चार नवता आणि चौथी नवता
विनोद कुमार शुक्ल (हिंदीत शुक्ला) : विधान छंदाचा अभूतपूर्व कवी गेला श्रीधर तिळवे नाईक
विनोद कुमार शुक्ल गेले ते कवितेच्या इतिहासामध्ये नेमके कुठे उभे आहेत हे कळायचे असेल तर प्रथम आपणाला कवितेचा छंदात्मक इतिहास तपासला पाहिजे .
कवितेच्या इतिहासामध्ये जगातल्या जवळजवळ सर्वच धारांच्या मध्ये टोळ्यांच्या मध्ये कवितेची सुरुवात ही नेहमीच मात्रा छंदाने झाली कारण तिथे केवळ सामुदायिक लिखाण नव्हते तर सामुदायिक गायन आणि नृत्य सुद्धा केले जाई. पुढे मग पंडित लोक घुसले आणि त्यांनी लोकपरंपरा बाजूला करून वृत्तछंदात म्हणजे अक्षरगणवृत्तात लिहायला सुरुवात केली. साहजिकच कविता म्हणजे ती छंदातच असली पाहिजे अशी धारणा अभिजात पंडिती परंपरेमध्ये घट्ट होत गेली आणि अभिजात परंपरा कायमच आपला हट्ट लोकपरंपरेवर लादण्याचा प्रयत्न करू लागली परंतु लोक परंपरेने कधीही त्याला दाद दिली नाही . यादृष्टीने मराठीतील पंडिती कवी बघण्याजोगे आहेत. आणि त्यांना समकालीन असणारे शाहिरी वाङ्मय बघावे .
त्यानंतर भारतातल्या संतांच्यापैकी मराठी परंपरेमध्ये मराठी संतांनी काही प्रमाणात एक वेगळा मात्रा छंद विकसित केला तो म्हणजे अक्षरी अभंग होय ह्यात मात्रा मोजण्याऐवजी अक्षरे मोजली जात होती. आठ किंवा सहा किंवा दहा अक्षरी लिहिणे हे त्यामुळेच उदयाला आले. मी अर्थातच हीच गोष्ट सुनिता मध्ये वापरली होती आणि अक्षरी सुनीत निर्माण केले होते ते माझ्या क.व्ही या संग्रहामध्ये आहे. (मराठी समीक्षकांना अजूनही आपल्या परंपरा नीट कळत नाहीत जिथे परंपराच नीट कळत नाही तिथे त्यांना नवता नीट कळावी अशी अपेक्षा का करावी? किंबहुना मराठी समीक्षक हा कवितेबाबत अडाणी असतो असा माझा अनुभव आहे)
पुढे मग युरोपमध्ये पुरोगामी कवितेचा कालखंड सुरू झाला आणि या पुरोगामी कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य स्वच्छंद होते . स्वच्छंद दोन प्रकारचा होता पहिला प्रकार वृत्तछंदात आणि मात्रा छंदात थोडी सैलता आणू इच्छित होता काही काही वेळा तरी स्वच्छंदीशैली खूपच सैल होत गेली. उदाहरणार्थ आपण नारायण सुर्वे यांची ऐसा गा मी ब्रह्मा किंवा माझ्या विद्यापीठ मधली कविता जर घेतली तर त्यामध्ये हा स्वच्छंद जबरदस्त रीतीने आलेला दिसतो. ज्यांना कोणाला स्वच्छंद समजून घ्यायचा आहे त्यांनी नारायण सुर्वे यांच्या कविता नक्की वाचाव्यात अर्थातच त्यांच्या आधी अशा प्रकारच्या कविता वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीने अभूतपूर्व पद्धतीने लिहिल्या आहेत त्याच्यावर मी स्वतंत्र लेख त्यामुळेच लिहिला होता . आपल्याकडे सदानंद रेगे यांनी अतिशय उत्तम मानावा असा त्याच्या कविताचा अनुवाद केलेला आहे. तो रसिकांनी पहावा .
स्वच्छंदाचा दुसरा प्रकार वृत्त आणि मात्रा ऐवजी थेट तालावर आधारित ताल छंद निर्माण करत येत होता . आपल्याकडे या प्रकारच्या अत्यंत अद्भुत कविता पु.शि रेगे यांनी लिहिलेल्या आहेत उदाहरणार्थ पुष्कळा किंवा झाडावर जे गाणे पक्षी गातो किंवा माझ्याजवळ होते या ताल छंदाचा विस्तार काही ठिकाणी दिलीप चित्रे यांनी अतिशय सुंदर केला . मी स्वतःही ताल छंदात काही कविता नंतर लिहिलेल्या आहेत. त्यासाठी मुळात तुम्हाला तबला येत असेल तर उत्तम किंवा मग तबल्याचे निदान भान तुमच्याजवळ असायला लागते. अर्थातच याबाबतीतले दुसरे कवी विंदा करंदीकर आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आणि आधुनिकतेच्या अंगाने ताल छंदातल्या कविता लिहिल्या . म्हणजे आपण असे म्हणू शकतो की पु शि रेंगे यांची कविता ही पुरोगामी ताल छंद आहे तर निंदा करंदीकर यांची कविता ही आधुनिक ताल छंद आहे . दिलीप चित्रे यांनी मग उत्तराधुनिक ताल छंद शोधला असे म्हणता येते . अर्थातच त्याकडे जितके लक्ष त्यांनी द्यायला हवे होते तितके दिले नाही मी याबद्दल त्यांच्याशी बोललेलो होतो . पण अडचण मुळात पु शी रेंगे आणि विंदा करंदीकर यांनीच करून ठेवलेली आहे या लोकांना जे साधले आहे ते पुन्हा पुन्हा साधणे हे इतके सोपे नाही . पुढे पुढे तर चित्रपटांच्या गाण्यांमध्ये हे आले म्हणजे अच्छा तो हम चलते है किंवा निसर्ग राजा ऐक सांगतो यातील निसर्ग राजा हे माझे अत्यंत आवडते तालछंदातले गाणे आहे .
यानंतर अर्थातच मग आधुनिक कविता आली आणि ह्या कवितेने ज्याला आज आपण मुक्त छंद म्हणतो तो छंद आणला याबाबतीत जो पायोनियर होता तो वॉल्ट विटमन होता आणि त्याला आता हे श्रेय निर्विवाद पण हे दिले जाते आधुनिकतेने हा फक्त उजवला नाही तर रुजवला वाढवला आणि आज हा कवितेचा मुख्य छंद बनलेला आहे. साहजिकच मग या मुक्तछंदाचा प्रभाव पडून पारंपारिक आणि पुरोगामी अशा मात्रा छंदाचा वृत्तछंदाचा स्वच्छंदाचा ढाचा अधिकाधिक मुक्त करण्याचा प्रयोग सुरू झाला आणि जगभर मग मुक्त सुनीत उदयाला आले आपल्याकडे मुक्त सुनीताची रचना अत्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतीने विंदा करंदीकर यांनी केलेली आहे . ही धारा पुढे विलास सारंग आणि दिलीप चित्रे यांनी फार सुंदर रीतीने पुढे नेली . मुक्तछंदाचा अप्रतिम वापर हे आधुनिक आणि देशीवादी लोकांचे फार मोठे वैशिष्ट्य होते जगभरातच एकंदर या काळामध्ये मुक्त गझल मुक्त सुनीत मुक्त हायकू असे प्रकार उदयाला आलेले दिसतात .
आधुनिकतेनंतर उत्तर आधुनिकतेने नवीन प्रयोग केले आणि त्यामध्ये दोन प्रयोग अतिशय महत्त्वाचे होते पहिला प्रयोग हा गद्यात्मक कवितेचा होता आणि दुसरा प्रयोग हा विधान छंदाचा होता. अर्थातच आधुनिक ताल छंद सुद्धा नंतर उदयाला आला आणि आपणाला त्याचे अप्रतिम दर्शन अरुण कोलटकर यांच्या "अरुण कोलटकर यांच्या कविता"या नावाच्या संग्रहात दिसते. पु शि रेंगे यांचा ताल छंद दिलीप चित्रे आणि विशेषता अरुण कोल्हटकर यांनी प्रचंड पुढे नेला याबाबत शंका असू नये मुख्य म्हणजे अरुण कोलटकर यांनी तो ताल छंद आधुनिक केला आणि पु शी रेगे यांच्या पुरोगामी ताल छंदाच्या छायेतून मराठी कवितेला बाहेर काढले . या अंगाने दुसरी एक अतिशय महत्त्वाची आलेली कविता म्हणजे विलास सारंग यांची उद्देशिका ! अर्थातच या अंगाने आणखी एक जमून गेलेली कविता म्हणजे हेमंत जोगळेकर यांची होड्या ( मला पुष्कळ होड्या येतात वैगरे) मराठी घाबरट मध्यमवर्गाच्या प्रेमी असलेल्या लवर बॉय चे हे मस्त प्रकटीकरण होते . त्यात एक इनोसन्स होता आणि घाबरटपणा आणि भंबेरी उडणे ही होते . त्या उलट दिशेची ताल छंदातली कविता म्हणजे विलास सारंग यांची उद्देशिका ही कविता !
ऐंशोत्तर पिढी मधील कवितांचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपणाला ही गोष्ट सांगितली पाहिजे की याच लोकांनी आपला मध्यमवर्ग सहज स्वाभाविकपणे स्वीकारला (याबाबतीत ग्रंथालीने काढलेल्या काव्यसंग्रहाला पहावे त्या त्या प्रश्नांची नीट चर्चा झालेली आहे ज्या प्रश्नांची चर्चा झालेली नाही ते प्रश्न मी इथे घेत आहे माझ्या पिढीतल्या आणि विशेषता माझ्या नंतरच्या पिढीतल्या कवींनी जरा पुन्हा एकदा या पिढीच्या मर्यादांचा अभ्यास केला पाहिजे असे हल्ली मला तीव्रतेने वाटते)प्रश्न असा आहे की यांच्यापैकी कोणालाच विनोद कुमार शुक्ल यांची उंची का गाठता आली नाही ? याचे त्या काळात मला सापडलेले जे उत्तर होते ते असे की विनोद कुमार शुक्ल तत्त्वज्ञान पचवून बसलेले होते आणि अशा प्रकारचे तत्त्वज्ञान पचवून बसण्याचा उद्योग या कवींनी केला नाही . तत्त्वज्ञानामुळे एक जे स्वतंत्र दर्शन आणि काव्य दर्शन प्राप्त होते त्यापासून हे लोक वंचित झाले आणि त्यामुळेच यांच्यापैकी कोणालाही विनोद कुमार शुक्ल यांची उंची गाठता आली नाही. प्रश्न असा आहे की मराठी मध्यम वर्गाचा हा खुजेपणा आहे का ? या पुढचा प्रश्न हिंदी मध्यम वर्गाची तात्विक उंची ही मराठी मध्यम वर्गाच्या तात्विक उंचीपेक्षा अधिक आहे का ? मी स्वतः हिंदी बेल्ट मध्ये अनेकदा हिंडलेलो आहे आणि मला हा प्रश्न अनेकदा पडलेला आहे. तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवणे हा मराठी मध्यमवर्गीय लोकांना पु ल देशपांडे यांच्यापासून मिळालेला रोग आहे . कळत नकळत या लोकांचा आधुनिक रोमांस देखील पारंपारिक रोमँटिसीजमच्या प्रभावाखाली जातो विनोद कुमार शुक्ल असे रोमँटिक होत नाही ते आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात प्रकट होत राहतात आणि इथेच ते उंची गाठण्याचे सगळे कसब प्राप्त करतात त्यामानाने आपण जर का याच पिढीतले मराठी कथाकार बघितले म्हणजे उदाहरणार्थ सतीश तांबे यांची कथा बघितली तर ते अधिक प्रगल्भ आहे हे स्पष्ट दिसते .
उत्तर आधुनिक कालखंडामध्ये गद्यात्मक कविता ही स्पष्टपणे गद्य म्हणूनच येत होती . तर विधान छंदामध्ये कवितेमध्ये विधाने येतात पण कधी कधी ही विधाने गद्य न होता त्यांना एक विशिष्ट प्रकारची लय प्राप्त होते . उदाहरणार्थ द भा धामणस्कर यांची परंपरा ही कविता ! मराठीमध्ये अशी कविता अत्यंत प्रभावीपणाने लिहिली गेलेली आहे किंबहुना हिंदीच्या तुलनेत साठोत्तरी मराठी कवी लोक याबाबतीत अधिक स्मार्ट आहेत . नामदेव ढसाळ यांच्या मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या काव्यसंग्रहामध्ये आपणाला गद्य कवितेचे काही उत्तम नमुने मिळतात. एका इतिहासाबाबत अडाणी असलेल्या कवीने याबाबतीत अलीकडे गद्य कविता लिहून जणू काय आपणच शोधली आहे असा दावा केला होता मी अर्थातच प्रतिवाद केला नाही कारण दरवेळेला कुठे प्रतिकार करत बसा. पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक उत्तम गद्य कविता लिहिल्या गेल्या. मी स्वतः काही गद्य कविता लिहिल्या आहेत आणि चॅनल अंडरवर्ल्ड मध्ये अशा दोन गद्य कविता आहेत. पण अर्थातच मी कधी श्रेय घेतले नाही कारण मराठीत नामदेव ढसाळ यांनी आधीच या प्रकारचे काम केले आहे याची मला कल्पना होती आणि दुसऱ्यांचे श्रेय लाटणे माझ्या नैतिकतेत बसत नाही . आपण आपल्या आधी शोधली गेलेली गोष्ट अधिक विकसित करू शकतो आणि ती केलीच पाहिजे पण जर का ते श्रेय आपले नसेल तर ते आपण ते घेता कामा नये. कधी कधी अपवादात्मक वेळेला असे होते की मराठीत आपण सुरुवात करतो म्हणजे मराठीत मुक्त गजलेची मी सुरुवात केली असेल परंतु मुक्त गजलेची मी सुरुवात केलेली नाही ती आधीच उर्दूमध्ये कोणीतरी केलेली आहे हे सांगण्याचे कारण की हल्ली काही लोकांना नैतिकता नावाची गोष्ट मानवत नाही. अर्थातच चिन्ह गजलेची सुरुवात मात्र मी केलेली आहे जगात इतरत्र मात्र ती अजून मी पाहिलेली नाही उद्या जर काय कोणी त्या संदर्भात माझ्या काही लक्षात आणून दिले तर तेही श्रेय मी त्या व्यक्तीला देईन किंबहुना दिले पाहिजे अनेकदा जगातली सगळी कविता आपण वाचत नसतो आणि आपल्या अपरोक्ष अनेक प्रकार चाललेले असतात. अशा वेळेस इतिहास पुन्हा लिहावा लागतो आणि तो खुद्द स्वतःच्या बाबतीत पण असू शकतो .
माझ्या आवडीचा दुसरा उत्तर आधुनिक प्रकार म्हणजे विधान छंद ! या प्रकारच्या कवितेमध्ये फक्त विधानाची विधानलय सांभाळत कविता निर्माण केली जाते . मराठीमध्ये वसंत आबाजी डहाके यांनी अशा प्रकारच्या काही कविता लिहिलेल्या आहेत . त्यांची मुक्तछंदातली अप्रतिम कविता म्हणजे योगभ्रष्ट होय . (त्यात गद्यात्मक कवितेचाही पडसाद आहे)पण अपवादात्मक वेळेला त्यांनी विधान छंद पण सांभाळलेला दिसतो .
विनोद कुमार शुक्ल यांचे सर्वात मोठे यश जर कुठे असेल तर ते ह्या विधान छंदात आहे. मुळातच हिंदीमध्ये विधान छंद हा अतिशय उत्तम रित्या विकसित होत गेला . या छंदामध्ये केवळ विधानांनी कविता निर्माण केली जाते त्यामुळे अनेकदा ही कसली कविता हे तर गद्य आहे अशा प्रकारचे ऑब्जेक्शन येऊ शकते. पण मला वाटते की विनोद कुमार शुक्ल हे कदाचित एकमेव असे कवी असतील की ज्यांच्या कवितेवर असे ऑब्जेक्शन घेणे इतरांना खूप अवघड गेले.
मुक्त छंद आणि विधान छंद असे दोन्ही प्रकार त्यांनी आपल्या कवितेत आजमावलेले दिसतात. आता त्यांची सध्या मृत्यूनंतर गाजत असलेली पुढील कविता घ्या. ही कविता पुढील प्रमाणे आहे .
जो मेरे घर कभी नहीं आएँगे
मैं उनसे मिलने उनके पास चला जाऊँगा। एक उफनती नदी कभी नहीं आएगी मेरे घर नदी जैसे लोगों से मिलने नदी किनारे जाऊँगा कुछ तैरूँगा और डूब जाऊँगा| पहाड़, टीले, चट्टानें, तालाब असंख्य पेड़ खेत
कभी नहीं आएँगे मेरे घर खेत-खलिहानों जैसे लोगों से मिलने गाँव-गाँव, जंगल-गलियाँ जाऊँगा।जो लगातार काम में लगे हैं मैं फ़ुरसत से नही उनसे एक ज़रूरी काम की तरह मिलता रहूँगा| इसे मैं अकेली आख़िरी इच्छा की तरह सबसे पहली इच्छा रखना चाहूँगा।
ही पाच किंवा सहा विधानांची कविता आहे पण अख्खा डावा विचार कोळून पिल्यासारखी ती येते. आणि तरीही पारंपारिक अर्थाने ती मार्क्सवादी नाही तर श्रमिक वादी आहे . एक भारतीय स्पर्श त्या कवितेला आहे. विधाने आहेत पण ती तोडून व्यवस्थित कवितेसारखी मांडलेली आहेत. त्यांच्या अशा अनेक कविता दाखवता येतील . आमच्या नव्वोदत्तरी पिढीमध्ये अनेक लोकांनी विधानात्मक कवितांची जी प्रेरणा घेतली ती हिंदी मधून आलेली आहे . विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशातील कवी! आम्ही कोल्हापूर साईड आणि कोकण मधून आलेले कवी हिंदी पासून प्रभावीत नाही आहोत त्यामुळे आमचा विधानात्मक छंद हा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाला (माझा तो युरोपियन कवींच्यामुळे डेव्हलप होत गेला)परंतु विदर्भ आणि मराठवाडा विशेषता विदर्भ हा अनेक वर्षे ब्रिटिश काळामध्ये हिंदी बेल्टशी निगडित असल्याने हिंदीच्या कवितांचा जबरदस्त प्रभाव त्यावर पडतो. हे लोक हिंदीला अकारण चढवून असतात आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र वाले याबाबतीत अपवाद आहोत . आमचे सर्व काही दख्खन असते अर्थात देशीवादाच्या प्रभावाखाली आलेले कवी सोडून ते मात्र मुर्खासारखे आपली दख्खन परंपरा विसरतात आणि नेमाडे यांची मराठवाडा परंपरा किंवा विदर्भ परंपरा ते स्वीकारतात.
साहजिकच तुम्ही जर का बारकाईने पाहिले तर विनोद कुमार शुक्ल यांच्या मृत्यूचे सर्वाधिक दुःख हे विदर्भातून आलेले दिसते आणि ते आलेच पाहिजे कारण हा एक अव्वल कवी होता याबद्दल शंका नाही . माझ्या स्वतःच्या आयुष्यात त्यांची कविता खूप उशिरा आली . पण मला असे अनेक कवी माहिती आहेत ज्यांच्यावर त्यांचा प्रभाव आहे .
ज्यांना कोणाला विधान छंद वापरायचा असेल त्याने विनोद कुमार शुक्ल यांची कविता एकदा तरी नीट वाचलीच पाहिजे असा माझा आग्रह असतो. मुख्य म्हणजे ते विधाने कशी तोडतात आणि कशी जोडतात ते कवितेच्या संदर्भात पाहिले पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे.
प्रश्न असा आहे की मग कविता त्यांच्यात विधानातून निर्माण कशी होते . तर अनेकदा विधान छंदामध्ये विधाने रूपकात्मक पद्धतीने मेटाफोरिकल सादर केली जातात आणि त्यामुळे ही रूपकात्मकता काव्य बनत जाते. अशा प्रकारची रूपकात्मता नसली की मग ती कविता कविता उरत नाही गद्य बनून जाते . त्या कवीचा केशवसुत होतो म्हणजे असे की केशवसुत फार अप्रतिमरित्या वृत्तछंदात किंवा मात्रा छंदात लिहायचे. पण तरीही रूपकात्मता कमी पडल्यामुळे ती कविता अनेकदा गद्य होऊन जायची . जिथे जिथे त्यांना यश मिळायचे तेव्हा मात्र ते त्या काळाचा विचार करता खूप भव्य असायचे म्हणजे झपूर्झा ही कविता !
विनोद कुमार शुक्ल यांचा केशवसुत झाला नाही आणि याचे कारण मुळात ते ज्या काळात आले होते त्या काळामध्ये कवींची कवितेविषयीची पुरोगामी ,आधुनिक आणि उत्तर आधुनिक समज वाढलेली होती. केशवसुतसुद्धा ज्या परिस्थितीत लढायचे लिहायचे त्या काळामध्ये कवितेविषयीची पुरोगामी समजच प्रस्थापित न झाल्याने त्यांना प्रथम ती समजच रुजवावी लागली आणि त्यामध्ये त्यांचा खूप वेळ वाया गेला मला तर अनेकदा असे वाटते की केशवसुत अधिक जगते तर ते फार काहीतरी उत्तम काम करून गेले असते पण दुर्दैवाने त्यांना इंग्लंड मधल्या कवींना मिळालेले स्वातंत्र्य आणि स्वतंत्र काळ पण मिळाला नाही आणि पुढे आयुष्य पण मिळाले नाही.
विनोद कुमार शुक्ल यांना असा काळ मिळाला आयुष्य मिळाले. अनेकदा ते उत्तरपुरोगामी आशय आपल्या कवितेतून आणि कादंबरी मधून सुद्धा सादर करायचे परंतु त्याला एक उत्तराधुनिक टच असायचा . शमशेर या कवीने काही वेगळ्या अशा कविता हिंदीमध्ये लिहिल्या होत्या त्या कविता पुढे घेऊन जाणारी अशी त्यांची कविता होती. गजानन माधव मुक्तिबोध जसे स्वतःला श्रमिकांशी जोडून घेत होते तसेच शुक्ल सुद्धा जोडून घेतात परंतु आपला खास मध्यमवर्गीयपणा ते अजिबात लपवत नाही आणि इथेच ते गजानन माधव मुक्तीबोधांच्यापेक्षा वेगळे होतात . गजानन मुक्तिबोध काही झाले तरी आपण प्रोलीटरिएट वर्गाशी पूर्णपणे तादात्म पावले पाहिजे अशी निकराची भूमिका घेताना दिसतात विनोद कुमार शुक्ल असा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये सुद्धा ही सहजता आढळते . मराठीमध्ये ही मध्यमवर्गीय सहजता सहसा अनेकांना साधत नाही आणि तिथेच आपणाला विनोद कुमार शुक्ल वाचण्याची गरज निर्माण होते.
ते गेले पण त्यांनी एक उत्तम कवितेचा उत्तम कादंबरीकाराचा वारसा आपल्यासाठी सोडलेला आहे . हिंदीमध्ये असा वारसा आमच्या पिढीमध्ये कोण पुढे नेतो आहे याचा एकदा आढावा घेतला पाहिजे. माझी त्यांना आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
अर्वाचीन स्वच्छंद वादी कवितेचा दुसरा जनक श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर हे माझे नाव माझ्या वडिलांच्या वडिलांचे असलेले पण मराठीत आपल्या नावाचे कुणी आहे का म्हणून शोध घेताना दोन श्रीधर सापडले आणि आश्चर्यकारकरीत्या दोघेही समकालीन लोकांच्या पेक्षा अधिक लोकाभिमुख होते . एकाने रामायण महाभारत व्यवस्थित आणले आणि दुसरा श्रीधर कुलकर्णी मात्र प्रचंड बंडखोर होता. त्याने ब्राह्मण असूनही सर्व काही धुडकावले आणि आपल्या पद्धतीने जीवनशैली निर्माण केली त्याने आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारणीवर प्रेम केलं आणि त्यांचा रोमान्स हा खऱ्या अर्थाने रोमँटिक होता . अर्वाचीन होता कारण तो ब्राह्मण आणि महार या भारतीय समाजातील सर्वात उच्च आणि सर्वात निम्न असा दोन जातींच्या मधला लिविंग रिलेशन होता. अर्थातच हे सर्व शक्य होते याचे कारण तो शैव होता त्याचा पहिला साक्षात्कार वाराणशीलाच होता म्हणजे काशीला होता त्याच्या भाषेत विश्वेश्वर आणि रुद्र ! आपली ओळख करून देताना त्याने या दोघांचे नाव घेतलेले आहे शैव हे कायम कसे वेगळे असतात हा प्रश्न मराठीला पडत नसतो पण मला कायम पडत असतो कारण मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे कायम वारकरी असतात किंवा वेदांती वैदिक ! त्याच्या आयुष्याची तुलना जर का आपण युरोपमधल्या रोमँटिक कविता लिहिणाऱ्या कवींशी केली तर कदाचित हा मराठी कवी त्यांच्यापेक्षा सरस जीवनशैलीचा वाटेल कारण तिकडे वर्ण जात नव्हती आणि आंतर वर्णीय आंतरजातीय नाते काय त्रासातून करावे लागते टिकवावे लागते याची कदाचित युरोपियन लोकांना कल्पना ही येणार नाही माझा स्वतःचा आजोबा याचा फॅन होता कारण आंतरजातीय विवाह करण्याचे धाडस माझ्या सुदैवाने माझ्या दोन्ही आजोबांनी केले माझा मातुल आजोबा हा चक्क प्रभू घराण्यातून बायको करून आणलेला होता माझी आजी ज्यांना आजकाल कायस्थ म्हणतात त्यांच्यातून त्यांच्यातून आली होती
अर्थातच त्याचे लिजंड बनणे अटळ होते आणि तो बनला त्याचे नाव पठ्ठे बापूराव ! ब्राह्मण असूनही तमाशा करणारा आणि नामचंद पवळा नावाच्या तमासगिरीणीच्च्या प्रेमात पडलेला !
त्यांचा आणि केशवसुत यांचा जन्म 1866 सालीच व्हावा हा एक योगायोग (पठ्ठे बापूराव जन्म ११- ११- १८६६ आत्ताचा सातारा पूर्वीचा सांगली, गाव हरणाक्ष रेठरे )दोघेही ब्राह्मण परंतु दोघांनी दोन दिशा पकडल्या यामध्ये त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीचा वाटा किती हा एक फार मोठा विषय आहे . केशव सुत कायमच वेदांती राहिले पण वेदांती असणे सुद्धा त्या काळात पुरोगामी गोष्ट होती . पण पठ्ठे बापूराव खऱ्या अर्थाने क्रांतिकारक कारण त्यांची जीवनशैली क्रांतीकारक होती. ज्या काळात तमाशा अटेंड करणे गुन्हा होता त्या काळामध्ये त्यांनी खुद्द तमाशा केला आणि अतिशय मनापासून केला. एकदा लावणी लिहायला घेतली कि ती लिहूनच संपवायची आणि तिच्यात दुरुस्ती करायची नाही असा काहीतरी विचित्र बाणा त्यांचा होता. पैशाबाबत ही तेच प्रचंड उधळपट्टी करणारा स्वभाव हे त्यांचे वैगुण्य होते . त्यामुळे म्हातारपण अत्यंत हलाखीत गेले . बापूसाहेब जिंतीकर यांनी जर का त्यांच्या लावण्या प्रकाशित केल्या नसत्या तर कदाचित त्यांनी काय काम केले हे कळालेच नसते. त्यांनी मुंबई पुणे कोल्हापूर वगैरे सर्व शहरांच्या वर लावण्या लिहिल्या आणि ही अर्वाचीन सुरुवात होती . हे काम केशवसुत यांच्या कामाइतकेच महत्त्वाचे होते . त्यांना त्यांच्या गावाने बहिष्कृत केले यात आश्चर्य नाहीच त्यांना मोरे लोकांनी आश्रय दिला.
पवळा ही त्यांच्या मनाची राणी ! साहजिकच तिच्याबरोबरच त्यांचा शृंगार त्यांच्या रचनांच्या मध्ये सुद्धा उतरला हा खरा रोमांस होता केशवसुतांच्या सारखा तो मध्यमवर्गीय नव्हता .
त्यांच्या लिखाणाची सुरुवात अर्थातच ओवी पासून झाली होती मग ते कविता रचायला लागले. त्यांच्या घराच्या शेजारीच पूर्वाश्रमीच्या महारांचे राहणे होते आणि त्यांची लावणी कवने कानावर पडत होती घरचे नाव श्रीधर आणि ते केवळ कवी नव्हते संगीतकार पण होते . स्वतःच्या कवनाच्या संगीत रचना त्यांना सुचत . हळूहळू हलगी डफ अस्वस्थ करायला लागला आणि पुढे मग वाटचाल सुरू झाली. भवताली अत्यंत प्रेरणा देणारे असे औंध संस्थान होते.
रेठरे हरणाक्ष माझे घर |
जंगली बाबांचा हात शिरावर|
त्यांनी पंथ दावीला राजयोग सुंदर |
अशी आध्यात्मिक विरासत त्यांनी सांगितलेली आहे . जंगली महाराज हे सद्गुरु होते आणि कट्टर योगी राजयोगी !
एक ब्राह्मणाचा मुलगा तमाशा सारख्या लोककलेच्या नादाला लागतो आणि अस्पृश्यांच्यात मिसळतो हे पचणे अवघडच होते त्यामुळे टीका सुरू झाली पण तमाशा ही पॅशन झालेल्या बापूराव कुलकर्णी म्हणजे श्रीधर कुलकर्णी या माणसाला काही स्वस्थ बसवेना . सुरुवातीला चोरून रचना पुरवणे सुरू होते नंतर हळूहळू उघड होत गेले . या रचना छंदात असूनही मुक्त होत्या उदाहरणार्थ
लग्न लावले कुटुंब केले
कळत असोनी टाकली उडी
यामध्ये आठ मात्रांचे पादा कुलक आहे पण पुढे
पायात बेडी बळे अडकवली
येऊन बसल्या बारा नडी
यामध्ये पायात बेडी नऊ मात्रा आहेत येऊन बसल्या दहा मात्रा आहेत तर बारानडी सात मात्रा आहेत
मला मुक्त गझल सुचण्यामध्ये या लोक परंपरेचा खूप मोठा वाट आहे . गाताना ह्या सर्व आठ मात्रा होऊन जातात .
अर्थात हे करताना एके ठिकाणी ते म्हणतात
वेदशास्त्र आणि पुराने वर्जुनी भलतीच वटा वटा
एकंदरच हा वट वेगळा होता त्यांच्या भाषेत भलताच होता .
त्यांची देशाची लावणी कळत नकळत केशवसुतांच्या मार्गी परंपरेला दिलेला देशी छेद आहे स्वतःच्या अवकाशात ठाम उभे राहणे हे इथे चांगले साधले आहे
पवळाबरोबरचा त्यांचा रोमान्स सुद्धा देशी पद्धतीनेच अवतरत राहिला
त्यांच्याच भाषेत सांगायचे तर
लाखो बायकात खरी ग देखणी
तुझ्या ग वानी आम्ही नाही पाहिली कोणी ग
अशी पवळा होती .
आता अशा प्रेमप्रकरणात वर्ण संघर्ष जाती संघर्ष अटळ असतो तसा तो झाला आश्चर्य म्हणजे यामध्ये बहुजन समाज होता. हरिभाऊ किवलेकर हे पूर्वाश्रमीचे महार आणि भागुजी माळी यांनी पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांना वाळीत टाकावे असा प्रस्ताव दिला . साहजिकच साथीदार मिळणे अवघड होऊन बसले कारण त्या काळामध्ये वाळीत टाकणे हे फारच कठोर असे .
ब्राह्मणाचा महार झाला असाही आरोप आला. बहिष्कार पडल्यामुळे साहजिकच फड उभा राहणे शक्य नव्हते विवंचना वाढत गेल्या
शेवटी पट्टे बापूराव यांनी सर्वांना बोलावून विचारले की आमचे (म्हणजे पवळा आणि मी) काय करणार आहात
तर समोरच्या लोकांनी विचारले की काय करावे तर मग त्यांनी सूचना दिली की आम्हा दोघांनाही विका
शेवटी एलफिस्टन थिएटर चे मालक अबू सेट यांनी दोघांना दरमहा 900 रुपयांना विकत घेतले
अर्थात सेठ पुढे प्रश्न आला की आता मायना 900 रुपये द्यायचे कसे तर पठ्ठे बापूराव यांनी सल्ला दिला की आम्हा दोघांना तुम्ही प्रदर्शनात उभे केल्यासारखे उभे करा आम्हाला पाहायला लोक येतील आणि लोक खरोखरच यायला लागले दरदिवशी 300 ते 400 रुपये उत्पन्न यातून उभे राहिले एकंदर शेठला फायद्याचा सौदा ठरला इतकी पवळाची क्रेझ होती . अर्थात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मानसिकतेवर बराच प्रकाश टाकते
यातून पुढे जे होणार होते ते झाले ते म्हणजे ब्राह्मण बाटला किंवा नाही बाटला यावर वाद सुरू झाले मारा माऱ्या झाल्या आणि कोर्टात केस सुरू झाली शेवटी यावर उत्तर म्हणून बापूरावाने कोर्टाला चक्क पीला हाऊस मधल्या तमाशाच्या फडात उभे केले एक फार्स सादर केला तेल्याच्या मेलेल्या बैलाचा फार्स असे त्याचे नाव होते . स्वतः स्टेजवरून मी महार झालो आहे असे समजा असे डिक्लेअर केले आणि शेवटी कोर्टाकडे फैसला गेला कोर्टाने निर्णय दिला की बाटवा बाटवी काही झालेली नाही .
या खटल्यामुळे पठ्ठे बापूराव प्रचंड गाजले मुंबईची लावणी ही नंतर आली जी प्रचंड गाजली आणि अर्वाचीन कवितेमध्ये तिचे एक स्थान आहे. नामदेव ढसाळ चा मानला गेलेला गोलपिठा प्रथम या मुंबईच्या लावणीत येतो याची अनेकांना कल्पना नाही .
आत मधी किर्तन वरून तमाशा ही ओळसुद्धा बापूरावांची आहे लाखात अशी देखणी किंवा नटरंगी नार हे सुद्धा बापूरावांचेच कवन!
अलीकडे जे ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही हा डिबेट झाला त्या संदर्भात सुद्धा बापूरावांच्या फार उत्कृष्ट अशा दोन ओळी आहेत बापूराव लिहितात ,
"किती देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे
जे का तुझ्या भक्तीशी लागले
तितुक्यांची तू बुडवली घरे "
पुढे करवीर नगरीत शाहू महाराजांनी जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा तिथे तमाशा करताना त्यांनी कोल्हापूरची लावणी रचली ती सुद्धा त्या काळाचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे
शाहू महाराजांनी अर्थातच त्यांचा जरी फटका देऊन आणि सोन कडे देऊन गौरव केला पवळाला सोन्याचे दोन तोडे दिले
आणि मग पुढे मुंबईच्या बटाट्याच्या चाळीत दोघांचा अन ऑफिशियल संसार थाटला गेला . काही काळ हे सर्व उत्तम चालले परंतु एक दिवस कळत नकळत फेट्यासाठी म्हणून पवळाचे लुगडेच वापरले गेले आणि ठिणगी पडली नंतर मग दागिने गेले आणि हे दागिने तिच्याच लोकांनी लुटले होते साहजिकच घातलेली केस काढून घ्यावी लागली आणि इथे दुसरे मतभेदाचे कारण वाढू लागले. बापूरावांना शिक्षा दिली गेली पाहिजे होती असे वाटत होते तर पवळाला आहे ही सर्व माणसे तुरुंगात गेली तर तमाशा बंद पडला असता असे वाटत होते. जेव्हा दोन्ही लोक बरोबर असतात तेव्हा मग मतभेद मिटवणे फार अवघड जाते तेच इथे घडले तणतण वाढत गेली आणि एक दिवस पवळा निघून गेली
जेव्हा दोघात मतभेद होतात तेव्हा तिसरा आपोआपच येतो मारुतीराव पाटील यांच्या निमित्ताने आपोआपच तिसरा पक्ष पवळाच्या आयुष्यात आला त्यांनी पवळाच्या सर्व अटी मान्य करून तिचा तमाशा उभा केला. दागिने जसे पूर्वी होते तसेच करून दिले .
"द्यावा एक मुका चांगला "अशी कवनातून थेट किस ची मागणी करणारे पठ्ठे बापूराव कुलकर्णी हे मात्र पवळा गेल्यानंतर हताश झाले.
मग त्यांचा डर मधला शाहरुख खान झाला त्यांनी प्रथम पवळाला शेवटची आठवण म्हणत चार जरीची पातळे भेट दिली आणि नंतर पोलीस स्टेशनला त्यांच्या चोरीची तक्रार केली . प्रेमभंग झाला म्हणून असे काही करणे हे चुकीचे होते कळत नकळत तुम्ही प्रेमात सूड घ्यायला जाता पण असे सूड अंगलट येतात स्वतःला राजयोग दीक्षा घेतली म्हणणारे बापूराव कळत नकळत इथे मात्र चुकले. खरे तर बाई स्वतःच्या मर्जीने बाहेर पडून ती दुसऱ्याकडे गेली की आपण शांत पाठ फिरवावी आणि तिला मोकळे करावे पण काही प्रेमी लोकांना ते जमत नाही . यामागे अर्थातच पझेसिव्हनेस असतो . शेवटी मग
सारा मायेचा बाजार
तीन दिवसाचा गे भार
अशी उपरती त्यांना झाली
पण पुढे पवळाचे आणि मारुतीरावांचे एका व्यक्तीने तिचा तमाशा मध्येच हात धरला यावरून बिनसले मारुतीरावांनी पण पोलीस स्टेशनात तक्रार केली पवळाने आपले दागिने चोरले अशी! पण पवळाने दागिने आपल्या नावाने खरेदी केल्याची पावती सादर केली आणि हा खटला जिंकला पुन्हा पठ्ठे बापूराव आणि पोवाडा एकत्र आले पुन्हा तमाशा सुरू झाला पुन्हा प्रेम पण
खाली जमीन अंथरेण
वर आकाश पांघरेन
मानत सुरू झाले
कुठल्याही प्रेमप्रकरणात विशेषता समाजमान्य नसलेल्या रोमँटिक प्रेम प्रकरणात समाज येतोच तसा तो इथेही आला अचानक गावकऱ्यांनी बापूराव यांच्यापुढे त्यांनी पुन्हा ब्राह्मण धर्मात परतावे असा आग्रह धरायला सुरुवात केली त्यासाठी 300 रुपयाची वर्गणी जमवली आणि त्यांनी काशीला जाऊन शुद्धीकरण करावे असाही बूट निघाला अर्थात एकदा का पठ्ठे बापूराव ब्राह्मण धर्मात परतले तर ते आपल्याला टाकतील अशी भीती पवळाच्या मनात निर्माण झाली जी एका अर्थाने त्याकाळची सामाजिक परिस्थिती बघता योग्य होती पण मला नेहमी वाटते की तिने थोडासा विश्वास ठेवायला हवा होता तिने गाव सोडले आणि मुंबईला आली बापूराव पुन्हा एकदा तिला समजावण्यासाठी आले परंतु कळत नकळत कुठेतरी ही भीती आता दगड बनली होती . साहजिकच पवळा हलली नाही आणि ती आपल्या गावी गेली
इकडे बापूरावांनी नवा तमाशा उभा करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केले आणि ताई मरींचेकर हिच्याबरोबर फड उभा केला परंतु तो जितका चालायला हवा तितका चालला नाही कारण त्यात पवळा नव्हती . आपल्यामुळे फड चालतोय असे वाटणाऱ्या बापूरावांना हा धक्का होता . खरे तर दोघांच्यामुळे ही तो चालत होता परंतु आता हा फड चालेना . शेवटी मग पट्टे बापूराव यांनी 1836 मध्ये तमाशातून निवृत्ती घेतली
इकडे पवळाची ही स्थिती वेगळी नव्हती शेवटी वय झाले होते आणि आजार बळवले होते साहजिकच आयुष्याच्या शेवटी तिला बापूरावच आठवायला लागले . त्यांचे तिच्यावर निस्सीम प्रेम होते आणि ते प्रेम आठवत शेवटी मुंबईत भावाकडे आलेल्या पवळ्याने 1936 यावर्षी प्राण सोडले
ही प्रेम कहानी दोन्ही बाजूने तीव्र होती तिच्यात खरे होते नखरे होते एकमेकांवरचे जीवापाड प्रेम होते आणि सूड सुद्धा होते.
त्या काळामध्ये व्हिडिओ शूटिंग फारसे प्रचलित नव्हते त्यामुळे आपणाला पवळाची कला माहीत नाही परंतु पवळाला एक गोष्ट नक्की माहिती होती ती म्हणजे त्यांच्या लावण्या नंतर टिकतील आणि गायल्या जातील . तसेच झाले .
पठ्ठे बापूराव आणि केशवसुत यांची आपण तुलना केली तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे दोघांचीही शैली वर्णनपर आहे दोघांच्या जवळ कल्पनाविलास खूप कमी आहे अधून मधून तो डोकावतो परंतु तरीही आत्ताच्या काव्याच्या स्टॅंडर्ड च्या दृष्टीने तो कमी पडतो . रूपकात्मक ओळी फार कमी येतात त्यापेक्षा अधिक वास्तववादी सरळ पद्यात्म ओळी येतात . कळत नकळत त्याकाळची ही काव्यशैली होती आणि ती दोघांच्यातही दिसते . ज्योतिबा फुले यांच्यामध्येही हे दिसते . अर्वाचीन कवितेचा आरंभ हा ज्योतिबा फुले यांच्यामुळे झाला असला तरी आणि ते सुधारणावादी होते हे खरे असले तरी केशवसुत आणि बापूराव हे दोघेही एका अर्थाने रोमँटिक परंपरा आणत पुढे सरकले . मात्र पद्यात्मक लिहिणे कळत नकळत या तिघांच्याही लिखाणांमध्ये कॉमन फॅक्टर आहे . फार अपवादात्मक वक्रोक्ती येते. मीटर मध्ये लिहिताना प्रत्येक वेळेला अभूतपूर्व काही असे निर्माण होते ही एक फार मोठी चुकीची समजूत आहे हे या तिघा कवींच्यामुळे कळते . मात्र या तिघांनीही त्यांच्या काळाचा विचार करता फार पुढची कविता लिहिली. विशेषतः आशयाच्या संदर्भात त्याबद्दल शंका असू नये. तिघांनाही समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक वाटत होते आणि हाही एक कॉमन फॅक्टर आहे . एका अर्थाने तिघांच्याकडेही एक सामाजिक बांधिलकी होती यातील केशवसुत फार क्रांतिकारक जगले नाहीत परंतु ज्योतिबा फुले आणि पठ्ठे बापूराव हे मात्र अफलातून क्रांतिकारक आयुष्य जगले याबद्दल शंका नाही . आपल्या आयुष्यातील आलेल्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून तू सवता आन असे म्हणणारे ज्योतिबा फुले आणि ब्राह्मण आणि महार अशा दोन टोकांच्यावर जन्मलेले असूनही पवळाच्या प्रेमात पडणारे तिच्यासाठी महार होणे पत्करणारे आणि पुढे जाऊन पुरुषसत्ताक समाजामध्ये पवळाची अफेयर झाली तरी तिला तितक्याच पुन्हा प्रेमाने स्वीकारणारे पठ्ठे बापूराव हे काळाच्या मानाने फारच पुढे गेलेले होते आश्चर्यकारकरित्या आपण त्या काळातल्या मराठी समाजाचा विशेषता बहुजन मराठी समाजाचा विचार केला तर दिसते असे की या पठ्ठे बापूराव पवळा जोडीला निव्वळ पाहण्यासाठी सुद्धा लोक येत होते म्हणजे खरोखरच आंतरजातीय अंतर वर्णीय विवाहावर बहुजन समाजाकडून बहिष्कार टाकला जात होता का असा एक मोठाच पेच उभा राहतो पोलीस स्टेशनमध्ये पवळा जेव्हा गेली तेव्हा अस्पृश्यता पाळली गेली होती का असाही प्रश्न निर्माण होतो . त्या काळातले समाज वास्तव जसे आपल्यापुढे सादर केले जाते तसे ते होते का हा प्रश्न या दोघांच्या आयुष्याच्या संदर्भात अधिकच तीव्रपणाने उभा राहतो . ही प्रेम कहानी जितकी सरळ वाटते तितकी ती नाही तिच्यात सामाजिक जीवनाचे विशेषता मराठी बहुजन सामाजिक शैव समाजाचे अनेक पेच लपलेले आहेत . मराठीतील अर्वाचीन कवितेचे तीन पायोनियर त्यातील दोन शैव आहेत हा केवळ योगायोग नाही प्राचीन बद्दल मी आधीच बोललेलो आहे . असो.
माझा त्यांना म्हणजे पवळा आणि पठ्ठे बापूराव या दोघांनाही मानाचा मुजरा !
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment