मोक्ष आफ्टर इफेक्ट्स

 भाग ३ 

मालक म्हणतो 

जा 

भाडेकरू म्हणतो 

निघतो 


खरा प्रॉब्लेम तेव्हा येतो 

जेव्हा भाडेकरू 

निघत नाही 


भाडेकरू निघत नाही 

म्हणून मालक बनतो 


मालक तोच 

जो भाडेकरूला 

निघायला भाग पाडतो 


अन्यथा तो फक्त 

घरफाळा भरणारा

नागरिक असतो 


बाबासाहेब म्हणाले 

आम्ही ह्या देशाचे नागरिक 

ह्या देशाचे मालक आहोत 


खरंच ?

मी आयुष्यात कधीही 

निघ 

ह्या शब्दाला घाबरलो नाही 


निघालो 


ज्यांना निघणे घाबरवते 

त्यांचे काय ?


माणसाला प्रत्येक गोष्टीतून 

निघता आलं पाहिजे 


Continue

श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सीरीजमधील आफ्टरइफेक्ट ह्या काव्यफाईलीतून )


नख सर श्रीधर तिळवे नाईक 

नखाची सर कशालाच येत नाही



माणूस जगत सुटलाय 



मी निखळ आहे 

यातील तीन शब्दांचा अर्थ एकच आहे 

एक स्थिती आहे 


तीन वस्तुस्थितींच्यामधली ही विषस्थिती 

विशेष स्थितीचा मर्डर करण्यासाठी पाठवण्यात आलेली 

आणि आता माझ्या देहात साठवण्यात आलेली 


मरणाऱ्याला कधीच चॉईस दिला जात नाही

आणि मरण तर कधीच चॉईस नसतं 


आत्महत्या करणे म्हणजे मरण निवडणे नसते 

तर जगणे नाकारणे असते 


अपवाद समाधी 

म्हणून मी तुला विचारतोय समाधी घेऊ का?




नखावाटे मी विष जाऊ दिले 

किंवा जगण्याने अनेक स्पॉट निवडताना

नखे सुद्धा निवडली 

शेवटी काहीतरी बळी दिल्याशिवाय 

काहीतरी वाचत नाही 


जे आपण वाचवतो 

तेच उरलेले असते



मला दोन पाय आहेत

डावा आणि उजवा

त्यांच्यामध्ये सृजनशील लिंग आहे 


मी नेहमीच या तीन गोष्टींच्यावर विश्वास ठेवत चालत आलोय


यातली एकही फापल्ली

तर जिंदगी फापल्ली 



मोक्षाचा अर्बन सीनॉप्सिस तयार होईल 

असे मला कधीच वाटले नव्हते 


जे पोचले ते निसर्गात राहून पोहोचले 


म्हणूनच मुंबईत राहतानाही 

मी आसपासचा निसर्ग निवडला 


आणि मी निसर्गापासून पूर्ण पाठ केली आणि एका गुहा बनवलेल्या खोलीत बाळंत झालो


 ८


मी शाळांना नापास केले 

की शाळांनी मला नापास केले 

मला आजतागायत कळले नाही


सिल्याबस नेहमीच बोर करणारे होते 

आणि शिक्षण मिलिटरीमध्ये टाकल्यासारखे

टक्कल पडलेले

पण केसांचे जंगल बनवीन अशी खात्री देणारे


मी तेच शिकलो जे मला शिकायचे होते

परीक्षा कंटाळवाण्या होत्या 

आणि जुगाड तर मला कधीच जमले नाहीत


माझ्या ज्ञानाची तृष्णा 

गळे दाबून दाबून मारण्याचा प्रयत्न झाला

आणि मग ज्ञान देणाऱ्या प्रत्येक संस्थेबद्दल

मी केवळ प्रश्नचिन्ह टाकत पूर्णविराम द्यायला शिकलो


आजही कुठलाही whatsapp ग्रुप मला स्वीकारत नाही 


मी मोक्षाला पोहोचलो की नाही ह्यापेक्षा 

माझी जात नेमकी काय 

हा त्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे 


अधून मधून तेही म्हणतात 

ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ बघू नये 

मात्र हे म्हणताना ते बिसलरी प्यायला विसरत नाहीत 


 ९


माझा मृत्यू निश्चित झाला 

तेव्हा माझ्या आसपास कोणीच नव्हते 


सुरुवातीला डावे नख उडेल 

असे भाकीत आले तेव्हा 

मोदींनी नोटबंदी जाहीर केली होती 

आणि मला नख टिकवताना खूप त्रास होईल 

याची कल्पना आली 


माझ्या उजव्या पायाचे उजवे नख मात्र तरतरीत होते 



१०


शरीराच्या वाट्याला आलेले पेलत 

शारीरिक अवहेलना पेलत 

मी चालतोय 


एक लोहार फॅब्रिकेशन करणारा 

एक खाटीक जनावर कापणारा 

एक शिंपी शर्ट शिवणारा 

एक कॅमेरामन लग्न शूट करणारा 

एक कुंभार मातीची भांडी बनवणारा 

एक सुतार खाट तयार करून देणारा 

एक तेली तेल काढणारा 

एक मेकानिक गाड्या दुरुस्त करणारा 

एक धोबी कपडे धुणारा 

एक भावसार कपड्यांना रंग देणारा 

एक रिक्षावाला टेम्पोवाला सामान चढवणारा उतरवणारा 

एक भंगार भंगार उचलणारा 

एक फळ विक्या सफरचंद विकणारा 

एक भाजीवाला पैशाच्या बदल्यात भाजी देणारा 


माझ्याकडे टकामका बघतायेत 

काळा निळा पडलेला माझा पाय 

जो नोकरी करणाऱ्यांना दिसत नाही 

त्यांना स्पष्ट दिसतोय 


क्या हुआ श्रीधर भाई 

अब काम कैसे करोगे 


स्वामी की तो वाट लग गई भाई 


लगता है इन के पैरो से महादेव भाग गये 


मला माहित नाही विष नेमके कोणी दिले 

पण देणारा शेवटी तुझाच औंश होता 


मी फक्त काम मागतोय 

पण पाय बघून 

सगळ्यांचाच पाया हादरतोय


जिथे शारीरिक शक्ती महत्त्वाची असते 

तिथे अवयव शाबूत असणे फार महत्त्वाचे 


मी मुंबई विद्यापीठात शिकवणे 

आणि श्रम करणे 

नेहमीच इक्वल मांडले 


श्रमांचा लिलाव केल्याशिवाय 

पोट भरत नाही 

मग ते श्रम बौद्धिक असोत की शारीरिक 


श्रमांना फेटाळणारी हिंदू व्यवस्था 

श्रमिकांचा सतत अपमान करणारी हिंदू व्यवस्था  

आता मुसलमानांना श्रमांच्यात ढकलतिये 

जणू नवा शूद्र वर्ण तयार 


आणि मी या व्यवस्थेत 

काम मागणारा 

कामाला निकम्मा होत चाललोय 


आता मीही फक्त मराठी माणसासारख्या नोकऱ्या शोधाव्यात काय ?


मला पळता येत नाही 

आणि चालताना मला कायमच लंगडावे लागते 


मी स्वतःला दिव्यांग म्हटल्यामुळे माझे नष्टचर्य नष्ट होणार आहे का ?


नष्ट होणारा आचार्य 

की जो शहाणपण नष्ट करतो तो आचार्य ?


बौद्धिक श्रमाच्या शेकोट्या पेटताहेत काळजात 


माझ्या कायक संन्याशाच्या शपथेचे काय ?


मोक्ष मिळाल्यानंतर शपथांच्यापासून मुक्ती मिळते काय ?


निवड कधीच सोपी नसते 

ती अनेकदा लादलेली असू शकते 

किंवा ती ईल्युजन असू शकते 


सगळे जग माया आहे 

याचा अर्थ इतकाच 

माणूस भूतकाळात जगतो आहे 


प्रत्येक क्षण इतिहासात वाया घालवणाऱ्या लोकांना 

भविष्य नसते 

परंपरा खवखव्या लागल्या 

की फक्त खाज सुटते 


मी पाय खाजवतोय 

आणि नख उडण्याची धमकी देतंय 


मी निघालोय बाजारामधून 

यापुढे आपणाला कोणीही शारीरिक श्रम देणार नाही हे स्वीकारत 


जो दुबळा तो बेकार 


माझ्या अपंग हालचाली 

मला अमिबा बनवतायेत 


आता मी कोणता आकार धारण करावा 


११


डावे नख उडाले 

आणि मी त्याचा शोक कवितेत व्यक्त केला 

मला खात्री होती 

निदान मी उजवे नख वाचवेन 


नखे वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागते ?


१२


आपण पळू शकत नाही 

हे स्वीकारल्यानंतर 

आपण आता चालूही शकत नाही हे स्वीकारावे लागणार आहे काय ?


माझ्या पायांच्यातुन चालणे बाळंत होत नाही 


हाताला झालेला टेनिस एल्बो बरा केला 

आणि चालायला सुरुवात केली 

तेव्हा कळाले 

आपला उजवा पाय सुद्धा 

खतऱ्यात आहे 


प्रत्येक अवयवाने विष पचवले 

पण प्रत्येक अवयवाला ते पचले का ?


१३


माझे उजवे नखसुद्धा हळूहळू काळे पडत चालले आहे 


डॉक्टर विचारतात 

तू अजून जिवंत आहेस याचाच आनंद का साजरा करत नाहीस ?


दोन डोळे गेले म्हणे तोवर दोन डोळे वाचले 

दोन कान गेले म्हणे तोवर एक गाणं वाचला 

एक गळा गेला तो म्हणे तोवर 

गाणे वाचले 


एक हात गेला म्हणे तोवर 

दीड हात वाचला 


तुझ्यासारख्या मुक्त पुरुषाला याहून आनंद काय ?


नखे गेल्याने आयुष्यात काय फरक पडतो ?


मी काहीच बोलत नाही 

जे शिल्लक आहे त्यावरच खुश होण्याचा काळ आलेला आहे 

आणि भारतीय परंपरा तर 

जे वाचले आहे त्यावरच टाळ्या वाजवते 

जे नष्ट झाले किंवा जे नष्ट होते आहे 

त्याबद्दल कोणाला कधी ? काय पडली आहे ?


सगळ्याच गोष्टींची लोकसंख्या अतिरिक्त झाली 

कि ती गोष्ट फार महत्त्वाची ठरत नाही 


माणूस हा या देशात अतिरेकी लोकसंख्येचा बळी आहे 


मग त्याच्या अवयवांची काय किंमत 

आणि या एकमेव शिल्लक असलेल्या पण नाहीसे होत चाललेल्या नखाची तर काय किंमत ?


ज्यांचे नाक कापले गेले तरी ज्यांना शोक वाटत नाही 

त्यांना नख कापले गेले म्हणून काय शोक वाटणार ?


जिथे तिथे पानिपत स्वीकारण्याची सवय लागलेला मराठी समाज 

आणि माझा डाव्या पायाचा बोडखा झालेला विधवा अंगठा 


मी यातच खुश व्हावे का 

की मला अजून हातांनी सही करता येते ?


१४


मी नखशल्यवादी होतो आहे का ?


१५


मी नख वाचवण्याची प्राणांतिक धडपड करतोय 

कारण दुसरे नख कधीच सशक्त नसते 

हे मी डाव्या पायावर अनुभवतो आहे 


माझा दुबळ्या नखाचा डावा अंगठा 

मला कधीच भरभक्कम चालू देत नाही 


जगात तोच जिवंत असतो जो ताठ असतो 

माझे नख माझ्या अंगठ्याचा ताठपणा होता 

आणि विषाने नेमका तो ताठपणाच मोडीत काढला 


जो पळत नाही तो अंगठा काय कामाचा ?



१६


मी ratrace चा भाग नाही 

पण जगण्यासाठी जंगलात सुद्धा पळावे लागते 

माझा प्रॉब्लेम एकच आहे 

मला पळता येणार नाही 


मी निकराने माझे उजवे नख वाचवण्याचा प्रयत्न करत आहे 

आणि विष आहे की इफेक्ट सोडण्यात मातब्बर आहे 


त्याला काही करून माझ्या उजव्या पायाचे नखच हवे आहे 



१७


१८१९२०


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट्स या काव्य फायलीतून)

डोनाल्ड साठी श्रीधर तिळवे नाईक 


नाकाच्या पलीकडे पाहता न येणारा 

इतरांना सांगतोय 

तुम्ही माझा चष्मा घाला 

आणि मला मदत करा 


त्याला विजय पाहता येत नाही 

आणि रणांगण 

फक्त नाकापुढचे दिसते 


तो उड्यांना झेप समजतो 

आणि प्रवासाला खेप 


गळ्यापर्यंतचे कर्ज 

आणि त्या कर्जाचा बनलेला सर्प 

त्याच्यातला दर्प 

त्याच्या नाकाला झोंबत नाही 

मात्र इतरांना तो नाक शिंकायला लावतो 

आणि कण्याचा आवाज आला की ओरडतो 

युद्ध युद्ध युद्ध 


सत्ता सत्याला वाकवते 

असे त्याला उगाच वाटते 


तो सतत सत्याची मान मुरगाळतो 

आणि त्यातून खोटे रक्त येते का 

याचा शोध घेतो 


त्याला लाल रंगात कम्युनिस्ट दिसतात 

हिरव्या रंगात इस्लामिस्ट 


भयाचे भय वाटावे इतकाही तो सेंसिबल नाही 


त्याचे धैर्य एका मूर्खपणातून जन्मते 

आणि तरीही त्याला मिळालेले यश 

कोड्यात टाकते 


इतका पैसा याने कमावला कसा 

या प्रश्नाचा पाठलाग 

त्याला अगम्य करतो 


प्रत्येक सिंह त्याला सश्यासारखा दिसतो 

आणि त्या सिंहाने पंजे काढले की 

मग हा हतबल होत 

डबल ट्रबल होत जातो 


केवळ नाकापुढे जग आहे 

हा त्याचा ग्लोबल भ्रम 

त्याला दीर्घ होऊ देत नाही 


आता त्याला येत आहेत उचक्या 

आणि कोणीही येऊन देत आहे त्याच्या नाकावर टिचक्या 


प्रश्न इतकाच 

तो नाकात पाणी जाऊन मरणार आहे 

की ऑइल जाऊन ?


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष या सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


तिन्ही बाजूंनी हिटलर 

त्यांना सर्व बाजूंनी शेल्टर 


तीन सैतान मारतायत देवाशी गप्पा 

देवालाही कळत नाही हा कसला टप्पा 


शेवटाला जिवंत देह आणि मृत देह 

थंड झालेला अगतिक चेव 


कुठून सुरू झाला हा एक कंड

कुणी पुरवला यांना खालून फंड 


मुळात इतके नियंत्रण कशाला हवे 

शस्त्रे अशी उडतात जसे पक्षांचे थवे 


शेवट माहित आहे तरी करायचाय शेवट 

बातम्या सुद्धा देतात जशी मिसळ आणि कट 


तरी दळायचे आहे मरणाचे दळण 

मरणाचे पीठ आणि मरणाचे वरण 


बुद्धिमत्ता नि मूर्खपणा फरक काय 

दोन्हीही गोठ्यात बांधलेली गाय 


कधीतरी युद्धच करेल मानव जातीला ठार 

सांगायलाही उरणार नाही इतिहासाचा आधार 


त्याचीच बहुदा बघतायेत सर्वजण वाट 

युद्धात मरत चालली उत्क्रांतीची पहाट


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष या सिरीज मधील मोक्ष: आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय