स्वामी अविमुक्तेश्वरानंद, योगी आदित्यनाथ आणि रामभद्राचार्य श्रीधर तिळवे नाईक 

गेले काही दिवस स्वामी अविमुक्तेश्वरानंद, योगी आदित्यनाथ आणि रामभद्राचार्य या तिघांच्या मधला वाद माध्यमांच्या मध्ये सातत्याने चघळला जात आहे . या वादात मी पडत नाही याचे कारण मुळातच हा वाद शैव-धर्मांतर्गत वाद होता पण त्याच्यामध्ये वैष्णव आचार्य रामभद्राचार्य आले आणि आता तो शैव विरुद्ध वैष्णव असा झालेला आहे 


भारतामध्ये दोन प्रकारचे शैव लोक राहतात १ पहिले जे स्वतःचा धर्म स्वतःची श्रुती ही पूर्णपणे स्वतंत्र असून तिचे उगमस्थान किमान 12000 वर्षे जुने आहे असे मानतात आणि युरेशियन श्रुतीचे भारतामधले आगमन हे इसवी सन पूर्व 1500 आहे हे वैज्ञानिक सत्य स्वीकारतात . ते असे मानतात की भारताचा प्रमुख आद्य योगी आदी योगी भगवान शंकर आहेत आणि त्यांच्या तंत्रातूनच संपूर्ण शैव श्रुती विकसित होत गेली आणि पुढे आदिशैवधर्म , लोकशैवधर्म(यात प्रामुख्याने पाशुपत धर्म नाथधर्म शाक्तधर्म तंत्रधर्म येतात) , नवशैव धर्म (यात प्रामुख्याने लिंगायत , शीख आणि सत्यशोधक समाज धर्म येतात) , उत्तरशैव धर्म (यात प्रामुख्याने काडसिद्धेश्वर धर्म, रामकृष्ण परमहंस धर्म , गुरुजीफधर्म ,आनंद मार्ग धर्म, उत्तर तंत्र धर्म, नवलिंगायत धर्म , उत्तर पाशुपत धर्म येतात) निर्माण झाले . याउलट भारतामध्ये दुसरा जो शैव प्रवाह आहे तो शैव हा हिंदू लोकांचा दोन मुख्य पंथांच्या पैकी एक मुख्य पंथ आहे असे मानतो या प्रवाहाच्या मते शैव हा स्वतंत्र धर्म नसून स्वतंत्र श्रुती नसून तो सनातन हिंदू संस्कृतीचा एक मुख्य भाग आहे . हा वाद खेळणारे जे तीन लोक आहेत ते तीनच्या तीन या प्रवाहामध्येच येतात त्यामुळेच हिंदूंच्या अंतर्गत असलेला वाद असे प्रोजेक्शन सुद्धा या गोष्टीचे होत आहे . साहजिकच माझ्यासारख्या शैव-धर्म हा स्वतंत्र धर्म आहे असे मांडणाऱ्या माणसाने यात का पडावे असा प्रश्न निर्माण होतो परंतु शेवटी सर्वच जण शैव असल्याने मी यामध्ये काही गोष्टी बोलणार आहे.


मुळात नेमके काय चालले आहे हे सर्वात प्रथम पाहिले पाहिजे 


हा सगळा खेळ सुरू झाला आहे तो व्यवहाराच्या प्रश्नावर! धार्मिक व्यवहार हा एक कायमच कर्मकांडात्मक प्रश्न बनून जातो इथे तो बनलेला आहे आणि हा वाद प्रथम स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि योगी आदित्यनाथ यांच्या मधला वाद होता साहजिकच आदित्यनाथ हे सरकार आणि मुख्यमंत्री असल्याने त्यांनी अधिक कठोर भूमिका घेतली पण काहीही गरज नसताना वैष्णव असलेले रामभद्राचार्य या वादात पडले वास्तविक त्यांनी जर का शैव धर्माचा हा अंतर्गत प्रश्न आहे असे समजून मौन पाळले असते तर बरे झाले असते परंतु हा हिंदू धर्मांतर्गत प्रश्न आहे असे ते मानत असल्याने त्यांनी हस्तक्षेप केला मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की जोपर्यंत तुम्ही शैव श्रुती आणि शैव धर्म वेगळा ठेवत नाही तोपर्यंत असे हस्तक्षेप होणे अटळ आहे. आपण हिंदू संस्कृतीचे भाग बनावे परंतु हिंदू धर्माचे भाग असू नये कारण हिंदू धर्माचा मुख्य धार्मिक ग्रंथ भगवद्गीता वैष्णव आहे आणि वैष्णव धर्माच्या धर्मग्रंथाशी शैव धर्माला काहीही देणे घेणे नाही . रामायण आणि महाभारत ही वैष्णव महाकाव्य आहेत त्यांच्याशीही आपल्याला काही देणे घेणे नाही तो त्यांच्या धर्माचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामध्ये आपण शक्यतो हस्तक्षेप करू नये जोपर्यंत ते आपल्यावर चालून येत नाहीत . आपण या ग्रंथांनी निर्माण केलेली वर्ण जाती व्यवस्था स्वीकारू नये . किंबहुना आपण या लोकांनी निर्माण केलेली कुठलीच धार्मिक व्यवस्था स्वीकारू नये आणि आपल्याला जी भगवान शंकर यांनी व्यवस्था दिलेली आहे तिलाच परस्पर पूरक होईल अशा तऱ्हेचे यमनियम सिध्द आचरण ठेवावे आपण स्मृति वाङ्मय कधीही निर्माण केलेले नाही त्यामुळे आपल्याकडे काळा नुसार आपल्या धर्मात आणि श्रुतीत नव बदल करण्याची अनुमती आहे . युरेशियन (म्हणजेच वैदिक , ब्राह्मण , वैष्णव आणि हिंदू ) धर्मांच्या मध्ये ती नाहीये ते लोक स्मृतीमध्ये पूर्णपणे रुतलेले आहेत .हे चांगले की वाईट हे त्यांनी ठरवावे आपण त्यांना सूचना देऊ शकतो आणि आपल्यावर जर काय ते युरेशियन धर्म आणि त्यांची मनुस्मृती वगैरे स्मृती लादायला लागले तर मग आपण प्रतिकार केला पाहिजे. पण असे होत नाही आणि अनेक शैव लोकांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे आणि त्यातूनच मग आत्ताचा सर्व प्रश्न निर्माण झालेला आहे . हा हिंदू धर्म एका शैव असलेल्या माणसाने स्थापन केलेला आहे आणि त्याचे नाव आदिशंकराचार्य होय . त्याने तो कसा स्थापन केला याची मांडणी मी इतरत्र केलेली आहे त्यांनी त्यांनी मांडलेल्या वेदांतातूनच पुढे हिंदू धर्म जन्माला आला. मात्र भक्तीसाठी यांनी जे पंचायतन दिले होते ते शिव,शक्ती, गणपती, स्कंद आणि सूर्य असे होते आणि हे एका अर्थाने शैव आहे . किंबहुना जो गोंधळ आणि कन्फ्युजन शैव-धर्मामध्ये निर्माण झाले त्याचे कारण हे पंचायतन आहे. याबाबतीत सर्वात प्रथम गोंधळ घालायला सुरुवात केली ती केरळ आणि काश्मिरी पंडितांनी आणि पुढे यादवकाळातल्या महाराष्ट्रातल्या पंडितांनी ! या लोकांनी प्रथम वेदांत स्वीकारला आणि मग पुढचा सगळा हिंदू धर्माचा खटाटोप त्यातून निर्माण झालेला आहे.


याच हिंदू धर्मातून स्वामी अविमुक्तेश्वरानंद, योगी आदित्यनाथ हे दोघेही आलेले आहेत वाद कुठे झाला ?


स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे रथावरून गंगेत स्नान करायला चाललेत आणि कर्मकांडा नुसार रथ घेऊन गंगेत किंवा गंगा किनारी जाण्याची अनुमती नाही असे योगी आदित्यनाथ आणि रामभद्राचार्य यांचे म्हणणे आहे . तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे म्हणणे असे की, योगी आदित्यनाथ आणि रामभद्राचार्य त्यांना विनाकारण अडथळा करत आहेत .


माझे म्हणणे असे की तुम्ही एकदा दुसऱ्या प्रवाहात सामील झाला तर त्या प्रवाहाची सर्व कर्मकांडे तुमच्या मागे लागणे अटळ आहे तुम्ही मग स्पष्टपणे आमचा धर्म स्वतंत्र आहे अशी भूमिका घ्यायला हवी तशी भूमिका घ्यायला स्वामी अविमुक्तेश्वरानंद तयार नाहीत माझ्या मते जेव्हा तुम्ही अशी भूमिका घेतात तेव्हा मग तुम्ही सनातन धर्माची जी काही कर्मकांडे आता ते सांगत आहेत त्यांच्या कर्मकांडांचे अनुसरण केले पाहिजे . त्यांचे घर पाहिजे पण घरातले नियम नकोत असे होत नाही . रामभद्राचार्य यांना त्यामुळे संधीच मिळाली आणि त्यांनी जास्तीत जास्त आपला कर्मठ दृष्टिकोन मीडियामध्ये पोहोचवला . किंबहुना अशी काही संधी मिळाली की ते सोडत नाहीत आणि वर्ण जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थन करत बसतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपातले कोणीच त्यांना काही बोलत नाही . स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे म्हणणे असे आहे की असा काहीही नियम नाही कुठल्याही संहितेत तो सापडत नाही मात्र हे स्पष्टपणे ते मांडत नाहीत आणि सगळा घोळ इथेच आहे त्यांना आपला हिंदू सनातन प्रवाह सोडायचा नाही आणि खरा प्रॉब्लेम तिथेच आहे यातच भर म्हणून मनकर्णिका घाट उध्वस्त करताना जी सर्व मंदिर उध्वस्त झाली त्यांचा त्यांनी आता निषेध करायला सुरुवात केली आहे . साहजिकच यामध्ये प्रश्न असा आहे की ऑर्डर कोणी दिली आणि मुळात आज पर्यंत याबाबतीत काहीही स्पष्टपणे कळलेले नाही. काहींच्या मते ही ऑर्डर खुद्द आदित्यनाथ योगी यांनीच काढली तर काहींच्या मते ऍक्च्युली ती केंद्रामधून किंवा केंद्राच्या दबावातून आलेली आहे . मनकर्णिका घाटघटना घडल्यापासून अनेक शैव लोकांच्या मध्ये एक प्रकारचा प्रक्षोभ निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झाला आणि त्यामुळेच देवदत्त पटनायक यांनी हा जुनाच वैष्णव विरोधात शैव असा वाद आहे असे आपल्या अलीकडच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आणि या घटनेमुळे आता तो पुन्हा सुरू झाला आहे अशा पद्धतीची मांडणी समोर येते आहे . प्रत्यक्षामध्ये मी नेहमीच सांगत आलेलो आहे की हा वाद नेहमीच होता . फक्त इतिहास लिहिणारे लोक प्रामुख्याने वैष्णव असल्याने त्यांनी मात्र नेहमीच जणू काय असा वाद नाहीच असे ब्रिटिश काळात अत्यंत जाणीवपूर्वक भासवलेले आहे आणि ते सांगत असलेले सर्व कर्मकांड कसे सर्व भारताने स्वीकारले आहे असे एक खोटे असत्य सर्वत्र प्रसवले गेलेले आहे.


या सगळ्या प्रकारात सर्वाधिक गोंधळलेली भूमिका ही आदित्यनाथ योगी यांची आहे याचे कारण ते नेमके कुठल्या बाजूने उतरणार आहेत हे कळत नाही आणि हे न कळण्याचे सर्वात मोठे कारण राजकारण आहे परंतु आज ना उद्या त्यांना एक नक्की भूमिका घ्यावी लागेल कारण अनेकदा ते जय श्रीराम म्हणत भगवद्गीतेचे समर्थन करत असतात आणि ही मुळात दहाव्या शतकानंतर उदयाला आलेल्या नवीन वेदशरण शैव पंडितांची परंपरा आहे पण वेदशरण पंडित म्हणजे काही शैव श्रुती नव्हे किंवा शैव धर्म ही नव्हे ते केवळ या धर्माचा एक भाग आहेत हे लक्षात घेतले पाहिजे त्यांचा शब्द म्हणजे काही अंतिम शब्द नव्हे. 


याचवेळी आणखी तिसरी घटना घडली ती म्हणजे मोदी आणि शहा यांनी यूजीसी एक्ट आणायचा घाट घातला. सवर्ण लोक या कायद्यासाठी तयार नाहीत अशा प्रकारची पार्श्वभूमी अलीकडे तयार केली जात आहे. हे लोक मुठभर आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे . हे ते लोक आहेत जे अनेकदा मनुस्मृतीचे समर्थन करतात. वर्णजात व्यवस्थेचे समर्थन करतात पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की हे चक्क स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या बाजूने उतरलेले आहेत आणि यांना ही घटना मोदींच्या विरोधात वापरायची आहे याचे कारण यूजीसी ॲक्टमुळे मोदी या लोकांचे आता एक नंबरचे शत्रू झालेले आहेत . हे सर्व स्वतःला सनातन म्हणवून घेतात आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने उतरतात आता प्रॉब्लेम असा आहे की संघर्ष मुळात स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि योगी आदित्यनाथ यांच्यात झाला आणि हे या दोघांना पाठिंबा देतात आणि हे सर्व घडवणारे मोदी आहेत अशा प्रकारे मांडणी करतात . म्हणजेच घाट सुद्धा मोदींनी उध्वस्त केले , स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना सुद्धा मोदी यांच्यामुळेच विरोध सुरू आहे आणि योगी आदित्यनाथ हे मोदी यांच्या आज्ञेवरूनच काम करत असून प्रत्यक्षामध्ये हा सगळा डाव योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ नयेत म्हणून खेळला गेला आहे अशी ही मांडणी केली जात आहे थोडक्यात प्रत्येक जण आपल्या हिशेबाने या घटना मांडत असतो . स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी कायमच रामभद्राचार्य यांना विरोध केला आहे साहजिकच रामभद्राचार्य यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना बदनाम करण्यासाठी ही संधी आहे हे ओळखून त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठवलेली दिसते . ते राष्ट्रद्रोही आहेत असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. आता याचा अर्थ हिंदू धर्मातले शैव सुद्धा वैष्णव लोकांना सहन होत नाहीत असा काढावा का ? काही महिन्यापूर्वी रामभद्राचार्य यांनी जी आडनावे घेतली होती ती सर्व शैव ब्राह्मणांची आडनावे होती आणि या आडनावाचे लोक ब्राह्मण नव्हेत अशी टीका केली होती. मी त्या वेळेला सांगितले होते की हा माणूस काय आहे. याला प्रतीउत्तर म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी शास्त्रानुसार आंधळ्या माणसाला संन्यास घेण्याची अनुमतीच नाही त्यामुळे रामभद्राचार्य हे आचार्य सोडून द्या पण संन्यासीही होऊ शकत नाहीत अशी मांडणी केली. आता शास्त्रात काही ठिकाणी असा उल्लेख आहे ही वस्तुस्थिती परंतु ती काही अंतिम नव्हे. मला स्वतःला हे कधीही मान्य नाही झाले . प्रत्येक मनुष्याला शक्य असेल तर प्राण्याला वनस्पतीला प्रत्येक जिवंत गोष्टीला संन्यास घेण्याचा आणि मोक्ष मिळवण्याचा हक्क आहे असे मी मानतो . इथे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची भूमिका चुकली असे माझे मत आहे . म्हणजेच रामभद्राचार्य यांची वर्ण जातीवादी कट्टर भूमिका चुकीची आहे तशी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची दिव्यांगांना संन्यास घेता येत नाही ही भूमिकाही चुकीची आहे 


या सगळ्या प्रकारामध्ये जे कट्टर सवर्ण लोक यूजीसी कायद्याच्या विरोधात आहेत त्यांचे म्हणणे असे की हे अत्यंत जाणीवपूर्वक घडवले जात आहे जेणेकरून यूजीसी कायद्याकडे सवर्ण लोकांचे दुर्लक्ष व्हावे आणि यूजीसी कायदा बिन बोभाट पास व्हावा. काही लोकांच्या मते योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाच्या रेस मधून गायब व्हावेत म्हणून हा प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे आता यात जर का तथ्य असेल तर मग गंगा घाटावर जे बांधकाम कॉरिडॉर निर्माण करायचे म्हणून पाडले गेले ते आदित्यनाथ योगी यांनीच निर्णय घेतल्यामुळे झाले असे मानावे लागते . मुळातच हे सर्वच्या सर्व बांधकाम पाडायला नको पाहिजे होते . किंवा मग तज्ञ लोक बोलवून हे सर्व जसेच्या तसे शाबूत ठेवून कॉरिडॉर कसा मोठा करायचा याची मांडणी याचे स्थापत्य करता आले असते परंतु मुळातच प्रतिभेचा अभाव असल्याने असे राजकीय निर्णय अत्यंत आंधळेपणाने घेतले जातात. तपोवनमध्ये जे केले गेले तसेच काही इथे झालेले दिसते आणि आता प्रश्न निर्माण होतो की शैव धर्म पिछाडीला जावा म्हणून हे जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहे का ? कारण जोपर्यंत स्वामी अविमुक्तेश्वरानंद फक्त स्नानाचा मुद्दा घेऊन होते तोपर्यंत फारसा गाजावाजा झाला नाही परंतु अचानक त्यांनी गंगाघाटावर जे काय झाले त्याचा निषेध केला आणि मग याबाबतीत त्यांना अधिक विरोध होऊ लागला म्हणजे शासनाविरोधात बोलणे हे यांना भोवले आहे का ? मुळातच याची सुरुवात महाराष्ट्रातल्या विठ्ठल मंदिराचा पूर्णपणे कायापालट करत आणि तुळजाभवानी मंदिरा बाबत मात्र बरोबर वाद निर्माण करण्यात आले तिथून झाली . कुंभमेळा हा शैव लोकांना संघटित करण्यासाठी निर्माण होतो की शैवांची ताकद आजमावण्यासाठी होतो हा प्रश्न आता पुन्हा पुन्हा उपस्थित होतो आहे इथूनच पुढे मग कुंभमेळ्याच्या वेळीच त्यासंदर्भातच तपोवन आणि अलीकडे मनकर्णिका घाट अशी घटनांची एक मालिका उभी राहते आहे आणि कळत नकळत ही सर्व आश्चर्यकारकरीत्या शैव विरोधात आहे . त्यातूनच मग साहजिकच देवदत्त पटनाईक यांनी निर्माण केलेला प्रश्न की वैष्णव आणि शैव हा वाद आता नव्याने सुरू झाला आहे का निर्माण होतो. माझ्या मते हा आता निर्माण झालेलाच नाही हा पूर्वीपासूनच आहे . यावर उपाय अत्यंत स्पष्ट आहेत 


१ पहिले तुळजाभवानी आणि खंडोबाच्या मंदिराला सुद्धा जसे विठ्ठल मंदिराला री इनोवेशन लाभले तसे लाभले पाहिजे आणि हे करताना पर्यावरणाचा समतोल अजिबात बिघडता कामा नये 


२ तपोवन आतली झाडे कापता कामा नयेत आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा मात्र या तपोवनात पर्यावरणाचे संरक्षण करत व्यवस्थित कुंभमेळा भरवला जावा 


३ गंगा घाटावर बांधकामा बाबत नेमके काय घडले हे अजूनही स्पष्ट नाही मात्र जर का ते पाडले गेले असेल तर तुम्ही जेव्हा नवनिर्माण कराल तेव्हा सर्वच्या सर्व मुर्त्या रिनोवेट करून अधिक चांगल्या तऱ्हेने पुन्हा स्थापित झाल्या पाहिजेत आणि अहिल्याबाई होळकर यांचा मोठाच्या मोठा पुतळा उभा केला पाहिजे शैव लोकांना शांत करण्याचा हाच एक उपाय आहे अन्यथा हा वाद मोठ्या प्रचंड प्रमाणात चिघळणे अटळ आहे .


४ स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्नानाचा प्रश्न फार ताणवू नये असे माझे मत आहे . आदित्यनाथ योगी यांनी माफी मागावी अशी मागणी करणारे लोक आहेत मला वाटते की त्यांनी माफी मागण्याची गरज नाही . मात्र शासकीय व्यवस्थेतील कोणीतरी माफी मागितली पाहिजे जेणेकरून समतोल राखला जाईल . 


हिंदू संस्कृतीची एकात्मता आणि एकता झालीच पाहिजे त्याबद्दल आपणाला शंका असू नये परंतु ही एकता साधताना आपण विविधता गमू नये . आदि शैव , वैदिक , पाशुपत , लोकशैव, सांख्य , ब्रम्ह, ब्राह्मण , जैन, बौद्ध, वैष्णव , नवनाथ , हिंदू , नवशैव , नव वैष्णव , आर्य समाज धर्म वैगरे हे सर्वच वेगवेगळे धर्म आहेत . त्यांची ओळख पुसण्याची कसलीही गरज नाही भारताला एकात्म हिंदू संस्कृतीची गरज आहे आणि ही गरज भागवायची असेल तर या सर्वांचे स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र शरीर मान्य करत पुढे जावे लागेल. हे सर्वच आम्ही सनातन धर्माच्या नावाखाली एकाच धर्मात एकाच शरीरात विसर्जित करू असा उद्देश असेल तर तो सफल होणे शक्य नाही . त्यामुळेच मी सांगतो की सनातन संस्कृती म्हणा सनातन धर्म म्हणू नका . या देशात पुढेही नवीन नवीन धर्म निर्माण होणे अटळ आहे . मोक्ष आणि धर्म याबाबतीत हा देश कमालीचा सृजनशील आहे त्यामुळे नव्या नव्या वाट्या नव्या पद्धतीने शोधल्या जाणारच. 


या सर्व गोष्टींच्या बरोबरच आपण जर का विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान यांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले तर ते जास्त बरे होईल . गरीब राहून सुद्धा धर्म आणि मोक्ष जपणारा असा हा देश आहे पण त्यामुळे त्याला गरीब ठेवावा असा याचा अर्थ होत नाही . धर्म आणि मोक्ष या दोन गोष्टी नेहमीच श्रीमंतीमध्ये अधिक दिमागदार दिमाखदार आणि देखण्या दिसतात तेव्हा श्रीमंतीकडेही लक्ष दिले पाहिजे केवळ उद्योगपती म्हणजे श्रीमंती नव्हे या देशातले सर्व श्रमिक आणि त्यांना मिळणारे योग्य असे उत्पन्न हीच त्या देशाची खरी संस्कृती आणि श्रीमंती असते. तेव्हा स्नानाच्या एका प्रश्नावरून किती गोंधळ घालायचा हे आता प्रत्येकाने बसून ठरवावे . तुटेपर्यंत ताणवत बसू नये .


लोकांना मोक्ष मिळाला नाही की स्नान हा सुद्धा प्रश्न बनतो ज्याला मोक्ष मिळालेला असतो त्याला गंगेची गरज भासत नाही तो स्वतःच्या आत्मगंगेत सगळी पापे धुवूनच मोक्षाला पोहोचलेला असतो. ज्याचे मन चांगले त्याचे सर्व काही शुभ आणि मंगल हे नाही तरी सनातन सत्य आहेच. खरी गंगा ही शंकराच्या जटेतून उगम पावते म्हणजेच डोक्यातून उगम पावते . आता ज्यांना हे बेसिकच कळलेले नाही त्यांना काय सांगावे ?

श्रीधर तिळवे नाईक



आनंद मोरे 

माफ करा. शैवांनी स्मृती तयार केल्या नाहीत या वाक्यावर अडखळलो. ज्ञानेश्वरांना मुंजीचा हक्क नाकारणारे कोणत्या स्मृतींच्या आधारे तसे करत होते? स्मार्त शैव म्हणवले जाणारे कोणत्या स्मृती वापरतात? ज्ञानेश्वरांना वैष्णवांनी विरोध केला नाही हे नक्की. म्हणून अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर नंतर भावारथदिपिका लिहिते झाले.

तुम्ही शैवांचे जे प्रकार मांडले आहेत त्यातील कुठले प्रकार कुठल्या स्मृतींमागे अडकल्याने आजची स्थिती आली आहे?

श्रीधर तिळवे नाईक 

Anand More हा सर्व इतिहास 1000 नंतरचा आहे आणि हे मी वारंवार मांडलेले आहे. 1000 नंतर जवळजवळ सर्वच शैव पंडितांनी स्मृती स्वीकारल्या हेच तर मी मांडतो आहे आणि त्यामुळे झालेले घोळ तेही मांडतोय याबाबत मी कधी पंडितांना क्षमा केलेली नाही. किंबहुना आद्य शंकराचार्यांनी स्मृतीला मान्यता दिली आणि त्यामुळेच हे सगळे पतन सुरू झालेले आहे खुद्द ज्ञानेश्वर यांनी स्मृती स्वीकारली की नाही तर ज्ञानेश्वरीत त्यांनी स्मृती स्वीकारल्याचे पुरावे दिसतात प्रश्न इतकाच आहे की खरोखर ज्ञानेश्वरी ज्ञाननाथाने लिहिली की नाही किंवा खरोखर शंकराचार्य यांनी स्मृती स्वीकारली होती की नाही की हे सर्व नंतर रचण्यात आलेले आहे ? आठव्या शतकानंतरचा इतिहास हा फार गुंतागुंतीचा झाला आहे याचे कारण वैष्णव धर्माचा आणि स्मृतींच्या प्रभावाचा कालखंड सुरू झालेला आहे .


आनंद मोरे 


Shridhar Tilveझानेश्वर ज्ञानदेव आणि ज्ञाननाथ ही देखील शैवांच्या वेगवेगळ्या परंपरांतील नावे वाटतात. म्हणजे जितका प्रभाव वैष्णवांचा आहे तितकीच गुंतागुंत आणि तद्जन्य गोंधळ शैवांच्या पंथोपपंथांचाही वाटतो... निवृत्तीनाथांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी मुंजीचा हट्ट का धरावा हे मला अजूनही कळलेले नाही.


श्रीधर तिळवे नाईक 


Anand More त्याने हट्ट धरला असा पुरावा खरोखर आहे का की हेही सर्व रचले आहे ? ज्ञानेश्वरी आत्ता जी मिळते ती चक्क एकनाथांनी एडिट केलेली आहे आणि नाव सच्चिदानंद बाबा असेच आहे एक काळ असा होता की मला सुद्धा हे एक वाटायचे पण माझा आता निष्कर्ष असा आहे की या दोन व्यक्ती होऊन गेल्या पहिली ज्ञाननाथ जी निवृत्तीनाथांची शिष्य होती आणि दुसरे ज्ञानदेव अथवा ज्ञानेश्वर त्यातील ज्ञानेश्वर नाव नंतर मिळालेले आहे. ही बहुदा तेराशेपन्नासच्या च्या आसपास झालेली आहे


आनंद मोरे 


Shridhar Tilveतर्क मान्य आहे. पण ज्याप्रमाणे हट्टाचा पुरावा नाही त्याप्रमाणे तर्काचाही पुरावा नाही. पैठणहून आळंदीचे स्थलांतर मात्र झाले आहे हे नक्की. चांगदेवांचे गर्वहरणही झाले असण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे एकंदरीत शैव सोडून वैष्णव आणि मोक्ष सोडून भक्ती हा ज्ञानेश्वरांचा प्रवास दिसतो. तिथे बसवेश्वरांनाही विरोध करणारे वैष्णव होते असे दिसत नाही.


म्हणजे जसा आज अविमुक्तेश्वरानंद आणि आदित्यनाथांमधला आजचा वाद आहे तसाच तो त्याकाळीही अनेक शैवाचार्यांमधे होत असावा


श्रीधर तिळवे नाईक 

Anand More माझे म्हणणे असे की या दोन व्यक्ती वेगळ्या आहेत . ज्ञानेश्वरी मूळ स्वरूपात जी लिहिली गेली असेल तिचे रूप काय असेल याचा मला अंदाज आहे यावर मी लिहितो परंतु ते कधीही स्वीकारले जात नाही त्यामुळे हल्ली मी नादालाच लागत नाही . चांगदेव बाबत तुम्ही म्हणता ते सत्य आहे आणि चांगदेव पासष्टी ही खरी आहे अनेक अभंग ही ज्ञानानाथांचेच आहेत . या लोकांची लोकप्रियता वाढत गेली तसे मग यांच्या नावाने बरेच काही आले. विशेषतः ज्ञानदेव नावाच्या अत्यंत विद्वान असलेल्या व्यक्तीने ज्ञानदेवी लिहिली काही अभंगही लिहिले आणि मुख्य म्हणजे हरिपाठ लिहिला . मला स्वतःला हरिपाठ मधली भाषा आवडते . अतिशय सुगम शब्दात मांडणी आलेली आहे . त्यामुळे ज्ञाननाथ हे वैष्णव झाले असे मी मानत नाही . खरे तर त्यांनी समाधी घेतली की त्यांना समाधी घ्यायला लावली गेली हा एक फार मोठा प्रश्न आहे पण हा प्रश्न सध्या भलत्याच लोकांनी ताब्यात घेतल्याने आणि त्या प्रश्नाचा वापर भांडण निर्माण करण्यासाठी होत असल्याने मी काढता पाय घेतला . ज्ञानाच्या पातळीवरचे वाद हे ज्ञानाच्या पातळीवरच लढले गेले पाहिजे . थोडक्यात काय एक शैव ज्ञाननाथ झाला आणि एक वैष्णव ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर झाला .



आनंद मोरे 


श्रीधर तिळवे नाईक 


Anand More सर्वच आचार्य लोकांच्या मध्ये वादविवाद असतात आणि ते फार हेल्दी असते वाद विवाद झाले नाही की समाज मृत झाला असे समजावे अविमुक्तेश्वरानंद आणि आदित्यनाथांमधला आजचा वाद हा एकाच प्रवाहातला वाद आहे जो वेदप्रामाण्य मानतो आणि शैव हा पंथ असून तो सनातन किंवा हिंदू धर्माचा एक भाग मानतो. त्यामुळे हा जो वाद आहे तो दुसऱ्या प्रवाहातला वाद आहे आणि हे मी आधीच पोस्टमध्ये सांगितलेले आहे. फक्त यामुळे खूप केऑस निर्माण झाला म्हणून मग मी लेख लिहिला बाकी काही नाही .

 श्रीधर तिळवे नाईक 

आनंद मोरे 

Shridhar Tilveहो. आता माझ्यासाठी पुरेसे स्पष्ट झाले. धन्यवाद. 🙏🏻


श्रीधर तिळवे नाईक 

धन्यवाद 


आनंद मोरे श्रीधर ति

ळवे नाईक यांच्यात झालेला सुसंवाद 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय