सत्य ,केओस (कोलाहल )आणि उत्तर व्यवहार वाद १५ श्रीधर तिळवे नाईक 

इसवी सन पूर्व १२००० च्या आसपास झालेल्या प्रलयामुळे आणि नंतर इसवी सन पूर्व २००० ते १५०० च्या आसपास आलेल्या विचित्र दुष्काळांच्या मुळे संपूर्ण मानव जातीत फार विचित्र गोष्टी उदयाला आल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे केऑस आणि डीसऑर्डर ! श्रद्धा युगात जन्मलेल्या देवतांनी हे जग एका विशिष्ट ऑर्डरमध्ये बांधलेले आहे ही संकल्पना समाजांच्या मध्ये अतिशय दृढमूल होत गेली होती पण इसवी सन पूर्व 2000 पासून हळूहळू तिला तडे जायला लागले आणि त्याचे प्रतिबिंब कधी नव्हे ते मानवी आयुष्यात उमटायला लागले. देवांच्या वरचा विश्वास उडाला देवांच्या चांगुलपणावरचा विश्वास उडाला आणि पुढे पुढे माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वासही उडाला भारतामध्ये मुळात जी युरेशियन श्रुती आली ती हा अविश्वास घेऊनच आली होती साहजिकच ती अतिशय भयग्रस्त , कोलाहलग्रस्त आणि अव्यवस्थाग्रस्त होती. आणि तिचे काय करायचे हे तिला कळत नव्हते तिच्यापुढे काही उपाय उरलेला नव्हता . हे लोक आले तेव्हा दुष्काळांच्या मुळे शैव श्रुती सांभाळणारे लोक जंगलात निघून गेले होते किंवा दक्षिणेत स्थलांतर करून आले होते . त्यामुळे बाहेरून आलेल्या युरेशियन लोकांना फार काही मोठ्या लोकसंख्येचा सामना करावा लागला नाही. आज सुद्धा या लोकांना युद्ध करावी लागले की नाही हा एक फार मोठा प्रश्न इतिहासकारांच्या पुढे आहे .काही लोकांच्या मते युद्ध झालेच नाही कारण हे लोक आश्रयाला आले होते आणि जे शिल्लक शैव श्रुतीतले लोक होते त्यांनी त्यांना उदार अंतकरणाने हा आश्रय दिला . पण पुढे सर्व स्थलांतरित लोक जे करतात तेच या लोकांनी केले आणि ते म्हणजे यांनी स्वतःच हा प्रदेश बळकवायला सुरुवात केली आणि इथल्या मूळ लोकांच्यावर दादागिरी सुरू केली . 


हे सर्व स्थलांतरित लोक वेगवेगळ्या टोळ्या करत आले होते कारण ते युरेशिया मधल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आले होते आणि अनेक मार्गांनी आले होते . अनेकदा त्यांची आपापसात सुद्धा युद्ध झाली होती असे दिसते आणि अपवादात्मक वेळेला इथल्या असुर, दस्यु ,राक्षस ,पणी याही लोकांचा त्यांच्याशी सामना झाला असे दिसते. पण एकंदरच आलेल्या लोकांना हे कळून चुकले होते की आपण जेथे आले आहोत तिथे आपल्यापेक्षा अतिशय उजवी अशी एक संस्कृती आहे आणि ती आत्मसात केल्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही . या लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन होता साहजिकच ते संपत्ती सुद्धा पशुंच्यात मोजत होते . कोणाकडे किती गाई आणि बैल आहेत यावर सर्व काही ठरत होते . त्यांचा सामना प्रथमच वस्तूंचा अतिशय नीटनेटका वापर आणि उत्पादन करणाऱ्या लोकांशी पडला जे स्वतः व्यापारही करत होते . या लोकांच्यात आपापसात खूप लग्नेही झाली. आलेल्या लोकांनी इथल्या लोकांचा धर्म जो शिवकेंद्रित होता तो आत्मसात करायला सुरुवात केली आणि रुद्र आणि शिव या एकच देवता आहेत अशी दंतकथा तयार करत आणि पुढे पार्वतीला लक्ष्मी करत आत्मसात करायला सुरुवात केली. विद्येचा पत्ताच नव्हता त्यामुळे साहजिकच गणपती मात्र सर्व अंगाने स्वीकारला गेला. नाट्यशास्त्र स्वीकारले गेले . 


पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट टोकावतच राहिली आणि ती म्हणजे केऑस ( कोलाहल) . पूर्वी भगवान शंकर हा कोलाहल पिऊन बसले होते आणि आता काय करायचे हा प्रश्न होता . 


साहजिकच या सगळ्या कोलाहालामध्ये मग वैदिक देव सुद्धा नैतिक राहिले नाहीत आणि याचे सर्वोत्तम उदाहरण इंद्र होता . हा इंद्र म्हणजे कसलेही नैतिक तत्त्व नसलेला आणि तरीही प्रचंड सत्ता असलेला असा राजा होता . त्याच्याकडे स्वर्गाचे राज्य होते . तर दक्षिणेकडे यमाचे राज्य होते आणि हे लोक त्याला नरक म्हणत. 


या लोकांचे समाज अतिशय छोटे छोटे होते आपल्याकडे महाजन म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे असे मानले जाते प्रत्यक्षात ते नंतर उदयाला आले. हा स्वर्ग कुठे होता तर हा स्वर्ग आकाशात होता पण इथे इंद्र ही पावसाची देवता वेळेवर पाऊस धाडत होती पण तरीसुद्धा या लोकांच्या मनात बसलेली दुष्काळाची भीती कधीही गेली नाही त्यामुळे ते सतत इंद्राला पाऊस पाड पाऊस पाड म्हणायचे त्यामुळेच ऋग्वेदामध्ये इंद्रावरच्या निम्म्या ऋचा या पावसाच्या अंगाने लिहिल्या गेलेल्या सुक्ताच्या रूपात आहेत. शेती जमत नसल्याने पशुंना लागणारा चारा हा फक्त पावसामुळेच उपलब्ध होऊ शकत होता किंवा वाहत्या नदीमुळे ! त्यामुळे साहजिकच सरस्वती ही नदीदेवता या लोकांना फार महत्त्वाची वाटत होती. प्रत्यक्षात सरस्वती नावाची कुठलीही नदी नव्हती . पण सरस्वती नावाची नदी देवता मात्र अस्तित्वात होती आणि ती मुख्य देवतांच्या पैकी एक होती . तिला स्त्रीलिंगी करण्याचे कारण उघड होते . ती आपल्या गर्भाशयामध्ये नदीचे पाणी साठवून ठेवते अशी ही धारणा होती त्यामुळे स्त्राव ही संकल्पना खूपच महत्त्वाची होती . सर्व नद्या म्हणजे एका अर्थाने नदीदेवतेच्या स्त्राव होत्या . त्यामुळेच एका अर्थाने वैदिक संस्कृती ही सरस्वती संस्कृती होती . पुढे या संस्कृतीला शैव लोकांची गंगा संस्कृती मिळाली कारण गंगा म्हणजे सुद्धा नदीदेवता होती आणि गंगा या शब्दाचा अर्थच वाहणारे वाहते पाणी हाच होता. आणि त्यामुळेच गंगा आणि सरस्वती या दोन मुख्य नदीदेवता भारतीय संस्कृतीला आकार देताना दिसतात. अर्थातच शैव लोकांची गंगा मात्र खुद्द शंकराच्या जटेतून आली होती (पुढे युरेशियन लोकांनी प्रत्यक्ष आत्ताची गंगा नदी या दंतकथेला जोडून दिली) त्यामुळे सरस्वती कुठून आली असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यासाठी म्हणून मग ब्रह्मदेवाची कथा जन्माला घालण्यात आली आणि त्याच्यापासून पळ काढण्यासाठी म्हणून सरस्वती गुप्त झाली अशी अफवा पसरवली गेली प्रत्यक्षात फक्त एकच गोष्ट झाली होती खुद्द युरशियन लोकांनी आता गंगा स्वीकारली होती . ती कधी आटत नसल्याने सरस्वतीला अधिक प्रसन्न करून घेण्याची गरज राहिली नाही. 


हळूहळू या सगळ्याची व्यवस्था लावली पाहिजे हे लक्षात आल्यानंतर मग धर्म जन्माला आला . कारण लोकसंख्या वाढत होती आणि गण बनत होते. या गणांना एक शिस्त देणे प्रत्येकाला आवश्यक वाटत होते मात्र ही शिस्त कोणी द्यायची हा खरा प्रश्न होता. शैव लोकांच्या मध्ये ऑलरेडी एक अनुशासन होतेच ते सर्वच लोकांनी स्वीकारले मुख्य म्हणजे ज्याची आई शैव आहे आणि वडील वैदिक आहेत अशा ऐतरेय नावाच्या मिश्र ब्राह्मणाने पहिला धर्म निर्माण केला आणि त्याने ब्राह्मण धर्माची वर्णव्यवस्था प्रस्थापित केली त्याने ज्या पुस्तकात ही व्यवस्था निर्माण केली त्या पुस्तकाचे नाव आहे ऐतरेय ब्राह्मण होय. या ग्रंथानंतर मग अनेक ब्राह्मण ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांनी हळूहळू ब्राह्मण धर्म निर्माण केला आणि पुढे जाऊन स्मृती वांग्मय निर्माण करत त्याला एक ठाम आणि ठोसाकार दिला .


सुरुवातीच्या कालखंडामध्ये कर्मदत्त असलेली वर्णव्यवस्था ही ब्राह्मण ग्रंथाने जन्मदत्त केली आणि सगळा अनर्थ निर्माण व्हायला सुरुवात झाली. 


इथूनच संस्कृतीमिलनापासून दूर होत शैव लोकांनी स्वतःचे अनु शासन शाबूत ठेवायला सुरुवात केली आणि इथेच अनेक संघर्षाचे बीज पडले. 


पूर्वी फक्त संस्कृती वरून भांडणारे लोक आता धर्मावरून भांडायला लागले. 


शंकर हा एक अत्यंत पक्के अनुशासन देणारा श्रुती संस्थापक होता त्या उलट वैदिक लोकांचा इंद्र मात्र फार गडबड करणारा होता साहजिकच इंद्राचे सगळे गुण शंकराला चिपकवण्याचे उद्योग सुरू झाले . पण शैव लोकांनी हे कधीही स्वीकारले नाही. रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य एका बाजूला शंकराचे वर्चस्व मान्य करतात पण दुसऱ्या बाजूला शंकराची जितकी बदनामी करता येईल तितकी करतात . त्यातूनच सती सारख्या कथा निर्माण झाल्या. म्हणजे आपले देव तर भ्रष्ट आहेतच पण या लोकांनी दुसऱ्या धर्मातील देव सुद्धा भ्रष्ट करायला सुरुवात केली . अनैतिकतेची इतकी हौस असलेला पुरोहित वर्ग जगाच्या पाठीवर कुठेच नसेल . साहजिकच आपल्यापुढे जी शिव महावीर आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा येते ती अनेकदा भ्रष्ट स्वरूपात येते अशावेळी उपाय एकच असतो खरे काय आहे ते शोधणे .


याला कारण अर्थातच एकच होते ते म्हणजे पुन्हा एकदा कोलाहल. भाव तसा देव त्यामुळे कोलाहल तसा देव असे नेहमी घडते . मानवी जीवनातल्या सर्व वासना अनेकदा माणूस आपल्या दैवतांना लागू करतो. देवाने दिलेली व्यवस्था आहे असा एका बाजूला आग्रह धरायचा सर्व सत्ता देवाच्या नावाने लेजीटी मेट करायची आणि नियंत्रित करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःच अव्यवस्था आणि कोलाहल यांनी पछाडून जायचे असा एक विचित्र भयद्वंद्वात्मक घोरपणा आपणाला नेहमी पुरोहित वर्गामध्ये आणि क्षत्रिय वर्गामध्ये जाणवत राहतो. केऑस आणि डीसऑर्डर यांच्या तावडीत सापडलेला विलक्षण समाज हे या धार्मिक समाजाचे वैशिष्ट्य होते . धर्माने केऑस मोडित काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन हा धर्म संपूर्ण समाजाला धारण करायला लावला . पण तरीही कोलाहल आणि डिसऑर्डर काही मोडीत काढता आलेली दिसत नाही . महाभारतामध्ये याचे प्रचंड प्रतिबिंब पडलेले दिसते . महाभारतातले संपूर्ण युद्ध म्हणजे कोलाहाल आणि अव्यवस्थेची बजबजपुरी आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जो या सगळ्याला धर्म देण्याचा दावा करतो तसे वचन देतो त्याला स्वतःच्या गणामध्ये सुद्धा शेवटी ही कोलाहल आणि अव्यवस्थेची बजबजपुरी पहायला लागते. त्याचा स्वतःचा यादव गणसुद्धा एकमेकांशी भांडून नष्ट होतो . आपले स्वतःचे सर्व पुत्र मेलेले पाहून स्वतःचाच वंश निर्वंश झालेला पहात ध्यानस्थ बसलेल्या कृष्णाला शेवटी एका पायात घुसलेल्या बाणाने मरण येते . मानवी जीवनाचा सर्वात absurd शेवट हा आहे . यातही पुढे निरर्थक व्यस्तता ही आहे की श्रीकृष्ण वैकुंठात नसून स्वर्गात आहे. तिथेही त्याला भारतापलीकडचा प्रदेश माहीत नाही. आता याला दिलासा मानावा का की हा दिलासा काल्पनिक आहे हे ओळखून स्वतःलाच हसावे ? 


या कालखंडामधला हा कोलाहल पुन्हा एकदा विसाव्या शतकामध्ये परत आला. मुळात फ्रेंच राज्यक्रांती फसल्यानंतर तो परत आला होता . पण त्याचा कडवा मुकाबला करत अस्तित्व वाद ठामपणे उभा राहिला. सगळे असता व्यस्त असले तरी निदान माझे अस्तित्व तरी ठोस आहे अशी त्याची भूमिका होती पण १९५० नंतर या ठोसपणाला पण सुरंग लागला आणि सब्जेक्ट इज डेड जाहीर झाले एका अर्थाने हे एक्झिस्टन्स इज डेड असेच होते . हा उत्तरवादाचा कार्पोरेट जन्म होता . "मी" सुद्धा कन्स्ट्रक्टेड आहे आणि मी जे पाहत आहे तेही माझे कन्स्ट्रक्शन आहे असा व्यवहार या काळामध्ये प्रस्थापित झालेला दिसतो म्हणजे या जगामधला सगळा व्यवहार म्हणजे एका कन्स्ट्रक्शन ने दुसऱ्या कन्स्ट्रक्शनला पाहणे असा आहे साहजिकच मग बांधकाम कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला . बांधकाम चालू तर आहे पण ते पुन्हा पुन्हा कोसळते आहे अशावेळी करायचे काय? साहजिकच याला उत्तर व्यवहार म्हणणे गरजेचे बनले. पीटर ड्रकर यांनी याला डेथ ऑफ इकॉनोमिक मॅन म्हटलेले आहे. इकॉनॉमिक मॅन यात टिकणारा नव्हताच . आता पोस्ट इकॉनॉमिक मॅनला सर्व उत्तर व्यवहार सांभाळायचा होता आणि हे एक फार मोठे आव्हान होते. कारण आता कोलाहल क्वांटम सायन्स मुळे सायंटिफिक बनला होता . सर्व सापेक्ष झाले होते आणि निर्णय मात्र निरपेक्ष घ्यायचे होते . हे विज्ञान सांगत होते की तुमचे सर्व निर्णय निरपेक्ष असतच नाहीत ते कन्स्ट्रक्टेड तर असतातच पण ते सापेक्षच असतात . अशावेळी मानवी व्यवहार कसा करायचा ? आत्तापर्यंत व्यवहार करताना माणसाला गॅरंटी असायची आता मात्र व्यवहार करणाऱ्या माणसालाच गॅरंटी देणारे असे काही उरले नव्हते . साहजिकच त्यांनी एक नवीन व्यवस्थापन तंत्र हवे एक नवा व्यवहारा प्रकार हवा अशी मागणी केलेली दिसते आणि त्या अंगाने संपूर्ण मॅनेजमेंट चाललेली दिसते परंतु हे सर्व काही पुरेसे पडले नाही आणि अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी कोसत गेल्या पण सुदैवाने याच वेळेला एक नवे युग उदयाला आले . त्या युगाचा कणा इंटरनेट होता जाल होता 


आमची पिढी या जाल युगात वाढली सत्य दिसत नाही आणि जे वास्तव दिसते ते माया आहे असे काहीतरी आमच्या वाट्याला आता आले. एका अर्थाने पुन्हा एकदा सारा संसार शाक्त बनला . शक्ती चंचल असते माया चंचल असते ती काहीही निर्माण करते कधीही काहीही नष्ट करते . कधीही कसलाही आकार धारण करते . ती कधी चंडी होते ती कधी महाकाली होते ती कधी अन्नपूर्णा होते ती कधी गौरी होते अशा या माया व्यवहारामध्ये साहजिकच माझ्यासारख्या माणसाला शिव जिवंत करावे लागले . कारण शक्तीला हाताळण्याचा तोच एक उपाय असतो . 


मानवी जीवनाच्या आधुनिकतेवर आणि उत्तर आधुनिकतेवर त्यामुळेच बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा दिसतो परंतु चौथ्या नवतेत मात्र तो आटत चाललेला आहे आणि बौद्ध धर्माची जागा हळूहळू शैव श्रुती घेत आहे . प्रॉब्लेम फक्त एकच आहे प्रत्येकाला शक्ती हवी आहे शक्तीमुळे मिळणारी सत्ता हवी आहे पण शक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिव मात्र कोणालाच व्हायचे नाही . प्रत्येकाला हे नियंत्रण माय मधून माया मधून हवे आहे म्हणून प्रत्येक जण माया नियंत्रित करायला धडपडतो आहे परंतु ही धडपड वाया जाणे अटळ आहे. कारण माया फक्त एकच तत्व नियंत्रित करू शकते ते म्हणजे शिव ! म्हणूनच आपल्याला सर्व व्यवहार हा शिव व्यवहार म्हणून करावा लागेल ज्याला जमेल तो आनंदी होईल ज्याला जमणार नाही तो पुन्हा एकदा कोलहालग्रस्त होणे डिसऑर्डर ग्रस्त होणे अटळ आहे इतकेच नव्हे तर तो कोलाहल आणि अव्यवस्था निर्माण करण्याला हातभार लावणे अटळ आहे . अशा या संपूर्ण अवस्थेत व्यवस्थेत अव्यवस्थेत फक्त सिद्धच डान्स करू शकतो मी तो डान्स करत असतो . आणि इतरांचे डान्स वेडेवाकडे चालले असले तरी आणि मायात अडकले असले तरी एन्जॉय करत असतो .


श्रीधर तिळवे नाईक


सत्य व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद १६ खोटे बोलणे आणि भारतीय लोक श्रीधर तिळवे नाईक 


भारतात खोटे बोलण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे याचे कारण भारतात तुम्ही खोटे बोललात तरी तुमचे संबंध बिघडत नाहीत. चांगली माणसे चांगुलपणामुळे खोटे बोलणाऱ्या माणसाला क्षमा करत संबंध कायम ठेवतात तर वाईट माणसे "अरे ही आपल्यासारखीच व्यक्ती आहे आणि आपल्यासारखेच खोटे बोलते" असे म्हणून संबंध तोडत नाही . मात्र खोटं बोलणारा आणि खोटे ऐकणारा एकमेकावर आरोप न करता व्यवस्थित तालमेळ ठेवत बसतात जे फार आश्चर्यकारक असते . चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक संबंध कायमच ठेवतात. याचा एक दुष्परिणाम असा आहे की खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला संबंध गमावण्याची भीतीच नाही . 


याचाच व्हायचा तो दुष्परिणाम असा झाला आहे की आपल्या लोकशाहीमध्ये नेते लोकांना हळूहळू लोकांशी खोटे बोलणे यामध्ये काही वाटत नाही आणि याबाबतीतला न्याय तोच आहे की नेता खोटं बोलणारच अशी आपली मानसिकताच बनून गेलेली आहे कारण वैयक्तिक पातळीवर आपण खोटे बोलणाऱ्या व्यक्तीशी संबंध तोडत नाही त्याला माफ करून टाकतो. काही काही वेळा तर काय मस्त सॉलिड चुना लावतो ना तू अशी दादही देतो आता ही जी मानसिकता बनलेली आहे हिचा धर्माशी संबंध काय कारण धर्म तर खरं बोला असच सांगतो आणि तरीसुद्धा इतके सारे लोक सातत्याने खोटे बोलतात याला काय म्हणावे? ही कसल्या प्रकारची धार्मिकता आहे? साहजिकच आपल्याकडे खोटे बोलणारा किंवा खरं की खोटं हे न पाहणारा श्रीकृष्ण हा सर्वात लोकप्रिय देवतांच्यापैकी एक ठरतो इतकेच नव्हे तर श्रीकृष्ण नीती ही एक नीती बनते कौटिल्य निती ही नीती बनते, आता खोटं बोलणारी नीती ही कशी काय नीती असू शकते पण भारतीय सानंद हे सर्व स्वीकारतात याचे कारण हा सगळा वैष्णव वादाचा परिणाम आहे कारण वैष्णववादाला खोटे बोलायला काहीच वाटत नाही कारण महाभारतामध्ये गोलमटोल खोटे बोलणे खूप आहे म्हणजे अगदी युधिष्ठराचा सुद्धा घोड्यांचा धर्म रथ वैष्णव लोकांच्यामध्ये खाली आणला गेलेला आहे . जिथे हे लोक आपल्या सर्वोत्तम धार्मिक माणसाला सुद्धा सोडत नाहीत तिथे ते इतरांना काय खोटेपणाबद्दल जबाबदार धरणार ? वर आणि पुन्हा हे सगळं कसं वास्तविक वास्तवदर्शी आहे अशी ही डिंग मारता येते. जे लोक स्वतःच्या धर्मग्रंथात सुद्धा खोटं बोलतात खोट्याला सहन करतात त्या लोकांच्या बाबतीत खोटे बोलणे ही एक व्यवहाराची नित्याची बाब बनून जाते आणि जे नित्य असते ते नेते लोक करतातच करतात . भारतामध्ये भ्रष्टाचार करणे असो लाच घेणे असो किंवा खोटे बोलणे असो या सर्व गोष्टी नेते करतात कारण त्या नित्य आहेत आणि भारतातील बहुतांशी जनता त्याला पूरकच वागते . आपल्या लोकांना खऱ्याची जरा सुद्धा चाड नाही किंबहुना जो खरे बोलतो तो एकटा पडतो . 


प्रश्न असा आहे की मग खोटे बोलण्याच्या आधारे कसा काय समाजाचा व्यवहार नीट चालवता येईल ? तो नीट चालणे शक्य नाही आणि म्हणूनच गेली कित्येक वर्षे आपण बोंबलत गेलेलो आहे . खोटेपणा बाबत एक मीच्युअल अंडरस्टँडिंग तयार झालेले आहे त्यामुळे व्यवहाराचा अर्थ या प्रकारचे आपापसातील अंडरस्टँडिंग गृहीत धरत व्यवहार करणे असा काहीतरी प्रकार चाललेला असतो म्हणजे समोरचा कुठे खोटे बोलणार आणि कुठे खरे बोलणार याचा अंदाज घ्यायचा आणि व्यवहार करायचा अशी एक पॉलिसी किंबहुना व्यवहारी पॉलिसी आपल्या लोकांनी तयार केलेली यामुळे भारतीय लोकांच्यावर आज विश्वास ठेवायला भारताबाहेरचे लोक तयार असत नाहीत .खोटं बोलणाऱ्या लोकांचा खोटा रडा देश हीच आपली प्रतिमा झालेली आहे. 


खोटेपणाचे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कदाचित काही लोकांना अद्भुत वाटत असले तरी ही एक परदेशी लोकांची फार मोठी डोकेदुखी ठरताना दिसते . आपण घरातल्या लहान मुलाला सुद्धा त्याच्या जडणघडणीच्या काळातच खोटे बोलायला शिकवतो म्हणजे घरात असूनही घरात नाही असं सांग अशी सुरुवात होते. किंवा एखाद्या मुलाला कुठल्या गोष्टीमुळे काही झाले की दत थत करत खोटे मारणे इथूनच खोट्या कृतीची सुरुवात होते . हे सगळं नंतर नंतर नंतर इतकं भिनत जातं की त्या माणसाच्या रक्तातच खोटे बोलणे शिरते आणि तो भारतात जगायला लायक होतो . 


त्यामुळेच खोटे बोलणाऱ्या नेत्यांना आपण पराभूत करू अशी जर काय तुमची समजूत असेल तर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणि निवडणुकीत फारशी खरी ठरण्याची शक्यता नाही कारण मुळात आपल्या लोकांच्या नेत्यांच्या कडून असलेल्या अपेक्षा इतक्या मर्यादित आहेत की त्या खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माफ करून टाकतात . आता तर काय आपण मतही एक सेमिओडिटी करून टाकलेली आहे जिला विकता येते. म्हणजेच राजकीय लोकशाही सुद्धा आपण खोटी करून दाखवली. 


या सगळ्या प्रकारा मुळेच अलीकडे भारतामध्ये मोक्षाची साधना करणारे लोक अल्पसंख्य होत चाललेले आहेत आणि धर्म मात्र वाढत चालला आहे .


अर्थात काही कट्टर पुरोगामी लोकांच्या मते धर्म हे जगातले सर्वात मोठे खोटे आहे त्यामुळेच धर्म अंगवळणी पडला असेल तर त्यात आश्चर्य ते काय ?

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय