साहित्य आणि समीक्षा

 अर्वाचीन स्वच्छंद वादी कवितेचा दुसरा जनक श्रीधर तिळवे नाईक 


श्रीधर हे माझे नाव माझ्या वडिलांच्या वडिलांचे असलेले पण मराठीत आपल्या नावाचे कुणी आहे का म्हणून शोध घेताना दोन श्रीधर सापडले आणि आश्चर्यकारकरीत्या दोघेही समकालीन लोकांच्या पेक्षा अधिक लोकाभिमुख होते . एकाने रामायण महाभारत व्यवस्थित आणले आणि दुसरा श्रीधर कुलकर्णी मात्र प्रचंड बंडखोर होता. त्याने ब्राह्मण असूनही सर्व काही धुडकावले आणि आपल्या पद्धतीने जीवनशैली निर्माण केली त्याने आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारणीवर प्रेम केलं आणि त्यांचा रोमान्स हा खऱ्या अर्थाने रोमँटिक होता . अर्वाचीन होता कारण तो ब्राह्मण आणि महार या भारतीय समाजातील सर्वात उच्च आणि सर्वात निम्न असा दोन जातींच्या मधला लिविंग रिलेशन होता. अर्थातच हे सर्व शक्य होते याचे कारण तो शैव होता त्याचा पहिला साक्षात्कार वाराणशीलाच होता म्हणजे काशीला होता त्याच्या भाषेत विश्वेश्वर आणि रुद्र ! आपली ओळख करून देताना त्याने या दोघांचे नाव घेतलेले आहे शैव हे कायम कसे वेगळे असतात हा प्रश्न मराठीला पडत नसतो पण मला कायम पडत असतो कारण मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे कायम वारकरी असतात किंवा वेदांती वैदिक ! त्याच्या आयुष्याची तुलना जर का आपण युरोपमधल्या रोमँटिक कविता लिहिणाऱ्या कवींशी केली तर कदाचित हा मराठी कवी त्यांच्यापेक्षा सरस जीवनशैलीचा वाटेल कारण तिकडे वर्ण जात नव्हती आणि आंतर वर्णीय आंतरजातीय नाते काय त्रासातून करावे लागते टिकवावे लागते याची कदाचित युरोपियन लोकांना कल्पना ही येणार नाही माझा स्वतःचा आजोबा याचा फॅन होता कारण आंतरजातीय विवाह करण्याचे धाडस माझ्या सुदैवाने माझ्या दोन्ही आजोबांनी केले माझा मातुल आजोबा हा चक्क प्रभू घराण्यातून बायको करून आणलेला होता माझी आजी ज्यांना आजकाल कायस्थ म्हणतात त्यांच्यातून त्यांच्यातून आली होती 


अर्थातच त्याचे लिजंड बनणे अटळ होते आणि तो बनला त्याचे नाव पठ्ठे बापूराव ! ब्राह्मण असूनही तमाशा करणारा आणि नामचंद पवळा नावाच्या तमासगिरीणीच्च्या प्रेमात पडलेला ! 


त्यांचा आणि केशवसुत यांचा जन्म 1866 सालीच व्हावा हा एक योगायोग (पठ्ठे बापूराव जन्म ११- ११- १८६६ आत्ताचा सातारा पूर्वीचा सांगली, गाव हरणाक्ष रेठरे )दोघेही ब्राह्मण परंतु दोघांनी दोन दिशा पकडल्या यामध्ये त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीचा वाटा किती हा एक फार मोठा विषय आहे . केशव सुत कायमच वेदांती राहिले पण वेदांती असणे सुद्धा त्या काळात पुरोगामी गोष्ट होती . पण पठ्ठे बापूराव खऱ्या अर्थाने क्रांतिकारक कारण त्यांची जीवनशैली क्रांतीकारक होती. ज्या काळात तमाशा अटेंड करणे गुन्हा होता त्या काळामध्ये त्यांनी खुद्द तमाशा केला आणि अतिशय मनापासून केला. एकदा लावणी लिहायला घेतली कि ती लिहूनच संपवायची आणि तिच्यात दुरुस्ती करायची नाही असा काहीतरी विचित्र बाणा त्यांचा होता. पैशाबाबत ही तेच प्रचंड उधळपट्टी करणारा स्वभाव हे त्यांचे वैगुण्य होते . त्यामुळे म्हातारपण अत्यंत हलाखीत गेले . बापूसाहेब जिंतीकर यांनी जर का त्यांच्या लावण्या प्रकाशित केल्या नसत्या तर कदाचित त्यांनी काय काम केले हे कळालेच नसते. त्यांनी मुंबई पुणे कोल्हापूर वगैरे सर्व शहरांच्या वर लावण्या लिहिल्या आणि ही अर्वाचीन सुरुवात होती . हे काम केशवसुत यांच्या कामाइतकेच महत्त्वाचे होते . त्यांना त्यांच्या गावाने बहिष्कृत केले यात आश्चर्य नाहीच त्यांना मोरे लोकांनी आश्रय दिला. 


पवळा ही त्यांच्या मनाची राणी ! साहजिकच तिच्याबरोबरच त्यांचा शृंगार त्यांच्या रचनांच्या मध्ये सुद्धा उतरला हा खरा रोमांस होता केशवसुतांच्या सारखा तो मध्यमवर्गीय नव्हता . 


त्यांच्या लिखाणाची सुरुवात अर्थातच ओवी पासून झाली होती मग ते कविता रचायला लागले. त्यांच्या घराच्या शेजारीच पूर्वाश्रमीच्या महारांचे राहणे होते आणि त्यांची लावणी कवने कानावर पडत होती घरचे नाव श्रीधर आणि ते केवळ कवी नव्हते संगीतकार पण होते . स्वतःच्या कवनाच्या संगीत रचना त्यांना सुचत . हळूहळू हलगी डफ अस्वस्थ करायला लागला आणि पुढे मग वाटचाल सुरू झाली. भवताली अत्यंत प्रेरणा देणारे असे औंध संस्थान होते. 


रेठरे हरणाक्ष माझे घर |

जंगली बाबांचा हात शिरावर|

त्यांनी पंथ दावीला राजयोग सुंदर |


अशी आध्यात्मिक विरासत त्यांनी सांगितलेली आहे . जंगली महाराज हे सद्गुरु होते आणि कट्टर योगी राजयोगी ! 


एक ब्राह्मणाचा मुलगा तमाशा सारख्या लोककलेच्या नादाला लागतो आणि अस्पृश्यांच्यात मिसळतो हे पचणे अवघडच होते त्यामुळे टीका सुरू झाली पण तमाशा ही पॅशन झालेल्या बापूराव कुलकर्णी म्हणजे श्रीधर कुलकर्णी या माणसाला काही स्वस्थ बसवेना . सुरुवातीला चोरून रचना पुरवणे सुरू होते नंतर हळूहळू उघड होत गेले . या रचना छंदात असूनही मुक्त होत्या उदाहरणार्थ 


लग्न लावले कुटुंब केले 

कळत असोनी टाकली उडी 


यामध्ये आठ मात्रांचे पादा कुलक आहे पण पुढे 


पायात बेडी बळे अडकवली 

येऊन बसल्या बारा नडी


यामध्ये पायात बेडी नऊ मात्रा आहेत येऊन बसल्या दहा मात्रा आहेत तर बारानडी सात मात्रा आहेत 


मला मुक्त गझल सुचण्यामध्ये या लोक परंपरेचा खूप मोठा वाट आहे . गाताना ह्या सर्व आठ मात्रा होऊन जातात . 


अर्थात हे करताना एके ठिकाणी ते म्हणतात 

वेदशास्त्र आणि पुराने वर्जुनी भलतीच वटा वटा 


एकंदरच हा वट वेगळा होता त्यांच्या भाषेत भलताच होता .


त्यांची देशाची लावणी कळत नकळत केशवसुतांच्या मार्गी परंपरेला दिलेला देशी छेद आहे स्वतःच्या अवकाशात ठाम उभे राहणे हे इथे चांगले साधले आहे 


पवळाबरोबरचा त्यांचा रोमान्स सुद्धा देशी पद्धतीनेच अवतरत राहिला 

त्यांच्याच भाषेत सांगायचे तर 

लाखो बायकात खरी ग देखणी 

तुझ्या ग वानी आम्ही नाही पाहिली कोणी ग 


अशी पवळा होती . 


आता अशा प्रेमप्रकरणात वर्ण संघर्ष जाती संघर्ष अटळ असतो तसा तो झाला आश्चर्य म्हणजे यामध्ये बहुजन समाज होता. हरिभाऊ किवलेकर हे पूर्वाश्रमीचे महार आणि भागुजी माळी यांनी पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांना वाळीत टाकावे असा प्रस्ताव दिला . साहजिकच साथीदार मिळणे अवघड होऊन बसले कारण त्या काळामध्ये वाळीत टाकणे हे फारच कठोर असे .


ब्राह्मणाचा महार झाला असाही आरोप आला. बहिष्कार पडल्यामुळे साहजिकच फड उभा राहणे शक्य नव्हते विवंचना वाढत गेल्या 


शेवटी पट्टे बापूराव यांनी सर्वांना बोलावून विचारले की आमचे (म्हणजे पवळा आणि मी) काय करणार आहात 


तर समोरच्या लोकांनी विचारले की काय करावे तर मग त्यांनी सूचना दिली की आम्हा दोघांनाही विका 


शेवटी एलफिस्टन थिएटर चे मालक अबू सेट यांनी दोघांना दरमहा 900 रुपयांना विकत घेतले 


अर्थात सेठ पुढे प्रश्न आला की आता मायना 900 रुपये द्यायचे कसे तर पठ्ठे बापूराव यांनी सल्ला दिला की आम्हा दोघांना तुम्ही प्रदर्शनात उभे केल्यासारखे उभे करा आम्हाला पाहायला लोक येतील आणि लोक खरोखरच यायला लागले दरदिवशी 300 ते 400 रुपये उत्पन्न यातून उभे राहिले एकंदर शेठला फायद्याचा सौदा ठरला इतकी पवळाची क्रेझ होती . अर्थात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मानसिकतेवर बराच प्रकाश टाकते 


यातून पुढे जे होणार होते ते झाले ते म्हणजे ब्राह्मण बाटला किंवा नाही बाटला यावर वाद सुरू झाले मारा माऱ्या झाल्या आणि कोर्टात केस सुरू झाली शेवटी यावर उत्तर म्हणून बापूरावाने कोर्टाला चक्क पीला हाऊस मधल्या तमाशाच्या फडात उभे केले एक फार्स सादर केला तेल्याच्या मेलेल्या बैलाचा फार्स असे त्याचे नाव होते . स्वतः स्टेजवरून मी महार झालो आहे असे समजा असे डिक्लेअर केले आणि शेवटी कोर्टाकडे फैसला गेला कोर्टाने निर्णय दिला की बाटवा बाटवी काही झालेली नाही .


या खटल्यामुळे पठ्ठे बापूराव प्रचंड गाजले मुंबईची लावणी ही नंतर आली जी प्रचंड गाजली आणि अर्वाचीन कवितेमध्ये तिचे एक स्थान आहे. नामदेव ढसाळ चा मानला गेलेला गोलपिठा प्रथम या मुंबईच्या लावणीत येतो याची अनेकांना कल्पना नाही . 


आत मधी किर्तन वरून तमाशा ही ओळसुद्धा बापूरावांची आहे लाखात अशी देखणी किंवा नटरंगी नार हे सुद्धा बापूरावांचेच कवन! 


अलीकडे जे ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही हा डिबेट झाला त्या संदर्भात सुद्धा बापूरावांच्या फार उत्कृष्ट अशा दोन ओळी आहेत बापूराव लिहितात ,

"किती देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे 

जे का तुझ्या भक्तीशी लागले 

तितुक्यांची तू बुडवली घरे "


पुढे करवीर नगरीत शाहू महाराजांनी जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा तिथे तमाशा करताना त्यांनी कोल्हापूरची लावणी रचली ती सुद्धा त्या काळाचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे 


शाहू महाराजांनी अर्थातच त्यांचा जरी फटका देऊन आणि सोन कडे देऊन गौरव केला पवळाला सोन्याचे दोन तोडे दिले


आणि मग पुढे मुंबईच्या बटाट्याच्या चाळीत दोघांचा अन ऑफिशियल संसार थाटला गेला . काही काळ हे सर्व उत्तम चालले परंतु एक दिवस कळत नकळत फेट्यासाठी म्हणून पवळाचे लुगडेच वापरले गेले आणि ठिणगी पडली नंतर मग दागिने गेले आणि हे दागिने तिच्याच लोकांनी लुटले होते साहजिकच घातलेली केस काढून घ्यावी लागली आणि इथे दुसरे मतभेदाचे कारण वाढू लागले. बापूरावांना शिक्षा दिली गेली पाहिजे होती असे वाटत होते तर पवळाला आहे ही सर्व माणसे तुरुंगात गेली तर तमाशा बंद पडला असता असे वाटत होते. जेव्हा दोन्ही लोक बरोबर असतात तेव्हा मग मतभेद मिटवणे फार अवघड जाते तेच इथे घडले तणतण वाढत गेली आणि एक दिवस पवळा निघून गेली 


जेव्हा दोघात मतभेद होतात तेव्हा तिसरा आपोआपच येतो मारुतीराव पाटील यांच्या निमित्ताने आपोआपच तिसरा पक्ष पवळाच्या आयुष्यात आला त्यांनी पवळाच्या सर्व अटी मान्य करून तिचा तमाशा उभा केला. दागिने जसे पूर्वी होते तसेच करून दिले . 


"द्यावा एक मुका चांगला "अशी कवनातून थेट किस ची मागणी करणारे पठ्ठे बापूराव कुलकर्णी हे मात्र पवळा गेल्यानंतर हताश झाले.


मग त्यांचा डर मधला शाहरुख खान झाला त्यांनी प्रथम पवळाला शेवटची आठवण म्हणत चार जरीची पातळे भेट दिली आणि नंतर पोलीस स्टेशनला त्यांच्या चोरीची तक्रार केली . प्रेमभंग झाला म्हणून असे काही करणे हे चुकीचे होते कळत नकळत तुम्ही प्रेमात सूड घ्यायला जाता पण असे सूड अंगलट येतात स्वतःला राजयोग दीक्षा घेतली म्हणणारे बापूराव कळत नकळत इथे मात्र चुकले. खरे तर बाई स्वतःच्या मर्जीने बाहेर पडून ती दुसऱ्याकडे गेली की आपण शांत पाठ फिरवावी आणि तिला मोकळे करावे पण काही प्रेमी लोकांना ते जमत नाही . यामागे अर्थातच पझेसिव्हनेस असतो . शेवटी मग 

सारा मायेचा बाजार 

तीन दिवसाचा गे भार

अशी उपरती त्यांना झाली 


पण पुढे पवळाचे आणि मारुतीरावांचे एका व्यक्तीने तिचा तमाशा मध्येच हात धरला यावरून बिनसले मारुतीरावांनी पण पोलीस स्टेशनात तक्रार केली पवळाने आपले दागिने चोरले अशी! पण पवळाने दागिने आपल्या नावाने खरेदी केल्याची पावती सादर केली आणि हा खटला जिंकला पुन्हा पठ्ठे बापूराव आणि पोवाडा एकत्र आले पुन्हा तमाशा सुरू झाला पुन्हा प्रेम पण 

खाली जमीन अंथरेण

वर आकाश पांघरेन


मानत सुरू झाले 


कुठल्याही प्रेमप्रकरणात विशेषता समाजमान्य नसलेल्या रोमँटिक प्रेम प्रकरणात समाज येतोच तसा तो इथेही आला अचानक गावकऱ्यांनी बापूराव यांच्यापुढे त्यांनी पुन्हा ब्राह्मण धर्मात परतावे असा आग्रह धरायला सुरुवात केली त्यासाठी 300 रुपयाची वर्गणी जमवली आणि त्यांनी काशीला जाऊन शुद्धीकरण करावे असाही बूट निघाला अर्थात एकदा का पठ्ठे बापूराव ब्राह्मण धर्मात परतले तर ते आपल्याला टाकतील अशी भीती पवळाच्या मनात निर्माण झाली जी एका अर्थाने त्याकाळची सामाजिक परिस्थिती बघता योग्य होती पण मला नेहमी वाटते की तिने थोडासा विश्वास ठेवायला हवा होता तिने गाव सोडले आणि मुंबईला आली बापूराव पुन्हा एकदा तिला समजावण्यासाठी आले परंतु कळत नकळत कुठेतरी ही भीती आता दगड बनली होती . साहजिकच पवळा हलली नाही आणि ती आपल्या गावी गेली 


इकडे बापूरावांनी नवा तमाशा उभा करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केले आणि ताई मरींचेकर हिच्याबरोबर फड उभा केला परंतु तो जितका चालायला हवा तितका चालला नाही कारण त्यात पवळा नव्हती . आपल्यामुळे फड चालतोय असे वाटणाऱ्या बापूरावांना हा धक्का होता . खरे तर दोघांच्यामुळे ही तो चालत होता परंतु आता हा फड चालेना . शेवटी मग पट्टे बापूराव यांनी 1836 मध्ये तमाशातून निवृत्ती घेतली 


इकडे पवळाची ही स्थिती वेगळी नव्हती शेवटी वय झाले होते आणि आजार बळवले होते साहजिकच आयुष्याच्या शेवटी तिला बापूरावच आठवायला लागले . त्यांचे तिच्यावर निस्सीम प्रेम होते आणि ते प्रेम आठवत शेवटी मुंबईत भावाकडे आलेल्या पवळ्याने 1936 यावर्षी प्राण सोडले 


ही प्रेम कहानी दोन्ही बाजूने तीव्र होती तिच्यात खरे होते नखरे होते एकमेकांवरचे जीवापाड प्रेम होते आणि सूड सुद्धा होते. 


त्या काळामध्ये व्हिडिओ शूटिंग फारसे प्रचलित नव्हते त्यामुळे आपणाला पवळाची कला माहीत नाही परंतु पवळाला एक गोष्ट नक्की माहिती होती ती म्हणजे त्यांच्या लावण्या नंतर टिकतील आणि गायल्या जातील . तसेच झाले .


पठ्ठे बापूराव आणि केशवसुत यांची आपण तुलना केली तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे दोघांचीही शैली वर्णनपर आहे दोघांच्या जवळ कल्पनाविलास खूप कमी आहे अधून मधून तो डोकावतो परंतु तरीही आत्ताच्या काव्याच्या स्टॅंडर्ड च्या दृष्टीने तो कमी पडतो . रूपकात्मक ओळी फार कमी येतात त्यापेक्षा अधिक वास्तववादी सरळ पद्यात्म ओळी येतात . कळत नकळत त्याकाळची ही काव्यशैली होती आणि ती दोघांच्यातही दिसते . ज्योतिबा फुले यांच्यामध्येही हे दिसते . अर्वाचीन कवितेचा आरंभ हा ज्योतिबा फुले यांच्यामुळे झाला असला तरी आणि ते सुधारणावादी होते हे खरे असले तरी केशवसुत आणि बापूराव हे दोघेही एका अर्थाने रोमँटिक परंपरा आणत पुढे सरकले . मात्र पद्यात्मक लिहिणे कळत नकळत या तिघांच्याही लिखाणांमध्ये कॉमन फॅक्टर आहे . फार अपवादात्मक वक्रोक्ती येते. मीटर मध्ये लिहिताना प्रत्येक वेळेला अभूतपूर्व काही असे निर्माण होते ही एक फार मोठी चुकीची समजूत आहे हे या तिघा कवींच्यामुळे कळते . मात्र या तिघांनीही त्यांच्या काळाचा विचार करता फार पुढची कविता लिहिली. विशेषतः आशयाच्या संदर्भात त्याबद्दल शंका असू नये. तिघांनाही समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक वाटत होते आणि हाही एक कॉमन फॅक्टर आहे . एका अर्थाने तिघांच्याकडेही एक सामाजिक बांधिलकी होती यातील केशवसुत फार क्रांतिकारक जगले नाहीत परंतु ज्योतिबा फुले आणि पठ्ठे बापूराव हे मात्र अफलातून क्रांतिकारक आयुष्य जगले याबद्दल शंका नाही . आपल्या आयुष्यातील आलेल्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून तू सवता आन असे म्हणणारे ज्योतिबा फुले आणि ब्राह्मण आणि महार अशा दोन टोकांच्यावर जन्मलेले असूनही पवळाच्या प्रेमात पडणारे तिच्यासाठी महार होणे पत्करणारे आणि पुढे जाऊन पुरुषसत्ताक समाजामध्ये पवळाची अफेयर झाली तरी तिला तितक्याच पुन्हा प्रेमाने स्वीकारणारे पठ्ठे बापूराव हे काळाच्या मानाने फारच पुढे गेलेले होते आश्चर्यकारकरित्या आपण त्या काळातल्या मराठी समाजाचा विशेषता बहुजन मराठी समाजाचा विचार केला तर दिसते असे की या पठ्ठे बापूराव पवळा जोडीला निव्वळ पाहण्यासाठी सुद्धा लोक येत होते म्हणजे खरोखरच आंतरजातीय अंतर वर्णीय विवाहावर बहुजन समाजाकडून बहिष्कार टाकला जात होता का असा एक मोठाच पेच उभा राहतो पोलीस स्टेशनमध्ये पवळा जेव्हा गेली तेव्हा अस्पृश्यता पाळली गेली होती का असाही प्रश्न निर्माण होतो . त्या काळातले समाज वास्तव जसे आपल्यापुढे सादर केले जाते तसे ते होते का हा प्रश्न या दोघांच्या आयुष्याच्या संदर्भात अधिकच तीव्रपणाने उभा राहतो . ही प्रेम कहानी जितकी सरळ वाटते तितकी ती नाही तिच्यात सामाजिक जीवनाचे विशेषता मराठी बहुजन सामाजिक शैव समाजाचे अनेक पेच लपलेले आहेत . मराठीतील अर्वाचीन कवितेचे तीन पायोनियर त्यातील दोन शैव आहेत हा केवळ योगायोग नाही प्राचीन बद्दल मी आधीच बोललेलो आहे . असो.


माझा त्यांना म्हणजे पवळा आणि पठ्ठे बापूराव या दोघांनाही मानाचा मुजरा ! 


श्रीधर तिळवे नाईक

मी फक्त प्रणव सखदेव यांच्या कादंबरीवर का बोललो ? श्रीधर तिळवे नाईक 


माझे साहित्यिक कार्यक्रमांच्या बाबतीत नेमके काय चालते याबद्दल अनेकांचां गोंधळ उडालेला दिसतो आणि काहींचा गैरसमज ही झालेला आहे म्हणून हे लिहीत आहे. 


हे खरे आहे की मी साहित्यिक कार्यक्रम खूपच कमी घेतो कारण अनेक क्षेत्रांमध्ये माझे काम चाललेले असते . मात्र जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी कधीही नाही म्हणत नाही . अनेक फालतू कार्यक्रम मात्र मी नाकारतो कारण असा एक कार्यक्रम करून काय होते ते मी पाहिले आहे केवळ मंगेश आणि भुजंग मेश्राम यांच्या आग्रहास्तव मी तसा कार्यक्रम घेतला होता आणि ज्याचा हा कार्यक्रम घेतला त्याची कविता अतिशय सामान्य होती. हेमंत दिवटे यांच्या थांबताच येत नाही या कवितासंग्रहावर मी बोलण्याचे सर्वात मोठे कारण सलील वाघचा आग्रह होता अन्यथा परिसंवादात सहसा बोलू नये असाच माझा एक नियम आहे . अपवाद सर्वच ठिकाणी असतो आणि तो नेहमी मैत्री असतो 


कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सर्वसाधारणपणे आचार्य हे नेहमी एकटे बोलतात सुरुवातीला कोणीतरी ओळख करून देते आणि आचार्यांचे भाषण झाल्यानंतर कुणीतरी कार्यक्रम समाप्तीची घोषणा करण्यासाठी बोलतो त्यात जे काही बोलले गेले त्याचे सार तत्व सांगितले जाते 


ही एक व्यवस्था आहे आणि ती हजारो वर्षे सुरू आहे . साहित्यिकांची अपेक्षा अशी असते की मी त्यांची मेथड फॉलो करावी आणि मला ते शक्य नसते . याचा अर्थ असा नाही की मी प्रयत्न केला नाही परंतु अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या व्यक्तिमत्त्वात फीट बसत नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे 


साहजिकच जेव्हा साहित्यिक कार्यक्रम माझ्याकडे चालून येतात तेव्हा मी ही माझी पद्धत सांगतो साहित्यिक कार्यक्रम या पद्धतीत बसतच नसल्याने साहजिकच पुढे काहीही पावले पडत नाहीत मी ही कधी पाठपुरावा करत नाही कारण कुठल्याही क्षेत्राची स्वतःची एक सिस्टीम असते या सिस्टीम मध्ये तुम्ही त्या सिस्टीमबाहेरचा माणूस बोलवत असाल तर एक तर त्या माणसाने त्या सिस्टीमशी अड्जस्ट करणे गरजेचे असते किंवा मग सिस्टीमला त्या माणसाशी अड्जस्ट करावे लागते प्रणव सखदेव यांच्या कादंबरीवर मी बोललो कारण तो या आचार्य सिस्टीमशी ऍडजस्ट करायला तयार होता. त्यानंतर कुठलेही आमंत्रण अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट करायला तयार नव्हते त्यामुळे साहजिकच कोणालाच होकार देता येणे शक्य झालेले नाही हीच गोष्ट काव्यवाचन संदर्भात ठरवली आहे मुंबई विद्यापीठात माझे पहिले काव्यवाचन केशव मेश्राम यांनी ठेवले होते आणि ते चौथ्या नवतेच्या कविता नवीन पिढीला कळावे म्हणून ठेवले होते आणि ते सोलो होते . नंतर ही शिवाजी विद्यापीठात मराठी विभागातर्फे रणधीर शिंदे यांनी ऑफर दिली होती आणि जवळजवळ ठरलीही होते पण माझ्या आरोग्याच्या तक्रारीने सर्व काही अशक्य होत गेले चौघांच्या कवितेबाबत गोष्टी अशक्य बनत गेल्या आणि त्या का अशक्य बनल्या याची कारणे इतर तीन कवींना माहिती असावीत . अर्थातच मी आता मात्र त्यांच्यामधून अंग काढून घेतो आहे. यामुळे काय होणार याची मला कल्पना आहे आणि होती

माझी याबद्दल कसलीही यापूर्वीही तक्रार नव्हती आणि पुढेही नसणार. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या जागी चुकतो आहे . 


चित्रपट ही गोष्ट या गोष्टीला अपवाद आहे कारण ती माझ्यासाठी कला कमी आणि व्यवसाय जास्त आहे . तिथे मी समीक्षक म्हणून काम करू इच्छित नाही. माझ्या अभिनयाच्या क्लासमध्ये मात्र मी एकटाच असतो आणि मी आचार्य म्हणूनच शिकवतो .


खरे तर यावरही मी फार काही जाहीर बोलत नव्हतो परंतु अलीकडे आमंत्रण जास्त यायला लागलेली आहेत म्हणून हे बोलतो आहे उगाच प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण देत बसणे यापेक्षा एखादे स्पष्टीकरण जाहीर केले की मग वाया जाणारी आमंत्रणे कमी होतील इतर लोकांचा वेळ वाचेल अशी अपेक्षा आहे   


श्रीधर तिळवे नाईक

उत्तर आधुनिकता , विश्राम गुप्ते मीनाक्षी पाटील आणि माझी कविता 


हा एक असा विषय आहे ज्यावर मी बोलणे सातत्याने टाळलेले आहे याचे कारण या संदर्भातली समीक्षा सातत्याने येणे आवश्यक आहे याची मला कल्पना होती आणि यासंदर्भात आपण वाट पहावी असे धोरण मी स्वतः स्वीकारले होते .मला वाटते की आता उत्तर आधुनिकता ही संकल्पना या दोघांच्या अंगाने अधिक गडद झालेली आहे त्यामुळे आता काही प्रमाणात का होईना पण मांडणी करायला काही हरकत नाही .


मराठी मांडणी तपासायची असेल तर दोन गंड बघावे लागतील 


पहिला गंड विरोध गंड oppositional complex 

आणि दुसरा गंड स्पर्धागंड competition complex 


मुळात विरोधगंडाचा तपास करायचा झाला तर आपणाला अभिधाच्या इतिहासात जावे लागते वास्तविक सुरुवातीला अभिधाला काहीही किंमत नव्हती नव्यांची अक्षर चळवळ यापेक्षा काहीही चेहरा नव्हता पण सौष्ठवचा पहिला अंक आला आणि सर्व चित्र बदलले त्यानंतर हेमंत दिवटे माझ्याकडे आला आणि मी स्वतः अभिधा स्वीकारली . वास्तविक सौष्ठव हे नाव देऊया असा पर्याय मी टाकू शकलो असतो परंतु मला अशा प्रकारचे राजकारण खेळण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता  


यानंतर माझ्या बांधकाम चालू आहे या कवितेवरून जो वाद झाला त्यानंतर बरेचसे गणित बदलले आणि अचानक विरोध सुरू झाला . मुळात जे नवीन खेळाडू आले होते त्यांनाही आपली ओळख प्रस्थापित करायची होती आणि त्यासाठी काही हालचाली करणे आवश्यक होते त्यामध्ये श्रीधर तिळवे विरोध ही एक हालचाल बनून गेली आणि त्यातूनच विरोधगंड तयार झाला


मला त्याचाही प्रॉब्लेम नव्हता कारण शेवटी चळवळ ही नेहमीच वेगवेगळी वळणे घेत असते मात्र जेव्हा एक पद्धतशीरपणे समीक्षाव्यूह पुढे आणला जातो तेव्हा मात्र सामाजिक पातळीवर त्याचा विचार करावा लागतो कारण समाजावर इष्ट आणि अनिष्ट परिणाम होत असतात. अभिधांनंतर नावाखाली हा समीक्षा व्यूह सातत्याने पुढे आणला जात आहे आणि म्हणूनच यासंदर्भात एक-दोन सूचना कराव्यात म्हणून हे लिहितो आहे.


या ग्रुप मधले बहुतांशी लोक टीका करण्यात वाकबगार परंतु टीका सहन करण्यात अजिबात वाकबगार नाहीत . आम्ही टीका करू पण तुम्ही आमच्यावर प्रती टीका करता कामा नये अशा प्रकारचे अपेक्षा उद्योग चाललेले असतात. दुसऱ्यांची टीका सहन होत नाही अशा लेवलला तुम्ही स्वतः असाल त्याबाबत संवेदनशील असाल तर मग तुम्ही स्वतः कशाला टीका करता? एक तर पूर्णपणे मैदानात उतरा किंवा मग उतरू नका कारण मैदानात तुम्ही गोल मारायला बघणार आणि समोरचा माणूस होणारा गोल वाचवणारच नाही असे तुम्हाला कसे काय वाटते ? म्हणून सुरुवातीला सूचना देतो की मी माझा डिफेन्स करतोय आणि तो यासाठी करतोय कारण त्याचे सामाजिक परिणाम होऊ शकतात .


मी स्वतःच उत्तराधुनिकतेला चौथ्या नवतेचा भाग मानलेले आहे ते यासाठी की चौथा नवतेतल्या अनेक लोकांनी आपल्या काव्यांच्या किंवा कादंबऱ्यांच्या रचना करताना उत्तराधुनिकतेचा , उत्तराधुनिक तंत्राचा आधार घेतलेला आहे अशावेळी पारंपारिक पद्धतीने कोणी नवा विषय आणि आशय मांडत असेल तर त्या आशयाला किंमत दिली पाहिजे असे मी मानतो. खुद्द पुरोगामी कवितेची सुरुवात ज्यांनी केली त्या ज्योतिबा फुले यांनी पारंपारिक अभंग रचना शाहिरी पोवाडा अशा पद्धतीचा अवलंब केलेला होता पुढे आधुनिक कवितेची ज्यांनी सुरुवात केली त्या बाळ सिताराम मर्ढेकर यांनी जे तंत्र अवलंबले ते पारंपारिकच होते आणि ओव्या आणि अभंग आणि पादाकुलक अशा पारंपारिक रचनांमध्ये त्यांनी नवा आशय सादर केला होता त्यामुळे अशा प्रकारचा इतिहास मराठी कवितेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


त्यामुळेच मनोज जोशी याच्या कवितेला मी ग्रँड वेलकम दिला होता कारण अर्बन आधुनिकता आणि अर्बन उत्तराधुनिकता यांचा मिलाफ त्याच्या कवितेमध्ये होता चौथ्या नवतेचे पडसाद होते . पण याचा अर्थ असा नव्हता की मी स्वतः उत्तर आधुनिकतेचा समर्थक होतो किंवा आहे तंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच असते की ते शेवटी कुठल्याच जूनतेला किंवा नवतेला इतके चिकटलेले नसतं की ते सेपरेट वेगळे करता येणार नाही ते पृथक करता येते त्यामुळेच तुम्ही प्रबोधनवादी अभंग सौंदर्यवादी अभंग आधुनिक अभंग आणि उत्तराधुनिक अभंग असे लिहू शकता आणि आता चौथ्या नवतेचा अभंगही तुम्ही लिहू शकता कारण शेवटी तंत्रे आशयापासून वेगळी काढता येतात पृथक्करण करून पृथक करता येतात आणि नव्या विषयाशी नव्या आशयाशी जोडता येतात . मी स्वतः हे अनेकदा केलेले आहे त्यामुळे तंत्राबाबत माझा कधी आक्षेपच नव्हता . आधुनिक भाषेत सांगायचे तर आकाराबाबत माझा आक्षेप नव्हता आशय काय व्यक्त होतो हे मात्र माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते . 


कुठल्याही कलाकृतीमध्ये आशय हा अवकाशाच्या अंगाने 

१ विषय उदाहरणार्थ व्यापार हा विषय आहे ग्राहक मालक व्यापारी यांच्यातले नाते 

२ विषय रेखा मॉल हा विषय रेखा आहे जी मी आणि हेमंत दिवटे आणि कथेत सतीश तांबे अशी हँडल केलेली आहे 

३ आशय रेखा themes मॉल मधला मी 

माझे स्वतःचे तिळवे भांडार नावाचे दुकान मॉल मुळे नष्ट झाले त्यामुळे तो प्रसंग आशयरेखा म्हणून डेव्हलपत गेला 

४ उक्ती यामध्ये प्रामुख्याने लेखन शैली येते भाषाशैली येते 

५ मक्ती 


अशा पाच पद्धतीने व्यक्त होत राहतो 


काळाच्या अंगाने 

१ सनातन: दुकान हे एका अर्थाने आता सनातन झालेले आहे सूर्य चंद्र हे सनातन विषय आहेत पृथ्वी ही सनातन विषय आहे निसर्ग त्यातील झाड सनातन विषय आहे 

२ सद्यतन आत्ताची पृथ्वी हा सद्यतन विषय आहे कारण तिच्याशी पर्यावरणाचे प्रश्न आता जोडले गेलेले आहेत 

३ आद्यतन झाड हे मूळ आद्य मांडले तर त्या अंगाने जे येईल ते माझ्या अडा हॉ का बाणा सुना मध्ये यासंदर्भात एक आद्यतन झाडकथा आहे 

४ अद्यतन आत्ताचे झाड हे फोटोजनिक कसे आहे हे मी मांडले होते एका झाडाकडे मॉडेल म्हणून पाहणे त्यात होते ही कविता कव्ही या संग्रहात आहे 

५ कर्मठन : आणि अर्थातच झाड हे कर्मठ पद्धतीनेही मांडता येते उदाहरणार्थ झाडाच्या अंगाने कोणी वटवृक्षाची आणि त्या संदर्भातील वटपौर्णिमेची समर्थन करणारी कविता लिहिली तर तो कर्मठपणा होईल 


अशा पाच पद्धतीने व्यक्त होत राहतो 


याउलट अभीव्यक्तीच्या अंगाने 

१ पारंपारिक आकार 

२ नवीन आकार 

३ नवा आकार 


अशा पद्धतीने अभिव्यक्ती होत असते नवीन आकारामध्ये पारंपारिक आकारामध्येच काही बदल घडवून आणला जातो उदाहरणार्थ गझल : वृत्त गझल ही पारंपारिक असते परंतु मुक्त गझल (माझा कव्ही हा संग्रह पहा ) हा त्यामध्ये घडवलेला बदल असतो हा नवीन असतो त्या उलट चिन्ह गझल हा आकारच नवा असतो मी जेव्हा अक्षर सुनीत शोधतो तेव्हा ते नवीन असते किंवा नवे असते नवीनता आणि नवता यांच्या मुळाशी नवीन असणे आणि नवे असणे असते 


मी जेव्हा निर्वस्तूवादी कविता आणतो तेव्हा तो पूर्णपणे नवा आकार असतो 


उत्तर आधुनिकतेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे तिने पुन्हा एकदा आधुनिक मुक्तछंदाला चॅलेंज देत पारंपारिक छंद आणले ग्रेस यांच्या संदर्भात हे तीव्रतेने जाणवते पण आशयाबाबत ते आधुनिक सुद्धा होत नाहीत अत्यंत पारंपारिक राहतात पण त्यांच्या भावनांची तीव्रताच इतकी आहे की ती अपील होत राहते याउलट अरुण कोलटकर यांच्या कविता या संग्रहामध्ये ज्ञानेश्वरांच्या समाधी वर लिहिलेला अभंग अत्यंत पारंपारिक आकाराच्या पद्धतीत आहे परंतु आशय मात्र पूर्णपणे नवीन आहे . विंदा करंदीकरांच्या आधुनिक अभंगापेक्षा हा अभंग वेगळा आहे पण तो आशयामुळे आहे मी माझ्या टीव्हीच्या अभंगांमध्ये मग चौथ्या नवतेचा अभंग सादर करतो 


यामधून नेमके काय सिद्ध होते तर यामधून हे सिद्ध होते की अभंग हा आता सनातन काव्य आकार बनलेला आहे आणि प्रत्येक नवतेमध्ये तो येऊ शकतो आता जर का अभंग लिहिण्याची एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमता नसेल तर ती काही उणीव मानता कामा नये परंतु आपल्या उणीवेला जाणीव म्हणून किती प्रमोट करायचं ? हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. वाईट गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टीचे समर्थन करत आहात तो मुक्त छंद हा काही तुम्ही शोधलेला नाही तो पाश्चात्त्य देशातून तुम्ही आयात केलेला आहे . 


त्यामुळे चौथी नवता मांडताना मी कधीही काव्य आकारांच्या विरोधात बंड केले नाही कुठलाही शहाणा ते करत नाही . उलट चौथ्या नवतेच्या अंगाने जर का तशा पद्धतीने लिखाण होत असेल तर मी ते होऊ दिलेले आहे. 


हीच गोष्ट आपण सुनित या काव्य आकाराविषयी म्हणू शकतो केशवसुतांच्या पुरोगामी सुनितांच्या पेक्षा विंदा करंदीकर यांचे आधुनिक सुनीत वेगळे असते मग अरुण कोलटकर यांचे उत्तर आधुनिक सुनीत येते मग मी एक पोस्ट sonnet चौथ्या नवतेचे सुनीत सादर करतो 


मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की नवता आणण्यासाठी मुळात तुमच्याकडे परंपरेची अतिशय खोलवर जाण असावी लागते . परंपरेच्या मर्यादा कुठे आहेत हे तुम्हाला कळायला लागते परंपरा काय आहे ते जर का कळले नाही की काहीतरी उथळ ऍक्टिव्हिटी तुम्ही करत राहता . अभिधानंतर आणि अभिधानंतर मधली समीक्षा ही अशी उथळ ऍक्टिव्हिटी म्हणून येते आणि म्हणूनच मग त्याला विरोध करावा लागतो वाईट या गोष्टीचे असते की अनेक धुरंदर त्यामध्ये सामील होतात . विश्राम गुप्ते हे यामध्ये येतात . आपण स्वतः राजकीय बनत चाललेलो आहोत हे सुद्धा या लोकांच्या लक्षात येत नाही . कुठलाही कवी वाचायचा असेल तर तो संपूर्ण वाचावा लागतो किमान तो जो पब्लिश झालाय तो वाचण्याइतपत वेळ काढावा लागतो किंवा मग त्याच्यावर लिहायचे नसते . त्या लेखकाने लिहिलेली पुस्तके सुद्धा वाचायची नाहीत आणि बिंदास समीक्षा लिहायची हा फालतूपणा असतो . मग ठरवून केलेली गिरमीटी समीक्षा निर्माण होते . बरं माझ्यासारख्या प्रचंड संख्येने लिहिलेल्या माणसाने समजा दहा हजार कविता आहेत तर त्यामध्ये १००० कविता वाईट निघू शकतात त्याच नेमक्या निवडायच्या आणि हा कसा वाईट कवी आहे हे सिद्ध करायचे असा हा उद्योग असतो अगदी कव्ही या संग्रहातल्या सुद्धा चांगल्या कविता घ्यायच्याच नाहीत असे हे धोरण असते . समीक्षक हा नेमका उलटा व्यवहार करत असतो तो जेव्हा नव्या गोष्टींच्यावर लिहितो तेव्हा तो चांगल्या कविता काढतो मी स्वतः हे मनोज जोशीच्या कवितेबाबत केलेले आहे सलील वाघच्या कवितेबाबत केलेले आहे . कुठल्याही लेखकाची सर्वात प्रथम ताकद मांडायची असते ते राहिले बाजूला विश्राम गुप्ते माझ्या बाबत फालतुगिरी जास्त करत बसतात. आणि प्रश्न निर्माण होतो की उद्देश काय आहे आणि उद्देश स्पष्ट असतो नालायकगिरी! श्रीधर तिळवे नाईक हा कसा नालायक कवी आहे हे सिद्ध करणे एवढाच त्यांच्या समीक्षेचा उद्देश होऊन बसतो आता या संदर्भात मला जे वाटते ते सत्य मी बोलू नये काय ? मला तुमचे राजकारण स्पष्ट दिसते मग मी बोलणारच . केवळ सुसंस्कृत चेहरा बनवून हे राजकारण केले म्हणजे ते छान असते असे कोणी सांगितले तर ते मी स्वीकारावे काय ? ही कसोटी लावली तर शरद पवार राजकारणातले सर्वात सभ्य गृहस्थ होऊन जातील तुम्ही शरद पवारांचे आदर्श घेऊन साहित्यिक राजकारण करता हे कळण्याइतपत आम्ही पण शहाणे आहोत . माझा यासंदर्भातला मुख्य प्रॉब्लेम असा आहे की यातून जे प्रस्थापित होते आहे ते हे आहे की चौथी नवता ही उत्तर आधुनिक नवता आहे त्यातूनच मग मीनाक्षी पाटील आणखी एक नवीन प्रमेय घेऊन येतात हे प्रमेय असे आहे की नामदेव ढसाळ यांनी उत्तर आधुनिकतेची सुरुवात केली आणि मग आम्ही सगळे त्यांच्या मागोमाग गेलो. आता हे राजकारण आहे की आकलन आहे असा प्रश्न निर्माण होतो तर हे आकलन आहे कारण मुळात तशी इमेज विश्राम गुप्ते यांच्या समीक्षेतून तयार केली जाते पण त्यांनाही कल्पना नसते की त्यांनी जी उत्तराधुनिक इमेज तयार केलेली आहे ती इमेज पकडली की मग सुरुवात साठोत्तरी पासूनच होणार आता हा परिणाम होईल याची कल्पना विश्राम गुप्ते यांनी केली होती की नाही ? एकदा का उत्तराधुनिक हीच शैली आहे असे ठरले की मग आपोआपच सुरुवात कोणी केली असा प्रश्न येतो. पण मग हा प्रश्न खोलात जाऊन तपासायला हवा कारण उत्तराधुनिकतेची सुरुवात ही नामदेव ढसाळ यांनी केलेलीच नसते मग तुम्ही (पक्षी मीनाक्षी पाटील नामदेव ढसाळ) का निवडता ? वस्तुस्थिती अशी आहे की उत्तर आधुनिकतेची मार्गी सुरुवात ही दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर यांच्यापासून होते मग तुम्हाला ती गोष्ट आवडो किंवा न आवडो. विशेषतः अरुण कोलटकर यांच्या अरुण कोलटकर यांच्या कविता या काव्यसंग्रहातील काही कविता तर स्पष्टपणे उत्तर आधुनिक दृष्टिकोन व्यक्त करतात . पुढे मग ते देशीवादी होत जातात . त्यामुळे सुरुवातच करायची असेल तर तशी करायला हवी मग आपणाला देशी उत्तराधुनिकता आली आहे का ते तपासावे लागते आणि मग जेव्हा पोटी उत्तर आधुनिकतेचा विचार करावा लागतो तेव्हा आपणाला नामदेव ढसाळचा विचार करावा लागतो ढसाळ यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्यच हे होते की त्यांनी देशीवादाला शरण जायला नकार दिला पण याचे कारण मुळातच त्यांच्या दलित जाणीवेशी निगडित आहे आंबेडकर हे अत्यंत जाणीवपूर्वक बौद्ध हा मार्गी धम्म निवडतात आणि हा धम्म त्यांना देशीवादी होऊ देत नाही. आंबेडकर यांनी ही निवड केलेली आहे ती इंटरनॅशनल पार्श्वभूमीवरच केलेली आहे संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरच आपला समाज आपण जोडला पाहिजे याची त्यांना कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माची निवड केली कारण तोच एक धम्म असा होता जो त्यांच्या काळामध्ये संपूर्ण विश्वात पसरलेला होता आणि ह्या आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाचा पाठिंबा त्यांना आवश्यक वाटत होता नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ते कधीही देशी नव्हते . मुळात पाली हीच भाषा मगधमध्ये मार्गी भाषा झाली होती आणि त्या भाषेत गौतम बुद्ध बोलतात . एका अर्थाने मार्गी आणि देशी यांचा तो समतोल आहे ज्याचे मी समर्थन करत असतो. मुळात गौतम बुद्धांच्या काळात संस्कृत नावाची भाषा जन्माला तरी आली होती का हाच खरा प्रश्न आहे. जे बौद्ध आहेत ते अनेकदा संस्कृत ही भाषा नंतर बौद्ध धर्माने निर्माण केली अशी मांडणी करत असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे . 


आता मग असा एक दृष्टिकोन व्यक्त करता येतो की मुळात एखादी स्त्री लिहिते तेव्हा ती कळत नकळत पोटी संस्कृतीतूनच लिहिलं असते. मीनाक्षी पाटील ह्या कळत नकळत आपण असे म्हणू शकतो की स्त्रीवादाला जो पोटी संस्कृतीतून जन्मलेला आहे पकडत नामदेव ढसाळ या दुसऱ्या पोटी समुदायातून म्हणजेच दलित समुदायातून आलेल्या कवीशी नाते जोडतात . त्यामुळे दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर यांच्याशी नाते न ठेवता त्या नामदेव ढसाळ यांच्याशी समीक्षक म्हणून नाते सांगतात . माझे म्हणणे असे की असे जर असेल तर ते तुम्ही तुमच्या समीक्षेत नीट मांडायला पाहिजे . मनात आले आणि नामदेव ढसाळ यांच्यापासून सुरुवात केली असे होत नाही . एकदा का तुम्ही उत्तर आधुनिकता पकडली की मग तुम्ही त्या उत्तराधुनिकतेशी संपूर्णपणे प्रामाणिक राहिले पाहिजे . आणि मग या उत्तराधुनिक शैलीमध्येच कसे सर्व बाकीचे कवी वावरत आहेत हे सिद्ध केले पाहिजे .


माझा प्रॉब्लेम असा आहे की मी माझ्या मांडणीमध्ये हे नेहमीच सांगत आलेलो आहे की समीक्षक म्हणून मी उत्तर आधुनिकता चौथ्या नवतेचा पारंपारिक आकाराचा भाग म्हणून स्वीकारतो किंबहुना 1987 पर्यंतच्या माझ्या कवितेमध्ये उत्तराधुनिकतावादी एलिमेंटसं आढळतात पण त्याचबरोबर त्यांचा विरोधही मी केलेला आहे. उद्या जर का कोणी असे सिद्ध केले की संपूर्ण डे कॅथलॉन सिरीज उत्तरआधुनिकतिकडे सरकत जाते तर त्यामध्ये तथ्य आहे पण त्या कवितांचा विचार या दोघांनी केलेला आहे असे दिसत नाही. परंतु विचारवंत म्हणून मी नेहमीच सांगितलेले आहे की मी उत्तर आधुनिकतेच्या ठाम विरोधात आहे आणि याची कल्पना विश्राम गुप्ते यांना तर आहेच आहे असे असताना मी उत्तर आधुनिक कसा नाही हे सिद्ध करत जणू काय उत्तर आधुनिक असणे हे आडवांस आहे असे सांगणे हा मूर्खपणा असतो . माझे बंड हे उत्तर आधुनिकते विरोधात सुद्धा आहे याचे कारण असे की ज्याला आज आपण देशीवाद म्हणतो तो सुद्धा एका अर्थाने उत्तर आधुनिकतेचा भाग म्हणून आलेला आहे . मेगा नारेटिव्ह नाकारणे याचा एक अर्थ कलोनियल mega narrative नाकारणे असाही होतो आणि देशीवाद हेच करतो प्रॉब्लेम असा आहे की तो उत्तर आधुनिक जीवनशैली मात्र स्वीकारत नाही जी तंत्रज्ञानाशी निगडित असते आणि इथेच आमच्या पिढीचे विशेषता मनोज जोशीचे सलील वाघचे आगमन होते तो उत्तराधुनिक टीव्ही संस्कृतीशी निगडित राहतोच परंतु त्याचबरोबर तो चौथ्या नवतेकडे पण सरकायला लागतो हा एक ट्रांझीशन पिरियड असतो मराठीत संस्कृतीतला आणि तो कळत नकळत आमच्या पिढीने पकडलेला आहे कारण तो आमच्या वाट्याला आला . 


प्रश्न असा आहे की मुळात हे सर्व उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानाच्या अंगाने पकडायचे की स्वतःचे नवीन तत्त्वज्ञान निर्माण करायचे ? मी याचे उत्तर माझ्या सौष्ठव च्या पहिल्याच अंकात दिले होते की मी निर्माणतेच्या दिशेने जाणार आहे ज्याचा उल्लेख विश्राम गुप्ते (नवे जग नवी कविता) आणि मीनाक्षी पाटील ( उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता) हे दोघेही आपल्या पुस्तकात करतात 


माझी मांडणी ही अनेक लेखांच्यात आलेली आहे आणि टीकाहरण आणि चौथ्या नवतेची अनियतकालिके या दोन ग्रंथात आलेली आहे नामदेव ढसाळ एक अढळ कवी यामध्येही ती थोडीशी आलेली आहे इतर अनेक पुस्तकांचा उल्लेख करताना ही पुस्तके बरोबर गायब झालेली असतात . ती तुम्ही वाचली नाहीत असे समजावे की वाचलेत पण उल्लेख करायचा नाही किंवा लोणच्या पुरता उल्लेख करायचा असे ठरवलेले आहे ? 


आज अवस्था काय झालेली आहे ? श्रीधर तिळवे या माणसाला नाहीसे करण्याच्या नादामध्ये संपूर्ण नव्वोदत्तर पिढीच बाद करण्यात आलेली आहे हे राजकारण पुढची पिढी कुठून शिकली तर तुम्ही मुळात तुमच्या आधी काही झालेले आहे हे नाकारण्याच्या नादात राजकारण खेळलात आणि तेच राजकारण नेमके पुढच्या पिढीने गिरवले . मराठी विकिपीडिया वरील मराठी कवितेचा संदर्भातला जो लेख आहे त्यामध्ये आज अमूर्त पद्धतीने दोन ओळीत सगळा चाप्टर गुंडाळलेला आहे हे देशी कारस्थान आहे असे समजू पण हे मुळात आले कुठून? तलवार उगारणारे तलवारीनेच मरतात त्याचा हा पुरावा आहे . आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार असाल आणि मराठीकडे दुर्लक्ष करणार असाल तर गोष्ट वेगळी आहे. हे राजकारण प्रामुख्याने हेमंत दिवटे आणि सचिन केतकर यांचे होते पण ते अंगलट आलेले दिसते तरीही विश्राम गुप्ते आणि मीनाक्षी पाटील यांनी का हे स्वीकारावे ? 


अभिधानंतर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवींचे समर्थन मी समजू शकतो त्यासाठी श्रीधर तिळवे याची झालेली हत्या ही मी समजू शकतो पण तुम्ही जी मांडणी करताय ती तरी निदान खरोखर काय करते याची तरी जाणीव आहे की नाही ? जर का एखादा कवी स्पष्टपणाने सातत्याने सांगतो की मी चौथ्या नवतेचा कवी आहे परंतु मी उत्तर आधुनिकतेच्या विरोधात आहे तर मग तुम्ही त्या अंगाने त्याच्या कवितेचे काही वाचन करणार आहात की नाही ? मुख्य म्हणजे नेमक्या कुठल्या कविता निवडणार आहात ? सिलेक्शन इज इलेक्शन अँड इलेक्शन इज पॉलिटिक्स हे चौथ्या नवतेचे गृहीतक तुम्ही गिरवत आहात का ? आणि समजा तुम्ही ते गिरवत असाल तर मला हे लेख लिहून ते अंडरलाईन करायचे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तुमच्या नादाला लागू नयेत. किमान माझ्या बाबतीत त्यांनी काही गैरसमज बाळगू नयेत त्यांना निदान इतके कळावे की एक माणूस ठामपणे उत्तर आधुनिकतेच्या विरोधात होता आणि स्वतः एक चौथ्या नवतेचे मेगा netanarretive रचत होता 


आता तुम्ही म्हणाल की मग यापुढे स्वातंत्र्य मान्य करणार की नाही तर ते मान्यच आहे परंतु कोणाचे स्वातंत्र्य मला चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट करत आहे असे वाटत असेल तर मलाही ते खोडून काढण्याचे स्वातंत्र्य आहेच की ! मी सुद्धा कोणी दुसरा मनुष्य ते खोडीन काढेल म्हणून मी वाट पाहिली आहेच की परंतु जर का कोणी उभा राहत नसेल तर मला माझ्या सत्यासाठी उभे राहिलेच पाहिजे .माझ्यासाठी क्षेत्र कुठलेही असू दे तिथे खरे बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अगदी तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या समकालीन कवींच्या बद्दल कठोर समीक्षा अभंगातूनच लिहिलेली आहे कारण त्या काळामध्ये समीक्षा ही गोष्ट फारशी उपलब्ध नव्हती. तशी प्रथा नव्हती. आणि तुकारामांना मुळात गद्यच लिहायचे नव्हते. आता समीक्षा स्वतंत्र काढता येते त्यामुळे मी लिहित आहे. वाङ्मयीन राजकारणातून कोण सुटला ज्ञानेश्वराना घ्यायला लावलेली समाधी ही त्या राजकारणाची परमोच्च अवस्था आहे . मुद्दा असा असतो की तुम्ही त्या राजकारणाचा भाग होता की नाही आणि मला कुठल्याच राजकारणाचा भाग व्हायचे नाही. भले मग ते राजकारण माझ्या विरोधातील असेल किंवा माझ्या बाजूने असेल मला त्याचाही भाग व्हायचा नाही मला हे सांगायचे आहे की हे असे नाही जसे प्रोजेक्ट केले गेलेले आहे .


माझ्या सौष्ठवमधील कवितेचा संदर्भ या दोघांनीही दिलेला आहे आणि असे म्हटले आहे की तिळवे यांची भूमिका उत्तर आधुनिक आहे की नाही याबद्दल संदिग्धता ही कविता निर्माण करते माझे म्हणणे असे संदिग्धता आहे कुठे ? उलट माझा तर ठाम स्टान्स आहे की मी उत्तर आधुनिकतेच्या विरोधात आहे . याबाबतीची कारणे मी अनेक वार दिलेली आहेत धर्माच्या पुनरागमनाला उत्तर आधुनिकता जबाबदार आहे असे माझे स्पष्ट मत आहे या संदर्भात जेवढे लिहिता येईल तेवढे लिहिलेले आहेच . धर्माला पर्याय मोक्ष आहे म्हणून तोही मी सातत्याने मांडत असतोच .


फक्त शिव किंवा शून्य शक्ती किंवा अनंत सनातन आहे आणि ह्या क्षणी ते आपल्या या संसारात उपस्थित आहे आणि हा संसार अनंत आहे आहे याबद्दल कोणाला काय शंका आहे ? हे सर्व मान्य वैज्ञानिक सत्य आहे. त्यामुळे चौथ्या नवतेला हे सनातन सत्य असल्याने स्वीकारावेच लागेल शून्य आणि अनंत नाकारून कुठे जाता येते ? 

त्यामुळे ते मी स्वीकारतो आता त्यावरून कोणाला जर का मला पारंपारिक ठरवायचे असेल तर त्याची अक्कल रसातळाला गेलेली आहे असेच म्हणावे लागेल आता एक गोष्ट मात्र तुम्हाला करता येते ती म्हणजे मोक्षच नाकारणे आपल्याकडे डाव्या पुरोगामी लोकांनी हे केलेले आहे . तुम्हाला ते करायचे असेल तर तुम्ही करा पण मग मोक्ष विरोधी मांडणी नीट करा . माझ्या माहितीप्रमाणे मीनाक्षी पाटील यांचा मोक्ष या सनातनतेला पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांच्या कवितेचे हळूहळू ते वैशिष्ट्य बनताना दिसते त्यावर कधीतरी नीट लिहीनच पण ती गोष्ट वेगळी आहे .


थोडक्यात सांगण्याचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे जो मी नाही (म्हणजे उत्तर आधुनिक म्हणून ) ते प्रोजेक्ट करू नका . हवे तर लिहू नका तो सुद्धा उत्तम पर्याय आहे . पण एकदा का तुम्ही लिखाणाच्या मैदानात आला की मग तुमचा प्रतिवाद येणारच कारण शेवटी वांग्मय सत्य हे सत्यापेक्षा वेगळे करता येत नाही ते सुद्धा सत्यशोधनाच्या प्रोजेक्टमध्ये एक भाग म्हणून वाट्याला येते आणि त्याच्या बाबतीत काही करावे लागते .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय