डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल : क्रिया

 लोक प्रामाणिक उरलेले नाहीत 

आणि त्यांना संपूर्ण प्रामाणिकपणा नको आहे 


असे लोक कोणाच्याही वाट्याला न येवो 


जर तुझ्या वाट्याला ते येतील 

तर तुला दुप्पट खोलवर प्रामाणिकपणा जपावा लागेल 


लोकांनी जंगलचा कायदा 

बागेत आणलाय 


रानटी वाटणारे गुलाब आता घरगुती वाटतात 

आणि काट्यांनी चावतात 


फळे तर फक्त विकण्यासाठीच उगवली जातात 


निसर्गाची कोणाला पडलीये ?

हे ते भुक्कड लोक आहेत 

ज्यांना निसर्ग चरायचा आहे 


सिमेंट आणि झाड यांच्यापैकी 

 सिमेंट निवडणारे लोक 


असे लोक कोणाच्याही वाट्याला न येवो 


यांना शक्य असते तर यांनी सर्व नोकर सिमेंटचे बनवले असते 


सभ्य दिसतात याचा अर्थ गुलामगिरीतून बाहेर पडले असे नाही 


जे लोक देवांना बनवतात 

ते माणसांना काय सोडणार ?


ज्यांना श्रीकृष्ण आदर्श वाटतो 

त्यांना खांडव वन जाळताना मजा येते 


असे लोक जंगलातून पळणाऱ्या माणसांना 

नाग म्हणतात 

यज्ञात टाकतात 


संस्कृत भाषेतून क्रौर्य व्यक्त केलं म्हणून ते थोडंच सभ्य होतं ?


तुला अशा लोकांच्यात राहून मोक्ष मिळवायचाय


त्यांच्या हितसंबंधांच्या आड गेलास 

तर हे तुलाच अप्रामाणिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील 

तुझ्याच नावाने आरोपांचा गुलाल उधळतील 


तुला तरीही ध्यानात पक्के उभे राहायचे आहे 


एक स्टेप तर उरलीये 


एका हनुमान उडीची गरज 

परज 


स्वतःचेच काळीज फाडून बाहेर ये 


मुक्त होशील 


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल : क्रिया या काव्यफायलीतून)

ज्यांना सुधारायचं आहे 

त्यांना लांब ठेवून 

सुधारक त्यांना सुधारायला बघतात 

आणि ज्यांना सुधारायचं नाही ते 

त्यांचा लॉन्ग डिस्टन्स कॉल घेतच नाहीत 


टेलिफोन तुटलेत 

संवाद आटलेत 

आख्खे समुद्राच्या समुद्र डोक्यावरून चाललेत 


आणि तरीही सुधारक आहेत की लॉंग डिस्टन्स कॉल करायचे सोडत नाहीत 


त्यांना वाटते की ते नवीन टेक्नॉलॉजी युक्त आहेत 

कारण ते मुक्त आहेत 


प्रत्यक्षात ते आभाळात राहतात 

जमिनीवरची विषमता पाहतात 


त्यांचा पोटात पाऊस नसलेला ढग होत चाललाय 

हे सुद्धा त्यांना कळत नाही 


ते ढगाची पॅन्ट घालतात 

आणि ढगात हिंडतात


आता काय यक्षाने येऊन 

यांचा सुधारकी संदेश ढगामार्फत पोहोचवावा ?


मी ढग नाही 

मी थेट ज्यांना सुधारायचं आहे त्यांच्यात उतरतो 


तुम्हाला वाटतं मी बिघडलोय 

पण मी खरे तर तुमच्यापेक्षा जास्त सुधारलोय 


कारण मी लॉंग डिस्टन्स कॉल लावत नाही 

मी थेट सनातन लोकांशी बोलतो ज्यांना सुधारणे आवश्यक आहे 


तेव्हा तुम्ही राहा ढग पिकवत 

आणि ढगांना पॅंटी चढवत 


मी चाललो माझा पाऊस घेऊन 

जमिनीवर वर्षायला 


श्रीधर तिळवे नाईक 


( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : क्रिया या काव्यफायलीतून)

