झाला जेव्हा मेरा नाम जोकर पडला आणि साहजिकच आपण मोकळे ढाकळे होणे बरे नव्हे असे खुद्द राज कपूरला वाटायला लागले मुख्य म्हणजे खरा प्रश्न गीत आणि संगीत यांच्या बाबतीत झाला. कारण यापुढे बॉबी चित्रपटासाठी जे काय करायला तो निघाला होता ते फार मोकळे आणि स्वतंत्र होते ही एक अशी टीनेज लव स्टोरी होती जी आत्तापर्यंत बॉलीवूडच्या पडद्यावर आली नव्हती आणि साहजिकच इथे बऱ्याच गोष्टी मग बदलल्या यातील सर्वात मोठा बदल म्हणजे गीतांच्या रचना पारंपारिक चालणार नव्हत्या म्हणजे उर्दू पद्धतीतील टिपिकल मुस्लिम असणाऱ्या अशा शेरोशायरीतल्या चालणाऱ्या नव्हत्या त्यामुळे प्रथमच राज कपूर याने गीतकार बदलला आणि या गीतकाराने एक वेगळा टीनेज फील आणला या मधले सर्वात गाजलेले गाणे होते,
"बाहर से कोई अंदर न आ सके
अंदर से कोई बाहर न जा सके
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
हम तुम एक कमरे में बंद हो
और चाबी खो जाए
हम तुम एक कमरे में बंद हो
और चाबी खो जाए
तेरे नैनों की भूलभुलैया
में बॉबी खो जाए
हम तुम एक कमरे में बंद हो
और चाबी खो जाए"
या गाण्याला राज कपूर ने एक स्वातंत्र्य घेतले होते हे गाणे स्वतंत्र होते. एक प्रकारचा उनमुक्तपणा यामध्ये होता आणि साहजिकच तो नवीन पिढीला आवडला आणि तो इतका आवडला की हे गाणे वार्षिक बिनाका गीतमालेमध्ये दोन नंबरला आले होते पहिले गाणे यारी हे इमान मेरा होते आतली गोष्ट अशी होती की हे गाणे पहिले येऊ नये अशी सर्वांचीच इच्छा होती कारण त्यामुळे संपूर्ण बॉलीवूडची मुळे हादरली असते आणि अनेकांना असे वाटत होते की कदाचित संपूर्ण भारताचीच मुळे हल्ली असते त्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे त्यात पहिल्या नंबरच्या गाण्यापेक्षा लोकप्रिय असून सुद्धा त्याला जाणीवपूर्वक दुसरा नंबर दिला गेला.
या गाण्यामुळे बरेच काही बदलले मुख्य म्हणजे कमर्शियल फिल्म्स मध्ये यानंतर मग चुंबन सेट होत गेले आणि हळूहळू चुंबन दृश्य वाढत गेली आणि त्या पुढचेही काही येऊ लागले राम तेरी गंगा मैली मध्ये हे प्रचंड प्रमाणात दिसते
आपण जर का हे गाणे पाहिले तर ते पद्यात्मक असलेले गद्यात्मक आहे असे लक्षात येते मोकळी घेण्यासाठी कदाचित आनंद बक्षी यांना ते करणे गरजेचे वाटले असावे आणि त्यांनी पूर्वी अच्छा तो हम चलते है या गाण्यांमध्ये ही कमाल केलीच होती .
यातून मग अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातील एक मूलभूत प्रश्न म्हणजे हे जे काव्य होते गीत होते हे प्रत्यक्षात जवळजवळ गद्याला जाणारे होते म्हणजेआगे हो घनघोर अँधेरा
बाबा मुझे डर लगता है
पीछे कोई डाकू लूटेरा
हम क्यूँ दर्रा रहे हो
आगे हो घनघोर अँधेरा
पीछे कोई डाकू लूटेरा
ऊपर भी जाना हो मुश्किल
नीचे भी आना हो मुश्किल
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो
हम तुम कहीं को जा रहे हो
और रास्ता भूल जाए
किंवा पुढे
हम तुम एक जंगल से
गुज़रे और शेर आ जाए
शेर से मैं कहूँ तुमको
छोड़ दे मुझे खा जाए
आता यामध्ये शेर आ जाय तो मै शेर से कहूंगी तू मुझे खा जाये वगैरे सर्व काही गद्य होते
आणि यातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सांकेतिक हे नेहमी काव्य असते का किंवा काव्य हे नेहमी सांकेतिक असते का जेव्हा समाजामध्ये ज्या गोष्टींना मोकळीक नसते त्या गोष्टी व्यक्त करण्याचे कविता हे माध्यम आहे का आणि मग जेव्हा मोकळीक मिळते तेव्हा आपोआपच काव्य गद्यात्मक बनत जाते का ? गजलांच्या सारख्या काव्य प्रकारामध्ये तर हा टोकाचा वाद होऊन बसलेला आहे कारण गझल का पुढे सरकत नाही तर ती सांकेतिक असण्यातच धन्यता मानते त्यामुळे मी जेव्हा संभोग घे अशा प्रकारचा अंत्य यमक हा प्रकार आणला तेव्हा तो प्रचंड बोल्ड वाटला आणि अशा प्रकारची अंत्ययामक तू वापरू नकोस असे सांगणारे लोक आले आता इतक्या थेट परिभाषेत बोलावे की नाही एवढे ऊनमुक्त व्हावे की नाही असा एक मोठाच प्रश्न यातून निर्माण झाला याचे कारण असे होते की मुळात एका बाजूला दिलीप चित्रे यांच्यासारखे कवी येत होते जे स्पष्टपणे आणि स्वच्छ पणाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शरीर संबंधांना व्यक्त करत होते आणि गजल लिहिताना मात्र हे सर्व टाळावे असे सांगणारे अनेक पारंपारिक सुरेश भट टाईप लोक होते यातला सर्वात मोठा विरोधाभास हा होता की यातले काहीजण खाजगी मध्ये बिनधास्तपणे एडल्ट आशय पाहत होते हे एकाच अर्थाने डबल स्टॅंडर्ड होते दुटप्पीपणा होता यामागे नेमका गोंधळ काय होता गोंधळ हा होता की कवितेने मात्र सांकेतिकच राहिले पाहिजे असा संकेत हे लोक सुचवत होते आता हे कसे काय शक्य होणार? शेवटी कविता ही जर का तुमच्या समाजाचा आरसा असेल तर ती समाजाला व्यक्त करताना आपोआपच अभिव्यक्ती बाबत अधिकाधिक उन्मुक्त आणि मुक्त होत जाणार स्वतंत्र तर किमान होणार . दरवेळेला सांकेतिक सांकेतिक कसे काय चालेल?
आता हाच प्रश्न जर का आपण जनरल नरवणे यांच्या उदाहरणाबाबतीत घेतला तर वेगळ्याच गोष्टी दिसायला लागतात कारण एक संकेत तर साफ आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा लष्कराच्या बाबतीत बोलता तेव्हा आणि तुम्ही जर का ऑफिसर असाल तर सरकारची अनुमती घ्यावी लागते प्रश्न असा आहे की ही अनुमती घेतली आहे की नाही आणि जर काही अनुमती आधीच घेतली असेल आणि आता ते पुस्तक पब्लिकेशन मध्ये गेले असेल तर मग त्या पुस्तकाचे करायचे काय ? याचे कारण काही संकेत हे कायदेशीर असतात ते सर्वांनीच पाळले पाहिजे परंतु आता इथे हा संकेत पाळून जर का पुस्तक प्रकाशानाच्या दालनात गेले असेल तर साहजिकच अनुमती काढलीच असणार त्यामुळे आता अनुमती दिल्यानंतर प्रश्न काय निर्माण झाला ? अनुमती देतानाच का हे पुस्तक आडवले नाही ?
मला असे दिसते की एक प्रश्न नक्की भाजपाच्या बाजूने आहे तो म्हणजे हे पुस्तक आध्याप प्रकाशित झालेले नाही आणि सदनामध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाची चर्चा झाली पाहिजे . प्रत्यक्षामध्ये खरोखर हा संकेत आहे का आणि मुख्य म्हणजे आता हे जे सांकेतिक आहे त्याला मोकळीक द्यावी की नाही द्यावी ? कारण असे असते की एकदा का संकेत मोडला तर कोणीही उद्या प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या पुस्तकाचे पॅराग्राफ किंवा प्रकरण संसदेमध्ये घेऊन येईल आणि यातून नेमके काय होईल हे सांगता येत नाही आणि माझ्या मते भाजपच्या काही लोकांचा मुद्दा हाच होता की पुस्तक प्रकाशित झालेले नाही म्हणून बोलू नका मला वाटते की याबाबतीत सर्वात उत्तम गोष्ट हीच होती की राहुल गांधींनी हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत वाट पाहायला हवी होती आणि उलट हे पुस्तक ताबडतोब कसे प्रकाशित होईल हे पाहायला हवेत पण संयम नावाची गोष्ट असावी लागते ती राहुल गांधी यांच्याजवळ नाही किंबहुना त्यांचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे . तुम्ही जेव्हा भाजप विरोधात उभे राहतात तेव्हा तुम्हाला अधिक मॅच्युरिटी दाखवावी लागते जर काही पुस्तक प्रकाशित होऊन मार्केटमध्येच आले असते आणि प्रकाशनानंतर दोन दिवसांनी तुम्ही जर का हा मुद्दा आणला असता तर कदाचित तो अधिक प्रभावी तर झालाच असता परंतु जो आक्षेप आता घेतला गेलाय तो घेतला गेला नसता घेता आलाच नसता आणि समजा आता जर का खरोखर राहुल गांधी यांनी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर हे सर्व आणले असेल तर भाजपला विरोध करण्याचे काही कारणच नाही . उलट मग या मुद्द्यावर खुली चर्चा होऊ शकते जर संसदेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य नसेल आणि बोलणारा वक्ता स्वतंत्र नसेल तर मग संसदेचा कारभार करणेच अशक्य होईल . पण त्याचबरोबर हेही खरे की हे सर्व जे झालेले आहे त्यामध्ये काही कायदेशीर सांकेतिक पार पाडले आहे की नाही आणि हा प्रश्न कोणी विचारातच घेत नाही . गोष्टी या नेहमीच गुंतागुंतीच्या असतात एक गोष्ट मात्र नक्की आज ना उद्या या संदर्भात मोदी यांना उत्तर द्यावे लागेल.
याबाबतीत काही लोकांनी नेहरूंच्या काळामध्ये मेनन्यांचे उद्योग पुढे आणलेले आहेत तसे आणायला हरकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजेकी उलट त्यामध्ये नेहरू यांना क्लीन चीट मिळते कारण खरोखरच मेनन यांनी नेहरूंच्या पर्यंत सर्वच्या सर्व संकेत सर्वच्या सर्व वॉर्निंग पोहोचवल्यास नव्हत्या असे इथे दिसते त्यामुळे नेहरू यांच्यावर आत्तापर्यंत तुम्ही जे टीका करत होता तिला काहीच अर्थ नाही उरत उलट हा सगळा दोष आता मेनन्यांच्या डोक्यावर फोडून काँग्रेस कधीही मोकळी होऊ शकते . आता हा डाव्या विचारसरणी असलेल्या माणसाचा चीनवर असलेल्या प्रेमामुळे घडलेला उद्योग आहे का ? तर ते तसेच आहे किंबहुना डावे लोक जे बदनाम झाले त्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की त्यांचे आजही चीनवरचे हे प्रेम नष्ट झालेले नाही . खरे सांगायचे तर भारतीय कम्युनिजम नावाची एक गोष्ट व्यवस्थित निर्माण करायला हवी आणि हे मी १९८२- ८३पासून सांगतोय पण एकंदरीत परधार्जिणेपणाच इतका आहे की बोलता सोय नाही . आणि यानेच या प्रकरणांमध्ये मेनन यांचा घोळ केला आणि संपूर्ण देशाला हे एकतर्फी झालेले आक्रमण सोसावे लागले. जर का आधी वॉर्निंग मिळाली असती तर कदाचित या युद्धाचा निकाल वेगळा ही लागला असता.
थोडक्यात काय प्रत्येक वेळेला सर्व काही सांकेतिकच होईल असे अपेक्षा आपण कधीच करू नये कारण कुठला ना कुठलातरी मनुष्य बंडखोर असतो किंवा मूर्ख तरी असतो आणि तो सांकेतिकता डावलून थेट सार्वजनिक जीवनात येतोच येतो . त्याची चिन्हसृष्टीमध्ये अभिव्यक्ती होतेच होते अशावेळी हा सर्व प्रकार नीट समजून घेणे आवश्यक आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment