चॅनेल स्पिरीच्युअल

 काही लोकांना मंबाजीचा रोल आवडतो

त्यांना तो करू दे 


त्यांच्या मत्सरांना मच्छर बनव 

म्हणजे त्यांना रक्त पिल्याचे समाधान 


स्पर्धा अशी आहे 

की भल्या भल्यांना उचकवत आहे 


लोक स्वतःहून आतल्या बागांची कोंडी करतायेत 

आणि जंगले तर कधीच तोडायला सुरुवात केलेली 


इको फ्रेंडली मोक्षाचा काळ कधीच संपला 

आता बुद्धांना सुद्धा ऑक्सीजनची चिंता पडते 


हे त्याच लोकांचे वंशज आहेत 

ज्यांनी बुद्धांचा उपदेश ऐकला नाही


तेव्हा जास्त अपेक्षा नको 

ऐकू येईल फक्त इको 


नशीब की तुझ्या धर्मात 

घंटा वाजवायची पद्धत आहे 

लोक बिझी राहतात 


आणि आता तर सारी रिलेशनशिप लॉंग डिस्टन्स वर 

त्यामुळे मंबाजी आता इंटरनेटवर 

बोचक बोचक बोचकणारे 


तुला संयम ठेवता येणार आहे का हा खरा प्रश्न आहे 


खेळवत रहा मंबाजींना त्वचेवर 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)


ईश्वराची सुरवात खूप क्षणिक आणि सूक्ष्म असते

त्याचा शेवटहीं खूप तात्कालिक आणि छोटा असतो

ह्या दरम्यान जी माफियागिरी असते ती आकाराने महाविशाल आणि जगडव्याळ असते


त्यामुळेच ईश्वर झेपत नाही

आणि सूक्ष्म बनण्याची कला 

नाहीशी होत जाते


ह्याचा फायदा दादागिरी ला मिळतो

आणि लोक पुचाटगिरीला घाबरायला लागतात


ईश्वराच्या खुनाची सुरवात इथून होते

आणि ईश्वरही स्वतःचा खून एन्जॉय करत

स्वतःच्या खुनाचे पुरावे सोडायला लागतो


जो खरा मुमुक्षु असतो

तोच फक्त जाणतो

ईश्वर अमर आहे


बाकी सर्व स्वतःला क्षणभंगुर समजून

ईश्वरावर एकमेकाला प्रवचने देत बसतात

अजान वाढवत बसतात


ईश्वर भाषेतल्या भाषेत हसत राहतो


धर्मग्रंथ म्हणजे त्या हसण्याची कॉपी करणारी कवळी असते 

जी वाचणाऱ्याला दिसते

आणि जी वाचणाऱ्याचे दात घश्यात घालत राहते


लेखक म्हणतो

ऑथर इज डेड


श्रीधर तिळवे नाईक

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल 

या काव्यफायलीतून)

शंभरातील 99 असणाऱ्या देशीवादी जमातीसाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 


पृथ्वी जिवंत आहे 

कारण ती मोबाईल आहे 


ती जर का रुट्स पकडून 

दृढ झाली असती

तर झाडासारखी घट्ट होत 

शेवटी दगड झाली असती 


तू जिवंत आहेस 

कारण पृथ्वी देशीवादी नाही 


ती देश जन्माला घालणारी 

आणि त्यांना सतत बदलणारी 


तिला ऋतू येतात 

कारण तिच्याजवळ मुळे नाहीत 


झाडे तिच्याजवळून ऋतू उसने घेतात 

आणि स्वतःला बदलतात 


तेव्हा मुळावर डिंगा मारणाऱ्या इसमा 

माझ्या चालत्या जंगलामधून 

निमूट उतर 


तू उतरताना सुद्धा 

ही पृथ्वी पर अवर १६७० किलोमीटर स्पीडने 

फिरत असेल याची गॅरंटी मी देतो 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल या काव्यफायलीतून)

तुमची श्रद्धा माझ्या विज्ञानाइतकी भली नाही 

मग सेक्युलॅरिझम काही म्हणो 


स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या अज्ञानाचे सेलिब्रेशन न्हवे 

की तुमच्या दंतकथा म्हणजे माणसाला झालेल्या रोगावरचे उपचार न्हवेत


कवितेच्या बुडाखाली खोटेपण भरायला मी काही प्राचीन कवी नाही

मी आहे पोस्ट क्वांटम भाषा 

जी डिजिटली वाहते 


माझा मोक्ष म्हणजे जुनाट वाऱ्याचा अनुवाद न्हवे

किंवा मी भाकड कथांचे माकड न्हवे 


मी आकाशगंगेतलं हरिकेन आहे

जे दगडांना मास्टरपीस बनवते 

अहंकरांना स्फटीकांची जिरायती शेती करायला लावते 


माझा टाक ब्रम्हांडभर आहे 

आणि तो टकाटक आहे 


तेव्हा ॲबस्ट्रक्ट घोड्यावरून मी घुमजाव करणार नाही 

मी तुम्हाला थेट शिव दर्शनाच्या नेब्युलात उभा करीन 


तेव्हा बघा क्रिम लावून यायचं 

की शून्यात विलीन व्हायला यायचं 


पळवाटा मी पळून जायलाच ठेवल्या आहेत 

आणि आरश्यापुढे दगड


स्वतःचं रूप असह्य झालं तर फोडायला


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरिजमधील चॅनेल  स्पिरीच्युअल 

ह्या काव्यफाईलीतून)

प्रत्येक वेळेला माझी लायकी आहे का 

असा प्रश्न का विचारू ?

कधीतरी समोरचे आपल्या लायकीचे आहे का 

हाही प्रश्न विचारावा 


आकाश मोठेच असेल 

पण आपल्याला किती व्याप्ती लागते 

जमीन मोठीच असेल 

पण आपल्याला किती जागा लागते 


किती अन्न लागते देहाला 

आणि किती लागतो ऑक्सिजन प्राणाला 


किती बाई लागते आपल्या मांसाला?

किती लागते प्रेम हृदयाला 


एक तुकडा तर आहोत आपण 

मधोमध कडमडलेला 

एक जन्म तर आहे आपण 

मरणाआधी अडलेला 

जो कधीही होऊ शकतो सडलेला


हे आयुष्याला घाबरून वामन होण्याचे वेड 

ही डरकाळीची एक्टिंग करून बळी घेण्याची हाळी 


मी रक्ताला कायमच मायक्रोस्कोप खाली ठेवतो 

मला अनेक सैतान वळवळताना दिसतात 


चॅनेल बदलणारा हात 

किती चंचल 

आणि किती मादकतेला भुलणारा 


टीव्हीच्या स्क्रीन वरून लॅपटॉपच्या स्क्रीनवर उड्या मारल्या 

म्हणजे माणूस उत्क्रांत होतो का ?


माझा पूर्वज माकडासारखा होता माकड नव्हता 


आणि यातील जो सारखा असतो ना 

जो सारखा नसतो 

त्याला मोक्ष हवा असतो 


तेव्हा समोरचे काय आहे 

आणि आपण काय आहोत 


जरा नटच मॅच होत नसतील 

तर मॅच होण्याचा अभिनय कशाला 

Screw अप होणे 

आणि खिळे ठोकले जाणे 

यांच्या गुणवत्तेत फरक काय 


मला आता ईश्वर आठवत नाही 


मी माझ्या आतून 

आतले आणि बाहेरचे न्याहाळतो 


मी आता स्वतःला ऍडजेस्ट करणार नाही 

मी आता स्वतःला नाहीसे करणार आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल स्पीरीच्युअल या 

काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय