भावतंत्र

 संत , मोक्ष आणि व्यवहार श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही संताचा एखादा विशेष दिवस आला की आपल्याकडे त्या संताने केलेला व्यवहारिक उपदेश सांगण्याची प्रथा आहे विशेषत: संत तुकाराम यांच्या बाबतीत हे अनेकदा घडते मात्र या संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची हा एक फार मोठा प्रश्न असतो कारण लोकांचा व्यवहार आणि संतांनी सांगितलेला व्यवहार यांच्यामध्ये प्रचंड तफावत असते . ही तफावत भरून काढण्याची कसलीही तसदी आपले लोक घेत नाही. हा विरोधाभास नेमका कशातून निर्माण होतो हे एकदा नीट पाहिले पाहिजे. हे समजून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम संत म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुळातच संतांची चळवळ ही शैव-धर्मातली चळवळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचे उगमस्थान तामिळनाडू आहे . अर्थातच अलीकडे वैष्णव लोक स्वतःचे घोडे दामटवत असल्यामुळे मुद्दाम म्हणून खोट्या तारखा तयार करून आम्ही आधीच आलो अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतात अर्थातच हे युरेशियन श्रुतीला धरून आहे पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की जिला आज आपण भक्ती चळवळ म्हणतो ती चळवळच मुळात आनंदीपासून सुरू होते (नंदीपासून सुरु होते )त्याच्या नावाचा जो शॉर्ट फॉर्म तयार केला गेला आणि त्याला नंतर जो बैलाचा आकार दिला गेला त्यामुळे अनेक गैरसमज पसरले आणि हे जाणीवपूर्वक घडवले गेले जेणेकरून भक्तीचे नाव शैवधर्मापासून जास्तीत जास्त तोडता येईल . वास्तविक हा मुळात भगवान शंकरांचा सर्वोत्तम मित्र ! इतका जिवलग मित्र की ते जिथे जातील तिथे हा जायचा सोबत असायचा .भक्त म्हणजे बैलोबा असे काहीतरी विचित्र समीकरण त्यामुळे तयार होते किंबहुना ते तयार करण्यासाठीच आनंदी सारख्या पहिल्या शिवभक्ताचे नाव शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले जाते. त्यामुळे होते असे की भक्तीचा मूळ उद्देशच लोप पावतो भक्तीचा मूळ उद्देश आहे आनंदी होणे आणि तुकाराम तो नेहमीच आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे या भाषेत व्यक्त करतात याचे कारण संपूर्ण शिवांडाचा स्वभाव हा आनंदसोहळा साजरा करणारा स्वभाव आहे आणि या शिवस्वभावापर्यंत पोहोचणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे .


संत तुकाराम म्हणतात दुःख पाहता पर्वताएवढे हे त्यांच्या बाबतीत खरे आहे मात्र ते सर्वांच्या बाबतीतच खरे असेल असे नाही काहीजणांच्या आयुष्यामध्ये सुख पण असते पण आनंद नसतो आणि या आनंदासाठी जो कासावीस होतो तो खरा भक्त होय .


भक्तिमार्गाने किंवा भावतंत्राने जो मोक्ष मिळवतो त्याला आपल्याकडे संत म्हणतात. याचे कारण अर्थातच सांताचा अंत करणारा तो संत अशी व्याख्याच आहे. भक्तिमार्गावर भाव तंत्रावर चालत ज्याच्या सांतपणाचा अंत होऊन जी व्यक्ती अनंताला उपलब्ध झाली आहे ती संत होय . स अनंत म्हणजे अनंतासह असणारा तो संत होय. त्यावरूनच पुढे संतोष हा शब्द आलेला आहे.


प्रश्न असा आहे की एकदा अंतिम उद्देश कळाला की मग भावतंत्राची सुरुवात करायची कशी ?


शैव धर्म हा ही सुरुवात '' आहे " पासून सुरू करतो आणि जे आहे ते आनंदी आहे. त्याउलट कपिल आणि बुद्ध दुसऱ्या दुखऱ्या टोकाला जातात आणि संसार दुःख ग्रस्त आहे दुःखाने भरलेला आहे अशी सुरुवात करतात. हा मुळात काळामुळे पडलेला फरक आहे . ज्या पशुपालन युगामध्ये शैव धर्म जन्म घेता झाला त्या युगामध्ये मुळातच शेती वगैरे भानगडी संपत्ती वगैरे भानगडी फार कमी होत्या त्यामुळे जमीन आणि संपत्ती प्रॉपर्टी यावरून होणारे तंटे फार कमी होते . मुळात मुबलक जमीन ,मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित पाळलेले पशु असा प्रमाणबद्ध व्यवहार असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला भरपूर जमीन येत होती . शेती सुरू झाली आणि मग जमीन कोणाची यावरून टोकाचे वाद सुरू झाले . बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर गौतम बुद्धाने पाण्याच्या प्रश्नावरून गण सोडला असेल तर पाणी हे सुद्धा संपत्ती झाले होते असे म्हणता येते. 


आणि एकदा का प्रॉपर्टी आली की बऱ्याचशा गोष्टी बदलत जातात मुख्य म्हणजे ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी नाही त्यांच्या वाट्याला समाज निर्मित दुःख खूप यायला लागते . याचे कारण प्रॉपर्टी असलेला एक वर्ग तयार होतो आणि हा वर्ग शोषणाची प्रचंड मोठी व्यवस्था निर्माण करतो ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्याला जो आधार असतो तो नेहमीच धर्म असतो म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की धर्म ही राजकीय प्रणाली आहे आणि या राजकीय प्रणालीला शह देण्यासाठी म्हणूनच नकुलिश याने पाशुपत (लोकधर्म), राजपुत्र कपिल याने सांख्य धर्म , वर्धमान महावीर याने जैन तर गौतम बुद्धाने बौद्ध अशा धम्म प्रणाली नव्याने निर्माण केल्या . या चारही प्रणालींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बुद्धिप्रधान होत्या . त्यांनी एका बाजूला दोन्ही श्रुतींच्या मधली मांत्रिकी नाकारली आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण धर्माला ठाम आणि स्पष्ट नकार दिला .


या चार लोकांच्यामुळेच भारताचा राज्यकारभार जवळ जवळ 1000 पर्यंत नीट चालला होता. या सगळ्यांचा पाडाव कसा केला गेला हे सर्वश्रुत आहे . भक्ती ही मुळात जेव्हा जन्मली तेव्हा या चार लोकांनी मांडलेल्या कठोर बुद्धिवादामुळे निर्माण झालेल्या प्रचंड बुद्धी केंद्री वातावरण आता स्वतःच सत्तेवर आले होते आणि त्यातून समाधानकारक व्यवस्था निर्माण करण्यात काही राजवटींना अपयश यायला लागले. यातील ज्या शोषक राजवटी होत्या त्यांना शह देण्यासाठी भक्ती पुन्हा एकदा जन्मली . वास्तविक या धर्मांचा बौद्धिक मुकाबला करणे फार आवश्यक होते कारण त्यांचे जे पतंग झाले होते ते मुळातच स्वतःच्या मूळ उद्देशापासून आणि उपदेशापासून दूर गेल्या मुळे नको तितकी उडायला लागले होते आणि नको तितके पतन पण व्हायला लागले होते . दुसरी गोष्ट यांचे सर्व व्यवहार हे कमालीचे प्रज्ञा प्रधान होते हळूहळू ते शुष्क आणि कोरडे होऊ लागले आणि जनसामान्यांच्या आकलनाच्या ते पलीकडे जायला लागले. विशेषतः शुष्क बौद्धिक चर्चा या इतक्या तपशीलवार व्हायला लागल्या की मूळ उद्देश जो मोक्ष तोच बाजूला पडला आणि बुद्धाचा हा दात चांगला की तो दात चांगला अशा प्रकारचे बौद्धिक वाद व्हायला लागले . पाशुपत दर्शन नकुलिशाने मांडले की लकुलीशाने मांडले अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ लागले . मुळातच ब्राह्मण लोकांनी या सर्व बौद्धिक चर्चा स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालवला आणि हळूहळू मूळ उपदेश आणि उद्देश बाजूला पडला. एका अर्थाने पौराहित्य करणाऱ्या वर्गाने हे चारीच्या चारी धम्म बळकावले .


याचे कारण असे होते की कळत नकळत भावनांची उपेक्षा अनेक सामान्य लोकांना झोंबतच होती मुळातच त्यांना हा मार्ग अतिशय अवघड वाटत होता आणि हे लोक भावनेच्या अधिक जवळ असल्याने त्यांना भाव तंत्र योग्य वाटत होते परिणामी भावमार्ग हाच योग्य वाटत गेला आणि याचे पहिले पडसाद हे मुळातच दक्षिणेकडे उमटले आणि आज सुद्धा दक्षिण मधली भावकेंद्रीयता हा चर्चेचा विषय असतो . शैव भक्ती साधारणपणे इसवी सन पाचव्या शतकाच्या आसपास कुठेतरी जन्मलेली आहे असे वाटत असले तरी ती पूर्वी पासूनच जन माणसांमध्ये ती होती परंतु तिला एक आकार या भक्ती चळवळीने दिला . त्यामुळे सामान्य लोकांना ज्यांना भाविक असणे परवडते त्यांच्यासाठी मोक्षाचा एक मार्ग अधिकृत मान्यता घेत पुन्हा नव्याने अवतरला जो आधीच आनंदीला( नंदीला )सांगण्यात आला होता . मुळातच संस्कृत मध्ये ज्यांना नारद सूत्रे म्हणतात ती भगवान शंकरांच्या कडून आनंदीला दिली गेलेली सूत्रे आहेत . कारण हा आनंदी जरी मित्र असला तरी तोच प्रथम शिवभक्त होता. किंबहुना तो आद्यभक्त आहे म्हणूनच शंकराच्या कुठल्याही मंदिराच्या दारामध्ये सर्वात प्रथम त्याला स्पर्श करावा लागतो.


आनंदी सूत्रे अर्थात नारद सूत्रे हा ग्रंथ साधारणपणे इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून प्रचलित झाला होता आणि त्याला कारण आचार्य शंकर होते पाचव्या शतकामध्ये या ग्रंथाचा जोरदार बोलबाला होत हळूहळू तो पसरत गेला कारण आता संस्कृत ही कळत नकळत विद्वानांची पण भाषा झाली होती .


या आनंदी सूत्रातील सूत्रे जी नंतर नारदसूत्र म्हणून प्रचलित झाली शैव-धर्मातली मांडणी आनंदप्रधान आहे त्याउलट वैष्णव आणि कळत नकळत सांख्य आणि बौद्ध धर्म (बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये सांख्य आणि गौतम बुद्ध यांचा दुःखाच्या अंगाने असलेला संबंध मान्य केलेला आहे ज्यांना विशेष रस असेल त्यांनी या ग्रंथाचे पहिले तीन चाप्टर वाचावेत) अनुसरला आणि त्यामुळेच दुःखाची सातत्याने चर्चा वैष्णव धर्माच्या भक्तीवादामध्ये सुद्धा होते . संत तुकाराम त्यामुळेच सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वताएवढे असे म्हणतात यामध्ये सुद्धा दुःख अधोरेखित करणे हेच मुख्य आहे. ( मुळातच त्यांच्या काळामध्ये सातत्याने पडत गेलेल्या दुष्काळांचा त्यामध्ये प्रचंड वाटा आहे त्यामुळेच आयुष्यच मुळात कमालीचे दुःखी होत गेले होते)मात्र त्यांची यात्रा तिथे थांबलेली नाही तर ती शेवटी आनंदाचे डोही आनंद तरंग अशी झालेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगदी गौतम बुद्धाला सुद्धा नेमके हेच अपेक्षित होते म्हणजे संसार दुःखमय आहे परंतु निर्वाण आनंदमय आहे हेच त्याला सांगायचे होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की या यात्रेच्या शेवटावर अनेकांचा विश्वास असत नाही वास्तविक निर्वाणप्राप्तीनंतर शांती आणि आनंद दोन्ही प्राप्त होतात. किंबहुना दुःखाचे निर्वाण आणि अक्षय आनंदाचा जन्म हेच निर्वाण हाच मोक्ष असतो. 


प्रश्न असा आहे की मग साहजिकच भक्ती तंत्र करते काय ? तर भक्ती तंत्र आपण आनंदी का नसतो आपण दुःखी का असतो अशा दोन अंगाने कारण मीमांसा करते . शैव भक्ती कारणमीमांसा करत आनंदाकडे जाते तर युरेशियन भक्ती ही दुःखाकडे जाते आणि दुःखातून आनंदाकडे जाते . सुख आणि आनंद या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहे हे कृपया लक्षात घ्या . अत्यंत गरीब असलेला मनुष्य सुद्धा आनंदात असू शकतो त्या उलट अत्यंत श्रीमंत असलेला मनुष्य दुःखी असू शकतो . सुख आणि दुःख अनेकदा बाहेरून येते तर वेदना आणि आनंद आतून येतात. वेदना या त्रासदायक संवेदना असतात या अनेकदा शारीरिक दुखापतींच्यामुळे येत असतात . त्या टाळता येत नाहीत . तुम्हाला अपघात झाला आणि तुम्ही जखमी झाला तर वेदना अटळ असतात. अगदी मोक्षाला पोचलेला पुरुष अथवा स्त्री सुद्धा वेदना टाळू शकत नाही . याउलट दुःखातून मात्र मुक्त होता येते . 


साहजिकच मग दुःखातून मुक्त होण्यासाठी कसा व्यवहार झाला पाहिजे यावर सगळे संत येतात आणि यामध्ये सर्वाधिक उत्तम निवेदन आणि मांडण संत तुकाराम यांनीच केलेले आहे .


काम, क्रोध, , लोभ , मोह, माया, मद हे मोक्ष मार्गावरचे आणि आनंदाच्या मार्गावरचे सर्वात मोठे शत्रू! त्यांचा उल्लेख अनेकदा षडरिपू म्हणजे सहा शत्रू असा होतो .या शत्रूंच्यावर मात व काळजात दया ,क्षमा ,शांती आणि शेवटी मोक्ष उमलणे हे या व्यवहाराचे मुख्य अंग ! 


हा व्यवहार पार पाडल्याशिवाय भाव मार्गाने (भक्ती मार्गाने) सुद्धा मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या संदर्भात जी कीर्तने होतात त्यांचा भर या दहा गोष्टीवर असला पाहिजे पण आपल्याकडे अनेकदा हे सर्व मनोरंजक पद्धतीने सांगत मुख्य दहा गोष्टीच बाजूला होतात आणि कीर्तन म्हणजे मनोरंजन बनत जाते . वास्तविक किर्तनांचा मुख्य उद्देश हा सहा शत्रू आणि चार मित्र यांचा प्रचार आणि प्रसार करणे हा असला पाहिजे.


या दहा गोष्टी भावतंत्रातल्या बेसिक गोष्टी आहेत जोपर्यंत या साध्य होत नाही आणि त्या दिशेने साधना होत नाही तोपर्यंत तुम्ही किती पण भक्तीचा आव आणा तुम्हाला मोक्ष मिळणे शक्य नाही .


यानंतर मग आणखी काही उप व्यवहार येतात . उदाहरणार्थ

१ उत्तम व्यवहार करूनच धन मिळवणे तुकारामाच्या भाषेत वेचणे 

२ बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 

३ सत्य बोलावे सत्य चालावे 

४ मुंगीला सुद्धा अतिशय अहिंसक पणाने जपावे (प्रत्यक्ष व्यवहारात अनेक भक्त मुंगीला जपणे सोडून द्या माणसाला सुद्धा जपत नाही मुंगीला सुद्धा मारू नका असे ज्ञानेश्वर सांगतात आणि इकडे लोक चक्क धर्माच्या नावाने माणसाला मारतात तर हे कोणत्या मार्गाचे भक्त आहेत )


तेव्हा भाव मार्गाने चाला पण भाव मार्गाने चालणे म्हणजे उत्तम व्यवहार करणे संत व्यवहार करणे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


श्रीधर तिळवे नाईक


पुन्हा तुकाराम की पुन्हा पुन्हा तुकाराम श्रीधर तिळवे नाईक 


तुकाराम बीज च्या निमित्ताने पॉप्युलर प्रकाशनाने पुन्हा एकदा तुकाराम केंद्रस्थानी आणलेला आहे त्यासाठी निमित्त आहे ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिलेल्या "पुन्हा तुकाराम " या पुस्तकाचे ! 


या पुस्तकाबद्दल सदानंद रेगे यांनी एक अभिप्राय दिलेला आहे जो या पुस्तकाच्या जाहिरातीत आलेला आहे तो पुढील प्रमाणे,"पुन्हा तुकाराम' मराठी साहित्य कोपर्निकन क्रांती करणारी कृती आहे असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकोबा आणि इतर कवी परिघावर अशी एक प्रकारची उत्पाती उलटापालट चित्रे यांनी घडवून आणली.

…मुद्दा तुकारामगाथेचे वारंवार काळजीपूर्वक परिशीलन करून (ही (एक प्रकारची वारीच) तिच्यात अनुस्युत असलेली काव्याची संकल्पना स्पष्ट करणे, स्वत: तुकोबांच्या काव्यजाणिवेवर प्रकाश टाकणे आणि त्यातून काव्यसमीक्षेची काही मूल्ये हाती लागतात का हे पाहणे, तसेच त्यांचा मराठी संवेदनस्वभावाशी आणि संस्कृतीशी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून संबंध जोडून आवश्यक होते हा आहे. चित्र्यांनी नेमके हेच केलेले आहे. परंतु हे करताना त्यांना अपरिहार्यपणे मानदंड परिवर्तनाकडे (Paragigm Shift) जावे लागले आहे. आणि नेमकी इथेच मराठी समीक्षकांची गोची झालेली दिसून येते.

…‘पुन्हा तुकाराम’मध्ये चित्र्यांनी तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असा सिद्धान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र पण वैश्विक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबा हा आपण चौफेर वाचलेल्या जागतिक कवितेतला एक अनन्य चमत्कार असून मराठी साहित्यबाजीने आणि कोत्या सांस्कृतिक बुद्धीने गमावलेला महाकवी आहे असे ते म्हणतात.

…संस्कृतोद्भव पंडिती, इस्लामोत्तर काळातल्या शाहिरी आणि इंग्रजोत्तर काळातल्या रोमँटिक, रोमँटिकोत्तर, पूर्वाधुनिक आणि मध्याधुनिक कवितेची काव्यसंकल्पनाच तुकोबांच्या गाथेच्या मानाने

संकुचित, उथळ, अतिनियोजित आणि अलंकारिक आहे. तुकोबांच्या गाथेतील काव्यसंकल्पना एकदा मान्य केली तर वरील तिन्ही परंपरांमधली, बैठकीत किंवा विद्यापीठात किंवा रसिकांच्या संमेलनात आस्वादण्यासाठीच निर्माण केलेली कविता थिटीच दिसू लागते.”

— डॉ. सदानंद मोरे ‘श्री’ जून १९९३


सदानंद मोरे यांनी या पुस्तकाचे सांगितलेले महत्त्व नक्कीच महत्त्वाचे आहे. किंबहुना म्हणूनच ते मी दिलेले आहे .

मात्र मला त्या संदर्भात एक गोष्ट विचाराच्या प्रकाशात आणावी लागते ती म्हणजे दिलीप चित्रे म्हणतात तसे पुन्हा तुकाराम? की पुन्हा पुन्हा तुकाराम ?


आणि दुसरी गोष्ट तुकारामाच्या तोडीचा एकही कवी तुकारामानंतर मराठी साहित्यात निर्माण झाला नाही हे सर्वसाधारणपणे साठोत्तरी लोकांचे म्हणणे खरे आहे की खोटे ? दिलीप चित्रे अत्यंत व्यवस्थितपणे असे पटवतात की साठोत्तरी पिढीपर्यंत तुकारामाच्या पठडीतला त्याच्याशी नाळ जुळवलेला एकही कवी आपणाला दिसत नाही . आता हा जो निष्कर्ष ते काढतात तो योग्य आहे परंतु त्यांनी दिलेली कारण मीमांसा मात्र अपूर्ण आहे असे सांगावे लागते.


आपण जर का मर्ढेकर आणि विंदा करंदीकर यांच्या पर्यंतची कविता पाहिली तर ह्या म्हणण्यामध्ये नक्की तथ्य आहे . तुकाराम यांच्यानंतर या अर्थाने एकही महाकवी निर्माण झालेला नाही आणि तुकाराम हा 1960 पर्यंत तरी मराठी साहित्यात झालेला चौथा महाकवी होता त्याआधी ज्ञाननाथ , संत नामदेव आणि संत एकनाथ असे तीन महाकवी होऊन गेले होते याच परंपरेमधला चौथा महाकवी म्हणजे संत तुकाराम होय. त्यांच्या या स्थानाबद्दल मला नाही वाटत की दुमत होऊ शकते. मात्र त्यांच्या या परंपरेचे बीज कवी संत नामदेव होते हे श्रेय आपण संत नामदेवांना दिले पाहिजे जे अनेकदा तुकारामांना देताना नाकारले जाते . नामदेव झाले म्हणून तुकाराम झाले . नामदेव आणि तुकाराम यांच्या अभंग रचनेमध्ये असलेले साम्य अनेकदा दाखवणे सहज शक्य आहे . किंबहुना आपल्याकडे अनेकांनी ते दाखवलेले आहे .


त्या उलट जे ज्ञाननाथ आणि ज्ञानेश्वर बीज कवी आहेत त्याचे महाकाव्य स्वरूप मात्र आपणाला संत एकनाथांच्या मध्ये साकारलेले दिसते . पण संत एकनाथांच्या मध्ये पंडिताचा गवगवा सुद्धा आढळतो . त्यामुळे अनेकांना ते महाकवी म्हणून मान्य नाहीत. तुकारामांच्या बाबतीत असे दुमत होत नाही . ते महाकवी आहेत याबद्दल जवळजवळ एकमत आहे .


मराठीतील 1000 नंतरची पहिली परंपरा ही पंडितांची परंपरा आहे जी निवृत्तीनाथ ज्ञाननाथांच्या पासून सुरु होते . पंडितांचे वैष्णवीकरण इथेच सुरू झालेले दिसते आणि त्याचे मराठीवर अत्यंत घातक परिणाम झाले की काय अशी शंका घ्यावी असे काही पुढे घडत गेले. 


स्वतःच्या दैनंदिन आयुष्यातील तपशिलांशी स्वतःच्या काव्यात्मक प्रतिभेशी उत्तम सांगड घालत आणि त्या सांगडीला योग्य ते भाषिक रूप देत स्वतःचा काव्य अविष्कार करायचा अशी ही नामदेवांची वैष्णव परंपरा आहे जेसीबी जिचे बीज आपणाला सरळ सरळ गाथा सप्तशतीमध्ये दिसते जी शैव आहे .


त्याचे संपूर्ण आणि सफल स्वरूप आपणाला संत तुकाराम यांच्यामध्ये दिसते. 


प्रश्न असा आहे की या तुकारामाचे नंतर काय झाले? यासंदर्भामध्ये साठोत्तरी पिढीने एक विशिष्ट मांडणी केली ती मांडणी म्हणजे पुरोगामी काव्याने संत तुकाराम यांच्याबरोबर योग्य असे नाते जोडले नाही आणि नंतरच्या आधुनिक काव्यालाही ते जमले नाही. हे जे साठोत्तरीचे प्रमेय आहे त्याचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणजे पुन्हा तुकाराम हे पुस्तक होय. या पुस्तकाबरोबर भालचंद्र नेमाडे यांचे तुकाराम हे पुस्तक आपण पाहिले की साधारणपणे साठोत्तरी पिढीचा नेमका दृष्टिकोन काय होता ते आपणाला समजू शकते.


साहजिकच मग आमच्या पिढीवर खरोखरच हा दृष्टिकोन खरा आहे काय याची तपासणी करण्याची वेळ आली . 


दुसरा प्रश्न तुकारामाशी नाते जोडले म्हणजे ग्रेट कविता लिहिता येईल का ? हा होता. सर्वसाधारणपणे देशीवाद हा असेच मानतो की परंपरेत राहून तुम्ही लिखाण केले तर ते अधिक थोर होते . त्यामुळे तुकारामाच्या परंपरेत राहून तुम्ही लिखाण करा तुमचे लिखाण थोर होईल असे एका अर्थाने एक प्रमेयच हे पुस्तक सुद्धा मांडत जाते आणि त्याचा प्रचंड परिणाम हा 1990 नंतर विशेषता या पुस्तकाच्या नंतर झालेला दिसतो त्यामुळे मी नेहमी म्हणत आलो आहे की चित्रे नेमाडे यांनी आमच्या पिढीतील अनेक कवी सहज गिळले.


माझा तुकारामांच्या बाबतीत असलेला प्रॉब्लेम वेगळाच होता . मी शैव होतो आणि तुकाराम शैववादावर अभंगातून अनेकदा कठोर टीका करत होते . म्हणजेच माझ्या घरामध्ये असलेल्या शैव परंपरेवर एका अर्थाने ही टीका होती. साठोत्तरी पिढी असे गृहीत धरत होती की जणू काही हीच एक वारकरी वैष्णव परंपरा मराठीची खरी परंपरा आहे माझे म्हणणे असे की हे खोटे आहे प्रत्यक्षामध्ये मराठीची खरी परंपरा ही शैव आहे . साहजिकच मग एकाच वेळेला तुकारामाच्या कवितेवर प्रेम आणि दुसऱ्या बाजूला तुकारामच्या कवितेतील शैवविरोधी आशयावर चिंतन अशा स्वरूपाचे काहीसे मनन सुरू झाले. 


थोडक्यात हा संघर्ष खंडोबा विरुद्ध विठोबा असा होता . आमच्या मते दोन्ही देव शैव आणि वैष्णवांच्या मते विठोबा वैष्णव ! हिंदूंच्या मते दोघेही एकाच ईश्वराचे रूप ! प्रत्यक्षामध्ये दिसायला हा संघर्ष अत्यंत सरफेस लेव्हलचा वाटत असला तरी प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये वर्णव्यवस्था नाकारायची की स्वीकारायची की असा संघर्ष आहे. मराठीमध्ये सर्वसाधारणपणे साठोत्तरीने आणि पुरोगामी वादी लोकांनी जो एक भ्रम फैलावलेला आहे तो असा आहे की वैष्णव परंपरा आणि त्यामध्ये तुकाराम हे वर्ण व्यवस्थेला विरोध करतात प्रत्यक्षामध्ये दलित साहित्यातील अनेक समीक्षकांनी तुकारामाने कुठे कुठे वर्ण व्यवस्थेला समर्थन दिलेले आहे ते तुकारामाच्या अभंगातलेच पुरावे काढून सिद्ध केलेले होते . वस्तुस्थिती अशी आहे की वैष्णव परंपरेमध्ये मोक्षापुरती समता आहे आणि इतर धर्म ,अर्थ आणि काम यांच्याबाबत ही समता नाही त्यामुळे साहजिकच वारकरी लोक रोटी बेटी व्यवहार जातीतल्या जातीत करतात . इतकेच नव्हे तर मंदिराबाबत ही समता नाही त्यामुळेच संत चोखोबांना शेवटपर्यंत पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही त्यासाठी साने गुरुजी यांना चक्क आंदोलन करावे लागते आणि संत चोखामेळा यांना पायरीमध्ये गाडले जाते .


जर वारकरी चळवळ खरोखर समतेची चळवळ असती तर संत चोखामेळा यांची ही अवस्था झालीच नसती . 


त्यामुळेच मी माझ्या पद्धतीने तुकारामाचे एक विश्लेषण कायमच करत आलेलो आहे कारण तो माझा एक अत्यंत आवडता कवी आहे. मात्र त्यांच्यापेक्षा अधिक नाळ बसवेश्वर यांची यांच्याशी जुळवणे मला जास्त नैसर्गिक वाटत गेले कारण माझ्या घरामध्ये शेव परंपरा होती मला बसवेश्वरांशी नाते जोडणे हे जास्त योग्य वाटते . बसवेश्वर हे स्पष्टपणे उघडपणे वर्ण जात विरोधी भूमिका घेतात अशा प्रकारची भूमिका संत तुकाराम यांनी घेतली की नाही याबद्दल प्रश्न निर्माण करता येतो. त्यामुळे कवी म्हणून संत तुकाराम यांच्या बद्दल कितीही प्रेम असले तरी वर्ण जात व्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा मग वेगळी परंपरा पत्करावी लागते. 


प्रश्न असा आहे की तरी सुद्धा संत तुकाराम यांच्याशी नाते जोडणारा कवी कोण असा प्रश्न विचारला की पुन्हा एकदा शैवच येतात आणि हे शैव म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होते. म्हणजे तुकारामांशी नाते जोडणारा कवी म्हणून प्रथम महात्मा फुले यांचाच उल्लेख करावा लागतो .


याचा अर्थ प्रबोधनवादी परंपरेमध्ये तुकारामाशी नाते अनेकांनी जोडले होते . अगदी न्यायमूर्ती रानडे यांचा संत वाङ्मयावर एक स्वतंत्र ग्रंथच आहे मग संत तुकाराम यांच्याशी नाळ कधी तुटली ? 


पुढे मग केशवसुत येतात त्यांचेही तुकाराम यांच्याशी नाते होते परंतु हे नाते खोल नव्हते कळत नकळत केशवसुत हे वेदांती आहेत पण आपण जर का वेदांती परंपरा बघितली तर ती सुद्धा मराठीमध्ये विवेक सिंधू पासून सुरू झालेली दिसतेच . म्हणजे मग प्रश्न येतो तो म्हणजे वारकरी परंपरेशी जुळवले म्हणजेच मराठी कवी मराठी कवी बनतो काय ? 


मुळातच प्रबोधन काळ आणि पुरोगामी काळ हा धर्माशी नाते तोडून पाहत होता त्याला हे साजेसे वाटते. पुढे मग आपण उत्तर सौंदर्यवादात गेलो तर तिथे शंकर वैद्य यांनी तुकारामांची अतिशय खोलात जाऊन मीमांसा केलेली दिसते . ग्रेस यांची तर संत तुकाराम यांच्यावर एक कविताच आहे . मग नाते कुठे तुटले ? याच काळामध्ये आपण जर का विनोबा भावेंनी सिलेक्ट केलेले तुकारामाचे अभंग आणि त्या संदर्भातील त्यांचे भाष्य पाहिले तर गांधीवादाचे तरी तुकारामाचे असलेले नाते कुठे तुटले ? असा प्रश्न विचारता येतो थोडक्यात काय तुकाराम पुन्हा पुन्हा आला म्हणजेच पुन्हा तुकाराम नाही तर पुन्हा पुन्हा तुकाराम हीच मराठीची वस्तुस्थिती आहे . 


पुढे आधुनिक नवतेमध्ये सुद्धा विंदा करंदीकर यांचे नाठाळ अभंग असेच तुकारामाशी नाते जुळवतात .


वस्तुस्थिती अशी आहे की तुकारामाशी मराठी कवितेची नाळ तुटली असे प्रतिपादन साठोत्तरी लोक करत असतात त्याला परिस्थितीजन्य पुरावा मिळत नाही प्रॉब्लेम वेगळाच आहे हा प्रॉब्लेम काय आहे ? तर या काळामध्ये यांच्यापैकी एकही कवी तुकारामाच्या तोडीचा झाला नाही . आणि ही मर्यादा परंपरेची नसून प्रतिभेची आहे . केवळ परंपरेत लिहिल्याने कोणीही संत तुकारामासारखा महान कवी होत नाही अन्यथा सदानंद मोरे सर्वात महान कवी झाले असते. त्यासाठी मुळात तुमच्याजवळ उपजत प्रतिभा लागते आणि अत्यंत ओरिजनल म्हणावे असे समाजाशी लढणारे आणि जीवावर रिस्क घेणारे आयुष्य लागते , अनुभव विश्व लागते. या गोष्टीची मुळातच या कवींच्याकडे वानवा होती आणि म्हणूनच त्या तोडीचा कवी झालेला नाही. तिसरी गोष्ट अर्थातच तंत्रकौशल्य आहे. तुकारामाच्या ठाई 


१ जन्मदत्त प्रतिभा 

२ न भूतो न भविष्यती असे अद्भुत संघर्षाने भरलेले आयुष्य या आयुष्यात त्यांनी घेतलेली रिस्क 

३ कमालीचे भाषा प्रभुत्व आणि भाषा कौशल्य 


या तिन्ही गोष्टी एकवटलेल्या दिसतात म्हणून ते महान कवी आहेत . प्रॉब्लेम कुठे झाला तर स्वतःच्या आयुष्याकडेच दुर्लक्ष करणे हा एक विचित्र उद्योग बाळ सिताराम मर्ढेकर यांनी केला . वास्तविक त्यांची प्रेमप्रकरणे आणि त्यांच्यावर झालेली केस यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याला अत्यंत रिस्की वळण लागलेले होते पण हे वळण आपण जर का त्यांच्या कवितेत शोधायला गेलो तर आपणाला काहीही सापडत नाही . एका अर्थाने हा स्वअनुभवद्रोह आहे . या काळात फक्त बा सी मर्ढेकर असे होते की ते तुकारामाच्या तोडीस तोड लिहू शकले असते पण पाश्चात्त्य समीक्षेने त्यांना बिघडवले . करंदीकर यांचे अनुभव विश्व मर्यादित होते . हीच गोष्ट केशवसुत यांची तर महात्मा फुले यांचे आयुष्य आणि त्या आयुष्यातला संघर्ष त्या आयुष्यातले अनुभव विश्व प्रचंड होते पण दुर्दैवाने कवी म्हणून जी प्रतिभा लागते ती तुकारामाच्या तोडीची नव्हती . त्यामुळे त्यांच्या कवितेला मर्यादा पडलेल्या दिसतात . इथे अनुभवनिष्ठ लिखाण झाले पण सर्वच्या सर्व अनुभव कवितेत आणण्यासाठी मुळातच कवितेची जी साधना करायला हवी ती करायला वेळच मिळालेला नाही त्यापेक्षा सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात करणे फुले यांना महत्त्वाचे वाटलेले दिसते . 


जोपर्यंत आपण ही सर्व कारणे नीट पहात नाही तोपर्यंत तुकारामाबाबत नेमके आपले कुठे चुकले हे कळणे अशक्य आहे . 


थोडक्यात काय चित्रे यांनी साठोतरी पद्धतीची एक उत्कृष्ट मांडणी या ग्रंथामध्ये केलेली आहे याबद्दल शंका घ्यायला जागा नाही किंबहुना मी नेहमीच सर्व कवींना सांगतो की आयुष्यात किमान एकदा तरी हे पुस्तक वाचा. ते वाचणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय तुकारामाचे आकलन पूर्ण होऊ शकत नाही मात्र याच आकलनापाशी थांबू नका शंकर वैद्य यांनी केलेले तुकारामाचे विश्लेषण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे मुख्य म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जे भय दाटलेले दिसते त्या भयाच्या अंगाने त्यांनी हे विश्लेषण केलेले आहे. शंकर वैद्य यांचे मुळात प्रमेयच असे आहे की तुकारामांना कळी काळाचे भय वाटत होते आणि शेवटी त्यांनी त्यावर मात केली. 


हीच गोष्ट विनोबा भावे यांच्याबाबतीत आहे त्यांचे तुकारामा संदर्भातली विश्लेषण हे अध्यात्माच्या अंगाने आलेले आहे आणि तेही तुकाराम कळायला फार मदत करणारे आहे अर्थातच आणखी एक पुस्तक आहेच ते म्हणजे खुद्द सदानंद मोरे यांनी तुकाराम या संदर्भात केलेले लिखाण हेही उत्तम लिखाण आहे .


मात्र दिलीप चित्रे यांचे जे विश्लेषण आहेत ते पूर्णपणे वेगळे आहे याचे सर्वात मोठे कारण दिलीप चित्रे हे स्वतः अव्वल दर्जाचे कवी होते. साहजिकच एका कवीने दुसऱ्या कवीला कसे बघावे भूतकाळातल्या एका कवीला वर्तमान काळातल्या एका कवीने कसे बघावे याचे अद्भुत प्रत्यंतर आपणाला या ग्रंथांमध्ये येते . तुकारामावर कवी म्हणून जितका प्रकाश दिलीप चित्रे टाकतात तेवढा कोणीही यापूर्वी टाकलेला नाही याचे कारण दिलीप चित्रे मुळात प्रथम संत तुकाराम यांचा विचार माणूस तुकाराम म्हणून करतात . आणि हा जो माणूस तुकाराम आहे तो संत तुकाराम कसा बनत गेला याचा एक ग्राफ जो आपणाला विनोबा भावे यांच्या पुस्तकांमध्ये वेगळ्या पद्धतीने मिळतो तो इथे एका कवीने काढलेल्या ग्राफच्या संदर्भात मिळतो. त्यामुळेच दिलीप चित्रे तुकाराम यांचे कवी म्हणून असलेले सामर्थ्य अतिशय व्यवस्थित उलगडून दाखवतात. 


प्रत्येकाने निदान एकदा तरी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे विशेषता कवी लोकांनी तर तो मुद्दामच तपासून पहावा.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय