डेकॅथलॉन एल्सेट्रा

इंग्रज श्रीधर तिळवे नाईक 

ईश्वर सैतानाला मुळात परमिशनस का देतो 


देव मुळातच इंग्रजांना येऊ कसा देतो 


या दोन प्रश्नात फरक नाही 


पुलाचे बांधकाम नीट व्हावे म्हणून 

लहान मुलांना बळी देणारे लोक 

आज सुद्धा शिल्लक असतील 

तर आपण काय निर्माण केलं 

आणि तुम्ही आमच्यासाठी काय सोडलं ?




तुमच्या भाषेचं काय करायचं 

हा प्रश्न तर अजूनही सुटलेला नाही 

सर्वत्र इंग्लिश मिडीयमची स्कूल्स ओपन होत आहेत 

आणि मला कळत नाही 

भारतीय लोकांनी नेमके कोणते असे हत्ती मारले 

की अजूनही या संस्कृतीत घोडे सळसळतायेत ?


अजूनही नाण्याचे पुरावे हवे तसे वळवणारे लोक 

अजूनही शिलालेख हवे तसे वळवणारे लोक 


इतिहासात वाकून पाहायला जावं 

तर आपलीच मान मोडलेली आढळावी 

याहून शोकांतिका ती काय 



तुम्हाला परत जायला वाट होती 

कारण तुम्ही घोड्यावरून आलेले नव्हता 

तुम्ही थेट जहाजातून आला 

आणि जहाजातूनच निघून गेला 


घोड्यावरून आलेले मात्र 

घोड्यावरून परत गेले नाहीत


उलट इथेच घोडे रूढ केले 

अश्वमेध रुढ केले

मशिदी रूढ केल्या 


उत्तरीय घालणाऱ्यांनी 

जॅकेट घालायला सुरुवात केली 


पण तुम्ही 

असे काहीही सोडले नाही 

शिवाय प्रोटेस्टंट 


आता सगळे प्रोटेस्ट थंड झालेत 

शिवाय की आर्य समाज 


सत्यशोधक सत्य शोधत कुठे गेले मला माहित नाही

प्रार्थना वाल्यांच्या प्रार्थना फक्त मुलीच्या नावापुरत्या शिल्लक आहेत 

रामकृष्ण मिशन तेवढेच ऍक्टिव्ह आहे 

सतत मिशन ऑन ठेवल्याने 


सगळ्या प्रोटेस्टची माती करण्याची या मातीची लकब 

बाहेरून आलेल्यांची मात्र माती करत नाही 

त्यांना जिवंत ठेवते 

आणि अनेकदा स्वतः मरते 



तुम्ही सेक्युलर झाल्यानेच 

स्वतःचे साम्राज्य मोडीत काढू शकला 


तुमच्यामुळेच एक डुक्कर फोन करायला शिकले 


पण तुमच्यामुळेच सर्व कासवे 

हळूहळू नाहीशी होत गेली 


तुम्ही हत्ती अल्पसंख्यांक केले 

हस्तिदंत काढून घेत 

आणि वाघ तर कायमच तुमच्या शिकारीचा विषय होता 


मुस्लिमांनी चष्मे दिले 

तुम्ही गॉगल 


आणि तुम्हाला हवे असलेले स्फोट 

स्पोर्ट सारखे कायम घडत राहिले या देशात 


तुम्हाला हवी ती तावदाने बसवली गेली 

तुम्हाला हव्यात अशा खिडक्या उघड्या करून देण्यात आल्या 


तुम्ही यावेत म्हणून दरवाजे अधिकच मोठे झाले 


पण आतल्या माणसांचे काय 


उलट दिंड्या वाढत गेल्या आषाढी एकादशीला 


साईबाबा अधिकच भक्कम झाला 


माझ्या पुढची अंबाबाई बघता बघता महालक्ष्मी होत चाललीये 

तुम्ही वैष्णव मजबूत केले 

आणि वाढवले 

तुमच्या सोयीचे होते म्हणून 

तुम्ही बौद्ध पुन्हा जन्माला घातले 

तुमच्या सोयीचे होते म्हणून 


शेवटी बाहेरून आलेल्या लोकांनी 

बाहेरून आलेल्या लोकांना मदत करायला नको काय ?



सगळा मानवतावाद 

पसायदानात आल्यानंतरही 

वस्तुस्थितीत आला नाही 


किंचाळ्यांनासुद्धा जातीनुसार भेद मिळाला 

सत्तांना वर्णानुसार दर्जा मिळाला 


नखे खुपसली गेली एकमेकांच्या हातात 


पेन फक्त गिफ्ट म्हणून देण्यात आले 

तलवार म्हणून नाही 


श्वास म्हणजे नाकाभोवती गुंडाळला गेलेला स्कार्फ 


परिवर्तनाची वाट पाहणारे 

फक्त वेटिंग रूम मध्येच कैद केले गेले 


वादळे चहाच्या कपातून उठली आणि आईस बॉक्समध्ये ठेवली गेली 


आम्ही झाडतोय लाथा 

आणि आमचा सत्कार गाढव म्हणून केला जात आहे 



तुम्ही व्हाईट वॉश दिला 

आणि तो वाईट होता 


आमचं काय काय धुवून निघालं 

याचा हिशेब सुद्धा अजून लावता येत नाही 


तुम्ही आमचे कपडे फाडले 

आणि आम्ही म्हणालो आमच्या छातीतून राम उगवणार आहे 


किती वसाहतीकरण व्हावं वस्तींचं 

की आरशात दिसणारा आमचा सावळा चेहरा 

मूळचा गोरा निघावा ?



मी माझ्या वडिलांच्या बरोबर 

माझ्या दुकानात उभा आहे 


ना त्यांचा अंबाबाई वर विश्वास होता 

ना त्यांचा आत्ताच्या महालक्ष्मी झालेल्या देवीवर विश्वास आहे 


ते धर्माला फक्त शिल्पकला म्हणून बघतात 

आणि स्थापत्य कला म्हणून एन्जॉय करतात 


ज्या माणसाने गणपतीच्या अनेक मूर्ती घडवल्या 

तो आस्तिक कसा होत नाही 


ते फक्त माझ्या प्रश्नाकडे बघून हसतात आणि म्हणतात 

ईश्वर ना युरोपियन लोकांच्या सारखा आहे 

म्हटलं तर आपल्या देशात अस्तित्वात आहे 

म्हटलं तर आपल्या देशात अस्तित्वात नाही 


तुम्ही खरोखरच ईश्वराइतके प्रबळ होता का?



खोटे डिस्कवर्स डिस्कोर्स या देशाला नवीन नाहीत 


ब्राह्मणांनी किती तरी तुमच्या आधी 

या देशात असे डिस्कोर्स पुराण म्हणून रचलेत आहेत 


तुम्ही सुद्धा तुमची सत्ता पुराण म्हणूनच रचली का 

त्यामुळेच ती इतकी रसरसली का 


अन्यथा दहा लाख लोक कोट्यावधींच्यावर राज्य कसे करतात 


की एक विशिष्ट प्रकारचा बधिरपणा 

आमच्या नसांच्यामध्येच आहे ?


मंत्र वास्तवबधिर करतात का?


तुम्ही एक समुद्र ड्रॉप केला 

आणि आम्ही शेवटी तो एका तांब्यात ठेवून दिला 


तुमच्यामुळे आमचे दगडासारखे बुडत गेलेले जमाव 

आता आवाज सुद्धा करत नाहीत 


बहुदा तांब्यात बुडालेले लोक समुद्रात सुद्धा सापडत नाहीत 




तुम्हाला उद्देशून एकही खरी कविता लिहिली गेली नाही या देशात

इतकी मूर्ख आहे या देशातली काव्यप्रतिभा 


आम्ही तुमच्याकडून सुनीते आणि मुक्त छंद मुबलक घेतला 


त्यामुळे पंख मिळाले आणि डंखही 


आमचा विस्तार ही झाला 

आणि आम्ही अधिक खोलवरही झालो 


पण तरीही तुमच्या विरोधात 

एक प्रॉपर कविता लिहिण्याचं धाडस काय आम्हाला झाले नाही 


आमच्या पंखांना वादळ लपवून ठेवता येत नाही 

म्हणून आम्ही फॅन लपवून ठेवतो 


आम्ही बायकी आहोत का  

की होलसेल वजाबाकी करण्यात आम्ही निपुण आहोत ?


स्वतःला गमावण्याची आम्हाला का लाज वाटत नाही ?


आम्ही का पुन्हा पुन्हा विघटित होतो ?


आमच्या खंड खंड अस्मिता 

का सतत सतत विखंडन विखंडन करतात ?


जिथे भावांच्या विरोधात भाऊ उभे करणारा मनुष्य ईश्वराचा अवतार बनतो 

तिथे याहून काही वेगळे घडू शकणार नाही का? 


कोणता गांजा पिऊन 

आम्ही इथे जगत असतो?

भांग सुद्धा कशी काय अध्यात्मिक बनते ?


वर आणि पुन्हा भांगेतली तुळस आहेच 

पूजन करायला 


हा देश समजायला कठीण आहे 

की या देशात मोक्षाची इतके धागे तयार झालेत 

की तो अधिकाधिक गुंतागुंतीचे कापड बनलाय ?


या कापडापासून कितीही फॅशन तयार करा 

ते अनलिमिटेड आहे 


१०


माणसाच्या बॉडीच्या साईजचे आम्ही आहोत म्हणून आम्ही होमोसिपिअन्स 


अन्यथा आम्ही फक्त जात 


फिकी पडलेली 

शंभर वस्त्रे घालून चालू पाहणारी 

स्वतःच्या थंडीत काकडणारी 

त्यावर उपाय म्हणून काकड आरती करणारी 

काळजाचा बर्फ करून स्वतःलाच गोठवणारी 

सतत एकमेकाला कचऱ्यात डंप करणारी 

गायीच्या डोळ्यांनी दुःख पाहणारी 

स्वतःचे डायपर चेंज करत 

स्वतःलाच डायर करणारी 


आम्ही स्वतःलाही मदत करू शकत नाही 

कारण आम्ही जात आहोत 

जी जात नाही 



११


तुम्ही आलात 

आमचा अख्खा देश पिळलात 

त्याचा रस काढून 

युरोपमध्ये घेऊन गेलात


आम्ही जणू हा काळ 

नवनाथ ऊस सेंटर म्हणून पाहत आहोत 


दोन्ही बाजूंनी फोल्ड होणारे दरवाजे तुम्ही लावले

आणि ये जा सुरू झाली 


आम्ही इतके मूर्ख की 

तुमच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाला आम्ही समुद्र पर्यटन केले म्हणून 

प्रायश्चित्य घ्यायला लावले 


तुमच्याकडून आम्ही मर्सिडीज सुद्धा घेऊन आलो 

आणि ती जणू काय आपलीच कार आहे अशा थाटात मिरवलो 


आम्ही म्हणजे कुत्रे 

आम्ही म्हणजे त्या कुत्र्याची शेपूट 

तुम्ही आमच्यावर राज्य करत आहात या आनंदात वळवळणारी 


मी पुन्हा पुन्हा कपाळाला चिमटा घेतोय 

तुम्ही लिहून दिलेले प्राक्तन 

खरवडून काढतोय 


स्वतंत्र तोच होतो ज्याला गुलामगिरी खोडता येते 

प्रसंगी स्वतःची त्वचा खरवडता येते 


मी जाणतो तुमचे वकलिंग 

फार टाईट आहे 

आणि त्यातच पुन्हा तुमची भाषा 

जिवंत आहे 

कारण ती ज्ञानासाठी आम्हाला आवश्यक आहे 


तुम्ही आमच्यात अख्खा काळ शिफ्ट करून 

निघून गेलेले आहात 


तुम्ही लोड केलेले अनेक ट्रक्स 

अजूनही आमचा ट्रॅफिक जाम करतात 


१२


तुम्ही म्हणाल 

आता गेलो ना 

आता कशाला आमच्यावर आदळतोयस ?


प्रॉब्लेम हा आहे 

की तुम्ही फक्त इंडियात आला नाही 

तुम्ही अमेरिकेत गेलात 

आणि तिथून निघाला नाही 


आता तुम्ही पुन्हा एकदा व्हाया अमेरिका 

आमच्या देशात 

थेट संगणकातून उतरत 


पुन्हा एकदा सगळ्या कीज तुमच्या 

कीबोर्ड तुमचे 

आणि त्यासाठी होणाऱ्या मिटींगाही तुमच्याच 


तुम्ही नेहमीच नवीन खेळणी घेऊन येता 

पण जुनेच खेळ खेळता 


तुम्हाला बुभुक्षित होण्याची सवय आहे या देशात 


आणि या देशातले लोक इतके मूर्ख 

की नेहमी शिकार व्हायला तयार 


माझ्या चिंतेची सुरुवात तिथून होते 


आत्ता आत्ता उडत जाणारे राजहंस 

पुन्हा एकदा पांढरे कावळे बनणार का 


आत्ता आत्ता नव्याने उगवलेले वटवृक्ष 

पुन्हा एकदा युक्यालिपटस होणार का ?


जंगले कापून उद्याने बनवणारी मोगलाई

पुन्हा एकदा उगवणार का 


तुम्ही तमाशे स्पॉन्सर करत नाही तुम्ही थेट शेक्सपियरियन नाटके 

सादर करता 


मला फक्त अहंकाराचे भस्मिकरण होणे आवडतं 

तुम्ही असे की 

थेट सगळ्याची राख रांगोळी करत येता 


मला चिंता तुमच्या स्वभावाची आहे 

कारण तो मेल्याशिवाय जात नाही 


तुमचा नवा वर्जन थेट विमानातून बॉम्ब टाकतो 

देशच्या देश राख करतो 


माझा प्रॉब्लेम हा वर्जन आहे 


हा देश आत्महत्यांना सोकावलेला आहे 

याला मरायला लाज वाटत नाही 


पुनर्जन्मावर याची इतकी गाढ श्रद्धा आहे की 

हा आत्ताच्या जन्माचा खात्मा बसल्या जागी करू शकतो  


१३


वैचारिकतेचे अजीर्ण झालेले देश विचार करत नाहीत 


ते फक्त विचारांच्या पुढे नांगी टाकतात 

आणि स्वतःच्या अस्तित्वाचा विंचू बनवून इतरांना डसतात 


या देशाची चव नेहमीच कडवट असते 

म्हणून तर तो सतत साखर टाकत चहा पीत असतो 


डायबिटीज झाला तरी बेहतर 

पण चहा पिणे सोडणार नाही 

शरीरातला कडवटपणा कमी करणार नाही 


१४


अतिथी देवो भव 

आणि स्वतःच्या लोकांना माती खायला घालणार 


तुमचे फवारे आता उडायला लागलेले आहेत 

राजीव गांधी सगळीकडे चालायला लागलेले आहेत 

लोक सुद्धा त्यांच्या प्रेमात हालायला लागलेले आहेत 

जे झोपले होते ते आता 

नव्या नशेत जागायला लागलेले आहेत 


जे पूर्वी काही मागत नव्हते 

तेही आता आरक्षण मागायला लागलेले आहेत 


हळूहळू सर्वजण आपल्या दारात चंगळ टांगायला लागलेले आहेत 


कसल्याही एसटीत बसणारे लोक 

आता एशियाडला कवटाळायला लागलेले आहेत 


चांगले की वाईट याची काळजी न करता 

हळूहळू बदल व्हायला लागलेले आहेत 


जे स्क्रिन फक्त थिएटरमध्ये उगवत होते 

ते आता प्रत्येक घरात उगवायला लागलेले आहेत 


मला माहित नाही या सगळ्याचा अंत काय 

कारण आरंभ मला विचारून झालेले नव्हते 


मला भीती आहे 

कदाचित तुम्हीच पुन्हा अमेरिकन अवतार धारण करून 

जसेच्या तसे याल 


जसेच्या तसे 

पुन्हा एकदा या देशाची ठासून माराल 


जसेच्या तसे 

इंडियनस नॉट अलाउड 

ओन्ली इंडियन हू आर डॉग्स आर अलाऊड चे 

बोर्ड 

बाहेर लावाल 


कदाचित हे होणार नाही 

कदाचित तुम्ही सुधारलेले निघाल 


पण तुमचा काही नेम नाही 

शेवटी व्यापार हा तुमचा गेम आहे 


तुम्ही त्यासाठी 

कुठल्याही देशाला खेळाचे मैदान बनवू शकता


मी वाट बघतोय 

आणि वाट बघण्या खेरीज माझ्या हातात काहीच नाही 


मी पुन्हा एकदा वेटिंग रूम मध्ये माझे संपूर्ण अस्तित्व उभे करून उभा आहे 


हे स्वागत आहे की काळजी 

मला माहित नाही 


कदाचित मला माहित नाही 

हीच माझी चिंता आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलोन सिरीजमधील डेकॅथलॉन एल्सेट्रा या काव्यफायलीतून)

एकतर होकार दे  

नकार दे 

हा असा सस्पेन्स देऊ नकोस 


शेवटी पटलीये नाही पटलीये 

जजमेंट द्यावं लागतं मित्रांच्यात 

नातेवाइकांच्यात 


एकाचवेळी एकाच देहाच्या तीन स्पेसीज 

अफर्ड कशा करू ?


भावनांना ज्ञानापाशी पोहचवावं लागतं 


आतला आवाज एकट्याचं मॅटर असतं 

प्रेम दोघांचं 

त्यामुळे व्हाया आतला आवाज पोहचण्याचे चान्सेस नाहीत 


एक महिना पेंड्युलम ठीक 

दोन महिने पेंड्युलम सहनयोग्य 

पण आता तिसरा महिना आला 


रक्ताचा स्टॅमिना कितीकाळ पणास लावू ?


किस घेऊन देऊनही टेस्ट कळत नसेल 

तर काय थेट सेक्समध्ये उतरायचं ?


आधीच बोललो होतो 

मामला सेंटीमेंटल हाय 


पण तुझा आपला करस्पाँन्डन्स कोर्स चालूच 


इंद्रिये वाळत चाललेत माझी 

ह्या केंद्रहीन करस्पाँन्डन्समध्ये 


ती सुकडून मेल्यावर निर्णय घेणार काय ?

  

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन 

एलसेट्रा ह्या फाईलमधून )

तुझी भव्यता पाहू कि तुझं सौंदर्य पाहू ?


सौंदर्याचं विज्ञान बनवता येत नाही 

भव्यतेची कला 


भव्य भावतंय 

सौंदर्य मोहवतंय 


एन्काउंटर फ्रुटफूल 


सिंग्युलर इफेक्ट 


इतकं सारं पाणी एकत्र 


धबाधब कोसळ 


सारं ओल्ड फॅशन मोडून पडतंय 


स्तिमित उगवाई 


फुल्ल व्हाईटवॉश 


रक्तातलं पाणी दाद देतंय 


निरंतर 


फक्त तुझा आवाज पाठलाग करतोय 


हळूहळू तोही नाहीसा 


आतल्या पाण्याला पूर्णविराम 


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या 

फाईलमधून )

माझ्यानंतर कोल्हापुरात कवितेचं काय होणार 

माझ्या नंतर कोल्हापूर कवितेत कोण आणणार 


मी विचारतोय 

तर राजकुमार यादव म्हणतोय 

तू काय स्वतःला मराठी कवितेतला छत्रपती शाहू समजतोस काय ? 


मी उत्तर देत नाही 

फक्त महाराजांनी शिकार केलेल्या वाघाला 

जड अंत:करणाने पहात बसतो 


मला कवितेतून डरकाळी ऐकू येतीये 


म्हणजे मी कवितेत पुरेशी शिकार केलीच नाही तर 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलोन सिरीज मधील डेकॅथलॉन: एल्सेट्रा या काव्यफायलीतून)

प्रेमात मी वाट पाहतोय 

कि भविष्यात निघून जातोय ?


तू आलेली नाहीस 

किस किंवा टच 

प्रेमाचं सर्टिफिकेट मानणारा मी नाही 

पण तुझा प्रेझेन्स नाही 

आणि काळ प्रेग्नंट झालाय 

तुझ्या वाट पाहण्यात 

तू आलीस कि तो बाळंत होईल 


मी वाट पाहतोय घड्याळावर बसून 

काटे काट्यासारखे 

तू आलीस कि घड्याळ्याच्या पाकळ्या होतील 


सूर्य घड्याळाहासारखा वितळतोय रस्त्यावर 

मी तू रात्रीची वेळ द्यायला हवी होती का ?


हा टेम्बलाईचा डोंगर तू निवडलायस भर दुपारचा 

सावल्या पडतायत पण उन्ह कमी जाज्वल होत नाहीये 


झाडाखाली मी वाट पाहतोय 

वाट पाहताना मी प्रेमी नाहीये 

कदाचित प्रेमी असेन तेव्हा वाट पाहणारा नसेन 


तुझ्या प्रेमात मी झाड होईन का 

तुला सावली देणारं 

सावळी सावली 

गोऱ्या माणसांचीही सावली सावळी का असते 

कि देहाचं मूळ सावळ्या रंगात आहे ?


मी वाट पाहताना स्वतःची सावली पाहतोय 

तू माझी सावली वैग्रे रोमँटिक मला आवडत नाही 

एकमेकांच्या सावल्या बनण्यापेक्षा 

एकमेकांची शरीर बनणं जास्त ओरिजनल नाही काय 


काल मी तुला नीट ऑरगॅझम दिला नाही 

ह्याचा गिल्ट 

प्रत्येक संभोगात नवीन बनण्याची कला मला अजूनही अवगत नाही 

त्वचा फक्त फॅशन झाल्याने हे घडलंय का ?

कि मी तुला कंटाळलोय ?

कि मी सेक्सलाच कंटाळलोय ?


मी तुला सिड्यूस करताना जखमी केलं का ?


असताना इच्छा तळपते कि तू नसताना जास्त तळपते ?

आग वेडीवाकडी ह्यात वेडी कि वाकडी जास्त ?


रिक्तता रक्तात सेटल झालेली नाही 

शरीराचं प्रयोजन दुसरं शरीर ?

तू माझ्या आयुष्याचं प्रयोजन आहेस काय 


मी कोल्हापूरला टांग मारून जमा झालोय ह्या डोंगरावर 

तू कधी येऊन मला खर्च करणार आहेस प्रिये ? 


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा 

 ह्या फाईलमधून )

प्रेमात मी वाट पाहतोय 

कि भविष्यात निघून जातोय ?


तू आलेली नाहीस 

किस किंवा टच 

प्रेमाचं सर्टिफिकेट मानणारा मी नाही 

पण तुझा प्रेझेन्स नाही 

आणि काळ प्रेग्नंट झालाय 

तुझ्या वाट पाहण्यात 

तू आलीस कि तो बाळंत होईल 


मी वाट पाहतोय घड्याळावर बसून 

काटे काट्यासारखे 

तू आलीस कि घड्याळ्याच्या पाकळ्या होतील 


सूर्य घड्याळाहासारखा वितळतोय रस्त्यावर 

मी तू रात्रीची वेळ द्यायला हवी होती का ?


हा टेम्बलाईचा डोंगर तू निवडलायस भर दुपारचा 

सावल्या पडतायत पण उन्ह कमी जाज्वल होत नाहीये 


झाडाखाली मी वाट पाहतोय 

वाट पाहताना मी प्रेमी नाहीये 

कदाचित प्रेमी असेन तेव्हा वाट पाहणारा नसेन 


तुझ्या प्रेमात मी झाड होईन का 

तुला सावली देणारं 

सावळी सावली 

गोऱ्या माणसांचीही सावली सावळी का असते 

कि देहाचं मूळ सावळ्या रंगात आहे ?


मी वाट पाहताना स्वतःची सावली पाहतोय 

तू माझी सावली वैग्रे रोमँटिक मला आवडत नाही 

एकमेकांच्या सावल्या बनण्यापेक्षा 

एकमेकांची शरीर बनणं जास्त ओरिजनल नाही काय 


काल मी तुला नीट ऑरगॅझम दिला नाही 

ह्याचा गिल्ट 

प्रत्येक संभोगात नवीन बनण्याची कला मला अजूनही अवगत नाही 

त्वचा फक्त फॅशन झाल्याने हे घडलंय का ?

कि मी तुला कंटाळलोय ?

कि मी सेक्सलाच कंटाळलोय ?


मी तुला सिड्यूस करताना जखमी केलं का ?


असताना इच्छा तळपते कि तू नसताना जास्त तळपते ?

आग वेडीवाकडी ह्यात वेडी कि वाकडी जास्त ?


रिक्तता रक्तात सेटल झालेली नाही 

शरीराचं प्रयोजन दुसरं शरीर ?

तू माझ्या आयुष्याचं प्रयोजन आहेस काय 


मी कोल्हापूरला टांग मारून जमा झालोय ह्या डोंगरावर 

तू कधी येऊन मला खर्च करणार आहेस प्रिये ? 


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा

 ह्या फाईलमधून )

बातमीदार श्रीधर तिळवे नाईक 


सुरुवातीला मला फक्त डोळे होते 

पाहायचे आणि बातमी पोहोचवायची 

पळायला दोन पाय होते 

आणि कधी कधी एखादा बैल किंवा घोडा 

अपवादात्मक वेळा बैलगाडी 


नंतर मी अस्पृश्य झालो 

आणि मला 

घोडे आणि बैल यांच्यापासून 

वंचित करण्यात आले 


पुढे इंग्रज आले 

आणि माझ्या हातांच्याच लेखण्या झाल्या 

आणि मी दुप्पट वेगाने बातमी लिहू लागलो 

आणि ती छापूनही येऊ लागली 


मला घोड्याला निरोप देताना थोडे वाईट वाटले 

पण डोळे शाबूत आहेत याचा आनंदही झाला 


मी माझ्या बातमीत डोळ्यांना ओतायला शिकलो 

आणि चेहरा अबसेन्ट राहील 

याची काळजी संपादक घेऊ लागले 


आणि मग अचानक एके दिवशी 

माझी छाती रेडिओसारखी दिसायला लागली 

आणि मी फुफुसात श्वास घेत 

हृदयाला गळ्यात आणत 

बातम्या द्यायला शिकलो 


आता मला भीती वाटू लागली की 

आपण नको तितके खालावतो की काय ?

शेवटी प्रश्न मधल्या अवयवाचा होता 

ज्याच्यामुळे मी माझा संसार पुढे चालवणार होतो 


पण माझे सुदैव 

बातमी तिथेपर्यंत पोचलीच नाही 


आणि मग अचानक लोक म्हणायला लागले 

तुझे दोन्ही नितंब 

स्क्रीन सारखे दिसायला लागलेत 


मग माझ्या लक्षात आले 

आपला नितंबाचा टीव्ही झालाय 

आणि आपण आता तिथून 

आपला चेहरा सादर करणार आहोत 


माझ्यापुढे एकच प्रश्न आहे 

आपली डोळे 

आपली चेहरे पट्टी

आपले दोन हात 

आपला गळा 

सादर करताना 

आपले हृदय आणि आपले फुफ्फुस 

स्क्रीनमध्ये कसे लपवायचे ?


लोक म्हणतात 

तू टीव्हीत छान दिसतोस 

मी म्हणतो 

ज्याला हृदय आणि फुफुस नसते 

असाच माणूस आता टीव्हीत छान दिसतो 

बातम्या देताना 


श्रीधर तिळवे नाईक 

( डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलोन: एलसेट्रा या काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय