मोक्ष : मुद्रा
मोक्षाच्या परमोच्च शिखरावरून श्रीधर तिळवे नाईक
१
शेवटी तुम्ही तिथेच पोहचलाय
जिथे सर्वजण पोहचले होते
फ्रस्टेशन
कळवळ्याची प्रत्येक ट्रेन इथेच पोहचते आणि कावळा होते
मोक्ष हा ऑफेन्स आहे कि डिफेन्स ?
शेवटपर्यंत कळत नाही
मोक्षाच्या बॉलला गोलमध्ये कन्व्हर्ट केलं एवढाच आनंद
इतरांनीही खेळून हा आनंद मिळवावा ही अपेक्षा अवाजवी
लोक सुधारायचे असते तर कधीच सुधारले असते बुद्धाच्या युगात
पण लोकांनी त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या गणावर त्याला नमस्कार करून आक्रमण केले
तिथे तुम्ही कोण ?
२
जे आहे ती उदासी नाही मी जाणतो
पण आनंदाचं झाड एकट्यातच सळसळत असावं ?
नव्या बातम्या शिळे दिवस कागदात बांधून घेऊन येतात
हे आसक्तीकरण आहे
भुका तृष्णा आणि निकड
ह्यांचं आपण काय करू शकतो ?
३
कोण बुद्धिस्ट कोण सॅडीस्ट कोण न्यूडिस्ट
नग्न उपस्थितीही कपड्यात लागते लोकांना
म्हणून तर देवांना सुद्धा कपडे नेसवतात लोक
न्यूरॉसिस पोझ घेऊन सर्वांना प्रपोझ करतायत
जो शहाणा तो आऊटडेटेड
४
प्रेमाची भीती वाटायला लागलीये लोकांना
द्वेष त्यांना सेफ वाटतोय
५
जुन्या शरीरांनी काढलेले फतवे सर्वत्र जारी
प्राचीनच भारी आणि भरजरी
गुलाबांच्यात प्रोफेशनल घंटा वाजतायत
आणि गहनता गवतात चरतीये
दरवेळी जगाचा एन्ड कसं म्हणणार
मला खात्री आहे
जेव्हा खराखुरा शेवट येईल
तेव्हा लोक झोपलेले असतील
आणि स्वप्नातल्या स्वप्नात
त्यांना परमेश्वर उठवण्याची
वाट पाहतील
६
तेव्हा ज्या स्टेशनवर आहेस ते स्टेशनही एन्जॉय कर
आपलं काम आहे मोक्षाविषयी बोलणं
बाकी कान आणि हृदय निसर्गाने वेगळे केलेत हे स्वीकार
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरींजमधील मुद्रा ह्या काव्यफाईलीतून )
Comments
Post a Comment