तुम्ही पंढरीनाथाला 

विठ्ठल केले 

वैष्णवांनी विठ्ठलाला कृष्णरूप केले 


तुम्ही म्हणालात 

विठ्ठल देशी आहे 

आणि त्यांनी कृष्णाला विठ्ठल रूप केले 


शेवटी 

विठ्ठल कृष्ण राहिला नाही 

फक्त कृष्णच उरला 


आता विठ्ठल चालत नाही 

सर्वत्र कृष्ण चालतोय 


आणखी काही दिवसांनी कदाचित 

राम चालेल 

आणि मग विष्णूचा रास्ता 

आसान होईल 


तुम्हाला काय होईल याचा कधीच अंदाज येत नाही 

शेवटी फक्त आपल्या देशात राहणाऱ्यांची हीच शोकांतिका असते 


ते कोणती अंडी उबवत आहेत हे त्यांना कधीही कळत नाही 


तुम्हाला अरब जगतात काय झाले ते कळाले नाही 

आणि शेवटी तुम्ही पराभूत झाला 


तुम्हाला युरोप देशात काय चालले

ते कळाले नाही 

आणि शेवटी तुम्ही पराभूत झाला 


आता सर्वत्र वैष्णवांचा धर्म 


आता सर्वत्र हळूहळू येणारे राम मंदिर 


घोषणा झालीये 

आंदोलन सुरू होईल 


मला याचे दुःख नाही 

की माझा नाथ पंढरीनाथ 

तुमच्यामुळे वैष्णव झाला 


मला याचे दुःख आहे 

आता पुन्हा एकदा तुमच्यामुळेच 

या देशात पेशवाई येणार आहे 


उलट्या पावलाने चालत येणाऱ्या भुताचा आवाज 

मी ऐकतो आहे 


( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल: क्रिया या काव्यफायलीतून)

तिळवे भांडार मधील स्वगत : एक



खरेदी करताना फक्त खरीदणे असावे

विक्री करताना फक्त विकणे 

म्हटले तर सोपे 

नाहीतर खूप अवघड 


बरे झाले माझी साधना तुझ्यासारखी आरंभापासून सुरू नाही 



मी आयुष्यभर शिव्या घातल्या तुला 

व्यापार सोडलास म्हणून 

आणि आता व्यापार करताना 

काय काय अशक्य आहे 

त्याचं वजन घेत 

पाठीच्या कण्यात वाकत 


मोक्ष आणि तराजू यांच्यातला समतोल कसा साधावा 

ते मला कळत नाही 


तुलाधराच्या कथा आम्हाला काल्पनिक वाटल्या 

पण तू तर खराखुरा होतास 


शिवाजी महाराजांनी किल्ला सोडावा 

तसा तू व्यापार सोडलास 


हे जग जर मिर्झाराजे जयसिंग बनत येत असेल 

तर लढणाऱ्याने कसे लढावे?



माया म्हणजे आग्रा 

औरंगजेब वारंवार दरबारात बोलवतोय 

आणि मला कळत नाही 

हा मायेचा दरबार कसा हाताळावा 


कोणी पाच हजारी देतोय 

कोणी दहा हजारी 


मोहाचे क्षण वारंवार येतायेत 


एकीकडे ढासळत चाललेला व्यापार 

आणि दुसरीकडे सरंजामदार 


स्वतःतच वतन खालसा करत जाण्याची ही जीवनशैली 


माझा बाप म्हणतोय 

शेवटी माझा सासराच खरा झाला 

मला कळतच नाही तुला हँडल कसा करावा ?


निदान आय ए एस हो 

म्हणजे नोकरी करता करता 

तुला जे करायचं आहे ते करायला मोकळा 


शेवटी नोकरीमध्ये आणि शेतीमध्ये काय फरक पडलाय 

प्रामाणिक नोकरासाठी 


लाच तर तू घेणार नाहीस 

निदान स्वतः पुरता तरी कमावशील 

आणि साधना ही करशील 


त्याच्याजागी तो बरोबर आहे 


कुठल्या बापाला चिंता वाटत नाही 

त्यालाही वाटते 


मी खरे तर फार अवघडत चाललोय 


माझ्या मित्रांशी 

मी या विषयावर काही बोलत नाही 

गप्प राहतो 


तू जर जिवंत असतास तर तुला सल्ला विचारला असतास


कदाचित तू म्हणाला असतास 

व्यापार सोड नांगर पकड 


पण नांगर पकडायला तरी कुठे वाव आहे या इंडस्ट्रियल युगात 


जिथे व्यापार सुद्धा धोक्यात 

तिथे नष्ट होणाऱ्या मालाला काय मोक्ष देणार ?


शेती करून साधना करण्याचे दिवस संपले महाराजा 


आणि कदाचित तुझ्याच युगात 

व्यापार करून मोक्ष मिळवण्याचे दिवस संपले होते 



मी अभ्यास करतोय 

कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा 

पण अचानक 

माझे मोहाचे क्षण मला आरशासारखे दिसायला लागतात 

आणि माझा चेहरा तुकड्या तुकड्यात फुटून जातो 


हे शून्याचे आरसे 

तसे खूप घातक 

जगायला ही देत नाहीत 

मरायला ही देत नाहीत 



मला माहित नाही मी पोहोचणार की नाही 

कदाचित पोचणारही नाही 


हे कोल्हापूर 

व्यापाराला कधीच पूरक नव्हतं 

लोकांना उधारी ठेवायची लागलेली सवय 

आणि आता ओरिजनल वाटाव्यात अशा सगळीकडे डुप्लिकेट्स 


ओरिजनल महागड्या 

डुप्लिकेट स्वस्त 


आता लोकच इतके स्वस्त झालेत 

की डुप्लिकेट खरेदी करायला लागलेत 


स्पर्धा इतकी ही जीवघेणी असू नये 

की लोक स्वतःच्या जीवावर उठावेत 

आणि नकली मालावर धंदा करणाऱ्यांना त्यांनी प्रॉफिट उपलब्ध करून द्यावेत 


विवेक रसातळाला गेलाय लोकांचा 


समजावून सांगायला गेले 

तर विचारतात 

कशावरून तुम्ही खरे 


ज्यांना टेस्ट वरून ओळखता येत नाही 

ओरिजनल काय आणि डुप्लिकेट काय 

तिथे अस्सलतेचा व्यापार तरी करणार कसा 


शेतीचे एक बरं असतं 

तिथे डुप्लिकेटचं पिक काढता येत नाही 


कदाचित तू त्यामुळे शेतीकडे वळला असशील 


मी कोल्हापुरात बसून गावच्या जमिनीचा अंदाज घेतोय 


मला तिच्या फक्त आत्महत्या ऐकू येत असतात 


तिच्या आत्महत्येत उडी मारू ?

की डुप्लिकेट चुकवून 

ओरिजनल मध्ये जीव देऊ ?


मोक्षाचे प्रश्न कधीच कुठल्या युगात साधे नसतात 


याही युगात नाहीत 


तू समोर बसून मोरासारखा नाचतोयस 


आणि मी या वाळवंटात 

सिलिकॉन डान्स करत 

करपत चाललोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : क्रिया या काव्यफायलीतून)

मी सत्याला पाठिंबा देतो पक्षाला नाही 

मी मोक्षाला पाठिंबा देतो पक्षाला नाही 


तुम्ही विभागता माणूस राजकारणामध्ये 

मी माणसाला पाठिंबा देतो पक्षाला नाही 


माझे काम आहे काय भले आहे 

शोधणे 

मी भल्याला पाठिंबा देतो पक्षाला नाही 


तुम्हाला वाटते मी खूप चंचल आहे 

मी वाहत्याला पाठिंबा देतो पक्षाला नाही 


तुम्ही बनवत रहा स्वतःचा कठोर पाषाण 

मी काळजाला पाठिंबा देतो पक्षाला नाही 


(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅट्यागरीकल : क्रिया या काव्य फायलीतून)


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय