शैव श्रुती

 सिद्ध बोलत का नाहीत श्रीधर तिळवे नाईक 


सिद्ध बोलत का नाहीत हा प्रश्न अनेकदा मला विचारला गेलेला आहे याचे कारण अर्थातच अनेकदा ओशो रजनीश्यांचे अनुयायी असतात. ते जैन पद्धतीने विचार करणारे असतात किंवा बौद्ध पद्धतीने विचार करणारे असतात . साहजिकच ते त्या परंपरेत राहून मला प्रश्न विचारत असतात यातील जैन परंपरेची मांडणी ओशो यांनी केलेली आहे. 


जैन परंपरेमध्ये साधारणपणे पाच कॅटेगरीज आहेत १उपाध्याय: ज्यांना स्वतःला काहीच माहित नसते पण तरीही जे शिक्षक म्हणून काम करतात २ आचार्य: हे फक्त शिक्षक असतात पण प्रत्यक्षात त्यांचा मोक्षाच्या साधनेशी फारसा संबंध नसतो पण त्यांनी उपाध्यायांच्या पेक्षा जास्त वाचलेले असते त्यांचे तत्त्वज्ञान फार पक्के असते ३ साधू : हे साधक यांच्यापेक्षा पुढे असतात परंतु त्यांना मोक्ष मिळालेला नसतो ४ सिद्ध :यांना मोक्ष मिळालेला असतो परंतु ते फारसे बोलत नाहीत आणि ५ अरिहंत :यांना मोक्ष मिळालेला असतो आणि ते मोक्षावर बोलतात सुद्धा !


यातील सिद्ध बद्दल जी त्यांची व्याख्या आहे ती जैन परंपरेने आणि बौद्ध धर्मानेच फार पुढे न्हेली आहे जेणेकरून शैव श्रुतीचा काटा निघावा याचे कारण उघड आहे हे धर्म जेव्हा स्थापन झाले(साधारण इसवी सन पूर्व सहाव्या शतकात) तेव्हा त्यांच्यापुढे सर्वाधिक प्रस्थापित असलेला धर्म हा प्रामुख्याने शैव होता लोकशैव होता किंवा वैदिक होता किंवा ब्राह्मण धर्म होता. पण यांची खरी स्पर्धा ही लोकशैव धर्माशी होती .त्याला या लोकांनी अनारिय म्हटलेले आहे साहजिकच स्पर्धेबाबतीत जे होते तेच इथे घडलेले आहे कारण शैव लोकांच्यात ह्या कॅटेगरीज वेगळ्या आहेत आणि त्यांचाच प्रभाव जैन आणि बौद्ध धर्मावर आहे. 

या शैव कॅटेगरीज पुढील प्रमाणे १ पंडित यांना सर्व तंत्रे किंवा किमान दहा तंत्रे माहिती असतात परंतु त्यांचा प्रत्यक्ष साधनेशी काही फारसा संबंध असत नाही ते शैव धर्माचा अभ्यास करतात त्यामुळेच जो शैव तंत्रांचा अभ्यास करतो आणि प्रचार करतो तोच पंडित होय हे प्रचारक असतात आणि शिक्षक असतात २ साधक :हे प्रत्यक्ष साधना करायला उतरलेले असतात 

३ साधू: हे सविकल्प समाधी पर्यंत पोहोचलेले असतात परंतु मोक्ष मिळालेला नसतो त्यामुळे हे अनेकदा फारसे पब्लिकमध्ये बोलत नाहीत 

४ आचार्य : हे सविकल्प समाधी पर्यंत पोहोचलेले असतात परंतु ते पब्लिकमध्ये व्याख्याने देत असतात खुद्द रजनीश यांनी स्वतःला आचार्य रजनीश असेच म्हटलेले होते आणि 


५ सिद्ध हे मोक्षाला उपलब्ध झालेले असतात आणि हे बोलतात. प्रश्न असा आहे की मग हे जैन धर्माच्या भाषेत अरिहंत किंवा बौद्ध धर्माच्या भाषेत बुद्ध असूनही यांच्याबद्दल ते बोलत नाहीत अशी अफवा कोणी पसरवली ? तर ही अफवा जैन लोकांनी आणि बौद्ध लोकांनी पसरवली खुद्द आचार्य रजनीश यांनी सुद्धा अशीच व्याख्या केलेली आहे . कारण शेवटी ते जैन परंपरेत उभे आहेत. प्रत्यक्ष मध्ये फरक हा आहे की सिद्ध लोकांनी कधी धर्म स्थापन केला नाही याला अपवाद नकुलिश किंवा मच्छिंद्रनाथ किंवा बसवेश्वर यांच्यासारखे लोक आहेत. यांनी धर्मसुद्धा स्थापन केला आणि हे धर्म पाशुपत धर्म , नवनाथ धर्म किंवा लिंगायत धर्म म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. इतर कुठल्याही श्रुतीपेक्षा शैव श्रुतीमध्ये सिद्धांची संख्या प्रचंड आहे आणि अनेकदा त्यामुळे मौन पाळणाऱ्या सिद्धांची संख्या ही इतकी वाढलेली असते की सिद्ध ही संकल्पनाच आणि सिद्ध मौन आहेत असेच वाटते शिवाय अनेकदा ज्येष्ठ सिद्ध जे सांगतात ते ऐकले जाते म्हणजे उदाहरणार्थ शैवांच्या वतीने सद्गुरूंनी जगाच्या प्लॅटफॉर्मवर बोलले पाहिजे हे कळत नकळत राजर्षी महाराजांनी सुचवलेले होते आणि सर्व सिद्धांनी त्यांच्या सिनीयारीटीचा मान ठेवत या संदर्भामध्ये मौन पाळलेले आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी सिद्ध पाहिलेले आहेत अगदी आदिवासी लोकांच्यातसुद्धा एक सिद्ध मी पाहिलेला आहे . मुळातच मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर कशाला बोलायचे असा प्रश्न उभा राहतो याचे कारण स्पष्ट आहे या जगामध्ये इतके धर्म झालेले आहे की आता आपण त्यात भर टाकावी असे वाटत नाही . शिवाय पुस्तक रुपात जेव्हापासून मोक्षाविषयीचे साहित्य सर्व लोकांना उपलब्ध होऊ लागले तेव्हापासून कळत नकळत सिद्ध लोकांची एक पॉलिसी अशी आहे की पुस्तकांमध्ये साधक होण्यासाठी आवश्यक असणारे मटेरियल उपलब्ध आहे त्यामुळे त्यासाठी प्रत्यक्ष सिद्धाला भेटण्याची गरज नाही जेव्हा साधकाला अधिकच वैयक्तिक अडथळ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते तेव्हाच फक्त त्याला मार्गदर्शन करावे अशी गेल्या दोनशे वर्षातली सिद्ध लोकांची पॉलिसी आहे. त्यामुळे भाजी विकणारा सिद्ध हा आरामात भाजी विकतच आपल्या प्रपंच चालवत आरामात बसलेला असतो . किंवा बाईक दुरुस्त करणारा सिद्ध बाईक दुरुस्त करत मालकाला मालक म्हणतच आपले जग चालवत असतो . मी स्वतः या दोघांना भेटलेलो आहे म्हणून सांगतो. युरेशियशन श्रुतीमध्ये जसे प्रसिद्धी होणे प्रसिद्ध पावणे कळत नकळत जास्त आहे तसे शैव श्रुतीमध्ये नाही . जोपर्यंत साधू किंवा साधक आपल्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांना जाऊन स्वतः भेटणे हे सिद्ध लोक करत नाहीत . त्याला अपवाद फक्त विश्वाच्या ब्रम्हांडाच्या शिवांडाच्या संसाराच्या रिदम मधून जर का आज्ञा आली तर ! किंवा एखाद्याने तळमळून धावा केला असला तर ! अन्यथा सिद्ध त्यांचे जे फिल्ड असते त्या फिल्डमध्ये काम करत बसतात . ते इतके दैनंदिन जीवनातले अत्यंत रुटीन वर्क करत असतात की त्यांच्याबद्दल ते सिद्ध असल्याची शंका सुद्धा येऊ नये . जगात सर्वत्र थोडीशी झलक मिळाली तरी गाजावाजा करणारे लोक आता वाढत चाललेत त्याउलट सिद्ध शांतपणे आपल्या खोलीमध्ये बसून त्यांचे जे डेली आयुष्य असते ते जगत असतात . कधीतरी मग अपघात होतो आणि मालक असलेल्या माणसाला अचानक आपला नोकर सिद्ध आहे हे कळते आणि मग तो अर्थातच भक्त वगैरे व्हायला बघतो पण अनेकदा सिद्ध लोक मग त्या मालकाला उपदेश देतात आणि मग सोडून देतात तिथे पुन्हा थांबत नाहीत . अधून मधून लोकांना पुस्तके सुचवत राहतात . अगदीच जर का कोणी खरोखर तळमळीचा असेल तर मात्र त्याला व्यवस्थित आपल्या पंखाखाली घेतात . याबाबतीत शैव श्रुतीमध्ये आजही एक विलक्षण प्रामाणिकपणा टिकलेला आहे जो इतरत्र मला दिसत नाही . मी स्वतः सविकल्प समाधीत पोचल्यानंतर जेव्हा काही सिद्ध पुरुषांच्या कडे गेलो होतो तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की आमचा मार्ग तुझा मार्ग नाही . तू आमच्यापाशी थांबू नकोस. हा प्रामाणिकपणा मला इतरत्र दिसलेला नाही . म्हणजे ज्याला सविकल्प समाधी मिळालेली आहे असा मनुष्य सुद्धा थेट तू माझा शिष्य हो असे सांगतो अनेकदा तर सविकल्प समाधीचा पत्ता पण नसतो तरीसुद्धा स्वतःला गुरू समजणारे अति शहाणे लोक कॉलम लिहीत असतात आणि काही व्याख्याने सुद्धा देऊन बेस्ट सेलर बनलेले असतात . सिद्ध हे कधीच करत नाही कारण त्यांच्या श्रुतीमध्ये मुळात ते बसतच नाही . या सर्व गोष्टींच्या मुळे सुद्धा अलीकडे सिद्ध म्हणजे न बोलणारे बुद्ध न बोलणारे अरिहंत अशी प्रतिमा तयार झालेली आहे विशेषता जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ही प्रतिमा खूप प्रचलित आहे त्यांच्यामुळेच ती पुढे वैष्णव धर्मात पण प्रचलित झाली . म्हणजे जर का तुम्ही संपूर्ण वारकरी परंपरा बघितली तर तुम्हाला असे दिसेल की जवळजवळ प्रत्येक संताचा गुरु हा सिद्ध आहे आणि आश्चर्यकारकरीत्या तो शैव आहे . म्हणजे ज्ञानेश्वरांचे निवृत्तीनाथ किंवा एकनाथांचे जनार्दन! नंतरच्या लोकांनी हे हिंदू असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षामध्ये ते फक्त सिद्ध आहेत आणि शैव सिद्ध आहेत . ते विठ्ठलाचे वारकरी आहेत हा अपप्रचार आहे आणि तो नंतर झालेला आहे. आता संत इतके बोलतात लिहितात परंतु यांचे गुरु मात्र लिहीत नाहीत किंवा मोजकं लिहितात यांच्या नावावर अत्यंत भ्रष्ट काही लिखाण झालेले आहे परंतु ते त्यांनी लिहिलेले नाही . ती कोणाची घाल घुसळ आहे ते स्पष्ट आहे. अनेकदा तर हा प्रश्न येतो की खरोखर हे सर्व करण्याची गरज आहे का ? ज्याला पोहोचायच आहे तो कसाही तळमळून पोहोचतोच . त्यामुळे मदत मागितली जात नाही तोपर्यंत मदत करा कशाला ? अनेक सिद्ध लोकांना तो संसारामध्ये हस्तक्षेप वाटतो आणि हस्तक्षेप करायला सिद्ध तयार नसतात .


अलीकडच्या काळामध्ये मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मीडियाच मुख्य झाला आहे त्यामुळे बहुतेक सिद्धांना आता आपला आत्तापर्यंत चालत आलेला वसा मोडावा लागेल. याबाबतीत सद्गुरु यांनी अतिशय चांगले काम केलेले दिसते पण ते मुळातच आधुनिक आणि उत्तर आधुनिकतेच्या छायेखाली आहेत त्यामुळे शैव असण्याबरोबरच ते जास्त हिंदू आहेत. मुळातच राम आणि कृष्ण यांचे करायचे काय हा फार मोठा प्रश्न शैव लोकांच्या पुढे उभा ठाकला आहे. कारण मुळात हे शैव वीर होते पण वैष्णव लोकांनी त्यांना रामायण आणि महाभारतामध्ये आत्मसात करत विष्णूचे अवतार केल्याने त्यांचे काय करायचे हेच समजत नाही . विठ्ठलाचे सुद्धा असेच झालेले आहे हा मूळचा शैव सिद्ध ! पण वारकरी संप्रदायाने त्यांना पूर्णपणे वैष्णव बनवून टाकले आहे. यांना धरायला जावे तर वैष्णव व्हावे लागते आणि सोडावे तर ते शैव असल्याने सत्याचा त्याग केल्यासारखे होते . अशावेळी फक्त एकच गोष्ट सांगावी लागते ती म्हणजे हे मूळचे शैव आहेत . त्यांच्यावरूनच पुढच्या कथा आलेल्या आहेत आणि त्या जैन आणि बौद्ध धर्मात आपणाला दिसतात. किंबहुना जातक कथा हे पुराणच आहे फक्त ते बौद्ध लोकांचे असल्यामुळे कळत नकळत त्याला एक ऑथेंटिक जागा प्राप्त होते पण त्या कथा जर का नीट वाचल्या तर लक्षात येते की हे वास्तव पद्धतीने पण प्रत्यक्षात आभासी पद्धतीनेच रचलेले आहे. तिथेही राम आणि कृष्ण आहेत पण आश्चर्यकारकरीत्या याच धर्मांच्या मध्ये राम आणि कृष्ण यांना पापीही म्हटलेले आहे असे उल्लेख जैन आणि बौद्ध वाङ्मयात आहेत. प्रश्न असा आहे की मग ज्यांना पापी म्हटले ते कोण आहेत आणि त्यांची लोकप्रियता वाढत होती म्हणून मग तशा प्रकारची टीका त्यांच्यावर झाली पण पुढे ही लोकप्रियता तरीही कमी होत नाही म्हणून त्यांना सामावून घेण्यासाठी जैन धर्मातसुद्धा रामायण लिहिले गेले. आणि ते अतिशय विधायक पद्धतीने रामाला सादर करते . 


जेव्हा मग सर्वांचेच राम आणि कृष्ण पुढे यायला लागले तेव्हा त्यांना सामावून घेणे ही ब्राह्मणांची गरज बनली . अन्यथा कुठल्याही वेदांमध्ये रामाचा उल्लेख नाही कृष्णाचा उल्लेख नाही . जे आहेत ते नंतर घातलेले आहेत . साहजिकच सामावून घेण्यासाठी म्हणून पुढे रामायण आणि महाभारत ही महाकाव्य लिहिली गेली आणि मग त्यांना कसे सामावून घ्यायचे असा प्रश्न आला आणि त्यांना सामावून घेण्यासाठी देशी भाषेत सुद्धा अनेक प्रकारची रामायणे लिहिली गेली . सर्व सिद्धांना ऋषी आणि मुनी यांचा दर्जा दिला गेला आणि त्यांना हिंदू परंपरेमध्ये टाकत पचवले गेले . याचा एक परिणाम असा झाला की जे बोलतात ते ऋषीमुनी होतात सिद्ध राहात नाहीत . किंवा राहिले तरी अनेकांना वैष्णव करून टाकण्यात आले . अगदी कपिलांच्यासारखा सिद्ध सुद्धा मुनी किंवा ऋषी झालेला दिसतो. 


तरीही लोकांच्यामध्ये लोक धर्मामध्ये नवे नवे सिद्ध सळसळतच राहिले. 


याचा एक परिणाम असा झाला की मग ब्राह्मण धर्माने आपली स्ट्रॅटेजी बदलली त्याने शैव सिद्धांचे सर्व गड , सर्व आखाडे, सर्व मठ वेदांताच्या नावाने आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि आद्य शंकराचार्य यांना त्यासाठी शिवाचे अवतार म्हणून घोषित केले म्हणजे माणूस बोलतोय वेदांच्या बद्दल आणि डोक्यावर कपाळावर तीन पट्ट्यांचा अक्षांचा शिवनाम लावतो " मी शिवाचा अवतार असणाऱ्या आद्य शंकराचार्य यांचा अनुयायी फॉलोवर आहे" म्हणून सांगतो आणि सगळा प्रचार मात्र ब्राह्मण धर्माचा करतो वर्ण आश्रम धर्माचा करतो असा विरोधाभास निर्माण झाला आणि आपल्यापुढे अलीकडे हा विरोधाभास पुन्हा पुन्हा अत्यंत पद्धतशीरपणे सादर करण्यात येत आहे . हा गदारोळ इतका मोठा होत गेला आहे की हळूहळू सिद्ध दिसेनासे झाले . यदा कदाचित बाळूमामाच्या सारखे कोणी निर्माण झाले तर त्यांना ताबडतोब वैदिक परंपरेत पचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि पचवलेही गेले यामुळेच अलीकडे आ ह साळुंखे यांनी ब्राह्मण लोकांना धर्मात येण्यास मनाईच करा अशी मांडणी केली कारण कितीही प्रयत्न केला तरी ब्राह्मण शेवटी तुमच्या धर्मात येऊन तुमचा धर्म तुमचा विचार आपल्या नावाने करून बदलून टाकतातच तुमच्या धर्मात वर्ण जाती व्यवस्था आणतातच अशावेळी करायचे काय ? आ ह साळुंखे यांनी त्यामुळेच मग अत्यंत कडक विरोधी भूमिका घेतली . यानंतर खरे तर ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते पण ते राहिले बाजूलाच उलट आ ह साळुंखे यांनाच टार्गेट केले गेले . 


या सगळ्याचा परिणाम एकच झाला तो म्हणजे सिद्ध ही संकल्पना हळूहळू मौन होत गेली आणि आता ती मुख्य मीडिया मधून गायब झाल्यासारखी दिसते. सर्वच पत्रकारांना सिद्धांशी बोलायची लाज वाटते . आणि बोलायचे असेल तर ते अधिक हिंदू असलेल्या सिद्धांशी बोलतात . एका अर्थाने आत्ताचा मीडिया हा पूर्णपणे शैवविरोधी आहे आणि याचा विचार कधी ना कधीतरी सर्व लोकांना संघटित होऊन करावा लागेल कदाचित या मीडियावर बहिष्कार टाकावा लागेल अर्थात प्रत्यक्ष बहुजन जे आहेत ते मात्र त्याबाबतीत हळूहळू शहाणे होताना दिसतात . मीडिया त्यांच्यावर आपला ब्राह्मण धर्म किंवा वैष्णव धर्म हिंदू धर्माच्या नावाखाली लादण्याचा प्रचंड प्रयत्न करतो आहे पण सुदैवाने अजून तरी बहुजन समाज पूर्ण बिघडलेला नाही . 


त्यामुळेच आता सिद्धांनी केवळ बोलूच नये तर अति बोलावे . त्यांच्या न बोलण्याचा कॅटलॉग बराच आहे आणि तो आता भरून काढण्याची वेळ आलेली आहे. मुख्य म्हणजे शैव श्रुतीला एक शिस्त देणे आवश्यक आहे मी माझ्या परीने ही शिस्त देण्याचा प्रयत्न करतो आहे पण सर्वांनीच ती दिली पाहिजे अन्यथा सतत गेली हजार वर्षे शैव श्रुती गोंधळात आणि chaos मध्ये उभी केली गेली आहे . आता हे खूप झाले. आपण आता एक डिसिप्लिन द्यावी हे उत्तम अर्थातच ही डिसिप्लिन एकविसाव्या शतकाला अनुसरून असली पाहिजे. 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय