निर्वाणा पूर्वीच्या कविता
आजार देतोयस
तर आजार बरा करण्याची व्यवस्था तरी दे
आजाराला कशाला बाजार देतोस ?
उपचारात सुद्धा कसला भेद? परवडेबल आणि न परवडेबल
गरीब माणसाने काय अपटून आपटून
झीजवायची ?
गरीब माणूस काय श्रीमंतांनी पायात घालायची चप्पल आहे काय?
वापरली आणि फेकून दिली ?
आणि जर का हस्तक्षेप करायचाच नसेल तुला या व्यवस्थेत
तर जाळून टाक सारे धर्मग्रंथ
आणि दिलासे
तुझ्या जीवावर
काय काय मोठे होते आहे ?
तुझ्या नावाने होणारे हे शोषण
तुला दिसत नाही काय ?
की तुमचं तुम्ही निर्माण केले
तुमचं तुम्ही निस्तारा
इतका त्रयस्थ आहेस तू ?
असे असेल तर या भक्तीच्या गंगा कशाला वाहू देतोस
की तेही आमचेच कर्म आहे?
की फक्त मोक्ष हेच कनेक्शन ठेवले आहेस
तुझ्या हस्तक्षेपाचे ?
श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण सिरीजमधील निर्वाणा पूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
गुंड आले
याचे दुःख नाही
ते स्वतःसाठी आले नव्हते
याचे दुःख आहे
ते मला मारायला आले
याचे दुःख नाही
पण ते दुसऱ्यासाठी मारायला आले
याचे दुःख आहे
माणसांना जगण्यासाठी
माहित नसलेली माणसे मारायला लागत असतील
तर नेमका घोळ कुठे आहे?
मी मेलोही असतो आनंदाने
पण अचानक ते मारताना थकले
बहुदा मी प्रतिकार करत नाही
याचा त्यांना प्रॉब्लेम झाला
माझ्याकडे भयचक्कीत नजरेने पहात
मी जणू काय भूत आहे अशा स्टाईल मधले त्यांचे ते डोळे
मी विचारले ,"संपले?"
ते जागच्या जागी थीजलेल्या आवाजात म्हणाले , "तुम्ही कोण आहात"
मी म्हणालो ,"कुठल्याही व्यवस्थेला न परवडणारा माणूस "
श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण सिरीज मधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
दुर्दैव मी समजू शकतो
पण चहू बाजूंनी आणि इतकं ?
त्वचा काढून घेतलीस
डोळे बरबाद केलेस
पाठीचा कणा वाकडा केलास
दोन मांड्यांच्या मध्येच ऍसिड अटॅक करवलास
असा एकही भाग शिल्लक नाही ठेवलास
जिथे मी जखमी झालो नाही
आणि आता कानही?
माझी क्रिएटिव्हिटी दुसऱ्याच्या नावावर ऑस्कर पर्यंत पोहोचली
माझ्या काव्याच्या जीवावर
तिसरेच आंतरराष्ट्रीय झाले
प्रेयसी मित्राबरोबर पळून गेली
आणि जी बायको व्हायला आली
तिला तीन प्रियकर भेटले
आईला असहाय्य केलेस
वडिलांना जवळजवळ आत्महत्येपर्यंत नेलेस
सर्वात सद्गगुणी असलेल्या बहिणीवरच
विष प्रयोग टाकलास
आणि पोटगी देणाऱ्याने आयुष्यात एक रूपया सुद्धा दिला नाही
न्यायालयाचा आदेश म्हणजे वांजुटीचा कार्यक्रम
रडून रडून तिचे दुःख कोरडे झाले
आणि लोक म्हणाले वातड
भावांना स्टॅबिलिटी नाही
आणि कर्जांचे चढते डोंगर उतरवण्यासाठी
मी काळजावर दगड ठेवले
सगळी काम केली
देह फुंकून फुंकून
सिगरेटसारखा जाळला
नैतिकता सोडली नाही
तरी बदनाम झालो
ज्यांना ब्रेक दिले
त्यांनी
शरीर मोडण्याची कारस्थाने केली
काळीज कितीदा मोडीत काढले
त्याची तर गिनती अशक्य झाली
रक्त निळे पडले
लढे लढता लढता
आणि तू म्हणालास की
हाच तुझा ध्वज आहे
आता सर्वच बाजूंनी घायाळ झालेला देह उचलत
कामावर आलोय
तर मालक म्हणतोय
तुला कामावर ठेवणं परवडत नाही
व्यवस्थेवर टीका करायचे सोड
आणि मगच मजुरी करायला ये
उपाशी राहणे हा मला कधीच प्रॉब्लेम वाटला नाही
मी मोजलेली किंमत वाटली
खरा कंगाल साधूच असतो
आणि खरी कंगाली आनंदात ठेवणे हीच साधना
पण फाटत चाललेला देह
जर चिंध्या चिंध्या होणार असेल
तर मला सांग
कुठल्या देहात तू मला मोक्ष अंथरून देणार आहेस?
कि सविकल्प समाधी
एवढीच ह्या जन्माची कमाई ?
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणा पूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
सर्व काही तुटल्याचा क्षण
गुरुत्वाकर्षण आपल्या कह्यात नाही
आकाश निळे दिसत होते
आणि आता केवळ पसरलेले काहीतरी
घरातून निघताना
खूप डोळे खेळलेले खिळलेले
आईचा तो स्पर्श
ज्यात माया होती
आणि ती वाया जाणार का अशी शंकाही
भाऊ तर प्रश्नचिन्हासारखे उभे होते
आशीर्वाद देताना काय द्यावा म्हणून गोंधळलेले
बाप गरीब झाला
की स्थलांतर श्रीमंत वाटायला लागते
माझ्या डोळ्यात आग लागली होती
आणि तरीही मी बर्फ असल्यासारखा थंड होतो
एकीकडे मोक्षाचे अशक्य वाटणारे आकडे
आणि दुसरीकडे करिअरच्या काही शक्यता आणि त्यांचे विधिलिखित डिक्टेट करणारे फाकडे पाय
आता हे सर्व आठवत बसलोय
आठवणी नाहीशा करून बघितल्या तरी
बेडूक उड्या झेपावल्याच नाहीत
आणि आता हा अचानक भरभराटीस आलेला क्षण
क्षणभर कालातित
मी अचानक पोचलो की काय
प्रश्नच दगड होऊन
आणि दाणकण आपटतोय
ही संधी होती की काय जी मी गमावली ?
देवाला तरी किती वेळा धरणार
सगुण करण्यासाठी ?
पुन्हा एक सुजलेला फोपसेपणा
न उडालेल्या यानाचा ढगाळ क्रॅश
नायकी देहाचा उडालेला खलनायकी धुराळा
माती गोळा करायचे तंत्रज्ञान मला अवगत नाही
मी बसलोय स्वतःला कालवत
शेवटी कमळ मिळाले नाही
की चिखलाशीच डील करावे लागते
एक भव्य चिखलदरा
या अपयशी क्षणाचा दरारा
मोडीत काढून
मला पुन्हा एकदा उडायला हवे
देह पूर्णपणे रिता
जणू पालथा घडा
फुटलेला नाही हेच नशीब समजत
मी माठातलं पाणी पितोय
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणा पूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
आयुष्य पणाला लावले
आयुष्य वाया गेले
हाताशतेचेही पत्ते टाकून संपले
नैराशयाचा एक करंट
अकाउंट उघडून बसलाय कायमचा
खात्यात रोज होणाऱ्या जखमा
उदासीनता साधू होऊन बसलेली
सिद्ध व्हायला न मिळाल्याने नासलेली
घोडे कुठे अडतय कळत नाही
फिरवून फिरवून हाताला वळ आलेत
तिथेच तिथेच
समाधीचे तेच तेच लोचे
तसेच
सूर्य वाळवत ठेवलाय
आणि तो प्रकाशासाठी उमलत नाहीये
एका बाजूला आश्रम काढ म्हणून येणारे प्रेशर
आणि मी
ज्याला आयुष्यात निर्विकल्प समाधी शिवाय काहीच नकोय
आश्रमांना लाथाडून ठाम
इतरांनी धंदा मांडला म्हणून मीही धंदा मांडू का?
ध्यानाला बसता न येणाऱ्या लोकांनी
मेडिटेशन वर व्याख्याने द्यायला सुरुवात केलीये
मी पण आता पंचतारांकित बुवा बनावे काय ?
यापेक्षा मरण बरे
निदान ते अस्सल असेल
प्रसिद्धीच मिळवायची असती तर डॉन झालो असतो
किंवा राजकारणी
नट सुद्धा उत्तम होतोच की
पण शक्तिपात कोणी केला
तूच ना ?
मी मागितला होता ?
आणि हा असा वाया चालणारा काळ
एका उडीसाठी
मला डबीत ठेवल्याचा फील
सुरुवातीपासूनच जर स्ट्रगल दिला असतास
तर कदाचित एवढे फ्रस्ट्रेशन आले नसते
मी सुद्धा स्टेप बाय स्टेप करत
वाढत गेलो असतो
पण तू मला जन्म दिलास
तो वटवृक्ष म्हणून
आणि आता फक्त वटवायचा राहिलाय
तर तुझी इन्फिनिटी बँक
कायम मी दिवाळखोर असल्यासारखी वागवत
एक पुश तर हवाय
आणि तुझे आपले हाडहूड चाललेले
सगळी तंत्रे ट्राय करून झाली
एक शिळे आणि गुळगुळीत वातावरण प्रत्येक वेळी वाट्याला
तू मला एका अशा श्रुतीत जन्माला घातलेस
जी स्वतःला मेंटेन करत नाहीये
आणि जिचा मेंटेनन्स
आऊटडेटेड होत चाललाय
शेळी गेली जीवानिशी
खाणारा म्हणतो वातड
प्रत्येक वेळी तंत्र
नथी सारखं कानात
आणि शेवट असफल सुहागरात
पायवाटा तुडवत तुडवत
मार्गदर्शकाच्याशिवाय एकट्याने चालत
शेवट नसलेल्या कडेलोटापाशी
आता तर ह्या उपवासाचासुद्धा कंटाळा यायला लागला
घुमावपट्टी रीपीटेटेड
आणि आसपास
मोक्ष म्हणजे आभास
असे सांगणारे व्हर्जन
जे कधी मैदानात मरायला उतरलेच नाहीत
मला आजतागायत कळलेले नाही
लोकांना मोक्षाविषयी इतका कॉन्फिडन्स येतो कुठून
तोही साधना न करता ?
इतका निगेटिव्ह माहोल
आणि तू आहेस
शेवटचे होल उघडत नाहीयेस
की तिसरा डोळा पूर्ण उघडणे
किती आवश्यक आहे
ते मला तू सांगतोयस ?
या अशा तुला घालतो शिव्या
ओकेबोकेपणा म्याव करतो तेव्हा
तुला जर असे वाटत असेल
कि मी मैदान सोडून जाईन
तर लक्षात ठेव
तू माझा बाप असशील
तर मी तुझा पोरगा आहे
हटणार नाही
तुलाही दाखवून देईन
एखादा खेळाडू मरेतोवर गोलपोस्टपाशी कसा खेळत राहतो ते
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीजमधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्य फायलीतून)
आपल्या अपयशाचा सुद्धा आदर करता आला पाहिजे
आयुष्य भिरकावले मोक्षाच्या नादात
जाळ्यात मासे सापडले
समुद्र सापडला नाही
इंद्रिये वातड झाली शेळीसारखी
त्वचा उकळून उकळून खड
मायेला चिकटलेले दूध करपलेले
प्यालो आयुष्य
थंड झालेल्या चहासारखे
डोळ्यांना स्वल्पविराम टांगले
टांगांना पूर्णविराम दिले
पापणी लवली लावण्य नाकारत
लोकांना तोडले
एकांत नीट लाभावा म्हणून
मोबाईलने पुकारलेले बंड
टच केला तिथे कनेक्शन राख
आता दिवे गेलेल्या या अवस्थेत
जनरेटर सुद्धा जळून गेलाय
आता राखेतून स्वतःला गोळा करत
जाणार तरी कुठे
जिद्द मेली
मी मेलो असतो तर बरे झाले असते
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणा पूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
जितक्या निवांतपणे जगत आला आहेस तू
तितक्याच शांतपणे तुला मरता आले पाहिजे
मोबाईल बाजूला गेला पाहिजे
पाण्यासारखे ओसरता आले पाहिजे
हात कदाचित रिकामे असतील
तुझ्याकडे काम नसेल
चोवीस तास रिकामे आणि
घड्याळाला आराम असेल
दोन वेळच्या जेवणाची ही
कदाचित तुला असेल भ्रांत
कदाचित राहायला घर नसेल
जीव होऊन जाईल क्लांत
रस्त्यावरती असशील तरी
पाठीचा कणा ताठ हवा
मरतानाही अखेरचा क्षण
रोकडा आणि लाट हवा
पाठ फिरलेली मित्रांची
नात्यांचा गोतावळा गायब
ज्याला आपले माणूस म्हणावे
असा कोणी नसेल लायक
वारा सुद्धा जपून येईल
मोजून देईल तुला श्वास
सूर्य सुद्धा प्रकाश देईल
पण काढेल आतील वास
आकाश म्हणेल आहे ना जागा
आणखी किती जागा हवी
सगळे जीर्ण झालेले असेल
यमाची वारी असेल नवी
त्यावेळीही तू शांत रहा
देऊन टाक आनंदाने शरीर
असा बुडून जा मृत्यूमध्ये
जसा पाण्यात बुडतो पीर
कुठलाही ट्रॅफिक नव्हता
जेव्हा आलास जगामध्ये
जातानाही ट्रॅफिक नको
निवांत आवरता आले पाहिजे
जितक्या निवांतपणे जगत आला आहेस तू
तितक्याच शांतपणे तुला मरता आले पाहिजे
श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण सिरीज मधील निर्वाणाआधीच्या कविता या काव्यफायलीतून )
माझ्या आधीची पिढी
माझी समकालीन पिढी
माझ्यानंतरची पिढी
कायमस्वरूपी वाळीत हंगाम स्वीकारून मी शेती केली
संगणकांच्या किजसारखा दाबला गेलो
वापरला गेलो
आणि जेव्हा कीबोर्ड निकम्मा झाला
तेव्हा फेकला गेलो
माझी लायकी फक्त प्लास्टिकच्या कचऱ्या इतकीच आहे
हे वारंवार आलं सांगण्यात
पण मी प्लास्टिक सारखाच टिकलो
आणि मी इको फ्रेंडली नाही असा मारला गेलेला शिक्का झेलत
तुझ्यासमोर गंगेच्या काठावर भीष्मा सारखा उभा राहिलो
इतरांना बायका मिळवून दिल्या
स्वतःसाठी ही काही चालत आल्या
पण मुलांना जन्म देण्याचे धाडस नाही झालं
भीती एकच होती
पुढच्या जनरेशन मध्ये अडकलो तर सांतामध्ये अडकेन
आणि अनंत कमावणे
चपले सारखे झिजून जाईल
झाडाखाली बसून तपश्चर्या केल्या
तेव्हाही कमी होत झालेल्या ऑक्सिजनचीच काळजी करत होतो मी
आता मला प्रश्न पडलाय
मोक्ष तरी पर्यावरण प्रेमी आहे का ?
तुझे असणे तरी
पर्यावरण प्रेमी आहे का ?
की पृथ्वीला कधीच तू बेदखल केलंयस ?
सगळ्या पृथ्वीचा सातबारा आम्ही आमच्या नावावर करून घेतला
या कार्यालयीन कारवाईत
असणारा सत्यानाश महानाश तुला दिसत नाही का ?
की माणसावर विश्वास ठेवून तू पस्तावतो आहेस ?
एक काळ असा होता
मी मोक्ष पागल होतो
आता तर मोक्ष सुद्धा म्हातारा होत चाललाय माझ्यासमोर
मी टिकणार नाही
कदाचित माझा मोक्षाचा खटाटोपसुद्धा टिकणार नाही
पण हीही तुझीच इच्छा असेल महादेवा
शून्य होण्याऐवजी या पृथ्वीवरून रिक्त होऊन जाणे
हे किती दुःखदायक होऊ शकतं याची तुला कल्पना नसेल
पण हेही ठीक आहे
प्रत्येक न्यायालयात न्याय मिळालाच पाहिजे असं तू तरी कुठं म्हंटलयस ?
फक्त मरण येताना
माझा आवाज कातर करू नकोस
म्हणजे झाल
मरण वसंतात असो किंवा शिशिरात
तुझ्यातच देह थरथरावा
आणि उन्मळून पडावा
वृक्षासारखा
तुला वाटेल तर सुपर्ण
तुला वाटेल तर निष्पर्ण
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment